हितकारी नसणाऱ्या संगीताबद्दल सावध असा!
“तुम्ही कशा रितीने वागता, याविषयी काळजी घ्या. हे दिवस कठीण आहेत. मूर्ख होऊ नका, सूज्ञ व्हा. चांगले करण्याच्या प्रत्येक संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्या.”—इफिसकर ५:१५, १६, सुबोध मराठी भाषांतर.
१. संगीताला “ईश्वरी दान” असे का म्हणू शकतो?
“संगीत हे . . . ईश्वरी दान आहे.” असे लूलू रमसे विले यांनी आपल्या बायबल म्युझिक या पुस्तकात लिहिले आहे. आरंभीच्या काळापासून देवभिरू पुरुष व स्त्रियांची अशीच धारणा होती. मानवाने संगीताद्वारे आपल्या गहन भावना आनंद, दुःख, संताप, व प्रीती या गुणांनी व्यक्त केल्या आहेत. अशाप्रकारे, संगीत पवित्र शास्त्रीय काळी महत्त्वाची भूमिका राखून होते, व त्याचा त्या पवित्र पुस्तकात वारंवार उल्लेख आला आहे.—उत्पत्ति ४:२१; प्रकटीकरण १८:२२.
२. पवित्र शास्त्र काळी यहोवाची स्तुती करण्याकरता संगीताचा कसा वापर होत असे?
२ यहोवाच्या भक्तीमध्ये संगीताला उदात्त स्थान मिळाले होते. यहोवा देवाची स्तुती करण्यासाठी जे उच्च शब्द रचले गेले त्याला आरंभाला संगीताची साथ मिळाली होती. “गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन,” असे स्तोत्रकर्त्या दाविदाने लिहिले. (स्तोत्रसंहिता ६९:३०) एकांतातील प्रार्थनामय चिंतनामध्ये संगीत वापरण्यात येत होते. “रात्री मला आपल्या [“तंतुवाद्याच्या,” न्यू.व.] गीतांचे स्मरण होते; मी आपल्या मनात चिंतन करितो; माझा जीव विचारात पडला आहे,” असे आसाफाने लिहिले. (स्तोत्रसंहिता ७७:६) यहोवाच्या मंदिरी तर अगदी मोठ्या प्रमाणावर संगीताची संघटना केली जात होती. (१ इतिहास २३:१-५; २ इतिहास २९:२५, २६) कधी कधी तर, मंदिर समर्पण प्रसंगासारखे १२० कर्णेधाऱ्यांना एकत्र आणून संगीताचा प्रचंड दळ उभारला जाई. (२ इतिहास ५:१२, १३) त्यावेळी त्या भव्य संगीताचा केवढा प्रचंड निनाद होत असे ते आम्हाला सध्या ज्ञात नाही, तरी द म्युझिक ऑफ द बायबल हे पुस्तक परिक्षितेः “महत्त्वाच्या समारंभाच्या वेळी मंदिरातील संगीत ध्वनिचा कितपत परिणाम होत असे त्याबद्दलचे मत बनवणे तितके अवघड नाही . . . आपल्यापैकी जर कोणाला त्या प्रसंगात वाहून नेले गेले तर तेव्हाचा दरारा निर्माण करणाऱ्या वातावरणाची छाप आम्हावर पडणे हे अनिवार्य आहे.”a
संगीताचा दुरुपयोग
३, ४. संगीताच्या देणगीचा देवाचे लोक व त्यांचे मूर्तीपूजक शेजारी यांनी कसा अवमान केला?
३ तथापि, संगीताचा असा हा उच्च स्तरावरील वापर नेहमी राहिला नाही. सीनाय डोंगरावरील संगीत तर सोन्याच्या वासराची मूर्तीपूजक भक्ती करण्यासाठी चिथावणी देणारे होते. (निर्गम ३२:१८) काही प्रसंगी हे संगीत झिंगलेल्या अवस्थेला व वेश्याव्यवसायासाठी देखील संबंधित ठेवण्यात आले. (स्तोत्रसंहिता ६९:१२; यशया २३:१५) या ईश्वरी देणगीचा दुरुपयोग करण्यात इस्राएलाचे मूर्तीपूजक शेजारी काही कमी नव्हते. द इंटरप्रिटर्स डिक्शनरी ऑफ द बायबल म्हणते की, “फोएनशिया व सिरिया येथील सर्व लोकप्रिय संगीत इश्तार या फलदेवतेच्या भक्तीला प्रतिबिंबित करीत होते. अशाप्रकारे, लोकप्रिय संगीत बहुधा लैंगिक कृत्ये आचरल्या जाणाऱ्या आरडाओरडीच्या मेजवान्यांची नांदी होते.” प्राचीन ग्रीक लोकांनी देखील लोकप्रिय “वैषयिक नाचगाण्यात” संगीताचा वापर केला.
४ होय, संगीतामध्ये उद्युक्त करण्याची, मोहून टाकण्याची आणि प्रभाव पाडण्याची शक्ती आहे. दशकांआधी जॉन स्टेनर यांनी आपल्या द म्युझिक ऑफ द बायबल या प्रकाशनात तर हा देखील दावा केला की, “संगीत सध्याच्या काळी मानवजातीवर जितका प्रभाव पाडून आहे तितका प्रभाव इतर कोणतीही कला पाडत नाही.” आजही, संगीत जोरदार प्रभाव पाडत आहे. या कारणामुळेच, चुकीच्या प्रकारातील संगीत देवभिरु युवकांसाठी खरा धोका उभा करते.
सावधानीची गरज
५. (अ) बहुतेक नवयौवनांच्या जीवनात संगीत केवढे मोठे स्थान राखून आहे? (ब) तरुण लोकांनी आनंद करण्याच्या बाबतीत देवाचा दृष्टिकोन काय आहे?
५ तुम्ही स्वतः युवक आहात तर तुमच्या वयाच्या युवकवर्गाला खासपणे पॉप (लोकप्रिय) किंवा रॉक संगीत केवढे आवडते याची तुम्हाला कल्पना असेलच. संगीताला “यौवनावस्थेचा आवश्यक भाग” असेही म्हटले गेले आहे. अमेरिकेत असे अनुमान काढण्यात आले आहे की, एक सरासरी युवक त्याच्या शालेय वर्षांच्या अंतिम सहा वर्षात दरदिवशी चार तास रॉक संगीताचे श्रवण करील! हा संयम राखण्यामध्ये केवढा अभाव आहे. तुम्हाला चांगले वाटू देणाऱ्या किंवा आनंदी बनविणाऱ्या गोष्टींचा उपभोग घेण्यात वावगे किंवा चुकीचे असे काही नाही. संगीताचा निर्माता, स्वतः यहोवा देवाला, लोकांनी उदासवाणे किंवा दुःखी स्थितीत असावे असे मुळीच वाटत नाही. खरे म्हणजे, तो त्याच्या लोकांना ही आज्ञाही देतोः “अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] ठायी आनंदोत्सव करा; अहो सरळ मनाचे जनहो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा.” (स्तोत्रसंहिता ३२:११) युवकांना त्याचे वचन म्हणतेः “हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्लास देवो.”—उपदेशक ११:९.
६. (अ) युवकांनी संगीताबद्दल निवडक असण्याची जागरुकता राखण्याची का गरज आहे? (ब) पूर्वीच्या पिढ्यांच्या संगीतापेक्षा आजचे संगीत अधिक आक्षेपार्ह का आहे?
६ तरी देखील, तुम्ही जे संगीत निवडता त्याबद्दल जागरूक असण्याचे चांगले कारण आहे. प्रेषित पौलाने इफिसकर ५:१५, १६ मध्ये असे म्हटलेः “तुम्ही कशा रितीने वागता, याविषयी काळजी घ्या. हे दिवस कठीण आहेत. मूर्ख होऊ नका, सूज्ञ व्हा. चांगले करण्याच्या प्रत्येक संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्या.” हे वाचल्यावर, एका तरुण मुलीने दाखवलेल्या प्रतिक्रियेसारखीच तुमचीही प्रतिक्रिया असेल की, “आमचे पालक आमच्या वयाचे होते तेव्हा त्यांनी त्यांच्या काळात उपलब्ध असणारे संगीत ऐकले, मग आम्ही आमच्या काळचे का ऐकू नये?” तुमच्या पालकांनी तुमच्या वयाचे असताना जे संगीत ऐकले होते त्यातसुद्धा आक्षेपार्ह गोष्टी कदाचित होत्या. अगदी लक्षपूर्वक केलेल्या परिक्षणानंतर हे दिसते की, पुष्कळ लोकप्रिय दर्जांमध्ये अनपेक्षितपणे लैंगिक गोष्टींचा व अनैतिकतेचा अप्रत्यक्ष संदर्भ होता. पण ज्याचा पूर्वी नुसता गंध होता तो आता उघडपणे वावरत आहे. एक लेखक म्हणतोः “आमच्या संस्कृतीने जे पाहिले आहे ते पूर्वी कधीच पाहिले गेले नाही असे मुलांना आज उघडपणे सांगण्यात येत आहे.”
रॅप संगीत—बंडखोरांचे संगीत
७, ८. (अ) रॅप संगीत म्हणजे काय, व ते कशामुळे लोकप्रिय झाले? (ब) रॅप जीवनशैली आचरणारा कशावरून ओळखता येतो?
७ उदाहरणादाखल, रॅप संगीताची आजची लोकप्रियता लक्षात घ्या. टाईम मासिकानुसार, रॅपने “तालामध्ये गोलार्धव्याप्त मान्यता मिळवणारी क्रांती घडवून आणली आहे” व हे संगीत आता ब्राझिल, युरोप, जपान, रशिया, आणि अमेरिकेत अतिशय लोकप्रिय बनले आहे. यात बहुधा सूर नसतो, तर त्याच्या पंक्ती गाण्याऐवजी जोरदार ठेक्याच्या तालात बोलल्या जातात. रॅपने इतके व्यापारी यश का मिळवले आहे त्यामागचे त्याचे रहस्य चेतना भरवणारा ठेका हे आहे. “मी रॅप संगीत ऐकते तेव्हा,” एक जपानी युवती म्हणते, “मला किती आवेश चढतो, आणि मी नाचते तेव्हा मला किती मोकळे वाटते.”
८ रॅपच्या काव्यमय पंक्ती—अपशब्द व अशिष्ट संमत भाषेचे संमिश्रण—हे त्याच्या लोकप्रियतेचे आणखी एक कारण आहे. नवयौवनातील प्रणय हा विषय असणाऱ्या सांप्रदायिक रॉक काव्यपंक्तीपेक्षा रॅप काव्यात अधिक गंभीर स्वरुपाचा विषय सामावलेला असतो. काहीत अन्याय, जातीवाद, आणि पोलिसी क्रुरता यांजविरुद्ध आवाज असतो. तथापि, कधी कधी कडव्याच्या शेवटी येणारी तीच ती ओळ, कल्पना करता येणार नाही अशा अतिशय घाणेरड्या व धक्कादायक भाषेची असते. रॅपमध्ये पेहराव, केशभूषा तसेच लैंगिक नीती यांच्याविरुद्ध बंड केल्याचे सूचित होते. रॅपने त्याच्याच शैलीत आपली जीवनपद्धती घडवली आहे हे तितके आश्चर्याचे नाही. रॅपला चिकटून राहणारे त्यांच्या ठळक हावभावावरून, अनिष्ट भाषेवरून आणि बॅगी जिन्स या सैल विजारीवरून, पायाच्या घोट्यापर्यंत असणारे व सैल सोडलेले रबरी तळव्याचे बूट, सोन्याच्या साखळ्या, बेसबॉल खेळाच्या टोप्या आणि काळे चष्मे याद्वारे ओळखण्यात येतात.
९, १०. (अ) रॅप संगीत व रॅप जीवनशैली ही “प्रभूला संतोषकारक” आहेत का हे युवकाला कोणत्या गोष्टींच्या आधारे ठरवता येईल? (ब) काही ख्रिस्ती युवक कोणती गोष्ट सहजसोपी घेत आहेत?
९ इफिसकरांस पत्राच्या ५:१० मध्ये ख्रिश्चनांना “प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा,” असे सांगण्यात आले आहे. रॅपने जी प्रसिद्धी मिळवली आहे ते पाहता, तुम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट होणे हे “प्रभूला संतोषकारक आहे” असे तुम्हास वाटते का? जगातल्या पुष्कळ लोकांना जी जीवनशैली अस्वीकृत वाटते अशांसोबत आपली ओळख दाखवण्याची ख्रिस्ती युवकाची इच्छा होईल का? रॅप संगीत जलसाबद्दल एका परिक्षकाने जे वर्णन मांडले ते लक्षात घ्याः “अपशब्द व लैंगिक असे उघड काव्य जास्तीत जास्त धक्कादायक पद्धतीने मांडण्यामध्ये रॅप गायकांमध्ये स्पर्धा लागते. . . . रंगमंचावर पुरुष व स्त्रिया लैंगिक कृत्यांचा आव आणतात.” संगीत जलसाचे आयोजन करणारे, एका ठळक कृतीसंबंधाने म्हणालेः “कलाकाराच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द जवळजवळ (अश्लील) असतो.”
१० असे असले तरी, त्या संध्याकाळी वाजविण्यात येणारे संगीत हे रॅपमधील सर्वसाधारण संगीत होते असे मानण्यात येते. संगीत संयोजकाने म्हटलेः “तुम्हाला ऐकायला मिळणारे रॅप संगीत हे युवक बाजारातून जे विकत घेतात त्या संगीतासारखेच आहे.” त्या संगीत जलसात उपस्थित असणाऱ्या ४,००० पेक्षा अधिक लोकात व युवकात काही यहोवाचे साक्षीदार असण्याचा दावा करणारे होते हे सांगणे किती दुःखाचे वाटते! काहींनी, सैतान हा “अंतरिक्षातील राज्याचा अधिपती” आहे ही गोष्ट हलकी मानली आहे असे दिसते. तोच “आज्ञा मोडणाऱ्या लोकात [असणाऱ्या] आत्म्या”वर म्हणजे त्यांच्यात दिसून येणाऱ्या ठळक गुणांवर आपले प्रभुत्व राखून आहे. (इफिसकर २:२) तुम्ही रॅप संगीत किंवा रॅप जीवनशैलीत समाविष्ट होता तेव्हा कोणाच्या आस्थेची जोपासना करता? काही रॅप संगीतातील मसुदा कमी स्वरुपाचा आक्षेपार्ह असू शकेल हे मान्य आहे. पण जे संगीत ख्रिस्ती दर्जाला ठळकपणे धक्कादायक आहे अशा संगीताच्या कोणत्याही प्रकाराबद्दल आपली आवड उभारणे हे सुज्ञपणाचे आहे का?
लैंगिकता, हिंसाचार व दुरात्मिक संदेशाची “हेवी मेटल” गीते
११, १२. हेवी मेटल संगीत काय आहे, व त्यात कोणती आक्षेप घेण्याजोगी गुणलक्षणे आहेत?
११ हेवी मेटल हा आणखी एक संगीताचा प्रसिद्ध प्रकार आहे. हे, मोठ्या आवाजाच्या रॉक संगीतापेक्षा अधिक आहे. द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन यातील एक अहवाल म्हणतोः “हेवी मेटल संगीत . . . यामध्ये मोठा कंपाचा ताल व सोबत द्वेष, निंदा, लैंगिक अनाचार आणि वेळप्रसंगी दुरात्मिक गोष्टींची स्तुती गाणारे काव्य असते.” काही प्रसिद्ध संगीतकारांच्या गटाच्या नावावरुनच या रॉक संगीताची अधोगती कळून येते. त्यामध्ये “विष,” “बंदुका,” आणि “मृत्यू” अशीही नावे समाविष्ट आहेत. असे असले तरी, हे हेवी मेटल संगीत थ्रॅश मेटल म्हणजे पंक रॉक संगीताकडे कल असलेल्या संगीतप्रकारापेक्षा व डेथ मेटल म्हणजे ज्या संगीत जलसात “मृत्यु”बद्दलचा विषय अधिक असतो त्या प्रकारापेक्षा सौम्य समजले जाते. अशा संगीत गटामध्ये “नरभक्षक,” “मृत्युलेख” अशा संज्ञेची नावे अधिक दिसतात. ही नावे इंग्रजी किंवा दुसऱ्या विदेशी भाषेत असल्यामुळे त्याचा केवढा पगडा बसतो हे कित्येक देशातील युवकांच्या ध्यानात येणार नाही.
१२ हेवी मेटल संगीताचा संबंध वेळोवेळी युवकांच्या आत्महत्या, नैराश्य व मादक औषधांचा वापर याजसोबत करण्यात आला आहे. त्याचा हिंसाचारी स्वभावासोबत असणारा संबंध लक्षात घेऊन एका रेडिओ निवेदकाने त्याला “गुन्हेगारीशी संबंधित असणारे संगीत” असे म्हटले. त्या संगीताचा दुरात्मिक संबंध आता पुष्कळ पालक व पोलिस अधिकाऱ्यांना जागृत करीत आहे. एका संशोधकाने असा दावा केला की, सैतानी भक्तीत गढणाऱ्या काही युवकांना या संगीताद्वारे भूतविद्येमध्ये प्रवेश दिला गेला. “ते कशामध्ये जात आहेत, याचे त्यांना भान राहिले नाही,” असा समारोप त्याने केला.
१३. हेवी मेटल संगीतात गढून जाण्यात कोणता धोका आहे?
१३ तथापि, ख्रिस्ती युवकांनी “[सैतानाचे] विचार आपल्याला कळत नाहीत” अशा स्थितीत असू नये. (२ करिंथकर २:११) कारण, “आपले झगडणे . . . आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” (इफिसकर ६:१२) तेव्हा, संगीताची आपली विशिष्ट निवड ठेवून त्याद्वारे दुरात्म्यांना आपल्या जीवनात आणणे हे किती मूर्खपणाचे असेल बरे! (१ करिंथकर १०:२०, २१) तरीपण, पुष्कळ ख्रिस्ती युवकांना अशा संगीताची आवड आहे हे उघडपणे दिसत आहे. आपली संगीताची अभिरुचि बदलण्यासाठी काहींनी आपली दिशा बदलली आहे. एक युवती कबूल करतेः “मी हेवी मेटल संगीत बहुधा रात्रभर ऐकत असे. मी हेवी मेटल संगीताची आवड असणाऱ्यांकडून मासिके घेऊन ती माझ्या पालकांच्या नजरेपासून दूर ठेवण्याकरता बुटांच्या खोक्यात लपवून ठेवत असे. मी माझ्या आईवडीलांशी खोटेही बोलले. यहोवा याबाबतीत मजवर संतुष्ट नव्हता हे मी जाणून होते.” तिला अवेक! मासिकातील एका लेखाने शुद्धीवर आणले. खरेच, अशा या संगीतामुळे आणखी किती जण पाशात अडकलेले असतील?
पेराल त्याचीच कापणी कराल
१४, १५. हितकारक नसलेल्या संगीताचे श्रवण करण्यामुळे नकारात्मक स्वरुपाचे परिणाम होतील याची आपण खात्री का बाळगू शकतो? विवेचीत करा.
१४ संगीतामुळे ओढवणाऱ्या धोक्यांना कमी मोलाचे समजू नका. एखादे गाणे ऐकले म्हणजे लगेच तुम्ही कोणाचा खून करता किंवा लैंगिक अनैतिकता आचरता असे होत नाही हे खरे. तरीपण, गलतीकर ६:८ म्हणते की, “जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल.” त्यामुळे, ऐहिक, वैषयिक आणि दुरात्मिक प्रकारातील संगीत ऐकणे हे तुम्हावर केवळ नकारात्मक स्वरुपाचे परिणाम घडवून आणील. (पडताळा याकोब ३:१५.) जोसेफ स्टुसे या संगीत प्राध्यापकांनी असे म्हटल्याचे सांगितले जातेः “कोणत्याही प्रकारच्या संगीताचा आमच्या मनाचा कल, भावना, प्रवृत्ती आणि त्यापासून निष्पन्न होणारा परिणाम यावर प्रभाव घडतो. . . . कोणी म्हणेल की, ‘मी हेवी मेटल संगीत ऐकतो व मजवर काही परिणाम होत नाही,’ तर तो चूक आहे. ते संगीत वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रमाणात व विविध पद्धतीने परिणाम घडवते.”
१५ एक ख्रिस्ती युवक कबूल करतो की, “मी थ्रॅश मेटल संगीतात इतका गढलो होतो की, माझे संपूर्ण व्यक्तीमत्त्वच बदलले गेले.” लवकरच त्याला दुरात्म्यांशी सामना करावा लागला. “मी सरतेशेवटी मजकडील संगीत टेप्स, डिस्क् व रेकॉर्डस् यांचा अल्बम काढून फेकून दिला व मग मला दुरात्म्यांपासून मुक्तता लाभली.” आणखी एक युवक म्हणतोः “जे संगीत मी ऐकत होतो त्याचा दुरात्मे, मादक औषधे किंवा लिंग यासोबत संबंध होता. पुष्कळ युवक म्हणतात की, यामुळे काहीही होत नाही, पण परिणाम हा होतोच. मी जवळजवळ सत्यातून बाहेरच पडलो होतो.” एक नीतीसूत्र विचारतेः “मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरिला तर त्याची वस्त्रे जळणार नाहीत काय?”—नीतीसूत्रे ६:२७.
सावध राहा
१६. आजच्या संगीताच्या बहुतेक लेखकांच्या व त्यांना लय देणाऱ्या लोकांच्या बाबतीत काय म्हणता येईल?
१६ पौलाने प्राचीन इफिसमधील ख्रिश्चनांना असे लिहिलेः “मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. त्यांची बुद्धि अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहेत.” (इफिसकर ४:१७, १८) ही गोष्ट आजच्या संगीताचे लिखाण करणाऱ्या व त्यांना लयबद्ध करणाऱ्यांच्या बाबतीत खरी असल्याचे म्हणता येणार नाही का? यापेक्षा अधिक म्हणजे, सर्व शैलीच्या संगीतावर “या युगाचे दैवत,” दियाबल सैतानाचे वर्चस्व प्रवर्तित होते.—२ करिंथकर ४:४.
१७. युवकवर्ग संगीताचे मूल्यमापन किंवा परिक्षण कसे करू शकतात?
१७ “शेवटल्या काळा”बद्दल पवित्र शास्त्राने हे भाकित केले की, “दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यांस फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.” (२ तीमथ्य ३:१, १३) या कारणामुळे, तुम्हाला संगीताच्या निवडीबद्दल पूर्वीपेक्षा अधिक दक्षता राखावी लागेल. अल्बमवरील किळस आणणारे शीर्षकच मुळात त्याला निकामी ठरवतील. ईयोब १२:११ विचारतेः “जीभ अन्नाची रुचि घेते, तसा कान शब्दाची पारख करीत नाही काय?” याचप्रमाणे, एखादे संगीत कसे आहे ते त्याचा एक नमूना लावून व ते तारतम्य जाणणाऱ्या कानांनी ऐकून ठरवू शकता. संगीताचा ध्वनि तुम्हामध्ये कसल्या भावना निर्माण करतो? तो हिंस्र, अवनत आचार—चैनबाजीचा आत्मा वाढवतो का? (गलतीकर ५:१९-२१) त्याचे बोल काय सांगतात? ते लैंगिक अनाचार, मादक औषधांचा वापर, किंवा ज्यांचा “उच्चार देखील करणे लज्जास्पद आहे” अशा चुकीच्या गोष्टींचा विचार सुचवतात का? (इफिसकर ५:१२) पवित्र शास्त्र म्हणते की, अशा गोष्टींचे देवाच्या लोकांमध्ये “नावसुद्धा निघू नये,” मग त्या गीताचा ठेका व त्याची पुनरुक्ती तर बाजूलाच राहिली. (इफिसकर ५:३) आणि त्या अल्बमच्या मुखपृष्ठाबद्दल काय? त्यात दुरात्मिक विषयाचे किंवा लैंगिक भावना उद्दीपित करणारी चित्रे आहेत का?
१८. (अ) संगीताच्या बाबतीत काही युवकांना कोणता बदल करावा लागेल? (ब) अधिक हितकारी संगीताबद्दल युवक आपली अभिरुची कशी वाढवू शकतो?
१८ तुम्ही ज्या प्रकारातील संगीताची निवड करता त्यामध्ये कदाचित बदल करण्याची जरुरी असेल. तुम्हापाशी अनैतिक किंवा दुरात्मिक विषयाची ग्रामोफोन रेकॉर्डस्, ऑडिओ व व्हिडीओ कॅसेट टेप्स् आणि डिस्क् असतील तर तुम्ही यांना ताबडतोब काढून टाकले पाहिजे. (पडताळा प्रे. कृत्ये १९:१९.) याचा अर्थ, तुम्ही संगीताचा आनंद लुटू नये असा मुळीच नाही; खरे तर, लोकप्रिय सर्वच गाणी आक्षेपार्ह आहेत असे नाही. काही युवकांनी आपली संगीताची अभिरुची विशिष्ट शास्त्रीय गाणी, लोकसंगीत, सौम्य झाजसंगीत आणि इतर प्रकारच्या संगीताद्वारे अधिक विस्तारीत बनवली आहे. किंग्डम मेलडीज् टेप्सने पुष्कळ युवकांमध्ये उच्च ऑर्केस्ट्रा संगीताबद्दल अधिक आवड वाढवली आहे.
१९. संगीताला त्याच्या स्थानी ठेवणे का आवश्यक आहे?
१९ संगीत ईश्वराची देणगी आहे. पण बहुतांसाठी ते हितकारक नसलेल्या उद्योगात बदलले आहे. हे लोक, “वीणा, सारंगी, डफ, बासरी” वाजविण्याचा आनंद लुटणाऱ्या पण, “परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] कृतीकडे लक्ष” न देणाऱ्या प्राचीन काळच्या इस्राएल लोकांसारखे झाले आहेत. (यशया ५:१२) यास्तव, संगीताला आपल्या स्थानी ठेवण्याचा तुमचा मनोदय दृढ ठेवा व यहोवाची कृत्ये तुमच्या काळजीचा अग्रगामी भाग राहू द्या. तुम्ही निवडणाऱ्या संगीताच्या बाबतीत निवडक असा व काळजी घ्या. त्यामुळे तुम्ही ईश्वराच्या देणगीचा अवमान नव्हे तर योग्य वापर कराल.
[तळटीपा]
a इस्राएल राष्ट्र संगीत कलेत श्रेष्ठ होते यात शंका नाही. एक अश्शुरी खोदकाम प्रकट करते की, सन्हेरीब राजाने हिज्किया राजाकडून इस्राएली संगीतकारांच्या रुपात खंडणी मागितली. ग्रोव्ह यांची डिक्शनरी ऑफ म्युझिक ॲण्ड म्युझिशियन्स् यात अशी नोंद आहेः “संगीतकारांच्या रुपात खंडणी मागणे ही . . . खरोखरीच असामान्य गोष्ट होती.”
तुम्हाला आठवते का?
▫ संगीताला ईश्वराची देणगी का म्हटले जाऊ शकते?
▫ प्राचीन काळी संगीताचा कसा अवमान करण्यात आला?
▫ रॅप तसेच हेवी मेटल संगीत ख्रिस्ती युवकांपुढे कोणता धोका ठेवतात?
▫ ख्रिस्ती युवक संगीताबद्दलच्या निवडीत कशी काळजी घेतात?
[चित्र]
पवित्र शास्त्र काळी संगीताचा वापर यहोवाची स्तुती करण्यासाठी केला जात होता