वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 १२/१५ पृ. १३-१८
  • प्रीतीच्या परिपूर्ण बंधनात एकवटलेले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रीतीच्या परिपूर्ण बंधनात एकवटलेले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • एकवाक्यतेचा ज्ञानाशी संबंध
  • विचलितपणा एकवाक्यतेला हानी करू शकतो
  • लाघवी भाषणाविषयी जागृत असणे
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 १२/१५ पृ. १३-१८

प्रीतीच्या परिपूर्ण बंधनात एकवटलेले

‘प्रेमाने एकमेकांशी एकवाक्यतेत बांधले जावे.’—कलस्सैकर २:२, NW.

१, २. आज खासकरून कोणता विभाजक प्रभाव जाणवतो?

ऐका! स्वर्गातून एक मोठा आवाज म्हणतो: “पृथ्वी व समुद्र ह्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.” (प्रकटीकरण १२:१२) उलटणाऱ्‍या प्रत्येक वर्षासह, हा संदेश पृथ्वीच्या रहिवाश्‍यांसाठी अधिकच अनिष्टसूचक होत जातो.

२ यहोवाचा सर्वात मोठा शत्रू बऱ्‍याच काळापासून विरोधक (सैतान) व निंदक (दियाबल) म्हणून परिचित आहे. परंतु या फसवणाऱ्‍याने आता आणखी एक कपटी वेश धारण केला आहे—तो क्रोधिष्ट दैवत झाला आहे! का बरे? कारण १९१४ मध्ये सुरू झालेल्या लढाईत मीखाएल व त्याच्या दूतांनी त्याला स्वर्गातून खाली टाकून दिले होते. (प्रकटीकरण १२:७-९) देवाची उपासना करण्यापासून सर्व लोकांना परावृत्त करण्याच्या त्याच्या आव्हानाला शाबीत करण्यासाठी थोडा काळ राहिला आहे हे दियाबलाला माहीत आहे. (ईयोब १:११; २:४, ५) सुटकेसाठी कोणताही मार्ग नसल्यामुळे, तो आणि त्याचे दूत त्यांचा राग चिडलेल्या मधमाश्‍यांच्या थव्याप्रमाणे मानवजातीच्या अस्वस्थ समूहावर काढत आहेत.—यशया ५७:२०.

३. सैतानाला खाली टाकल्यामुळे आपल्या काळात त्याचा काय परिणाम झाला आहे?

३ मानवी डोळ्यांना न दिसणाऱ्‍या या घटना, मानवजातीतील सामान्य नैतिकता का ढासळत चालली आहे याचे कारण सांगतात. ते, एकवाक्यतेत राहू न शकणाऱ्‍या राष्ट्रांच्या झालेल्या तुकड्यांवर, ठिगळे लावण्याच्या मानवी क्षुब्ध प्रयत्नांचे देखील वर्णन देतात. अनेक जाती आणि जमातीचे गट एकमेकांवर वाईट रितीने हल्ला करतात, ज्यामुळे लाखो लोक बेघर होतात आणि ठिकाण सोडून जातात. म्हणूनच तर अभूतपूर्व प्रमाणावर अधर्म वाढत चालला आहे! येशूने भाकीत केल्याप्रमाणे, ‘पुष्कळांची प्रीती थंडावत’ आहे. तुम्ही जेथे पाहाल, तेथे तुम्हाला आजच्या अस्वस्थ मानवतेच्या विसंगततेची व प्रीतीहिनतेची चिन्हे दिसून येतील.—मत्तय २४:१२.

४. देवाचे लोक विशेषकरून धोक्यात का आहेत?

४ जगाच्या परिस्थितीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर, येशूने केलेली प्रार्थना अधिक महत्त्वपूर्ण होती: “तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करितो. जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (योहान १७:१५, १६) आज, तो ‘दुष्ट’ विशेषकरून “देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे” अशांवर त्याचा राग काढत आहे. (प्रकटीकरण १२:१७) यहोवाने त्याच्या विश्‍वासू साक्षीदारांवर लक्षपूर्वक आणि प्रेमळ काळजी दाखवली नसती तर त्यांचा नाश झाला असता. आपल्या आध्यात्मिक संरक्षणासाठी व भल्यासाठी देव ज्या सर्व तरतूदी करतो त्यांचा उपयोग करण्यावर आपले जीवन अवलंबून आहे. यात, कलस्सैकर १:२९ मध्ये प्रेषिताने आर्जवल्याप्रमाणे, ख्रिस्ताद्वारे त्याच्या शक्‍तीच्या कार्यानुसार झटून वागणे समाविष्ट आहे.

५, ६. प्रेषित पौलाला कलस्सैमधील ख्रिश्‍चनांबद्दल कसे वाटले, आणि १९९५ चे वार्षिक वचन का उचित आहे?

५ पौलाने कलस्सैकरातील त्याच्या बांधवांना कदाचित समोरासमोर पाहिले नसले तरी तो त्यांच्यावर प्रीती करत होता. त्याने त्यांना सांगितले: “तुम्हा सर्वांसाठी मी किती चिंता करतो हे तुम्हाला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे.” (कलस्सैकर २:१, जे. बी. फिलिप्स यांचे द न्यू टेस्टमेंट इन मॉडर्न इंग्लिश) येशूचे अनुयायी या जगाचे भाग नसल्यामुळे, तो ‘दुष्ट’ बांधवांमध्ये जगाच्या आत्म्याचे बी रोवून त्यांच्यामधील ऐक्याचा भंग करण्याचा प्रयत्न करीत राहील. कलस्सैकरातून एपफ्रासने आणलेल्या बातमीवरून सूचित होते की हीच गोष्ट काही प्रमाणात होत होती.

६ पौलाला त्याच्या ख्रिस्ती बांधवांबद्दल असलेल्या चिंतेपैकी एक मुख्य चिंता या शब्दात वर्णिली जाऊ शकते: “प्रेमाने त्यांनी एकमेकांशी एकवाक्यतेत बांधले जावे.” फुटी असलेल्या आणि प्रीती नसलेल्या जगात त्याच्या शब्दांचा आज एक खास अर्थ आहे. आपण मनापासून पौलाच्या सल्ल्याचे अनुकरण केले तर, यहोवाच्या काळजीचा आनंद लुटू. जगाच्या दबावांचा सामना करण्यासाठी आपल्याला मदत करणाऱ्‍या त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याचा देखील आपण आपल्या जीवनात अनुभव घेऊ शकू. हा सल्ला किती उत्तम आहे! म्हणूनच, कलस्सैकर २:२ हे १९९५ चे आपले वार्षिक वचन असेल.

७. खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये कोणती एकवाक्यता दिसून आली पाहिजे?

७ करिंथकरांना लिहिलेल्या आधीच्या एका पत्रात, प्रेषिताने उदाहरण देण्यासाठी एका मानवी शरीराचा उपयोग केला. त्याने लिहिले की अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीमध्ये “फूट नसावी” तर “अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी.” (१ करिंथकर १२:१२, २४, २५) किती आश्‍चर्यकारक उदाहरण! आपले हातपाय परस्परावलंबित आहेत, व प्रत्येक अवयव आपल्या बाकीच्या शरीराला जोडलेला आहे. हेच तत्त्व अभिषिक्‍त जन तसेच नंदनवनमय पृथ्वीवर राहण्याची आशा करणारे लाखो लोक यांच्या मिळून बनलेल्या आपल्या जगव्याप्त बंधुत्वाला लागू होते. आपण कधीही स्वतंत्रपणे राहण्यासाठी सहख्रिश्‍चनांच्या गटापासून स्वतःला वेगळे करू नये! ख्रिस्त येशूद्वारे कार्य करून देवाचा पवित्र आत्मा बांधवांसोबतच्या आपल्या सहवासाद्वारे आपल्यापर्यंत येतो.

एकवाक्यतेचा ज्ञानाशी संबंध

८, ९. (अ) आपल्याला मंडळीतील एकवाक्यतेला हातभार लावण्यासाठी काय आवश्‍यक आहे? (ब) तुम्ही ख्रिस्ताविषयीचे ज्ञान कसे प्राप्त केले?

८ पौलाच्या मुख्य मुद्यातील एक मुद्दा हा होता की विशेषकरून ख्रिस्ताच्या बाबतीत ख्रिस्ती एकवाक्यतेचा ज्ञानाशी संबंध आहे. पौलाने लिहिले की ख्रिश्‍चनांनी, ‘प्रेमाने एकमेकांशी एकवाक्यतेत बांधले जावे; समजबुद्धीची पूर्ण खातरी ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी; व देवाचे पवित्र रहस्य म्हणजे ख्रिस्ताचे अचूक ज्ञान त्यांस व्हावे.’ (कलस्सैकर २:२, NW) आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यास चालू केल्यापासून ज्ञान—वास्तविकता—मिळवले आहे. या वास्तविकता देवाच्या उद्देशाच्या चाकोरीत कशा मावतात याची समज प्राप्त करताना आपल्याला येशूची महत्त्वपूर्ण भूमिका समजू लागते. “त्या ख्रिस्तामध्ये बुद्धी व ज्ञानाचे सर्व निधि गुप्त आहेत.”—कलस्सैकर २:३, NW.

९ येशू आणि देवाच्या उद्देशातील त्याच्या भूमिकेबद्दल तुम्हालाही असेच वाटते का? ख्रिस्ती धर्मजगतातील अनेक जन येशूबद्दल बोलण्यास अतिशय आनंदित असतात. ते दावा करतात की, त्यांनी त्याचा स्वीकार केला आहे व त्यांचे तारण झाले आहे. परंतु ते खरोखर त्याला ओळखतात का? नाही, कारण बहुतेक जण त्रैक्याच्या अशास्त्रवचनीय शिकवणीवर विश्‍वास ठेवतात. तुम्हाला याबाबतीत केवळ सत्यच माहीत नाही, तर येशूने काय म्हटले व केले याचे विस्तृत ज्ञानही तुमच्याकडे आहे. सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाचा उपयोग करून लाखो लोकांना माहितीयुक्‍त अभ्यासाद्वारे यात मदत करण्यात आली आहे. तरीही आपल्याला येशू आणि त्याच्या मार्गांविषयीचे आपले ज्ञान वाढवत राहिले पाहिजे.

१०. गुप्त ज्ञान आपल्यासाठी कशाप्रकारे उपलब्ध आहे?

१० “बुद्धी व ज्ञानाचे सर्व निधि” येशूमध्ये “गुप्त आहेत” या विधानाचा अर्थ असा होत नाही की अशा प्रकारचे ज्ञान आपल्या आकलनशक्‍ती पलिकडील आहे. उलट, ते काहीसे एका खाणीसारखे आहे. एका विस्तृत क्षेत्रात कोठून खोदण्यास सुरवात करावी म्हणून आपल्याला जागा शोधत राहण्याची काही गरज नसते. आपल्याला आधीच माहीत आहे की—बायबल येशू ख्रिस्ताविषयी जे काही प्रकट करते तेथूनच खऱ्‍या ज्ञानाची सुरवात होते. आपण यहोवाचे उद्देश साध्य करण्यामधील येशूच्या भूमिकेबद्दल अधिक पूर्णपणे गुणग्राहकता बाळगतो तसे खऱ्‍या बुद्धीचा व अचूक ज्ञानाचा ठेवा प्राप्त करतो. यास्तव आपण आधी जेथे खोदले आहे तेथेच आणखी रत्न किंवा मौल्यवान वस्तू प्राप्त करण्यासाठी नियमितपणे खोदणे चालू ठेवले पाहिजे.—नीतीसूत्रे २:१-५.

११. येशूवर मनन केल्याने आपण आपले ज्ञान व बुद्धी कशी वाढवू शकतो? (येशूने त्याच्या शिष्यांचे पाय धुतल्याच्या, किंवा इतर कोणत्याही उदाहरणांचा वापर करून सांगा.)

११ उदाहरणार्थ, आपल्याला ठाऊक आहे की येशूने त्याच्या शिष्यांचे पाय धुतले. (योहान १३:१-२०) परंतु, तो शिकवत होता त्या धड्यावर आणि प्रदर्शित केलेल्या मनोवृत्तीवर आपण मनन केले का? असे केल्याने आपण बुद्धीचा ठेवा वर आणू शकतो. व ज्या बांधवाच्या किंवा बहिणीच्या व्यक्‍तिमत्वामुळे आपल्याला बऱ्‍याच काळापासून चीड येत होती त्यांच्यासोबतचा आपला व्यवहार बदलण्यास तो आपली मदत करतो—होय, आपल्याला उत्तेजित करतो. किंवा आपल्याला न आवडणारी नेमणूक मिळते तेव्हा, योहान १३:१४, १५ वचनाचा पूर्ण अर्थ समजल्यावर आपण एका वेगळ्याच प्रकारे त्याला प्रतिसाद देऊ. याप्रकारे ज्ञान आणि बुद्धीचा आपल्यावर प्रभाव होतो. आपण ख्रिस्ताबद्दलच्या अधिक ज्ञानानुसार होईल तितक्या जवळून त्याचे अनुकरण केल्याने त्याचा इतरांवर कसा परिणाम होऊ शकतो? निश्‍चितच, कळप ‘प्रेमाने एकमेकांशी एकवाक्यतेत आणखी बांधला जाईल.’a

विचलितपणा एकवाक्यतेला हानी करू शकतो

१२. कोणत्या ज्ञानाविषयी आम्ही जागृत असणे आवश्‍यक आहे?

१२ जर अचूक ज्ञान, ‘प्रेमाने एकमेकांशी एकवाक्यतेत’ राहण्यास आपल्याला सोपे करते तर जिला “‘ज्ञान’ हे नाव चुकीने दिले गेले आहे” तिचे कोणते परिणाम आहेत? अगदी त्याच्या उलट—वादविवाद, द्वेष आणि विश्‍वासापासून बहकणे. यास्तव पौलाने तीमथ्याला ताकीद दिल्यानुसार आपण अशा खोट्या ज्ञानापासून दक्ष असले पाहिजे. (१ तीमथ्य ६:२०, २१) पौलाने असेही लिहिले: “लाघवी भाषणाने कोणी तुम्हास भुलवू नये म्हणून हे सांगतो . . . ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्‍यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.”—कलस्सैकर २:४, ८.

१३, १४. (अ) कलस्सैमधील बांधव ज्ञानासंबंधाने धोक्यात का होते? (ब) त्याच प्रकारच्या धोक्यात आज नसल्याचे काहींना का वाटू शकते?

१३ कलस्सैमधील ख्रिस्ती, चुकीने ज्ञान म्हटलेल्या कपटी प्रभावाने वेढलेले होते. कलस्सैमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला राहणारे अनेक लोक ग्रीक तत्त्वज्ञानाला महत्त्व देत होते. त्यांच्यामध्ये यहुदी मत समर्थक देखील होते ज्यांची इच्छा होती की, ख्रिश्‍चनांनी सण पाळण्याविषयी आणि खाण्यापिण्याविषयी मोशेच्या नियमानुसार वागले पाहिजे. (कलस्सैकर २:११, १६, १७) पौलाने त्याच्या बांधवांना खरे ज्ञान घेण्यापासून अटकाव केला नाही. परंतु लाघवी भाषणाने जीवनाकडे आणि कार्यहालचालींकडे मानवी दृष्टिकोनातून पाहण्यास त्यांची दिशाभूल करून कोणी त्यांना ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून त्यांना सावध राहणे आवश्‍यक होते. मंडळीतील कोणी अशा अशास्त्रवचनीय कल्पनांच्या आहारी जाऊन त्यानुसार विचार आणि निर्णय घेतले तर ते मंडळीतील सदस्यांमधील एकवाक्यता आणि प्रीती याच्या विरूद्ध कार्य करील.

१४ परंतु तुम्ही कदाचित विचार कराल, ‘होय, कलस्सैमधील लोकांनी ज्या धोक्याचा सामना केला ते मला कळते पण माझ्यावर आत्म्याचे अमरत्व किंवा त्रैक्य देव यासारख्या ग्रीक शिकवणींचा प्रभाव होईल असे मला वाटत नाही; किंवा मी ज्या खोट्या धर्मातून बाहेर पडलो त्याच्या मूर्तिपूजक सणांमध्ये पुन्हा गुरफटून जाण्याचा मला धोका दिसत नाही.’ ते अगदी उत्तम आहे. येशूद्वारे प्रकट झालेल्या तसेच शास्त्रवचनांमध्ये उपलब्ध असलेल्या मूळ सत्याच्या श्रेष्ठतेविषयी असे दृढनिश्‍चयी असणे अतिशय उत्तम आहे. कदाचित आज सर्वत्र आढळणारे इतर तत्त्वज्ञान किंवा मानवी दृष्टिकोनांचा आपल्यासाठी काही धोका ठरू शकतो का?

१५, १६. जीवनाकडे पाहण्याचा कोणता दृष्टिकोन एखाद्या ख्रिश्‍चनाच्या विचारशक्‍तीवर प्रभाव करू शकतो?

१५ अशीच एक मनोवृत्ती फार काळापासून अस्तित्वात आहे: “त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.” (२ पेत्र ३:४) हे मत वेगळ्या शब्दात व्यक्‍त केले जाऊ शकते, परंतु दृष्टिकोन तोच असू शकतो. उदाहरणार्थ, कोणी कदाचित असा तर्क करू शकतो, ‘काही दशकांआधी मी पहिल्यांदा सत्य शिकलो तेव्हा, अंत “जवळच्या भविष्यात असल्यासारखा वाटत होता.” पण अजूनपर्यंत तो आलेला नाही, कोणास ठाऊक तो कधी येईल?’ हे खरे आहे की, अंत केव्हा येणार हे कोणाही मानवाला माहीत नाही. तरीही, येशूने कोणता दृष्टिकोन बाळगण्यास आर्जवले ते पहा: “सावध असा, जागृत राहा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही.”—मार्क १३:३२, ३३.

१६ अंत कधी येणार हे माहीत नाही म्हणून आपण रेलचेल असलेले आणि “सामान्य” जीवनाची योजना केली पाहिजे असा दृष्टिकोन स्वीकारणे किती घातक ठरू शकतो! ही मनोवृत्ती अशाप्रकारे तर्क करताना दिसून येते की, ‘मला (किंवा माझ्या मुलांना) चांगला पगार असलेली तसेच ऐशआरामाचे जीवन जगण्यासाठी आदरणीय जीवनक्रम मिळवण्यास योग्य ती पावले उचलणे स्वीकारयोग्य आहे. मी ख्रिस्ती सभांना जरूर उपस्थित राहीन आणि प्रचारकार्यातही थोडा भाग घेईन, परंतु मला झटण्याचे किंवा मोठमोठे त्याग करण्याचे काही कारणच नाही.’—मत्तय २४:३८-४२.

१७, १८. येशूने आणि त्याच्या प्रेषितांनी आपण कोणता दृष्टिकोन ठेवावा असे आर्जवले?

१७ परंतु आपल्याला हे कधीही नाकारता येणार नाही की येशू आणि त्याच्या शिष्यांनी शिफारस केली की, आपल्याला सुवार्तेचा प्रचार करण्याची निकड आहे हे लक्षात ठेवून जगले पाहिजे, झटले पाहिजे तसेच त्याग करण्यास तयार असले पाहिजे. पौलाने लिहिले: “बंधुजनहो, मी हेच म्हणतो की, काळाचा संक्षेप करण्यात आला आहे, ह्‍यासाठी की, ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने त्याने ह्‍यापुढे ती नसल्यासारखे असावे, . . . जे विकत घेतात त्यांनी आपणाजवळ काही नसल्यासारखे; आणि जे ह्‍या जगाचा उपयोग करितात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे असावे; कारण ह्‍या जगाचे बाह्‍य स्वरूप लयास जात आहे.”—१ करिंथकर ७:२९-३१; लूक १३:२३, २४; फिलिप्पैकर ३:१३-१५; कलस्सैकर १:२९; १ तीमथ्य ४:१०; २ तीमथ्य २:४; प्रकटीकरण २२:२०.

१८ आपण आपले जीवन अधिक सुखकर बनवण्याचे ध्येय राखावे असे जरा देखील सूचित न करता पौलाने प्रेरित होऊन लिहिले की: “आपण जगात काही आणिले नाही; आपल्याला त्यातून काही नेता येत नाही; आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे. . . . विश्‍वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर; त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे, आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तो चांगला पत्कर केला.”—१ तीमथ्य ६:७-१२.

१९. येशूने उत्तेजित केलेला जीवनाचा दृष्टिकोन मंडळीतील लोक स्वीकारतात तेव्हा मंडळीवर त्याचा कसा प्रभाव पडतो?

१९ मंडळीत “चांगला पत्कर” करण्यासाठी पराकाष्ठेने प्रयत्न करणारे आवेशी ख्रिस्ती जन असल्यावर तेथे साहजिकच एकवाक्यता असते. ते कधीच या मनोवृत्तीला शरण जात नाहीत की, ‘तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.’ (लूक १२:१९) उलट ते एकाच प्रयत्नात एकवटलेले, पुन्हा कधीही न होणाऱ्‍या कार्यात शक्य होईल तितका पूर्ण भाग घेण्यास त्याग करण्यासाठी इच्छुक असतात.—पडताळा फिलिप्पैकर १:२७, २८.

लाघवी भाषणाविषयी जागृत असणे

२०. आणखी असे कोणते क्षेत्र आहे जेथे ख्रिश्‍चनांची दिशाभूल होऊ शकते?

२० अर्थात, ख्रिस्ती जन “लाघवी भाषणाने” किंवा ‘प्रेमाने एकमेकांशी एकवाक्यतेत बांधले’ जाण्यास अडथळा निर्माण करणाऱ्‍या कदाचित पोकळ भुलथापांद्वारे सहजपणे ‘भुलविले’ जाण्याचे असे अनेक मार्ग आहेत. जर्मनीतील वॉचटावर संस्थेच्या दप्तराने लिहिले: “एकाच घटनेमुळे पुष्कळ वादविवाद झाले. एखाद्या बांधवाने कोणती उपचार पद्धती वापरली यावर प्रचारक आणि वडील देखील वादविषयांच्या विविध बाजू घेत होते.” त्यांनी पुढे म्हटले: “अनेक वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा वापर केला जात असल्यामुळे आणि पुष्कळ रूग्ण असल्यामुळे, येथे वादविवाद होतात. आणि जर का या उपचार पद्धतींच्या मागे भुताटकी असेल तर ते घातक ठरू शकते.”—इफिसकर ६:१२.

२१. एखादा ख्रिस्ती आज योग्य केंद्रस्थान कसे गमावू शकतो?

२१ ख्रिश्‍चनांना देवाची उपासना करता येण्यासाठी जिवंत आणि सुदृढ रहाण्याची इच्छा आहे. तरीसुद्धा, या युगामध्ये आपण अपूर्णत्वामुळे येणारे वृद्धापकाळ आणि आजार यांच्या अधीन आहोत. आरोग्यावर फाजील जोर देण्याऐवजी आपण आपल्यासाठी तसेच इतरांसाठी असलेल्या खऱ्‍या तोडग्यावर मन केंद्रित केले पाहिजे. (१ तीमथ्य ४:१६) कलस्सैमधील लोकांना पौलाने दिलेल्या सल्ल्याच्या केंद्रभागी ख्रिस्त होता तसे आजही तोच त्या तोडग्याचा केंद्रभाग आहे. परंतु लक्षात ठेवा, पौलाने दर्शवले की काही लोक “लाघवी भाषणाने” ख्रिस्तावरील आमचे लक्ष विचलित करून, कदाचित निदान ठरवण्याच्या पद्धतींकडे, उपचाराकडे किंवा आहाराकडे निरवू शकतात.—कलस्सैकर २:२-४.

२२. रोग निदान करण्याच्या व उपचार पद्धतींविषयी जे अनेक दावे केले जातात त्यांच्याबद्दल आपला कोणता समतोल दृष्टिकोन असला पाहिजे?

२२ संपूर्ण ग्रहावरील लोकांवर, सर्व प्रकारच्या उपचारांच्या आणि रोगाचे निदान करण्याच्या पद्धतींच्या जाहिराती व शिफारसींचा भडिमार होत आहे. त्यातील काहींचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो आणि त्यांना मान्यताही दिली जाते; इतरांची विस्तृत प्रमाणावर टिका केली जाते किंवा त्याबद्दल शंका व्यक्‍त केली जाते.b प्रत्येक व्यक्‍ती तिच्या आरोग्याच्या संबंधाने काय करणार आहे याचा निर्णय घेण्यास स्वतः जबाबदार आहे. परंतु कलस्सैकर २:४, ८ मध्ये पौलाने दिलेल्या सल्ल्याचा जे स्वीकार करतात त्यांना “लाघवी भाषणाने” किंवा “पोकळ भुलथापांनी” भुलवून जाण्यापासून संरक्षण मिळते. मुक्‍तता मिळण्याची उत्कंठा लागलेल्या लोकांकडे राज्य आशा नसल्यामुळे या भुलथापांनी अनेकांची दिशाभूल झाली आहे. एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीला एखादा विशिष्ट उपचार त्याच्यासाठी चांगला असल्याचे दिसून आल्यावर, त्याने ख्रिस्ती बंधुत्वामध्ये तिचा प्रसार करू नये, नाहीतर तो चर्चेचा किंवा वादाचा मोठा विषय बनू शकतो. अशाप्रकारे तो मंडळीतील एकवाक्यतेच्या महत्त्वाला खूप आदर देतो हे प्रकट करू शकतो.

२३. आपल्याला आनंद करण्याचे कोणते मुख्य कारण आहे?

२३ पौलाने जोर देऊन सांगितले की, ख्रिस्ती एकवाक्यता खऱ्‍या आनंदाचा पाया आहे. त्याच्या दिवसात मंडळ्यांची संख्या आजपेक्षा निश्‍चितच कमी होती. तरीही तो कलस्सैमधील लोकांना लिहू शकला: “जरी मी देहाने दूर आहे, तरी आत्म्याने तुम्हाजवळ आहे, आणि तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमच्या विश्‍वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करीत आहे.” (कलस्सैकर २:४ब, ५; तसेच कलस्सैकर ३:१४ हेही पाहा.) आपल्याला आनंद करण्यासाठी किती मोठे कारण! आपण आपल्या स्वतःच्या मंडळीत एकवाक्यता, चांगली व्यवस्था आणि विश्‍वासाच्या स्थिरपणाचा मूर्त पुरावा पाहू शकतो जो संपूर्ण जगभरातील देवाच्या लोकांच्या सामान्य परिस्थितीला प्रतिबिंबित करतो. यास्तव, सद्य युगाच्या उरलेल्या थोड्या वेळात आपण प्रत्येक जण ‘प्रेमाने एकमेकांशी एकवाक्यतेत बांधले’ जाण्यास दृढनिश्‍चयी होऊ या.

[तळटीपा]

a आपण अनेक अहवालांवरून शिकू शकत असलो तरी, पुढील उदाहरणांवरून तुमच्या मंडळीतील एकवाक्यतेला हातभार लावतील अशा येशूबद्दलच्या कोणत्या गोष्टी तुम्ही व्यक्‍तिगतरीत्या शिकू शकता ते पहा: मत्तय १२:१-८; लूक २:५१, ५२; ९:५१-५५; १०:२०; इब्रीयांस १०:५-९.

b जून १५, १९८२, चे टेहळणीबुरूज, पृष्ठे २२-९ पहा.

तुम्ही नोंद घेतली का?

▫ यहोवाच्या साक्षीदारांसाठी १९९५ चे वार्षिक वचन काय आहे?

▫ कलस्सैमधील ख्रिश्‍चनांना प्रेमाने एकमेकांशी एकवाक्यतेत बांधले जाण्याची आवश्‍यकता का होती, आणि आपल्यालाही आज का गरज आहे?

▫ जीवनाकडे पाहण्याचा कोणता कपटी दृष्टिकोन आहे ज्यापासून ख्रिश्‍चनांना आज विशेष जागृत असले पाहिजे?

▫ आरोग्य तसेच रोग निदान करण्याच्या पद्धतींबद्दल असलेल्या लाघवी भाषणाने भुलविले न जाण्यापासून ख्रिश्‍चनांनी सावध का राहिले पाहिजे?

[१७ पानांवरील चित्रं]

भवितव्यासंबंधाने तुम्ही केलेल्या योजना येशूच्या उपस्थितीवर केंद्रित आहेत का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा