त्यांनी अगदी “तसे केले”
“देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय.” —१ योहान ५:३.
१. देवाच्या प्रीतीच्या मर्यादेबद्दल काय म्हटले जाऊ शकते?
“देव प्रीति आहे.” देवाला ओळखणारे व त्याच्या आज्ञा पाळणारे सर्वजण या प्रीतीच्या सखोलतेबद्दल गहन गुणग्राहकता बाळगतात. “प्रीति म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीति केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हावर प्रीति केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्चित व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले.” आपण येशूच्या मौल्यवान खंडणी बलिदानावर विश्वास ठेवू लागतो तेव्हा आपण ‘देवाच्या प्रीतीमध्ये राहतो.’ (१ योहान ४:८-१०, १६) अशा प्रकारे आता आणि भावी व्यवस्थीकरणात आपण आध्यात्मिक आशीर्वादांच्या समृद्धतेचा आनंद, सार्वकालिक जीवनाचा आनंद लुटू शकतो.—योहान १७:३; १ योहान २:१५, १७.
२. देवाच्या आज्ञा पाळल्याने त्याच्या सेवकांना कसा लाभ झाला आहे?
२ देवाच्या आज्ञा पाळून समृद्ध आशीर्वाद मिळवला आहे अशांच्या उदाहरणांनी बायबलचा अहवाल ओतप्रोत भरला आहे. यामध्ये ख्रिस्ती-पूर्व काळातील साक्षीदारांचा समावेश आहे, ज्यांच्यातील काहींविषयी प्रेषित पौलाने असे लिहिले: “हे सर्व जण विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ति झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे पत्करले.” (इब्रीयांस ११:१३) नंतर, “कृपा व सत्य [जी] येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली” त्याकरवी देवाच्या समर्पित ख्रिस्ती सेवकांना लाभ प्राप्त झाला. (योहान १:१७) सुमारे ६,००० वर्षांच्या मानव इतिहासात, यहोवाच्या वस्तुतः “कठीण नाहीत” अशा आज्ञांचे पालन केलेल्या विश्वासू साक्षीदारांना त्याने प्रतिफळ दिले आहे.—१ योहान ५:२, ३.
नोहाच्या दिवसांत
३. नोहाने कोणत्या प्रकारे अगदी “तसे केले”?
३ बायबल वृत्तान्त म्हणतो: “तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त [ईश्वरी] भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरविले, आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्त्व त्याचा तो वतनदार झाला.” नोहाने “नीतिमत्त्वाचा उपदेशक” या नात्याने, जलप्रलयापूर्वीच्या हिंसक जगाला, समीप असलेल्या ईश्वरी न्यायदंडाचा इशारा देऊन देवाचे पूर्णपणे आज्ञापालन केले. (इब्रीयांस ११:७; २ पेत्र २:५) तारू बांधताना, ईश्वरी आराखड्याचे त्याने काळजीपूर्वक अनुसरण केले. त्यानंतर त्याने नेमलेले प्राणी आणि अन्नसाठा गोळा केला. “नोहाने तसे केले; देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.”—उत्पत्ति ६:२२.
४, ५. (अ) एका अनिष्ट प्रभावाचा मानवजातीवर या दिवसापर्यंत कसा परिणाम झाला आहे? (ब) ईश्वरी सूचनांचे पालन करण्यात आपण अगदी ‘तसेच का केले’ पाहिजे?
४ नोहा व त्याच्या कुटुंबाला अवज्ञाकारी दूतांच्या अनिष्ट प्रभावाविरुद्ध लढावे लागले होते. या देवपुत्रांनी रूपांतर करून स्त्रियांशी सहवास राखला व अतिमानुष संकरीत संतती उत्पन्न केली जिने मानवजातीवर अरेरावीपणा केला. “देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती; ती जाचजुलमांनी भरली होती.” त्या दुष्ट पिढीचा नायनाट करण्यासाठी यहोवाने प्रलय आणला. (उत्पत्ति ६:४, ११-१७; ७:१) नोहाच्या दिवसांपासून दुरात्मिक दूतांना मानवी स्वरूपात रूपांतर करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. तरीसुद्धा, “सगळे जग त्या दुष्टाला,” दियाबल सैतानाला “वश आहे.” (१ योहान ५:१९; प्रकटीकरण १२:९) भविष्यसूचकरित्या, येशूने नोहाच्या दिवसांतील त्या बंडखोर पिढीची तुलना त्या मानवजातीच्या पिढीशी केली ज्यांनी १९१४ मध्ये त्याच्या ‘उपस्थितीचे’ चिन्ह प्रकट होऊ लागले तेव्हापासून त्यास नाकारले.—मत्तय २४:३, ३४, ३७-३९; लूक १७:२६, २७.
५ सैतान आज, नोहाच्या दिवसाप्रमाणे, मानवजात व आपल्या ग्रहाचा नाश करण्याचा प्रयत्न करत आहे. (प्रकटीकरण ११:१५-१८) यास्तव, आपण “सैतानाच्या कावेबाज कृत्यांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा,” या प्रेरित आज्ञेकडे लक्ष द्यावे हे निकडीचे आहे. (इफिसकर ६:११, तळटीप, NW) असे करण्यामध्ये, देवाच्या वचनाचा अभ्यास केल्याने आणि त्यास आपल्या जीवनात लागू केल्याने आपल्याला बळकटी मिळते. शिवाय, आपण ज्या मार्गाने जावे त्या मार्गाने सहनशीलतेने मार्गदर्शित करण्यासाठी आपल्याजवळ यहोवाची प्रेमळ संघटना एवढेच नव्हे तर तिच्यासहित ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ तसेच प्रेमळ वडील आहेत. आपल्याला जागतिक प्रचाराचे कार्य पूर्ण करायचे आहे. (मत्तय २४:१४, ४५-४७) ईश्वरी सूचनांचे काळजीपूर्वक पालन केलेल्या नोहाप्रमाणे आपणही नेहमी अगदी ‘तसेच करू’ या.
मोशे—सर्व मनुष्यांपेक्षा नम्र
६, ७. (अ) मोशेने कोणती फलदायी निवड केली? (ब) मोशेने आपल्यासाठी कोणता धैर्यशील नमुना मांडला?
६ मोशे—या आणखी एका विश्वासू मनुष्याचा विचार करा. इजिप्तच्या ऐषारामात तो भोगासक्त जीवन व्यतीत करू शकला असता. परंतु, “पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले.” यहोवाचा नियुक्त सेवक या नात्याने, “त्याची दृष्टि प्रतिफळावर होती [व] जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.”—इब्रीयांस ११:२३-२८.
७ गणना १२:३ मध्ये आपण वाचतो: “मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.” याच्या विरुद्धतेत, इजिप्तचा फारो सर्व मनुष्यांपेक्षा गर्विष्ठ असा वागला. यहोवाने फारोवर आपला न्यायदंड घोषित करण्यासाठी मोशे आणि अहरोनला आज्ञापिले तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती? आपल्याला असे सांगण्यात येते: “मोशे व अहरोन यांनी तसे केले; परमेश्वराने [यहोवा, NW] त्यांस आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी केले.” (निर्गम ७:४-७) आज देवाचे न्यायदंड घोषित करणाऱ्या आपणासाठी हा किती धैर्यशील नमुना आहे!
८. इस्राएलांकडून अगदी ‘तसे करण्याची’ अपेक्षा कशी करण्यात आली होती आणि यामुळे घडलेल्या आनंदाचे समांतर नजीकच्या भवितव्यात कसे केले जाईल?
८ इस्राएलांनी मोशेला निष्ठेने पाठिंबा दिला का? यहोवाने दहा पीडांपैकी नऊ पीडांनी इजिप्तला पीडित केल्यावर, वल्हांडण सण साजरा करण्याबद्दल त्याने इस्राएलला तपशीलवार सूचना दिल्या. “लोकांनी मस्तके लववून दंडवत घातले. इस्राएल लोकांनी जाऊन तसे केले; परमेश्वराने [यहोवा] मोशे व अहरोन ह्यांना आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांनी केले.” (निर्गम १२:२७, २८) त्या घटनापूर्ण दिवसाच्या मध्यरात्री, सा. यु. पू. निसान १४, १५१३ रोजी, देवाच्या दूताने इस्राएल घराण्यांना सोडून इजिप्त लोकांचे सर्व प्रथमवत्स मारून टाकले. इस्राएलाच्या प्रथमवत्सांना का वाचवले होते? कारण त्यांच्या दरवाजांवर शिंपडलेल्या वल्हांडणाच्या कोकऱ्याच्या रक्तामुळे त्यांना संरक्षण मिळाले होते. यहोवाने मोशे व अहरोनला आज्ञापिल्याप्रमाणेच त्यांनी केले. होय, ‘त्यांनी तसे केले.’ (निर्गम १२:५०, ५१) लाल समुद्रापाशी, यहोवाने त्याच्या आज्ञाधारक लोकांना वाचवून व फारो आणि त्याच्या सामर्थ्यशाली लष्करी यंत्राचा नाश करून आणखी एक चमत्कार घडवला. इस्राएलांना किती आनंद झाला! त्याचप्रमाणे आज, यहोवाच्या आज्ञांचे पालन केलेले अनेकजण हर्मगिदोनमध्ये त्याच्या समर्थनाचे प्रत्यक्ष साक्षीदार झाल्याबद्दल आनंद करतील.—निर्गम १५:१, २; प्रकटीकरण १५:३, ४.
९. निवासमंडपाच्या संबंधात इस्राएलांनी अगदी “तसे केले” याद्वारे कोणते आधुनिक विशेषाधिकार पूर्वचित्रित करण्यात आले?
९ यहोवाने इस्राएल लोकांना देणगी गोळा करून रानात एक निवासमंडप बांधण्यास आज्ञापिले तेव्हा, लोकांनी उदारतेने संपूर्ण पाठिंबा दिला. मग, मोशे व त्याच्या इच्छुक साथीदारांनी अगदी बारीकसारीक तपशीलातही, यहोवाने पुरवलेल्या बांधकामाच्या योजना अनुसरल्या. “ह्या प्रकारे दर्शनमंडपाच्या निवासमंडपाचे सर्व काम समाप्त झाले; परमेश्वराने [यहोवा] मोशेला आज्ञा दिली होती तिला अनुसरून इस्राएल लोकांनी सर्व काही केले.” त्याचप्रमाणे, याजकपदाच्या उद्घाटन प्रसंगी, “मोशेने तसे केले म्हणजे परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने तसे केले.” (निर्गम ३९:३२; ४०:१६) आधुनिक काळात, प्रचार कार्याला आणि राज्य विस्ताराच्या कार्यक्रमांना संपूर्ण अंतःकरणाने पाठिंबा देण्याची संधी आपल्याला आहे. एकत्र मिळून ‘तसेच करण्याची’ आपल्याला सुसंधी आहे.
यहोशवा—धैर्यवान आणि अति सामर्थ्यवान
१०, ११. (अ) यहोशवाला यश प्राप्त करण्यास कोणत्या गोष्टीने सज्ज केले? (ब) आधुनिक दिवसातील परीक्षांना तोंड देण्यास आपण कसे बळकट होऊ?
१० मोशेने इस्राएलांना वाग्दत्त देशात नेण्यासाठी यहोशवाला नेमले तेव्हा, संभवतः यहोवाचे प्रेरित लिखित वचन, केवळ मोशेची पाच पुस्तके, एक किंवा दोन स्तोत्रे आणि ईयोबाच्या पुस्तकात उपलब्ध होते. मोशेने, वाग्दत्त देशात पोहंचल्यावर लोकांना एकत्रित करून “नियमशास्त्र सर्व इस्राएलांना ऐकू येईल असे वाचून” दाखवण्यास यहोशवाला सूचना दिली होती. (अनुवाद ३१:१०-१२) त्याशिवाय, यहोवाने स्वतः यहोशवाला म्हटले: “नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ति घडेल.”—यहोशवा १:८.
११ यहोवाचे वचन, बायबल याचे दैनिक वाचन केल्याने त्याच्या आधुनिक दिवसातील साक्षीदारांना या कठीण ‘शेवटल्या काळातील’ परीक्षांना तोंड देण्यास बळकटी मिळते त्याचप्रमाणे यहोवाच्या ‘ग्रंथाचे’ दैनिक वाचन केल्याने, पुढील परीक्षांना हाताळण्यासाठी यहोशवा सज्ज झाला. (२ तीमथ्य ३:१) आपल्याला हिंसक जगाने घेरलेले आहे, तर देवाने यहोशवाला, “खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नको, कचरू नको; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर [यहोवा] तुझ्याबरोबर असेल,” असा दिलेला बोध आपणही आत्मसात करू या. (यहोशवा १:९) कनानवर कब्जा केल्यावर, वतन वाटून घेताना इस्राएलच्या वंशांना समृद्धतेने आशीर्वादित करण्यात आले. ‘परमेश्वराने [यहोवा] मोशेला दिलेली आज्ञा इस्राएल लोकांनी अनुसरली.’ (यहोशवा १४:५) देवाचे वचन वाचणारे आणि ते त्यांच्या जीवनांत लागू करणारे व आज्ञाधारकपणे ‘तसेच करणाऱ्या’ आज आपल्या सर्वांसाठी अशाच प्रकारचे एक प्रतिफळ राखून ठेवलेले आहे.
राजे—विश्वासू आणि अवज्ञाकारी
१२. (अ) इस्राएलमधील राजांना कोणती आज्ञा दिली होती? (ब) राजा आज्ञापालन करण्यात अपयशी ठरल्यामुळे काय घडले?
१२ इस्राएलमधील राजांविषयी काय? यहोवाने राजांकडून ही अपेक्षा केली होती: “तो आपल्या राजासनावर आरूढ होईल तेव्हा लेवीय याजकांपाशी असलेल्या नियमशास्त्राची एक नक्कल त्याने एका वहीत स्वतःसाठी उतरून घ्यावी; ती त्याच्यापाशी असावी, आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे, म्हणजे त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधि पाळून व त्याप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्वर [यहोवा] ह्याचे भय बाळगावयाला शिकेल.” (अनुवाद १७:१८, १९) इस्राएलच्या राजांनी ती आज्ञा पाळली का? ते फारच दुःखकारकपणे अपयशी ठरले, जेणेकरून अनुवाद २८:१५-६८ मध्ये भाकीत केलेले शाप त्यांना भोगावे लागले. शेवटी, “पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत” इस्राएलची पांगापांग करण्यात आली.
१३. यहोवाच्या वचनाबद्दल प्रेम दाखवून दावीदाप्रमाणे आपल्याला लाभ कसा प्राप्त होईल?
१३ तथापि, दावीद—इस्राएलातील पहिला विश्वासू मानवी राजा—याने यहोवाबद्दल असाधारण भक्तीभाव दाखवला. तो “सिंहाचा छावा” ठरला व ‘यहुदा वंशाचा विजय मिळवणारा सिंह, दावीदाचा अंकुर’ असलेल्या ख्रिस्त येशूला त्याने पूर्वचित्रित केले. (उत्पत्ति ४९:८, ९; प्रकटीकरण ५:५) दाविदाचे सामर्थ्य कशात सामावलेले होते? त्याला यहोवाच्या लिखित वचनाबद्दल गाढ गुणग्राहकता होती व त्यानुसार तो जगला. स्तोत्र १९, “दावीदाचे स्तोत्र” यात आपण असे वाचतो: “परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे.” यहोवाचे निर्बंध, विधी, आज्ञा व निर्णय यांचा उल्लेख केल्यावर, दावीद पुढे म्हणतो: “ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत, ते मधापेक्षा, मोहोळांतून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो; ते पाळिल्याने मोठी फलप्राप्ति होते.” (स्तोत्र १९:७-११) यहोवाच्या वचनाचे दैनिक वाचन व त्यावर मनन करणे ३,००० वर्षांआधी फलदायी होते, तर आज आणखी कितीतरी प्रमाणात ते तसे आहे!—स्तोत्र १:१-३; १३:६; ११९:७२, ९७, १११.
१४. शलमोनाचे मार्गाक्रमण ज्ञानापेक्षा अधिक काहीतरी आवश्यक असल्याचे कशा प्रकारे दाखवून देते?
१४ तरीही, केवळ ज्ञान प्राप्त करणे पुरेसे नाही. देवाच्या सेवकांना त्या ज्ञानानुरुप कार्य करणे, ईश्वरी इच्छेनुसार त्याचा अवलंब करणे—होय, अगदी ‘तसेच करणे’ देखील आवश्यक आहे. दावीदाचा पुत्र शलमोन याच्या उदाहरणावरून हे स्पष्ट केले जाऊ शकते, ज्याला यहोवाने “इस्राएलावर राज्य करण्यासाठी परमेश्वराच्या राजासनावर बसावे म्हणून” निवडले. दावीदाला “दैवी आत्म्याच्या प्रेरणेने” मिळालेल्या बांधकामाच्या आराखड्याचा उपयोग करून मंदिर बांधण्यासाठी शलमोनाला नेमणूक मिळाली. (१ इतिहास २८:५, ११-१३) हे प्रचंड कार्य शलमोन कसे साध्य करणार होता? एका प्रार्थनेच्या उत्तरात यहोवाने त्याला बुद्धी व ज्ञान प्रदान केले. हे प्राप्त करून व ईश्वराकडून पुरवलेल्या आराखड्यानुसार कार्य करून, शलमोन भव्य मंदिर बांधू शकला जे नंतर यहोवाच्या गौरवाने भरले गेले. (२ इतिहास ७:२, ३) परंतु, नंतर शलमोन अपयशी ठरला. कोणत्या बाबतीत? इस्राएलाच्या राजाविषयी देवाच्या नियमात असे म्हटले होते: “राजाने पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन बहकून जावयाचे.” (अनुवाद १७:१७) तरीदेखील, शलमोनाच्या “सातशे राण्या [राजकुमारी] व तीनशे उपपत्नी होत्या; त्याच्या बायकांनी . . . त्याचे मन अन्य देवांकडे वळविले.” नंतरच्या वर्षांमध्ये, ‘तसेच करण्यापासून’ शलमोन परावृत्त झाला.—१ राजे ११:३, ४; नहेम्या १३:२६.
१५. योशीयाने कोणत्या प्रकारे अगदी ‘तसे केले’?
१५ यहुदामध्ये काही आज्ञाधारक राजे होते व त्यातला शेवटला योशीया होता. सा. यु. पू. ६४८ या वर्षी, देशातून मूर्तिपूजा काढून टाकण्यास व यहोवाचे मंदिर दुरुस्त करण्यास त्याने सुरवात केली. तेथे महायाजकाला “मोशेच्या द्वारे दिलेल्या परमेश्वराच्या [यहोवा] नियमशास्त्राचा ग्रंथ” सापडला. याविषयी योशीयाने काय केले? “यहूदा येथील सर्व लोक, यरुशलेमेतले सर्व रहिवासी, याजक, लेवी अशा सर्व आबालवृद्धांस बरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिरी गेला; परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकांस ऐकू येतील अशी वाचून दाखविली. मग राजाने आपल्या स्थानी उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की मी परमेश्वराचे अनुसरण करीन, त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जिवेभावे पाळीन व त्या ग्रंथांतील कराराच्या वचनांप्रमाणे वर्तेन.” (२ इतिहास ३४:१४, ३०, ३१) होय, योशीयाने “तसे केले.” त्याच्या विश्वासू मार्गाक्रमणामुळे, विश्वासहीन यहुदावर त्याच्या अपराधी पुत्रांच्या दिवसांपर्यंत यहोवाचा न्यायदंड बजावण्यात आला नाही.
देवाच्या वचनानुसार वागणे
१६, १७. (अ) आपण कोणत्या बाबतीत येशूच्या पावलांचे अनुकरण केले पाहिजे? (ब) देवाचे इतर कोणते विश्वासू सेवक आपल्यासाठी उदाहरण पुरवतात?
१६ सर्वकाळातील मनुष्यांपेक्षा, देवाच्या वचनावर मनन करणे आणि त्यानुसार वागणे याचे सर्वात उत्तम उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताचे आहे. देवाचे वचन त्याच्याकरता अन्नाप्रमाणे होते. (योहान ४:३४) त्याने आपल्या ऐकणाऱ्यांना म्हटले: “पुत्र पित्याला जे काही करिताना पाहतो त्यावाचून काहीहि त्याला स्वतः होऊन करिता येत नाही; कारण जे काही तो करितो ते पुत्रहि तसेच करितो.” (योहान ५:१९, ३०; ७:२८; ८:२८, ४२) येशूने अगदी “तसे केले” व म्हटले: “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे.” (योहान ६:३८) यहोवाचे समर्पित सेवक असलेल्या आपल्याकडून येशूच्या पावलांचे अनुकरण करून अगदी ‘तसे करण्याची’ अपेक्षा केली जाते.—लूक ९:२३; १४:२७; १ पेत्र २:२१.
१७ देवाची इच्छा करणे, या गोष्टीला येशूच्या मनात सर्वात प्रथम स्थान होते. देवाच्या वचनाशी संपूर्णतः परिचित असल्यामुळे शास्त्रवचनीय उत्तरे देण्यास तो सज्ज होता. (मत्तय ४:१-११; १२:२४-३१) देवाच्या वचनाकडे सतत लक्ष देण्याद्वारे आपण देखील “पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज” होऊ शकतो. (२ तीमथ्य ३:१६, १७) प्राचीन काळातील व त्यानंतरच्या काळातील यहोवाच्या विश्वासू सेवकांचे उदाहरण आणि याही पेक्षा अधिक म्हणजे आपला धनी, येशू ख्रिस्त याचे उदाहरण आपण अनुसरू या, ज्याने असे म्हटले: “मी पित्यावर प्रीति करितो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करितो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते.” (योहान १४:३१) आपणही अगदी ‘तसेच करून’ देवाबद्दल आपले प्रेम व्यक्त करू या.—मार्क १२:२९-३१.
१८. “वचनाप्रमाणे आचरण करणारे” होण्यास आपल्याला कशाने उद्दीपित केले पाहिजे आणि पुढे काय चर्चिले जाईल?
१८ बायबल काळातील देवाच्या सेवकांच्या आज्ञाधारक मार्गाक्रमणावर आपण मनन करतो, तसे सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या समाप्ती दरम्यान विश्वासूपणे सेवा करण्यास आपण उत्तेजित होत नाही का? (रोमकर १५:४-६) पुढील लेख चर्चा करील त्याप्रमाणे, संपूर्ण अर्थाने, “वचनाप्रमाणे आचरण करणारे” होण्यासाठी आपण खरोखर उत्तेजित झाले पाहिजे.—याकोब १:२२.
तुम्हाला आठवते का?
◻ ‘देवाच्या प्रीतीचा’ आपल्याकरता काय अर्थ होण्यास हवा?
◻ नोहा, मोशे आणि यहोशवाच्या उदाहरणांवरून आपण काय शिकतो?
◻ इस्राएलातील राजांनी कितपत देवाच्या ‘वचनाचे’ पालन केले?
◻ येशू ‘तसे करण्यामध्ये’ आपल्यासाठी कित्ता कसा आहे?
[१५ पानांवरील चित्रं]
नोहा, मोशे व यहोशवाने अगदी “तसे केले”