पवित्र शास्त्रीय दृष्टीकोण
कुंडली—साहाय्यक की घातक?
एक गृहिणी आपली दिनचर्या वर्तमानपत्रातील “तुमचे ग्रहमान” हा रकाना बघून सुरुवात करते. व्यापारी दलाल आपल्या व्यवसायाला आरंभ करण्याआधी ज्योतिषाला फोन करतो. जुगारी अड्ड्यावर जुगार खेळणारा एका हातात रक्कम तर दुसऱ्या हातात हाव टू प्ले द हॉर्सेस होरोस्कोपिकली हे पुस्तक न्याहाळत आहे. क्रिडापटु, राजकारणी लोक आणि इतर बरेच जण काही निर्णय घेण्याआधी आपल्या कुंडलीचा परामर्श घेतात.
तुमच्या जन्माच्या वेळी तारे, ग्रह, चंद्र आणि सूर्य या ग्रहमानाची स्थिती दाखविणारे जे चित्र ज्योतिषाने काढलेले असते त्याकरवी तुमचे जीवन खरेच परिणामित होते का? लाखोंचा असा विश्वास आहे. याकरताच तुम्हास हे आश्चर्य वाटत असेल कीः
कुंडली ही खरीच साहाय्यक आहे का?
होय, असेच तिचे मानणारे म्हणतील. पण त्यांना असे का वाटत असते? एका व्यक्तीने म्हटलेः “मी दररोज माझी कुंडली पाहतो . . . आणि मी असेच म्हणेन की जितकेदा मी ती तपासणी करुन पाहिली त्यापैकीच्या निदान ८० टक्के गोष्टी तरी बरोबरच्या वाटल्या.” होय, या लोकांना वाटते की, कुंडलीमध्ये त्यांच्या समस्येविषयीची उत्तरे किंवा मार्गदर्शन मिळते.
पण, वर्तमानपत्रे व मासिके यात छापलेली कुंडली खरीच साहाय्यक ठरते का? ॲस्ट्रॉलॉजी फॉर द अक्वेरियन एज या पुस्तकात अलेक्झाण्ड्रा मार्क या प्रसिध्द ज्योतिषीने काय लिहिले ते पहाः “त्यांचे वाचन . . . तसे पाहता कोणा व्यक्तीच्या बाबतीत योगायोगाशिवाय जवळजवळ लागू होणे शक्य नाही. पण संकेताच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.” जरा थांबून विचार करा की, तुम्हाला तुमचे जीवन नुसत्या योगायोगाने किंवा संकेताकरवी मार्गदर्शित होऊ देण्याची इच्छा आहे का?
‘तरीपण,’ तुम्ही म्हणाल की, ‘एखाद्याची अचूक जन्मवेळ आणि त्याचे जन्मस्थान यावर काढलेली कुंडली अधिक बरोबर ठरु शकणार नाही का?’ असा हा दृष्टीकोन, आकाशातील ग्रह लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपले प्रभुत्व राखून असतात या मतावर आधारलेला असतो. पण जर पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील असणारे बरेच अंतर लक्षात घेतले तर ही गोष्ट कशी शक्यतेची वाटते बरे? शास्त्रज्ञांनी हे दाखविले आहे की ग्रहाचा कोणा विशिष्टावर काही विशिष्ठ परिणाम होत असेलच तर तो अगदीच उपेक्षणीय आहे. खरे पाहता, ज्योतिषशास्त्र ज्या नकाशावर आधारलेले आहे की, पृथ्वी ही विश्वाच्या मध्यभागी असून सूर्य व इतर ग्रह तिच्याभोवती भ्रमण करीत आहेत तोच मुळात चुकीचा आहे.
अशाप्रकारे कुंडलीपासून मिळणाऱ्या साहाय्याविषयी साशंकता असली तरी हाही प्रश्न विचारात घेणे सुयुक्त ठरेल कीः
कुंडली ही घातक ठरु शकते का?
होय, ती घातक ठरु शकते. तुम्ही कुंडली वाचता तेव्हा आपल्याठायी अर्थभरीत निर्णय घेण्याचे कौशल्य गमावीत असता हे ध्यानात आणा. खगोलवेत्ता रॉजर कल्वर म्हणतात त्याप्रमाणे, “हे सर्व ग्रहांनी घडवून आणले असा तुम्ही शेरा द्याल.” हे खरे की कोणी मौजेखातर कुंडली वाचेल पण समजा, त्याने जी कुंडली वाचली त्याचप्रमाणे योगायोगाने त्याच्या जीवनात तशी घटना घडून आली तर मग कुंडलीने जे भाकित केले त्यात सत्यता आहे असाचा त्याचा विश्वास बसणार ना? आणि मग या ज्योतिषशास्त्रात तो अधिकाधिक रस घेऊन त्यात मग्न होणार नाही का?
असे जर आहे तर अधिक गंभीर असे काहीतरी घडू शकते. औत्सुक्य म्हणून ज्या गोष्टीची सुरुवात केली तिचे पर्यवसान अशा प्रथेत होईल ज्याचा सर्वसमर्थ देवाने जे म्हटले आहे त्याचा भंग करणारे ठरु शकेल. प्राचीन इस्त्राएलांना यहोवा देवाने म्हटले होते की कोणाही स्वरुपातील भूतविद्या आणि अंतराळातील ग्रहाकडे पाहणे या गोष्टींचा त्याला वीट होता.
ही गोष्ट किती गंभीर आहे ते दाखविण्यासाठी पवित्र शास्त्र म्हणतेः “तुझा देवा यहोवा याने दिलेल्या नगरात कोणी पुरुष अथवा स्त्री तुझा देव यहोवा ह्याचा करार मोडून त्याच्या दृष्टीने काही दुष्कृत्य करताना आढळून आले, म्हणजे माझ्या आज्ञांचे उल्लंघन करुन अन्य देवांची अथवा सूर्य, चंद्र किंवा आकाशातील तारांगण ह्यांची सेवा व पूजा करु लागले, आणि हे तुला कोणी सांगितल्यावरुन तुझ्या कानावर आले तर त्याची कसून चौकशी कर; आणि ते खरे ठरुन इस्त्राएल लोकात असले अमंगळ कृत्य घडल्याची तुझी खात्री झाली, तर ज्या पुरुषाने अथवा स्त्रीने हे दुष्कृत्य केले असेल त्या पुरुषाला अथवा त्या स्त्रीला वेशीत आण आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत दगडमार कर.”—अनुवाद १७:२-५.
सूर्य, चंद्र आणि तारे यांच्याद्वारे शकुन पाहणे देवाला का आवडत नाही? कारण ही गोष्ट, प्रथमतः, त्याने यांची ज्या कारणास्तव निर्मिती केली आहे त्याच्या उद्देशाविरुध्द ठरते. (उत्पत्ती १:१४-१८) मार्गदर्शनार्थ आम्ही निर्मित गोष्टींकडे नव्हे तर निर्माणकर्त्याकडे पाहण्यास हवे. (रोमकर १:२५) दुसरे हे की, देवाला आमच्या जीवनात अद्वितीय स्थान दिलेच पाहिजे. त्याची केली जाणारी भक्ती ही दुसऱ्या कोणाही व्यक्ती वा इतर गोष्टीसोबत संमिश्रित होण्यास नको. (अनुवाद ४:२४) एखादा कुंडलीत इतका गढून जाऊ शकतो की त्याचे अवलंबत्व आणि देवाची भक्ती यांच्यातील सीमा तो पार करु शकतो. तिसरे हे की हा प्रकार भूतविद्येला आमंत्रित करतो. आणि मग भूतविद्येत मग्न होणे हे त्या व्यक्तीला भूतविद्येच्या मागे असणारी अतिमानुष शक्ती—दुरात्मे—यांचे सहजगत्या भक्ष्य बनवू शकते. (पडताळा अनुवाद १८:९-१२; यशया ४७:१२-१४; प्रे. कृत्ये १६:१६-१८.) अशाप्रकारे आम्ही कुंडलीच्या माध्यमाकरवी अधिक धोक्यात सापडू नये याकरता देव आम्हाला काहीतरी चांगले देत आहे, व ते आहेः
अधिक श्रेष्ठ मार्गदर्शन
यहोवा देवाने आपल्याला त्याचे वचन, पवित्र शास्त्र दिले आहे जे नेहमीच विश्वासपात्र असल्याचे शाबीत झाले आहे. तो आम्हाला ही हमी देतोः “त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. . . . ज्या कार्याकरता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:११.
तथापि, आम्ही देवाच्या वचनाच्या परिक्षणासाठी व त्यातून विशिष्ठ सल्ला संपादित करण्यासाठी परिश्रम करण्याची जरुरी आहे. हेच सूज्ञ शलमोन राजाने केले. त्याने लिहिलेः “ह्या सगळ्यांचे मनन मी केले आणि हे स्पष्टपणे समजण्याचा प्रयत्न केला; ते हे की धार्मिक व ज्ञानी आणि त्यांची कृत्ये ही सर्व खऱ्या देवाच्या स्वाधीन आहेत.” (उपदेशक ९:१) तद्वत, ज्योतिषांच्या डळमळीत हातांनी दाखविलेल्या कुंडलीतर्फे स्वतःला मार्गदर्शित करण्याऐवजी आपला आत्मविश्वास यहोवा देवाच्या दृढ हातावर विसंबून ठेवा. (g85 9/8)
[१८ पानांवरील चौकट]
“लोक गोंधळलेल्या स्थितीत आहेत. आर्थिक गोष्टी, व्यक्तीगत नातेसंबंध आणि नोकरी याविषयी निर्णय घेण्यात त्यांना मदत हवी आहे. आता धर्म पूर्वीप्रमाणे मदतगार राहिला नाही आणि मनोरोगविज्ञानास मर्यादा आहेत. यास्तव . . . आता बरेच जण ज्योतिषशास्त्राकडे, त्यामध्ये वैज्ञानिक गोष्टींची शक्यता वाटते म्हणून वळत आहेत.”—डॉ ॲलन रोसेनबर्ग, मनोविकारतज्ञ, नेचर/सायन्स वार्षिक पुस्तक.
[१९ पानांवरील चौकट]
सायन्टिफिक इन्वेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ द पॅरानॉर्मल याच्या समितीने नोव्हेंबर १६, १९८४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या कुंडलीविषयीची जबाबदारी न स्विकारण्याच्या संबंधात असे म्हटलेः “पुढील ग्रहमानाची भाकिते निव्वळ मनोरंजन या अर्थाने वाचण्यात यावीत. या भाकितांना वैज्ञानिक स्वरुपाचा कसलाही सबळ आधार नाही.”