केळे—एक विलक्षणीय फळ
ग्रीक व अरब लोकांनी त्यास “विलक्षण फळझाड” असे म्हटले. सा. यु. पूर्व ३२७ मध्ये सम्राट सिकंदरच्या सैन्याला ते भारतात आढळले. एका पुरातन गोष्टीनुसार, भारतातील सुज्ञ लोक त्याच्या सावलीत विसावा घेत व त्याची फळे खात होते. यासाठी त्याला “सुज्ञ लोकांचे फळ” असे म्हटले जाते. ते काय आहे? होय, केळे!
परंतु हे केळे आशियातून कॅरिबियनकडे कसे आले? प्राचीन अरब व्यापाऱ्यांनी, आशियातून आफ्रिकेतील पूर्व किनाऱ्यापर्यंत केळीच्या रोपांचे गड्डे सोबत नेले. पोर्तुगल शोधकांना १४८२ मध्ये हे केळीचे रोप तेथे सापडले. त्यांनी त्याचे काही गड्डे व केळ हे त्याचे आफ्रिकन नाव कॅनरी बेटावरील पोर्तुगल वसाहतींमध्ये नेले. ॲटलांटिक ते पश्चिमी नवीन जगापर्यंतचा प्रवास हे पुढचे पाऊल होते. ते कोलंबसच्या जलप्रवासाच्या काही वर्षांनंतर म्हणजेच १५१६ मध्ये झाले. स्पॅनिश मिशनऱ्यांनी केळीची रोपे बेटांवर व कॅरिबियनच्या उष्ण कटिबंधातील मुख्य भूप्रदेशात नेली. अशाप्रकारे, मध्य व दक्षिण अमेरिकेत पोहंचण्यासाठी या विलक्षणीय फळाच्या रोपट्याला अर्धे जग फिरून यावे लागले.
अहवालाप्रमाणे, १६९० मध्ये पहिल्यांदा केळे कॅरिबियन बेटांवरून न्यू इंग्लंडमध्ये नेण्यात आले. प्युरिटन लोकांनी त्या विलक्षण फळाला शिजवले परंतु त्याची चव त्यांना आवडली नाही. तथापि, दक्षिण व मध्य अमेरिकेतील तसेच उष्ण कटिबंधातील लाखो लोक कच्च्या हिरव्या केळांना शिजवून आवडीने खातात.
केळीची लागवड
१८७० व १८८० च्या मध्यात, केळी निर्यात करण्याच्या शक्यतेबद्दल युरोपच्या व उत्तर अमेरिकेच्या विविध व्यापाऱ्यांना आवड निर्माण होऊ लागली. त्यांनी कारखाने तयार केले व केळीची लागवड करण्यास सुरवात केली. त्यांना फिंकॉज असे म्हटले जात होते. यासाठी, कामगारांना व अभियांत्रिकांना जंगले साफ करावी लागली, रस्ते तयार करावे लागले, व रेल्वे आणि दळवळणाचे मार्ग प्रस्थापित करावे लागले. कामगार व त्यांच्या कुटुंबांसाठी घरे, शाळा तसेच दवाखाने असलेली गावे बांधावी लागली. जगभरात केळी पाठवण्यासाठी वाफेच्या जोरावर चालणाऱ्या जहाजांना बनवावे लागले. हा उद्योग वाढत गेला तसे, कारखान्यांनी केळी उत्पन्न होणाऱ्या देशातील अधिक जागा विकत घेतली.
आज, उत्तर अमेरिकेत खाण्यात येणाऱ्या ९० पेक्षा अधिक टक्के केळी, लॅटिन अमेरिकेच्या देशांतून पुरवली जातात. ब्राझील हा निर्यात करण्यात अग्रगण्य आहे. त्या यादीत होंडुराजचे नाव सहाव्या स्थरावर येते. दर वर्षी तो जवळजवळ दहा अब्ज किलोग्रॅम वजनाची केळी निर्यात करतो.
केळी कशी वाढतात
केळीचे झाड वृक्ष नाही. त्यात लाकडाचे तंतू नसतात. त्याउलट, ती एक मोठी वनस्पती आहे जी पाम झाडासारखी दिसते. त्या झाडाची वाढ व आकार, हवामान व जमिनीवर अवलंबून आहे. केळीची वाढ उष्ण, दमट हवामानात चांगली होते. चांगले खत घातलेल्या गाळाच्या रेताड जमिनी या पिकाला फार मानवतात. उत्तम वाढीसाठी कितीही वेळेपर्यंत तापमान, २० डिग्री सेल्सीयसच्या खाली जाऊ नये.
पीक तयार करण्यासाठी, डोळे असलेले गड्डे लावावे लागतात. यांनाच कोंब म्हणतात. ही केळीच्या प्रौढ झाडाच्या जमिनीखालील गड्ड्यांपासून कापून काढली जातात. एक-तृतीयांश मीटर खोल व ५ मीटर रुंदीचे खड्डे खणले जातात. तीन ते चार आठवड्यांतच, हिरवी कोंबे दिसू लागतात. घट्ट गुंडाळलेली हिरवी पाने फुटतात व ती वाढतात तशी त्यांची गुंडाळी सुटते. केळीची झाडे फार लवकर वाढतात, म्हणजेच दर दिवशी ३ सेंटीमीटर एवढे वाढतात. दहा महिन्यांनंतर, झाडाची पूर्ण वाढ होते व ते पाम वृक्षासारखे दिसते. ते तीन ते सहा मीटर उंचीचे असते.
पूर्ण वाढ झालेल्या झाडावर, एक मोठे केळफूल असते. त्यावर लहान जांभळट छदे असतात. ही छदे गुंडाळलेल्या पानांतून वाढतात. मग लहान फुलांचा फुलोरा दिसू लागतो. प्रत्येक झाडाला एकच घड असतो. त्याचे वजन ३० ते ५० किलोग्रॅम इतके असते. त्यात ९ ते १६ केळीच्या फण्या असतात. प्रत्येक फणीला हात असे म्हणतात व त्यास १० ते २० केळी असतात. यास्तव केळींना बोटे म्हणतात.
केळींची वाढ सुरवातीला खाली जमिनीकडे होते. मग बाहेरच्या बाजूस व वरती वाढून केळीचा सर्वसामान्य कोन तयार होतो. वाढीच्या वेळी मशागत आणि संरक्षणाबद्दल काय? योग्य वेळी कामगार केळफूल काढून टाकतो. त्यामुळे केळींना, झाडातून सर्व पोषण मिळते. मग तो, किटकांपासून रक्षण देण्यासाठी सबंध घडच प्लास्टिकच्या पिशवीने झाकतो. केळी वरच्या बाजूस वाढत असल्यामुळे ती जड होतात. वाऱ्याने किंवा फळाच्या ओझ्याने झाड कोलमडून पडू नये यासाठी बाजूच्या झाडाच्या बुंध्यावर त्या झाडाला बांधले जाते. शेवटी, फळाची कापणी होईल ते दाखवण्यासाठी एक रंगीत कापड त्या पिशवीला बांधले जाते.
दररोज, झाडांच्या पानांवर फवारा मारण्यासाठी लागवडीवरून विमाने उडतात. यामुळे त्यांचे तीन मुख्य रोगांपासून संरक्षण मिळते. एक म्हणजे, पनामा रोग. त्यात बुरशीमुळे काही झाडांचा नाश होतो. परंतु, यांच्याऐवजी रोग निवारणारे प्रकार लावले जातात. दुसरा मॅको रोग आहे. तो सूक्ष्मजीवांमुळे होतो. कीड लागलेल्या झाडांना व रोग-फैलावणाऱ्या किटकांना आकर्षित करणाऱ्या फुलांना काढल्याद्वारे त्यावर नियंत्रण केले जाऊ शकते. मग, सीगटोका रोगदेखील आहे. ते झाडाच्या पानांचा नाश करते परंतु, लवकरात लवकर रासायनिक फवारे मारल्यास केळींचे काही नुकसान होत नाही. केळींना भरपूर पाणी लागते. ते कालव्यांद्वारे किंवा उच्च दाबाच्या फवारे मारण्याच्या साधनांद्वारे पुरवले जाते. शिवाय, लागवडीतून गवत व निदणे देखील काढून टाकली जातात.
शेतातून तुमच्या मेजावर
त्यावेळी, कापडाच्या रंगावरून केळी तयार झाली आहेत ते दिसते. काढण्याआधी ती योग्य लांबीची आहेत का याची खात्री करण्यासाठी त्यांचे माप घेतले जाते. दुसरी लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही आहे की, केळींना झाडावर पिकण्यासाठी सोडले जात नाही. स्थानिक गरजेसाठी देखील तसे केले जात नाही. ते का बरे? कारण त्यांची चव नष्ट होते. पीकाची कापणी कधी करावी हे ठरवण्याआधी, निर्यात करण्यासाठी लागणारा अवधी व कोणत्या प्रकारची वाहतुक वापरली जात आहे त्याचा विचार देखील केला पाहिजे. त्यानंतर, एखादा कामगार त्याच्या तीक्ष्ण धारेच्या हत्याराने घड कापतो. तेथून त्यांना माल भरण्याच्या स्थळी पाठविण्यात येते. कापणीनंतर केळीच्या झाडाचे काय केले जाते? त्याच्या जागी नवीन झाडे वाढवण्यासाठी ते झाड जमीन सपाट कापतात.
माल भरण्याच्या स्थळी केळींना धुण्यात येते. कोणतीही खराब झालेली फळे काढली जातात. कामगार व त्यांची कुटुंबे ती खातात. चव आणण्यासाठी व लहान मुलांच्या अन्नासाठी लहान केळींचा वापर केला जातो. प्रत्येक पेटीत १८ किलोग्रॅम वजनाची उत्तम केळी बांधली जातात. त्यांना शीतगृहाच्या रेल्वेमधून किंवा जहाजांतून पाठविण्यात येते.
धक्क्यावर फळांच्या दर्ज्याची तपासणी केली जाते व त्यांचे तापमान घेतले जाते. एकदा कापल्यावर, बाजारात जाईपर्यंत फळ हिरवे राहिले पाहिजे. केळी जास्त दिवस टिकत नसल्यामुळे, त्यांना १० ते २० दिवसांच्या आत गोळा करून, वाहून नेऊन दुकानात विकली गेली पाहिजेत. फळ न पिकण्यासाठी त्यास १२ ते १३ डिग्री सेल्सियस इतक्या थंड तापमानात ठेवले जाते. आधुनिक वाहतुकीमुळे केळींना, मध्य व दक्षिण अमेरिका ते कॅनडा व युरोप इतक्या दूरवर कोणत्याही समस्येविना पाठविण्यात येऊ शकते.
व्यावहारिक मूल्य व पोषकता
केळींचे शेकडो पेक्षा अधिक प्रकार आहेत. लहान केळे हे युरोप, कॅनडा, व अमेरिका येथे पाठविण्यात येणारा सर्वसामान्य प्रकार आहे. होंडुराज येथे लहान आकाराच्या जाती विपुलतेत आढळतात. त्यांच्या पातळ सालीमुळे त्यांची निर्यात होऊ शकत नाही. यांना मॉनसॉनॉ (सफरचंद) व रेड जामायका असे म्हटले जाते.
केळीच्या पानांमध्ये पुष्कळ तंतू असतात व उष्ण कटिबंधातील देशात विविध उद्देशांसाठी त्यांचा उपयोग केला जातो. बाजारात गेल्यावर, एखाद्याला बहुधा पानांचा गठ्ठा ठेवलेला दिसेल. ते विविध देशांमध्ये, गरम गरम टमॉल्स् या लोकप्रिय आहाराला त्यात गुंडाळून देण्यासाठी विकली जातात.
होंडुराज मधील पुष्कळ लोकांना त्यांच्या अन्नासोबत केळे खाण्यास आवडते. होंडुराजच्या उत्तर किनाऱ्यावरील मॉचुकॉ हा स्वादिष्ट अन्न पदार्थ आहे. त्याला तयार करण्यासाठी, कच्ची केळी खलात चेचली जातात, त्यात मसाले मिसळले जातात व त्या मिश्रणास खेकड्यांसोबत खोबरेल तेलात शिजवले जाते.
अमेरिकेत, दरवर्षी जवळजवळ ११ अब्ज केळी खाल्ली जातात. कॅनडा, ब्रिटन व युरोपच्या इतर देशांमध्ये ती मोठ्या प्रमाणात पाठवली जातात. या फळाला खाण्यामध्ये पौष्टिकतेचे कोणते लाभ आहेत? केळींमध्ये अ व क जीवनसत्वे, कर्बोदके, फॉस्फरस व पोटॅशियम यांचे प्रमाण अधिक असते.
केळाचे कितीतरी उपयोग आहेत! नाश्ता, सीरीयल, फळांचे मिश्रण, पाय पक्वान्न, केक व सुप्रसिद्ध बनाना स्पिल्ट यात केळे अगदी उचित आहे. परंतु, पुढच्या वेळी तुम्ही पिकलेले केळे खाल तेव्हा त्याच्या उल्लेखनीय गुणांचा विचार करा. या फळाला त्याचे स्वतःचे आवरण असते. त्यात जीवनसत्वे व खनिज पदार्थ अधिक प्रमाणात असतात. होय, या केळाला तुमच्या मेजापर्यंत येण्यासाठी अर्धे जग फिरावे लागले असेल. (g94 4/8)