तुमच्या दानाचा वापर
सभागृह चांगल्या स्थितीत ठेवणं
१ एप्रिल २०२४
कोलंबियामध्ये राहणारी १७ वर्षांची निकोल म्हणते:“मला माझं राज्य सभागृह खूप आवडतं! कारण इथे मला माझ्या आध्यात्मिक कुटुंबासोबत वेळ घालवता येतो.” तुम्हालाही असंच वाटतं का?
यहोवाचे साक्षीदार जगभरात जवळजवळ ६३,००० राज्य सभागृहांमध्ये एकत्र येतात. इथे त्यांना निवांतपणे यहोवाची उपासना करता येते. पण या सभागृहांमुळे आणखी एक गोष्ट साध्य होते. कोलंबियामध्ये राहणारा आणि पायनियर म्हणून सेवा करणारा डेविड म्हणतो: “सभागृहांमुळे नवीन लोकांना चांगली साक्ष मिळते. आम्ही ते किती स्वच्छ आणि चांगलं ठेवतो हे पाहून इथे येणाऱ्या लोकांना आश्चर्य वाटतं!” हे आपोआप होत नाही. तर सभागृहांची देखभाल करायला आणि ते स्वच्छ ठेवायला आम्ही मेहनत घेतो. आम्ही हे कसं करतो?
सभागृहांची काळजी कशी घेतली जाते?
सभागृह वापरणाऱ्या प्रत्येक मंडळीवर त्याची काळजी घ्यायची जबाबदारी असते. यासाठी भाऊबहीण नियमितपणे सभागृह स्वच्छ करतात. जास्त नुकसान होऊ नये म्हणून ते वेळोवेळी सभागृहांची दुरुस्ती करतात.
सभागृहांची काळजी घ्यायला मंडळ्यांना मदत व्हावी म्हणून स्थानिक डिझाईन/बांधकाम विभाग (LDC) काही भावांना प्रशिक्षण द्यायला नियुक्त करतं. प्रशिक्षण देणारा प्रत्येक भाऊ सहा ते दहा सभागृहांकडे लक्ष देतो. तो त्या मंडळ्यांना भेटून तिथल्या प्रचारकांना सभागृहाची काळजी घ्यायला शिकवतो. तसंच, प्रत्येक तीन वर्षांनी सभागृह कोणत्या स्थितीत आहे आणि ते दुरुस्त करायची गरज आहे का हे तो पाहतो.
प्रशिक्षण देणारे आपल्याला सभागृह चांगल्या स्थितीत ठेवायला मदत करतात
या भावांकडून मिळालेल्या प्रशिक्षणाची भाऊबहीण खूप कदर करतात. भारतात राहणारी बहीण इंदूमती म्हणते: “आम्हाला मिळालेलं प्रशिक्षण खूप जबरदस्त होतं. सभागृह चांगल्या स्थितीत कसं ठेवायचं हे शिकून घेतल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला.” केनियात राहणारा भाऊ इवान्झ म्हणतो: “मोठं नुकसान होण्याआधीच दुरुस्तीची कामं करून, मोठा खर्च कसा वाचवायचा हे आम्ही शिकलो.”
खर्च कसा भागवला जातो?
एखादं सभागृह चांगल्या स्थितीत ठेवायला आणि त्याची दुरुस्ती करायला बराच खर्च येऊ शकतो. सभागृह कुठे आहे, किती जुनं आहे आणि किती मंडळ्या ते वापरतात यावर हा खर्च अवलंबून असतो. मग तो कसा भागवला जातो?
सभागृहाच्या दुरुस्तीची कामं, मिळालेल्या दानाच्या पैशांतून केली जातात. कझाखस्तानमध्ये राहणारा भाऊ ॲलेक्झॅन्डर म्हणतो: “दानातून मिळालेले पैसे इंटरनेट, पाणी आणि वीज पुरवठ्यासाठी वापरले जातात. तसंच हे पैसे टीशू, ग्लव्झ, पेंट, साफसफाईचं सामान आणि इतर गोष्टी आणायला वापरले जातात.” उरलेले पैसे जगभरात चाललेल्या कामासाठी दान केले जातात. याचा वापर मोठमोठे प्रकल्प पूर्ण करायला केला जातो.
दुरुस्तीची मोठी प्रकल्पं
एखाद्या सभागृहाची देखभाल करायला दोन ते तीन महिन्यांत जितका खर्च होतो त्यापेक्षा दुरुस्तीचा खर्च जास्त होणार असेल, तर मंडळीतले वडील याबद्दल LDC मधल्या प्रशिक्षण देणाऱ्या भावाशी बोलतात. जर LDC ला हा प्रकल्प मान्य असेल, तर जगभरातल्या कामासाठी दिलेल्या दानातून या प्रकल्पासाठी खर्च केला जातो. २०२३ या सेवा वर्षांत असे ८,७९३ प्रकल्प हाती घेण्यात आले. यासाठी जवळपास ६३० कोटी रूपये खर्च करण्यात आले.a चला, अशा दोन प्रकल्पांबद्दल आता आपण पाहू या.
अंगोलामधल्या १५ वर्ष जुन्या सभागृहात बरीच दुरुस्तीची कामं करायची गरज होती. तिथल्या भिंतीना तडे गेले होते. वायरी आणि स्वीच बोर्ड बदलायची गरज होती आणि सभागृहामुळे पाणी शेजाऱ्यांच्या घरात जात होतं. म्हणून LDC ने हे सभागृह दुरुस्त करायचं ठरवलं. यासाठी जवळजवळ ७ ते ८ लाख रूपयांचा खर्च झाला. ज्याप्रकारे हे काम केलं गेलं, ते पाहून शेजाऱ्यांना खूप नवल वाटलं आणि त्यासाठी ते खूप आभारी होते.
अंगोलामधलं दुरुस्त केलेलं सभागृह
पोलंडमधल्या एका सभागृहाचं छत गळत होतं आणि तिथलं कार्पेट बदलायची वेळ आली होती. म्हणून LDC ने इथल्या दुरुस्तीच्या कामासाठी परवानगी दिली. या प्रकल्पासाठी जवळपास ८ लाख रूपये इतका खर्च झाला. यामुळे आता या सभागृहामध्ये बरीच वर्षं दुरुस्तीचं मोठं काम करायची गरज पडणार नाही.
पोलंडमध्ये राज्य सभागृहाचं सुरू असलेलं दुरुस्तीचं काम
या दुरुस्तीच्या कामामुळे यहोवाचा गौरव होतो
दुरुस्तीच्या कामामुळे आपल्याला मिळालेल्या मौल्यवान दानाची बचत तर होतेच, पण यामुळे यहोवाचा गौरवसुद्धा होतो. टाँगामध्ये राहणारा भाऊ शॉन म्हणतो: “या दुरुस्तीच्या कामामुळे आपल्याला स्वच्छ, नीटनेटक्या आणि व्यवस्थित सभागृहामध्ये यहोवाची उपासना करता येते. तसंच, इतर लोकांमध्येही यहोवाच्या नावाची स्तुती होते. आम्ही अभिमानाने लोकांना आमच्या सभागृहात यायचं आमंत्रण देतो.”
तुम्ही या कामात कशी मदत करू शकता?
आपण सगळेच आपलं सभागृह टापटीप आणि नीटनेटकं ठेवायला मदत करू शकतो. ऑस्ट्रेलियामधले प्रशिक्षण देणारे भाऊ मरिनो म्हणतात: “आपल्या राज्य सभागृहाची काळजी घेण्याच्या विशेष कामात आपण सगळेच सहभाग घेऊ शकतो. असं केल्यामुळे, मिळालेल्या दानाची बचत होते आणि जास्त गरज असलेल्या ठिकाणी ते वापरता येतं.”
भारतात राहणाऱ्या भाऊ जोएलला त्याच्या सभागृहाची दुरुस्ती करायला खूप आवडतं. तो म्हणतो: “भावांसोबत काम केल्यामुळे मला नवीन जगाची एक झलक पाहायला मिळते.” आधी उल्लेख केलेली निकोल म्हणते: “अलिकडेच, भाऊ बाथरूममध्ये नळ दुरुस्त करत होते. तेव्हा कोणी घसरून पडू नये म्हणून मी फरशी पुसायचं काम केलं. दुरुस्तीचं काम जरी मी केलं नसलं तरी माझ्या कामामुळे मोठा अपघात टळला.”
तुम्हालाही तुमच्या राज्य सभागृहाच्या दुरुस्तीच्या कामात हातभार लावायचा असेल, तर तुमच्या मंडळीतल्या वडिलांशी बोला. तसंच, तुम्ही मंडळीच्या दानपेटीत किंवा donate.jw.org वरूनही या कामासाठी दान देऊ शकता. तुमच्या दानाचा वापर फक्त तुमच्याच नाही तर जगभरातल्या सभागृहांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी केला जातो. तुम्ही दाखवलेल्या या उदार मनोवृत्तीसाठी आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो.
आपल्या सभागृहांची काळजी घ्यायला आपण सगळेच मदत करू शकतो
a या लेखात दिलेल्या रकमा डॉलरमधून रूपयांमध्ये बदलण्यात आल्या आहेत.