अध्ययन असमर्थतेशी झुंजणे
सहा वर्षांच्या डेविडला गोष्टी ऐकण्याचं भारी वेड आहे. त्याची आई त्याला गोष्ट वाचून दाखवते तेव्हा तो आवडीनं ऐकतो आणि ऐकलेलं त्याला सहज लक्षातही राहतं. मात्र डेविडला एक अडचण आहे. त्याला स्वतः वाचता येत नाही. खरं तर, डोळ्यांचा उपयोग करावा लागेल असं कोणतंही काम करायचं म्हटलं की त्याला नकोसं होतं.
सारा तीन वर्षांपासून शाळेला जाऊ लागलीय, पण अजूनही तिचं अक्षर असामान्यपणे खराब आहे. ती पूर्ण अक्षर काढू शकत नाही आणि काही अक्षरं तर चक्क उलटी लिहिलेली असतात. साराला धड तिचं नावही लिहिता येत नसल्यामुळे तिच्या आईबाबांना जास्तच काळजी वाटते.
जॉश नावाचा किशोर, एक गणिताचा विषय सोडला, तर शाळेच्या बाकी सर्व विषयांत उत्तम मार्क मिळवतो. पण, संख्यात्मक मूल्यांच्या विचारानेही तो गांगरून जातो. संख्या पाहताच जॉशला चीड येते आणि गणिताचं होमवर्क करायला बसला रे बसला, की त्याचा पारा चढू लागतो.
डेविड, सारा आणि जॉश यांना झालंय तरी काय? ते नुसते आळशी, हट्टी किंवा कदाचित मठ्ठ आहेत का? अजिबात नाही. या तिघांचीही बौद्धिक क्षमता सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त या वर्गांत मोडते. तरीपण, हे तिघंही कोणत्या न कोणत्या अध्ययन असमर्थतेमुळे कमी पडतात. डेविडला डिस्लेक्सिया नावाचा विकार झालाय आणि वाचनासंबंधी अनेक विकार याच नावानं ओळखले जातात. साराला लिहिण्याची जी भयंकर अडचण आहे तिला डिस्ग्राफिया म्हणतात. तसेच, जॉशला गणिताच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यात जी असमर्थता आहे ती डिस्कॅल्क्युलिया म्हटलेल्या विकारामुळे आहे. ही तर केवळ तीन अध्ययन असमर्थतांची नावं आहेत. याशिवाय आणखीही आहेत आणि काही तज्ज्ञांच्या अंदाजानुसार संयुक्त संस्थानांतील कमीतकमी १० टक्के मुलांवर यांचा परिणाम होतो आहे.
अध्ययन असमर्थतांचे स्पष्टीकरण
हे कबूल आहे की, बहुधा अधिकांश मुलामुलींना शिक्षण घेणं आव्हानात्मक वाटतं. पण सहसा, ही अध्ययन असमर्थता असल्याची खूण नसते. उलटपक्षी, यावरून हेच दिसून येतं की सर्वच मुलं काही बाबतीत प्रविण तर काही बाबतीत कच्चे असतात. काहींची श्रवणशक्ती उत्तम असते; यामुळे ते पुष्कळशी माहिती ऐकून आत्मसात करू शकतात. इतरांच्या ठिकाणी दृष्टीकौशल्यं असतात; त्यांना वाचनातून जास्त ग्रहण करता येतं. पण, शाळेत एकाच वर्गात अनेक मुलांचा समूह असतो आणि कोणतीही शिक्षण पद्धत वापरली तरीसुद्धा त्या सर्वांनी शिकावं अशी अपेक्षा केली जाते. यामुळे काहींना अध्ययनात अडचण येणे साहजिक आहे.
तथापि, काही अधिकारसूत्रांच्या मते, सर्वसामान्य अध्ययनासंबंधी अडचणी आणि अध्ययन असमर्थता यांमध्ये फरक आहे. कारण असे सांगण्यात येते की, धैर्याने प्रयत्न करत राहिल्यास अध्ययनासंबंधी अडचणींवर मात करता येणं शक्य आहे. उलटपक्षी, अध्ययन असमर्थता यांपेक्षा जास्त मुळावलेल्या असतात. पॉल व एस्तर वेन्डर या डॉक्टरांच्या मते, “अध्ययन असमर्थता असलेल्या मुलाचा मेंदू, विशिष्ट प्रकारच्या मानसिक कार्यांचे अर्थग्रहण, संस्करण किंवा स्मरण चुकीच्या पद्धतीने करतो.”a
तथापि, मुलाला अध्ययन असमर्थता आहे म्हणजे ते मूल मानसिकरित्या अधू आहे असे नेहमीच म्हणता येणार नाही. हे स्पष्ट करण्यासाठी पॉल व एस्तर वेन्डर, अध्ययन असमर्थता असणाऱ्या मुलांची स्वर-बधिर, अर्थात ज्यांना संगिताच्या कमीजास्त स्वरपदांतील फरक जाणवत नाही अशा लोकांशी तुलना करतात. वेन्डर यांनी लिहिले, “स्वर-बधिर लोकांच्या मेंदूला काही अपाय झालेला नसतो, किंवा त्यांच्या श्रवणशक्तीमध्येही काही बिघाड नसतो. स्वर-बधिरपणा, आळशीपणामुळे किंवा निकृष्ट शिकवण्याच्या पद्धतींमुळे किंवा प्रेरणेच्या अभावामुळे घडतो असंही कुणी सुचवणार नाही.” त्यांच्या मते, अध्ययन असमर्थता असणाऱ्यांचीही यासारखीच परिस्थिती आहे. सहसा, त्यांची अडचण शिक्षणाच्या एखाद्या विशिष्ट पैलूशीच संबंधित असते.
यामुळे, अध्ययन असमर्थता असलेल्या अनेक मुलांची सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त बौद्धिक क्षमता का असते हे स्पष्ट होतं; खरं तर, त्यांपैकी काहीजण अत्यंत हुशार असतात. याच विरोधाभासामुळे अनेक डॉक्टरांना अध्ययन असमर्थता असल्याच्या शक्यतेची चाहूल लागते. माझ्या मुलाला शिकण्यात अडचण का येतेय? (इंग्रजी) या पुस्तकात असे स्पष्ट केले आहे: “अध्ययन असमर्थता असलेले मूल त्याच्या वयाच्या अपेक्षित दर्जापेक्षा आणि निर्धारित केलेल्या बुद्ध्यांकाच्या मानाने दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांनी मागे असते.” वेगळ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ते मूल आपल्या समवयस्कांच्या बरोबरीने कार्य करू शकत नाही ही खरी समस्या नसते. उलटपक्षी, खरी समस्या ही असते की त्याचे कार्यमान त्याच्या स्वतःच्या कुवतीला अनुलक्षून नसते.
आवश्यक साहाय्य पुरवणे
सहसा अध्ययन असमर्थतेच्या भावनिक दुष्परिणामांमुळे समस्येत आणखीनच भर पडते. अध्ययन असमर्थता असलेली मुले शाळेत असमाधानकारक कामगिरी करतात तेव्हा त्यांचे शिक्षक, समवयस्क आणि कदाचित त्यांचे स्वतःचे कुटुंबीय देखील, ती कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहतील. दुःखाची बाब म्हणजे अशा कित्येक मुलांच्या मनात स्वतःबद्दल एक प्रकारचा नकारात्मक अभिप्राय निर्माण होतो आणि मोठे झाल्यावरही तो कायम राहू शकतो. हा विषय विचारात घेणं रास्तच आहे कारण अध्ययन असमर्थता सहसा नाहीशा होत नसतात.b डॉ. लॅरी बी. सिल्वर लिहितात, “अध्ययन असमर्थता या आजीवन असमर्थता असतात. आज ज्या असमर्थतांमुळे वाचन, लेखन आणि गणितं सोडवणं कठीण जातं त्याच असमर्थता पुढे खेळक्रीडा आणि इतर क्षेत्रांत, संसारात, आणि चारचौघांसोबत व्यवहार करताना अडखळण बनतील.”
यामुळे अध्ययन असमर्थतांशी झुंजणाऱ्या मुलांना आईवडिलांचा आधार मिळणं अत्यावश्यक आहे. अध्ययन असमर्थता असलेल्या मुलाचे संगोपन (इंग्रजी) या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, “आपल्याला आपल्या आईबाबांचा भक्कम आधार आहे याची जाणीव असलेल्या मुलांना, आपणही कार्यक्षम आहोत ही भावना आणि आत्मसन्मान विकसित करणं सोपं जातं.”
पण आधार देण्याआधी, पालकांनी स्वतःच्या भावना पारखणे आवश्यक आहे. काही पालकांना आपण दोषी आहोत, जणू आपल्या मुलाच्या या दशेसाठी आपणच जबाबदार आहोत असं वाटतं. इतर काही पालक त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांमुळे भावनातिरेकी होऊन बावरून जातात. या दोन्ही प्रतिक्रियांमुळे काहीएक साध्य होत नाही. उलट, त्यांमुळे आईवडिल कोणतेही पाऊल उचलण्यास असमर्थ होतात आणि अशारितीने ते आपल्या मुलाला आवश्यक असलेल्या मदतीपासून वंचित ठेवतात.
म्हणूनच एखाद्या अनुभवी तज्ज्ञाने तुमच्या मुलास अध्ययन असमर्थता असल्याचे निदान केल्यास, हवालदिल होऊ नका. अध्ययन असमर्थता असलेल्या मुलांना एखादे विशिष्ट शैक्षणिक कौशल्य विकसित करण्यासाठी केवळ सामान्यापेक्षा आणखी थोडा आधार हवा असतो हे लक्षात असू द्या. तुमच्या परिसरात अशा मुलांसाठी काही कार्यक्रम चालवले जात असल्यास त्यांबद्दल माहिती मिळवण्यासाठी वेळ काढा. मागील काही वर्षांच्या तुलनेत, आज अनेक शाळा अशाप्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी जास्त सक्षम बनल्या आहेत.
विशेषज्ञांच्या म्हणण्यानुसार तुमच्या मुलाच्या प्रत्येक साध्यतेसाठी, मग ती कितीही क्षुल्लक असली तरीसुद्धा तुम्ही त्याची प्रशंसा केली पाहिजे. भरभरून प्रशंसा करा. मात्र, शिस्त लावण्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. मुलांना वळण लावण्याची गरज असते आणि अध्ययन असमर्थता असलेल्या मुलांना तर याची खासकरून गरज असते. तुम्ही तुमच्या मुलाकडून काय अपेक्षा करता याची त्याला जाणीव करून द्या आणि स्वतः घालून दिलेल्या आदर्शांना खंबीरपणे जडून राहा.
शेवटी, आपल्या परिस्थितीकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहण्यास शिका. अध्ययन असमर्थता असलेल्या मुलाचे संगोपन हे पुस्तक एका उदाहरणातून हा मुद्दा स्पष्ट करते: “कल्पना करा. तुम्ही तुमच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तंदूरी चिकनची ऑर्डर देता. वेटर तुमच्यासमोर मटन चॉप्स ठेवतो. दोन्ही पदार्थ चविष्ट असले तरीही मानसिकरित्या तुम्ही तंदूरी चिकनची अपेक्षा करत होता. अनेक पालकांनाही आपल्या विचारसरणीत मानसिक फेरबदल करणे अगत्याचे आहे. तुम्ही कदाचित मटन चॉप्सची अपेक्षा करीत नव्हता, तरीपण चव घेतल्यावर तेसुद्धा अत्यंत रुचकर असल्याचं तुम्हाला कळून येतं. खास गरजा असलेल्या मुलांचं संगोपन करतानाही असंच घडतं.”
[तळटीपा]
a काही अभ्यासांतून असं सूचित होतं की अध्ययन असमर्थतांमध्ये अनुवंशाचा घटक असू शकतो किंवा शिसे विषबाधा, गर्भावस्थेत मादक पदार्थ किंवा मद्याचे सेवन यांसारखी, परिस्थितीची कारणंही त्यामागे असतील याची शक्यता नाकारता येत नाही. तरीसुद्धा, नेमकं कारण किंवा कारणे अद्याप हाती लागलेली नाहीत.
b काही केसेसमध्ये, मुलांत तात्पुरत्या काळापर्यंत एखादी अध्ययन असमर्थता आढळते कारण एखाद्या विशिष्ट क्षेत्रात त्यांची वाढ खुंटलेली असते. कालांतराने, वाढत्या वयासोबत या मुलांची ही लक्षणं नाहीशी होतात.