वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ४/८ पृ. ९-१०
  • गुन्हेगारी नसलेले जग कसे अस्तित्वात येईल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गुन्हेगारी नसलेले जग कसे अस्तित्वात येईल?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • गुन्हेगारी संघटनांमधून बाहेर पडणे
  • जगाच्या आत्म्यातून मुक्‍तता मिळवा
  • संघटित गुन्हेगारीची भरभराट का होते?
    सावध राहा!—१९९७
  • संघटित गुन्हेगारीचा तुमच्यावर होणारा परिणाम
    सावध राहा!—१९९७
  • संघटित गुन्हेगारीपासून संबंध तोडणे “मी याकूझा होतो”
    सावध राहा!—१९९७
  • एवढी गुन्हेगारी का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ४/८ पृ. ९-१०

गुन्हेगारी नसलेले जग कसे अस्तित्वात येईल?

संघटित गुन्हेगारीचा जागतिक पातळीवर प्रतिकार केला जात आहे. यु.एस.न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट याने घोषित केले की, “फारच कमी कालावधीत माफियाविरुद्ध लढाईत उल्लेखनीय यश आले आहे आणि याचे श्रेय प्रामुख्याने, रॅकेटीयर ईंफ्ल्युएन्स्ड ॲण्ड करप्ट ऑर्गनायझेशन्स ॲक्ट किंवा रिको या कायद्यालाच जाते.” या कायद्यानुसार केवळ विशिष्ट गुन्ह्यांच्या आधारावरच नव्हे तर रॅकेटीयरींग कार्यपद्धतीच्या आधारावरही गुन्हेगारी संघटनांना दोषी ठरवता येते. यासोबत, टॅपिंग करून मिळवलेल्या तसेच दया दाखवण्यात यावी म्हणून टोळीतून फुटलेल्या खबऱ्‍यांनी दिलेल्या माहितीचाही, संयुक्‍त संस्थानांत माफिया विरुद्धच्या लढ्यातील यशाला पुष्कळ हातभार लाभला आहे.

इटलीमधील अधिकारी देखील, गुन्हेगारी टोळ्यांचा कडवा विरोध करताहेत. संघटित गुन्हेगारीचा पगडा असलेल्या सिसिली, सार्डिनिया आणि कॅलॅब्रिया यांसारख्या क्षेत्रांतल्या सार्वजनिक इमारतींत आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर, गुन्हेगारांच्या हल्ल्यांपासून संरक्षणासाठी सैनिकी तुकड्यांना तैनात करण्यात आले आहे. सरकारच्या दृष्टिकोनातून ही समस्या एखाद्या गृहयुद्धाइतकीच गंभीर आहे. इटलीमध्ये काही परिणामही दिसून येत आहेत कारण अनेक गुन्हेगारी संघटनांच्या कुविख्यात म्होरक्यांना गजाआड करण्यात आले आहे. शिवाय, एका माजी प्रधानमंत्र्यांनाही माफियाशी तथाकथित लागेबांधे असल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे.

जपानमध्ये सरकारने मार्च १, १९९२ रोजी संघटित गुन्हेगारी-विरोधी कायदा अंमलात आणून याकूझांबद्दल एक अत्यंत कडक धोरण पत्करले आहे. या कायद्यानुसार, एखाद्या टोळीला गुंडांची संघटना म्हणून घोषित करण्यात आल्यास त्यानंतर त्यांच्या हिंसात्मक जबरदस्तीच्या ११ वेगवेगळ्या कृत्यांवर प्रतिबंध लागतो, ज्यात प्रकरण दाबून टाकण्यासाठी लाच मागणे, संरक्षण रॅकेट्‌समध्ये सहभाग घेणे आणि मोबदला घेऊन भांडणे मिटवणे समाविष्ट आहे. या कायद्याची अंमलबजावणी करून, टोळ्यांचे पैसा कमवण्याचे सर्व मार्ग खुंटवणे हेच सरकारचे उद्दिष्ट आहे. या कायद्यामुळे गुन्हेगारी संघटनांचे धाबे दणाणले आहेत. कदाचित, याच कायद्याच्या कडक अंमलबजावणीमुळे—काही गटांची पांगापांग झाली, तर एका म्होरक्याने आत्महत्या केली.

सरकार आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्‍या संस्था संघटित गुन्हेगारीला पूर्ण शक्‍तिनिशी लढा देताहेत, यात वाद नाही. तरीसुद्धा, मायनीची डेली न्यूज या वृत्तपत्राने १९९४ साली जगभरातील न्यायाधीश आणि पोलीस अधिकाऱ्‍यांच्या एका परिषदेच्या अहवालात असे म्हटले, “जगातल्या अक्षरशः कानाकोपऱ्‍यांत संघटित गुन्हेगारी बळकट आणि मालामाल होत चालली आहे; या गुन्हेगारीतून वर्षाला जवळजवळ एक महापद्‌म डॉलरचे उत्पन्‍न प्राप्त होते.” जगाच्या पाठीवरून क्राइम सिंडिकेट्‌सचे नामोनिशाण मिटवण्याचे मानवी प्रयत्न मर्यादित आहेत ही एक खेदपूर्ण वस्तुस्थिती आहे. याचे एक कारण असे की पुष्कळदा न्यायप्रक्रिया अतिशय धिम्मी असून न्याय मिळेलच याची खात्री नसते. अनेक लोकांच्या मते, कायद्याचा झुकाव सहसा गुन्हेगारांकडेच असतो, त्यांना बळी पडणाऱ्‍यांकडे नव्हे. सुमारे ३,००० वर्षांपूर्वी बायबलने असे विदित केले होते: “दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्राचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत होते.”—उपदेशक ८:११.

गुन्हेगारी संघटनांमधून बाहेर पडणे

संघटित गुन्हेगारीविषयी कडक धोरण पत्करण्याव्यतिरिक्‍त, सरकारांनी या क्राइम सिंडिकेट्‌समध्ये अडकून पडलेल्यांना बाहेर पडण्यास मदत करण्याच्या दिशेनेही प्रयत्न केले आहेत. तथापि, हे म्हणावे तितके सोपे नाही. “एकदा माफियात प्रवेश केला की मग मेल्याशिवाय सुटका नाही,” या अर्थाची एक जुनी म्हण आहे. एखाद्या गुंडाला याकूझा संघटना सोडावयाची असल्यास, त्याला एकतर मोठी रक्कम द्यावी लागते नाहीतर आपली करंगळी पूर्णपणे किंवा तिचा थोडा भाग कापून घ्यावा लागतो. पूर्वीच्या गुन्हेगाराला, गुन्हेगार विश्‍वाशी संबंध तोडण्याची भीती तर असतेच, पण त्यासोबत त्याला एक प्रामाणिक जीवन जगण्याच्या वास्तविकतेलाही सामोरे जावे लागते. नोकरीसाठी त्याने केलेले अर्ज सहसा स्वीकारले जाणार नाहीत. तथापि, जे गुंड गुन्हेगार विश्‍वाशी संबंध तोडण्याच्या प्रयत्नात आहेत आणि ज्यांना अब्रूदार कामधंदा शोधणे कठीण जात आहे अशा गुन्हेगारांना मदत करण्यासाठी काही देशांमध्ये, पोलिसांशी गुप्त दूरध्वनी संपर्काची व्यवस्था आहे.

टोळीकडून येणाऱ्‍या दबावाला आणि समाजातील दुराग्रहाला तोंड देण्यासाठी गुंडाच्या मनात प्रामाणिक जीवन जगण्याची जिद्द असली पाहिजे. ही जिद्द कशातून निर्माण होऊ शकते? कदाचित, आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमातून, स्थैर्याचे जीवन जगण्याच्या इच्छेतून किंवा सत्कृत्ये करण्याच्या कामनेतून. तथापि, सर्वाहून अधिक ही जिद्द ज्यामुळे निर्माण होते असे एक प्रबळ कारण या अंकातील २६ व्या पृष्ठावर आढळणाऱ्‍या लेखातील, यासुओ काटाओका याच्या अनुभवातून स्पष्ट होते.

यासुओ काटाओका हा, ज्या शेकडो जणांनी आपले जीवन बदलले आहे त्यांचे एक नमुनेदार उदाहरण आहे. ‘नीतिमत्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त अशा देवसदृश निर्माण केलेल्या’ नव्या मनुष्याने त्यांच्या आधीच्या पशुतुल्य गुणांची जागा घेतली आहे. (इफिसकर ४:२४) पूर्वी लांडग्यांसारखे असणारे आता सत्शील, कोकऱ्‍यांसारख्या नागरिकांसोबत शांतीने जगताहेत—एवढेच काय, ते इतरांना सुद्धा मदत करताहेत!—यशया ११:६.

जगाच्या आत्म्यातून मुक्‍तता मिळवा

मागच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, केवळ सर्व क्राइम सिंडिकेट्‌सच नव्हेत तर संपूर्ण जगच दियाबल सैतानाच्या एकमेव अदृश्‍य अधिकाराच्या अधीन आहे. लोकांना याची यत्किंचितही जाणीव नसली तरीसुद्धा, सैतानाने आपले गुन्हेगारीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जगाला संघटित केलेले आहे. क्राइम सिंडिकेट्‌स जशा पैसा आणि बनावटी कुटुंबाचे वातावरण देऊ करतात तशाच प्रकारे, सैतानही एखाद्या हितचिंतक मालकाचे रूप घेऊन लोकांना संपत्ती, सुखविलास देतो आणि एकजुटीची भावना निर्माण करतो. तुम्हाला जाणीव नसली तरीसुद्धा तुम्ही कदाचित त्याच्या दुष्ट योजनांना बळी पडला असाल. (रोमकर १:२८-३२) बायबल आपल्याला सांगते की, “जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे.” (याकोब ४:४) सैतानी प्रभावाखाली असलेल्या या जगाशी लगट करणे धोक्याचे आहे. विश्‍वाच्या निर्माणकर्त्याने सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना एकत्र आणून त्यांचा दुष्ट प्रभाव जगातून नाहीसा करण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या नेतृत्त्वाखाली देवदूतांची सेना तयार केली आहे.—प्रकटीकरण ११:१८; १६:१४, १६; २०:१-३.

तर मग, तुम्ही सैतानाच्या जगाच्या प्रभावातून स्वतःला कशाप्रकारे मुक्‍त करू शकाल? यासाठी विरक्‍त जीवन जगणे नव्हे तर आजच्या जगावर प्रभुत्व करणाऱ्‍या प्रवृत्ती आणि विचारसरणींतून स्वतःला मुक्‍त करणे अगत्याचे आहे. असे करावयाचे असल्यास, तुम्हाला घाबरवून सोडण्यासाठी सैतानाने खेळलेल्या डावपेचांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल आणि लोकांना कह्‍यात ठेवण्यासाठी तो जी आमिषे दाखवतो त्यांचाही प्रतिकार करावा लागेल. (इफिसकर ६:११, १२) तुम्हाला काही त्यागही करावे लागतील; पण, तुम्ही पक्का निर्धार केला आणि यहोवाचे साक्षीदार जी मदत देऊ इच्छितात तिचा फायदा करून घेतल्यास तुम्ही देखील इतरांप्रमाणे स्वतःला मुक्‍त करू शकता.

गुन्हेगारीने भरलेल्या या अस्ताव्यस्त जगाची देवाने सफाई केल्यावर पुढे काय होईल? बायबल म्हणते, ‘दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होईल.’ पुढे ते असेही म्हणते की, “नीतिमान्‌ पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२८, २९) पूर्वी पाशवी गुण असणाऱ्‍यांच्या भीतीने थरथर कापण्याची त्यानंतर गरज पडणार नाही; कारण ‘यहोवाच्या ज्ञानाने’ त्यांचे रूपांतर झालेले असेल आणि सबंध पृथ्वी या ज्ञानाने परिपूर्ण होईल.—यशया ११:९; यहेज्केल ३४:२८.

या अंकाच्या २६ व्या पृष्ठावर आढळणाऱ्‍या जपानमधील एका भूतपूर्व याकूझा गुंडाच्या आत्मकथेवरून स्पष्ट होते त्याप्रमाणे, अशाप्रकारचे रूपांतर आजही शक्य झाले आहे.

[१० पानांवरील चित्र]

देवाच्या नव्या जगात सर्वांना आपल्या हातच्या कष्टाद्वारे समाधान लाभेल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा