ताऱ्यांचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो का?
तुम्ही जर कधी, शहराच्या लखलखाटीपासून दूर एखाद्या माळरानावर रात्रीचे गेलात आणि वर आकाशाकडे पाहिले तर तुम्हाला कोणते दृश्य दिसेल? काळेभोर आकाश, पसरवलेल्या एखाद्या मखमखली कापडासारखे आणि त्यावर लुकलुकणारे इवले-इवलेशे हिरे कोंदल्यासारखे तुम्हाला दिसेल. ताऱ्यांच्या अवाढव्यतेचे आणि आपल्यापासून असलेल्या त्यांच्या अंतराचे आकलन मानवाला गेल्या ३५० वर्षांपासून होऊ लागले आहे. आपण ज्याला विश्व म्हणतो त्या नभोमंडळात कार्यरत असलेल्या प्रचंड शक्तींबद्दल आपण आत्ता कुठेसे समजू लागलो आहोत.
प्राचीन काळापासून मानव, रात्रीच्या आकाशातील ताऱ्यांची शिस्तबद्ध हालचाल आणि त्यांच्या स्थानांमुळे होणारे ऋतुबदल पाहत आला आहे. (उत्पत्ति १:१४) प्राचीन इस्राएलच्या राजा दाविदाप्रमाणे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुमारे ३,००० वर्षांपूर्वी राजा दाविदाने असे लिहिले: “आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पहावे तर—मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी?”—स्तोत्र ८:३, ४.
कळत-नकळत ताऱ्यांचा व त्यांच्या हालचालींचा आपल्या जीवनावर थेट प्रभाव पडतो. आपला पृथ्वी ग्रह ज्याच्या भोवती भ्रमण करतो त्या सूर्यामुळे दिवसाचा आणि वर्षाचा अवधी ठरतो. चंद्र हा ‘ऋतुमान समजण्यासाठी नेमला आहे.’ (स्तोत्र १०४:१९, पं.र.भा.) आणि तारे विश्वसनीय दिशादर्शक आहेत; ताऱ्यांच्या स्थितीवरून अंतराळवीर आपले अंतराळयान फिरवू शकतात. म्हणूनच काहींना वाटते, की ताऱ्यांच्या आधारावर आपण फक्त काल व ऋतू यांच्याबद्दलच नव्हे तर आणखी पुष्कळ काही शिकू शकतो आणि देवाने निर्माण केलेल्या सृष्टीबद्दलची प्रशंसा आणखी वाढवू शकतो. पण मग ग्रह-तारे आपले भविष्य सांगू शकतात का किंवा येणाऱ्या संकटाचा इशारा देऊ शकतात का?
फलज्योतिषशास्त्राचा उगम व उद्देश
पृथ्वीवरील जीवनाला मार्गदर्शन मिळावे म्हणून आकाशाकडे पाहून शकून सांगण्याच्या प्रथेची सुरुवात, सा.यु.पू. तीन हजार वर्षांपूर्वी प्राचीन मेसोपोटेमियात झाली असावी. प्राचीन काळचे फलज्योतिषी आकाशातील ग्रहताऱ्यांचे अगदी बारकाईने निरीक्षण करायचे. ग्रहताऱ्यांच्या हालचालींची तपशीलवार माहिती लिहिण्याच्या प्रयत्नात, ताऱ्यांच्या स्थितीची यादी बनवण्याच्या प्रयत्नात, दिनदर्शक बनवण्याच्या प्रयत्नात व ग्रहणांबद्दल पूर्व भाकीत करण्याच्या प्रयत्नात खगोलशास्त्राचा उगम झाला. पण खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यात बराच फरक आहे. फलज्योतिषशास्त्रात, सूर्य आणि चंद्र यांचा आपल्या परिस्थितीकीवर होणाऱ्या नैसर्गिक परिणामांचे निरीक्षण केले जाते; इतकेच नाही तर, असा दावाही केला जातो, की सूर्य, चंद्र, ग्रह, तारे आणि नक्षत्रे यांच्या स्थितीमुळे आणि त्यांचे एका रांगेत आल्यामुळे पृथ्वीवर मोठमोठ्या घटना घडतात आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावरही त्यांचा प्रभाव पडतो. तो कसा?
काही ज्योतिषी, फलज्योतिषशास्त्राचा उपयोग करून, भविष्याबद्दलचे काही संकेत किंवा इशारे मिळतात का ते पाहतात आणि हे शास्त्र अवगत असलेले लोक, विविध मार्गांनी स्वतःचा फायदा करून घेतात. इतर काहींना वाटते, की फलज्योतिषशास्त्राद्वारे आपण, आपल्या हातून काय घडणार आहे ते माहीत करून घेऊ शकतो किंवा विशिष्ट कार्ये किंवा विशिष्ट प्रयत्न सुरु करण्याचा मुहूर्त बघू शकतो. आकाशातील मुख्य ग्रह एका रांगेत येतात ते “पाहून” व मग त्यांचा परस्परांवर तसेच पृथ्वीवर होणारा परिणाम पाहून आपण ही माहिती मिळवू शकतो, असे फलज्योतिषींचे म्हणणे आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्यावेळी, आकाशातील ग्रह व राशी यांच्या स्थितीनुसार त्या व्यक्तीवर प्रभाव पडतो, असेही त्यांचे म्हणणे आहे.
प्राचीन काळच्या ज्योतिषींची अशी समजूत होती, की पृथ्वी ही विश्वाच्या मध्यभागी आहे आणि ग्रह व तारे एका मोठ्या कंकणात बसवलेले आहेत व हे कंकण पृथ्वीभोवती फिरत आहे. आणि सूर्याचा वर्षातून एकदा एक भ्रमणमार्ग असतो म्हणजे, एका विशिष्ट मार्गानेच तो ताऱ्यांजवळून व नक्षत्रांजवळून जातो, असेही त्यांना वाटायचे. सूर्याच्या या मार्गाला त्यांनी ग्रहणमार्ग म्हटले आणि त्याचे १२ राशींमध्ये अथवा भागांमध्ये विभाजन केले. प्रत्येक भागाला त्यांनी, सूर्य ज्या ज्या नक्षत्राजवळून जातो त्याला त्याचे नाव दिले. अशा प्रकारे, राशी चक्राच्या १२ खुणा अस्तित्वात आल्या. या राशी म्हणजे, विशिष्ट दैवतांची घरे. नंतर, वैज्ञानिकांना समजले, की सूर्य पृथ्वीभोवती भ्रमण करत नाही तर पृथ्वीच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. या शोधामुळे फलज्योतिषशास्त्र जो दावा करत होते त्याचा बट्ट्याबोळ झाला.
मेसोपोटेमियात सुरु झालेल्या फलज्योतिषशास्त्राची प्रथा जगातील बहुतेक भागात पसरली आणि मानवजातीच्या सर्व प्रमुख संस्कृतींमध्ये तिने वेगवेगळ्या रुपात आपले पाय रोवले. पर्शियाने बॅबिलोनवर विजय मिळवल्यानंतर, फलज्योतिषशास्त्र ईजिप्ट, ग्रीस व भारतापर्यंत पोचले. भारतातून मग बौद्ध मिशनऱ्यांनी पुढे ते मध्य आशिया, चीन, तिबेट, जपान व आग्नेय आशियात नेले. माया संस्कृतीपर्यंत ही प्रथा नेमकी कोणत्या मार्गाने गेली हे कोणाला माहीत नसले तरी, त्या संस्कृतीने बॅबिलोन्यांप्रमाणेच ग्रहताऱ्यांच्या निरीक्षणाचा विस्तारित प्रमाणात उपयोग केला. फलज्योतिषशास्त्राचा “आधुनिक” प्रकार हेल्लनी ईजिप्टमध्ये विकसित झाला आणि यहुदी, मुस्लिम व ख्रिस्ती धर्मजगत यांच्यावर त्याचा बराच परिणाम झाला.
सा.यु.पू. सातव्या शतकात इस्राएल लोकांना बॅबिलोनने कैद करून नेले तेव्हाही त्यांच्यावर फलज्योतिषशास्त्राचा परिणाम झाला. विश्वासू राजा योशिया याने आपल्या लोकांतून, ‘सूर्य, चंद्र, राशिचक्र व नक्षत्रगण यास धूप जाळण्याची’ प्रथा नष्ट करण्याचा बराच प्रयत्न केल्याचे वर्णन आपण बायबलमध्ये वाचतो.—२ राजे २३:५.
फलज्योतिषशास्त्राचा उगम
फलज्योतिषशास्त्र, विश्वाची रचना आणि त्याचे कार्य यांबद्दलच्या खूप मोठमोठ्या चुकांवर आधारित आहे. त्यामुळे देवाकडून या प्रथेचा उगम होणे शक्य नाही. यातील मूलभूत गृहिते असत्य गोष्टींवर आधारित असल्यामुळे, फलज्योतिषशास्त्र आपल्याला भविष्याविषयीची अचूक माहिती देऊच शकत नाही. दोन ऐतिहासिक घटनांवरून फलज्योतिषशास्त्राचा खोटेपणा दिसून येतो.
बॅबिलोनी राजा नबुखद्नेस्सर याला एकदा एक स्वप्न पडले तेव्हा त्याच्या राज्यातील पुरोहित व ज्योतिषी त्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकले नाहीत. का सांगू शकले नाहीत त्याचे कारण, खरा देव यहोवा याचा संदेष्टा असलेल्या दानीएलाने सांगितले: राजाने “जे रहस्य विचारिले आहे ते ज्ञानी, मांत्रिक, ज्योतिषी व दैवज्ञ यांस राजाला सांगता येणार नाही; तरी रहस्ये प्रगट करणारा देव स्वर्गात आहे आणि त्याने पुढील काळी काय होणार हे नबुखद्नेस्सर महाराजांना कळविले आहे.” (दानीएल २:२७, २८) होय, दानीएलाने सूर्य, चंद्र किंवा तारे यांना नव्हे तर “रहस्ये प्रगट करणारा” यहोवा देव याला त्या स्वप्नाचा अर्थ विचारल्यामुळे तो राजाला त्याच्या स्वप्नाचा अचूक अर्थ सांगू शकला.—दानीएल २:३६-४५.
माया संस्कृतीचे अचूक फलज्योतिषशास्त्राचे अंदाज, सा.यु. नवव्या शतकात कोसळलेल्या संकटातून या संस्कृतीला वाचवू शकले नाहीत. फलज्योतिषशास्त्राच्या या अपयशावरून सिद्ध होते, की फलज्योतिषशास्त्र एक निव्वळ फसवणूक आहे व ते भविष्य अचूकपणे वर्तवू शकत नाही. तसेच, या अपयशावरून फलज्योतिषाचा खरा उद्देश दिसून येतो आणि तो म्हणजे भविष्याविषयीची अचूक माहिती देवाकडून प्राप्त करण्यास लोकांना प्रतिबंध करणे.
फलज्योतिषशास्त्र असत्य गोष्टींवर आधारलेले असल्यामुळे आपल्याला याचा जनक कोण आहे ते समजते. येशूने सैतानाविषयी असे म्हटले होते: “तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.” (योहान ८:४४) सैतान “तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो” आणि त्याचे दुरात्मे “नीतिमत्वाच्या सेवकांचे सोंग” घेतात. पण खरे तर ते लोकांची फसवणूक करणारे आहेत. ते त्यांना त्यांच्या कपटी जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. (२ करिंथकर ११:१४, १५) पण देवाचे वचन “सैतानाच्या कृतीप्रमाणे [असलेली] सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते” यांचा पर्दाफाश करते.—२ थेस्सलनीकाकर २:९, १०.
तुम्ही ज्योतिष का पाहू नये
ज्योतिष लबाड्यांवर आधारित असल्यामुळे, सत्यस्वरुप देव यहोवा याला त्याची घृणा वाटते. (स्तोत्र ३१:५) म्हणूनच, बायबलमध्ये या सिद्धांताचा अगदी जोरदारपणे निषेध करण्यात आला आहे आणि लोकांनी देखील या सिद्धांतापासून चार हात दूरच राहावे, असे उत्तेजन देण्यात आले आहे. अनुवाद १८:१०-१२ यांत देवाने अगदी स्पष्टरीत्या असे म्हटले: “शकूनमुहूर्त पाहणारा, . . . पंचाक्षरी, छाछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. कारण जो कोणी असली कृत्ये करितो त्याचा परमेश्वराला वीट आहे.”
ज्योतिष, सैतान आणि त्याचे दुरात्मे यांच्या शक्तीने पाहिले जात असल्यामुळे, ज्योतिष पाहणाऱ्या व्यक्तीवर त्यांचा प्रभाव पडतोच. जसे, केवळ मौज म्हणून ड्रग्ज घेणाऱ्या व्यक्तीचा संबंध ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांशी येऊ शकतो, तसेच, केवळ मौज म्हणून ज्योतिष पाहणारी व्यक्ती, लबाडीचा बाप असलेल्या सैतानाच्या प्रभावाखाली येऊ शकते. त्यामुळे, देवावर आणि सत्यावर प्रेम करणाऱ्यांनी ज्योतिशास्त्रापासून चार हात दूरच राहिले पाहिजे आणि “वाइटाचा द्वेष करा, बऱ्याची आवड धरा,” या बायबलमधील सल्ल्याचे पालन केले पाहिजे.—आमोस ५:१५.
लोकांना आपले भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता असल्यामुळे, ज्योतिषशास्त्राचा सिद्धांत फोफावला आहे. पण मग भविष्य जाणून घेण्याचा काही मार्ग आहे का? उद्या, पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या वर्षी आपले काय होईल, हे आपल्याला माहीत नाही असे बायबल सांगते. (याकोब ४:१४) तरीपण, लवकरच संपूर्ण मानवजातीचे पुढे काय होणार आहे त्याचे एक सर्वसामान्य चित्र बायबल आपल्यासमोर उभे करते. येशूने शिकवलेल्या प्रार्थनेत आपण ज्या राज्यासाठी प्रार्थना करतो ते राज्य लवकरच येणार आहे, असे बायबल सांगते. (दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०) ते हेही सांगते, की मानव भोगत असलेले दुःख लवकरच काढून टाकले जाणार आहे आणि मानव पुन्हा कधीच कोणत्याही कारणामुळे दुःखी होणार नाही. (यशया ६५:१७; प्रकटीकरण २१:४) मानवाचे नशीब ठरवण्याऐवजी, देव संपूर्ण पृथ्वीवरील लोकांना त्याच्याबद्दल आणि त्यांच्या लाभाकरता तो त्यांच्यासाठी काय-काय करणार आहे याबद्दल शिकून घेण्याचे आमंत्रण देत आहे. हे आपण कसे सांगू शकतो? बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे, की “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे,” अशी देवाची इच्छा आहे.—१ तीमथ्य २:४.
आपण पाहत असलेले तेजोमय आकाश आणि त्यातील ग्रह-तारे आपल्या जीवनावर नियंत्रण करण्याकरता बनवण्यात आलेले नाहीत. तर ते आपल्याला यहोवाची शक्ती आणि त्याचे देवपण दाखवतात. (रोमकर १:२०) हे ग्रह-तारे आपल्याला लबाड गोष्टी नाकारायला तसेच देवाकडून आणि त्याचे वचन बायबल यातून, सुखी व यशस्वी जीवनासाठी असलेले विश्वसनीय मार्गदर्शन व सल्ला मिळवायला प्रवृत्त करतात. “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”—नीतिसूत्रे ३:५, ६. (w१०-E ०६/०१)
[२३ पानांवरील संक्षिप्त आशय]
माया लोक, ग्रह-ताऱ्यांच्या निरीक्षणाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करत असत
[२४ पानांवरील संक्षिप्त आशय]
“रहस्ये प्रगट करणारा देव स्वर्गात आहे आणि त्याने पुढील काळी काय होणार हे . . . कळविले आहे”
[२४ पानांवरील संक्षिप्त आशय]
माया संस्कृतीचे अचूक फलज्योतिषशास्त्रातील अंदाज, सा.यु. नवव्या शतकात कोसळलेल्या संकटातून या संस्कृतीला वाचवू शकले नाहीत
[२३ पानांवरील चित्र]
एल कारकोल वेधशाळा, चिचेन इट्झा, युकाटन, मेक्सिको, सा.यु. ७५०-९००
[२३ पानांवरील चित्राचे श्रेय]
पृष्ठे २२ व २३ वर, डावीकडून उजवीकडे: तारे: NASA, ESA, व A. Nota (STScI); माया कॅलेंडर: © Lynx/Iconotec com/age fotostock; माया अंतराळवीर: © Albert J. Copley/age fotostock; माया वेधशाळा: El Caracol (The Great Conch) (photo), Mayan/Chichen Itza, Yucatan, Mexico/Giraudon/The Bridgeman Art Library