नदीकाठचे रत्न स्पेनमधील
सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
नदीच्या काठी किंवा एखाद्या तळ्यापाशी फिरायला गेलो की नकळत माझी नजर माझ्या आवडत्या रत्नांना शोधू लागते—काही लाल, निळी तर काही हिरवी. यांपैकी एखादे कधी मला एखाद्या पानावर निपचित विसावलेले, तर एखादे पाण्यावर तरंगत असलेले तर आणखी एखादे अचानक माझ्या डोळ्यांसमोरून वेगाने जाताना दिसते. मी जे रत्न शोधतोय ते म्हणजे चतुर—कीटक विश्वाचे चकाकणारे “हेलिकॉप्टर.”
कित्येक वर्षांपूर्वी जंगलामध्ये अचानक आढळलेल्या एका शांत ओढ्यापाशी या उडणाऱ्या रत्नांनी माझे लक्ष वेधले. तेथे कितीतरी चतुर सूर्यप्रकाशात जणू नृत्य करत असलेले मला दिसले—काही चकाकत्या निळ्या धातूसारखे तर काही लखलखत्या हिरवट पिवळ्या रंगाचे. मी तासभर त्यांचे हवाई नृत्य पाहात होतो, जंगलातल्या त्या परिसराचे तेवढ्यापुरते एखाद्या नृत्यांगणात रूपांतर झाले आहे असा भास झाला. तेव्हापासूनच या रत्नांविषयी माझी जिज्ञासा जागृत झाली.
चतुरांविषयी मला जसजसी माहिती मिळत गेली तसतसे मला त्यांच्या सौंदर्याचे आणि मोलाचे अधिकाधिक कौतुक वाटू लागले. मला लागलेला पहिला शोध हा की चतुर (ड्रॅगनफ्लाय) आणि डॅम्सलफ्लाय हे वेगवेगळे असतात. चतुर हे तरबेज उड्डाणपटू असतात आणि सहसा त्यांचा आकारही मोठा असतो, तर डॅम्सलफ्लाय त्यांच्या नावाप्रमाणेच, म्हणजे इंग्रजीत डॅम्सल या शब्दाच्या अर्थाप्रमाणे—काहीसे नाजूक असतात आणि त्यांचे उड्डाणही तितके वेगवान नसते. त्यांच्या पंख धरण्याच्या पद्धतीतही मुख्यतः फरक आढळतो. विश्रांती घेताना चतुर सहसा आपल्या पंखांच्या दोन्ही जोड्या क्षितिज समांतर पसरून बसतो, पण डॅम्सलफ्लाय त्यांना आपल्या शरीरावर जुळवून उभे धरतात.a
हे चतुर हवेत इतक्या सहजपणे डास कसे काय पकडू शकतात याचे मला नवल वाटले. आपल्याला तर बुवा, स्वयंपाकघरातल्या भिंतीवर आरामशीर बसलेली भली मोठी माशी मारताना देखील नाकी नऊ येतात. मला प्रश्न पडला, ‘माझ्याजवळ नाही असं या चतुराजवळ आहे तरी काय?’ चतुराजवळ दोन गोष्टी आहेत: हवेवर पूर्ण प्रभुत्व आणि त्यांचे डोळे; असे डोळे की एखाद्या वॉचमनला हेवा वाटावा.
चतुराचे उड्डाण
स्पेनमध्ये चतुराचे टोपणनाव हेलिकॉप्टरच आहे; पण त्याची हेलिकॉप्टरशी तुलना करणं म्हणजे त्याचा चक्क अपमान आहे. हवेतल्या त्यांच्या कसरती इतक्या काही जलद असतात की कधीकधी तर त्या पाहणेही अशक्य बनते. झटके देत, काही जातींचे चतुर ताशी जवळजवळ ५५ किलोमीटरची वेगवान गती देखील गाठू शकतात. ते तरंगू शकतात, मागच्या किंवा पुढच्या दिशेने किंवा आजूबाजूला देखील क्षणार्धात उडू शकतात. त्यातल्यात्यात, चतुर हवेत आकस्मिक वळण घेतात तेव्हा, वैज्ञानिकांनी लावलेल्या हिशोबाप्रमाणे त्यांना जवळजवळ २.५ G एवढी प्रेरणा झेलावी लागते.
चतुरांना मऊ पापुद्र्यासारख्या पंखांच्या दोन जोड्या असतात. हे पंख दिसायला नाजूक असले तरीसुद्धा, ते दर सेकंदाला चाळीस वेळा फडफडू शकतात आणि त्यांना धक्का लागला तरीसुद्धा फारसे नुकसान होत नाही. या पंखांचे वर्णन करताना जीवशास्त्रज्ञ रॉबिन जे. वूटॉन यांनी त्यांस, “कल्पक रचनाकारीचे इवलेशेच पण सर्वश्रेष्ठ नमुने” म्हटले.
ते पुढे म्हणतात की, “कीटकांच्या पंखांची क्रिया आपल्याला जसजशी समजू लागते तसतशी त्यांची रचना आणखीन गुंतागुंतीची आणि अप्रतिम भासू लागते. . . . यंत्रसुद्धा त्यांची काय बरोबरी करू शकतील.” म्हणूनच तर सध्या विमानशास्त्राचे इंजिनियर्स देखील चतुरांच्या उड्डाण तंत्राचा अभ्यास करताहेत यात काही नवल नाही.
डोळ्यांनी व्यापलेले डोके
चतुरांचे उड्डाण तर अनन्यसाधारण आहेच पण त्यांची दृष्टी पण तितकीच अद्भुत आहे. त्यांच्या दोन मोठ्या संयुक्त डोळ्यांनी डोक्याचा अर्धा अधिक भाग व्यापला जातो. प्रत्येक डोळ्यात सुमारे ३०,००० षट्कोनी भाग असतात; एका डोळ्यात असंख्य लहानलहान डोळे आहेत असे म्हणता येईल कारण यांपैकी प्रत्येक भाग मेंदूला एक वेगळी प्रतिमा प्रक्षेपित करतो. अर्थात, चतुराला एकाच वेळी हजारो वेगवेगळी चित्रे दिसतात असा याचा अर्थ होत नाही. आपल्याला एक संपूर्ण चित्र दिसते पण चतुराला मात्र हालचाली, रचना, वैधर्म्य आणि आकारांचेही ज्ञान होते.
त्या सर्व प्रतिमांचे पद्धतशीर वर्गीकरण करणे आवश्यक असते. म्हणूनच चतुराच्या मेंदूच्या ८० टक्के भागावर दृष्टीसंबंधी माहितीचे परीक्षण करण्याचा कार्यभार असतो. दृष्टिशास्त्रासंबंधी यंत्रणा देखील सहसा इतक्या संवेदनशील नसतात—चतुराची नजर २० मीटर अंतरावरील डासाला देखील टिपू शकते. संध्याकाळच्या अंधूक प्रकाशात माणसाला लहान माश्या पाहणे कठीण जाते पण तेवढ्या प्रकाशातही उष्णप्रदेशांतील चतुर त्यांना सहज पकडतात.
नदीकाठच्या झाडाझुडुपांतून अतिजलद वेगाने उडताना चतुराला क्षणोक्षणी शेकडो निर्णय घ्यावे लागतात. पण हे कठीण काम त्याला जमते, कारण त्याला दर सेकंदाला जवळजवळ शंभर वेगवेगळ्या प्रतिमा दिसतात; आपल्याला दिसतात त्यापेक्षा पाचपटीने जास्त. सिनेमात दर सेकंदाला २४ प्रतिमा दाखवल्या जातात, पण चतुराने सिनेमा पाहिला तर त्याला ती एकापाठोपाठ अनेक स्थिरचित्रांसारखी भासतील.
जीवशैलीत बदल
चतुराच्या जीवनाला सुरवात होते तेव्हा, तो पुढे उड्डाणात इतका पटाईत होईल याचे कोणतेही चिन्ह नसते. अंड्यातून बाहेर पडल्यावर, पाण्यातील डिंभ एखाद्या तळ्यात किंवा ओढ्यात स्तब्ध पडून राहतो आणि खाण्यासाठी जे काही मिळेल ते तो फस्त करतो. त्वचेच्या अनेक विकासावस्थांमधून गेल्यावर—अनेक महिन्यांनंतर किंवा काही जातींत तर अनेक वर्षांनंतर—डिंभ एखाद्या बोरूवर चढतो. तेथे एक असाधारण रूपांतर घडते.
वक्षापासून त्वचा फाटते आणि त्यातून पूर्णपणे विकसित झालेला चतुर बाहेर सरपटत येतो. फुलपाखरासारखेच या पूर्ण विकसित कीटकाचे पंख काही तासांनंतरच ताठ होतात आणि मग एका नवीन जीवनाला सुरवात होते. काही दिवसांतच चतुर आपल्या उपजत बुद्धीच्या साहाय्याने यशस्वीपणे आपले भक्ष्य पकडतो आणि उड्डाणाचे डावपेच आत्मसात करतो.
लवकरच हा लहानसा चतुर उडता उडताच माश्या आणि डास पकडण्यात तरबेज होतो. तो रोज स्वतःच्या वजनाइतक्याच कीटकांचा फडशा पाडत असल्यामुळे आपल्यावर एका अर्थाने उपकारच करतो. पुरेशा खाद्य पुरवठ्याची खात्री करण्यासाठी, अनेक नर चतुर आपापल्या लहान लहान क्षेत्रांवर हक्क गाजवतात आणि मोठ्या त्वेषाने या क्षेत्रांची रखवाली करतात.
काही जातींचे चतुर एफिड किंवा बीटल यांवर ताव मारतात, तर काही, लहान बेडूक पकडतात; उष्णप्रदेशातील एका प्रकारचे डॅम्सलफ्लाय तर कोळीसुद्धा खातात. ते एखाद्या मोठ्या ऑर्ब कोळ्याच्या जाळ्याभोवती घुटमळताना या जाळ्याच्या मालकाचे उष्टे खाद्यान्न फस्त करायला आलेल्या लहान लहान कोळ्यांना पकडतात.
उत्क्रांतीवादाविरुद्ध पुरावा
उत्क्रांतीवादाचा पुरस्कार करणारे अनेक वैज्ञानिक, चतुर हे सर्वात पुरातन उडणारा कीटक असल्याचे मानतात. फ्रान्स येथे गवसलेल्या एका जीवाश्मावर एका चतुराच्या पंखाचा ठसा आहे ज्यांचा विस्तार तब्बल ७५ सेंटिमीटर एवढा आहे! तो मनुष्याच्या माहितीतला सर्वात मोठा कीटक असून सध्याच्या कोणत्याही चतुरापेक्षा त्याचा आकार तिप्पट आहे.
मला प्रश्न पडला, ‘मानवाच्या माहितीतले सर्वात गुंतागुंतीचे उड्डाण तंत्र पूर्ण विकसित रूपात आपोआप प्रकट होणे कसे शक्य आहे?’ जगावेगळे साम्राज्य—कीटकांच्या जीवनाचे संशोधन (इंग्रजी) हे पुस्तक कबूल करते की, “पंख नसलेल्या आणि पंख असलेल्या दोन टप्प्यांच्या मधल्या टप्प्याच्या कीटकांचे जीवाश्म कोठेही आढळलेले नाहीत.” अर्थातच, चतुर हे एका बुद्धीमान श्रेष्ठ रचनाकाराच्या हातच्या कलाकृती आहेत हे तर उघडच आहे.
चतुरांनी जगाच्या पाठीवर जवळजवळ प्रत्येक ठिकाणी वस्ती केलेली आहे. ते कोणत्याही ठिकाणी रुळतात—मग ती डोंगरांतील एखादी नदी असो, भूमध्यरेषेजवळील प्रदेशात एखादी दलदल असो किंवा शहरातला एखादा प्रशस्त स्विमिंग पूल असो.
मी आफ्रिकेतील उष्णप्रदेशीय समुद्रतटावर चतुरांचे थवे पाहिले आहेत आणि आपल्या आवडत्या युरोपियन तळ्याच्या आसपासच्या क्षेत्राची अविरत रखवाली करणारे एकएकटे सम्राट चतुर देखील पाहिलेले आहेत. शिवाय, फिलिपाईन्समधील एका हिरव्यागार खिंडीतून एका लहानशा होडीने प्रवास करताना चमचमते डॅम्सलफ्लाय माझ्या सोबतीला होते, काही तर माझ्या हातावरही येऊन बसले.
चतुर हे पृथ्वीवरील सर्वात उत्कृष्ट फ्लाइंग मशीन्सपैकी असले तरीसुद्धा मला मात्र त्यांच्या उडण्याच्या क्षमतांपेक्षा त्यांच्या नाजूकपणाने आणि सौंदर्यानेच जास्त प्रभावित केलं आहे. तळ्यांत आणि नदीच्या काठांवर त्यांच्यामुळे एक वेगळीच चमक येते. ती कधीही पाहता येण्यासारखी—अपूर्व रत्ने आहेत.
[तळटीपा]
a काहीवेळा, चतुर आपले शरीर सूर्याच्या दिशेने वर करून पंख खाली धरतात. थंडावा मिळावा म्हणून ते अशा स्थितीत असतात कारण या स्थितीत शरीराच्या कमीतकमी भागावर सूर्यप्रकाश पडतो.
[१६, १७ पानांवरील चित्रं]
आपले पंख क्षितिज समांतर धरून बसणारे चतुर, शरीरावर पंख जुळवून धरणाऱ्या डॅम्सलफ्लाय पेक्षा सहसा मोठे असतात