अम्मोनी दयेची शत्रुत्वाने परतफेड करणारे लोक
अम्मान, हे नाव असलेले आधुनिक शहर जॉर्डनच्या हशमाईट राज्याची राजधानी, पृथ्वीवरून नाहीशा झालेल्या लोकांच्या आठवणी जतन करून ठेवते. त्या लोकांना अम्मोनी असे म्हटले जात होते. ते कोण होते व त्यांच्या पतनापासून आपण कोणते धडे शिकू शकतो?
अम्मोनी लोक, धार्मिक पुरुष लोट याचे वंशज होते. (उत्पत्ति १९:३५-३८) लोट अब्राहामाचा पुतण्या असल्यामुळे अम्मोनी लोक इस्राएली लोकांची भावंडे होती असे तुम्ही म्हणू शकाल. परंतु, लोटाची मुले खोट्या दैवतांच्या उपासनेकडे वळाली. तरीसुद्धा, यहोवा देवाने त्यांच्यामध्ये आस्था बाळगली. इस्राएल राष्ट्र जसजसे वाग्दत्त देशाच्या जवळ येत होते, तसतसे देवाने त्यांना इशारा दिला: “अम्मोनी लोकांच्या सीमेवर येशील तेव्हा त्यांना उपद्रव देऊ नको व त्यांच्याशी झगडा करू नको; अम्मोनी लोकांच्या देशाचा कोणताहि भाग मी तुला वतन म्हणून देणार नाही, कारण लोटाच्या वंशजांना तो मी वतन म्हणून दिला आहे.”—अनुवाद २:१९.
अम्मोनी लोकांनी या दयेची गुणग्राहकता बाळगली का? उलटपक्षी यहोवाने त्यांना हे सर्व दिले होते ते कबूल करण्यास त्यांनी नकार दर्शवला. देवाने त्यांच्यामध्ये आस्था घेऊन त्यांना दाखवलेल्या दयेची त्यांनी, देवाचे लोक इस्राएलांविरुद्ध कठोर शत्रुत्व दाखवून परतफेड केली. इस्राएलांनी यहोवाच्या आज्ञेचा आदर केला व त्यांच्याविरुद्ध कोणत्याही आक्रमक हालचाली केल्या नाहीत तरी, अम्मोनी आणि मवाबी बांधवांना भीती वाटत होती. अम्मोनी लोकांनी लष्करी हल्ला केला नाही हे खरे पण त्यांनी बलाम नावाच्या संदेष्ट्याला दक्षिणा देऊन इस्राएलांना शाप देण्यास सांगितले होते!—गणना २२:१-६; अनुवाद २३:३-६.
तेव्हा काही तरी विचित्र घडले. बलाम त्याचा शाप उच्चारू शकला नाही असे बायबल सांगते. “जो तुझे अभिष्ट चिंतील, त्याचे अभिष्ट होईल, जो तुला शाप देईल त्याला शाप लागेल,” असे म्हणून तो त्यांना केवळ आशीर्वादच देऊ शकला. (गणना २४:९) यात गोवलेल्यांना, म्हणजे अम्मोन्यांना सुद्धा यापासून चांगला जोरदार धडा शिकायचा होता: देवाचे लोक गोवलेले असताना त्यांच्यावतीने हस्तक्षेप करण्यास तो पूर्णपणे तयार होता!
परंतु, अम्मोनी लोक इस्राएलांचा विरोध करण्यासाठी इतर मार्ग शोधू लागले. न्यायाधीशांच्या युगादरम्यान, अम्मोनी लोकांनी मवाबी आणि अमालेकी लोकांबरोबर संघ करून वाग्दत्त देश व पुढे जाऊन जेरिकोवर स्वारी केली. पण त्यांना मिळालेला विजय जास्त काळापर्यंत टिकला नाही कारण इस्राएली न्यायाधीश एहूदने स्वारी करणाऱ्यांना तेथून हाकलून लावले. (शास्ते ३:१२-१५, २७-३०) अस्थिर युद्धबंदी, शास्ता इफ्ताहच्या काळापर्यंत टिकली. तोपर्यंत इस्राएल राष्ट्र मूर्तिपूजा करण्यात गोवल्यामुळे यहोवाने त्यांच्यावरील आपले संरक्षण काढून घेतले. अशा प्रकारे सुमारे १८ वर्षांपर्यंत, देवाने “त्यांना . . . अम्मोन्यांच्या हाती दिले.” (शास्ते १०:६-९) पण इस्राएलांनी मूर्तिपूजेला धिक्कारून इफ्ताहच्या नेतृत्वाखाली एकत्रित आल्यावर पुन्हा एकदा अम्मोन्यांनी कटू पराभव अनुभवला.—शास्ते १०:१६–११:३३.
पहिला राजा, शौल याचा राज्याभिषेक झाला तेव्हा शास्त्यांद्वारा शासनाचे इस्राएलांचे युग समाप्त झाले. शौलाने राज्य करण्यास सुरवात केल्यानंतर लगेचच, अम्मोनच्या शत्रुत्वाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला. नाहाश राजाने इस्राएलचे शहर, याबेश-गिलादवर अचानक हल्ला केला. त्या शहराच्या लोकांनी शांतीसाठी विनंती केली तेव्हा, नाहाश या अम्मोन्याने चीड आणणारी अशी मागणी केली: “मी तुम्हा सर्वांचा उजवा डोळा फोडून अवघ्या इस्राएलांची अप्रतिष्ठा करीन, या अटीवर मी तुम्हांशी करार करीन.” संरक्षणासाठी असे अंशतः करण्यात आले होते, म्हणजे “त्यांचा डावा डोळा ढालीने झाकण्यात येईल तेव्हा ते लढाईमध्ये पूर्णपणे निकामी होतील” असे इतिहासकार फ्लेवियस जोसफस म्हणतात. पण, या निर्दयी निर्वाणीच्या खलित्याचा खरा उद्देश, इस्राएलांचा पाणउतारा करणे हाच होता.—१ शमुवेल ११:१, २.
पुन्हा एकवार अम्मोन्यांनी यहोवाच्या दयेची परतफेड शत्रुत्वाने केली होती. यहोवाने या दुष्ट धमकीकडे दुर्लक्ष केले नाही. “शौलाने हे वर्तमान [नाहाशचे शब्द] ऐकताच देवाचा आत्मा त्याच्यावर जोराने येऊन तो मनस्वी संतप्त झाला.” देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली, शौलाने ३,३०,००० लढाऊ पुरुषांना एकत्र केले ज्यांनी अम्मोन्यांना असा पळ काढावयाला लावला की “त्यांच्यातले दोनसुद्धा एकत्र राहिले नाहीत.”—१ शमुवेल ११:६, ११.
आपलेच हित साधण्याच्या अम्मोन्यांच्या स्वार्थी व्यग्रतेमुळे, त्यांच्या निर्घृणतेमुळे आणि त्यांच्या लोभामुळे कालांतराने त्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यात आला. यहोवाचा संदेष्टा सफन्याने भाकीत केल्याप्रमाणे, ते ‘गमोऱ्यासारखे, सर्वकाळ वैराण प्रदेशासारखे झाले, कारण त्यांनी सेनाधीश यहोवाच्या लोकांस तुच्छ मानिले व त्याजवर तोरा मिरविला.’—सफन्या २:९, १०.
अम्मोनच्या बाबतीत काय झाले त्याची नोंद जगाच्या नेत्यांनी घेतली पाहिजे. त्यांच्याप्रमाणेच देवानेही राष्ट्रांना त्याच्या पादासनावर, म्हणजेच पृथ्वीवर त्यांना जगू देऊन काही प्रमाणात दया दाखवली आहे. पण पृथ्वीची निगा राखण्याऐवजी, स्वार्थी राष्ट्रे तिचा नाश करत आहेत, पृथ्वीग्रहाचा आण्विक नाश करण्याची धमकी देखील देण्यात आली. पृथ्वीवरील यहोवाच्या उपासकांना दया दाखवण्याऐवजी, पुष्कळ वेळा राष्ट्रे त्यांचा निष्ठुरपणे छळ करून शत्रुत्व दाखवत आहेत. तेव्हा अम्मोन्यांकडून जो धडा मिळतो तो हाच, की यहोवा त्याच्या दयेची शत्रुत्वाने केलेली परतफेड इतक्या सहजासहजी घेत नाही. त्याच्या नियोजित समयी, प्राचीन काळी केले त्याप्रमाणेच तो कार्यहालचाल करील.—पडताळा स्तोत्र २:६-१२.
[९ पानांवरील चित्रं]
अम्मान येथील रोमी अवशेष, रब्बाहचे ठिकाण, अम्मोन्यांची राजधानी
[१० पानांवरील चित्रं]
अम्मोनी लोक या क्षेत्रात राहात होते