तरुण लोक विचारतात
मी एक चांगला आदर्श कसा निवडू शकतो?
“शाळेत असताना मला काही समस्यांचा सामना करावा लागला. मी ज्या व्यक्तीला खूप मानायचे तिलापण अशाच समस्यांचा सामना करावा लागला होता. म्हणून तिचा विचार केल्यामुळे मला त्या वेळी खूप मदत झाली. मग मी तिच्यासारखं वागायचा प्रयत्न करू लागले. आपल्यासमोर एखाद्याचा आदर्श असल्यामुळे कठीण समस्यांचा सामना करायला सोपं जातं.”—हेली.
आपल्यासमोर एक चांगला आदर्श असल्यामुळे आपल्याला समस्या टाळता येतील आणि आपली ध्येयं गाठता येतील. यासाठी एक चांगला आदर्श निवडणं खूप महत्त्वाचंय.
योग्य निवड करणं का गरजेचंय?
तुम्ही ज्यांचा आदर्श ठेवाल त्यांचा तुमच्या वागण्या-बोलण्यावर प्रभाव पडेल.
बायबल ख्रिश्चनांना चांगलं उदाहरण मांडलेल्यांचं अनुकरण करायचं प्रोत्साहन देतं. त्यात म्हटलंय: “त्यांच्या वागणुकीचे चांगले परिणाम पाहून त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा.”—इब्री लोकांना १३:७.
टीप: फक्त प्रसिद्ध किंवा तुमच्याच वयाच्या लोकांचा आदर्श ठेवू नका. तर, ज्यांच्यात खरंच कौतुक करण्यासारखे गुण असतील, त्यांचा आदर्श ठेवा. कारण तुम्ही ज्यांचा आदर्श ठेवता त्यांचा तुमच्या वागण्या-बोलण्यावर चांगला किंवा वाईट प्रभाव पडू शकतो.
“मला ॲडम नावाच्या एका भावाकडून बरंच शिकता आलं. त्याच्या वागण्या-बोलण्याचा आणि स्वभावाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. त्याने केलेल्या आणि बोललेल्या काही गोष्टी मला अजूनही स्पष्टपणे आठवतात. त्याचा माझ्यावर किती प्रभाव पडलाय हे त्यालाही माहीत नाही.”—कोलीन.
तुम्ही कोणाचा आदर्श ठेवताय याचा तुमच्या विचारांवर आणि भावनांवर खूप प्रभाव पडतो.
बायबल म्हणतं: “फसू नका. वाईट संगतीमुळे चांगल्या सवयी बिघडतात.”—१ करिंथकर १५:३३.
टीप: ज्यांच्यात चांगले गुण आहेत त्यांचा आदर्श ठेवा. फक्त एखाद्याची सुंदरता पाहून त्याला आदर्श निवडू नका, नाहीतर तुमच्या हाती निराशाच येईल.
“आकर्षक दिसणाऱ्या व्यक्तीसोबत जर तुम्ही स्वतःची तुलना केली, तर तुमच्यात कमीपणाची भावना येईल. आणि तुम्ही कसे दिसता याचा तुम्ही सतत विचार करू लागाल.”—तमार.
याचा विचार करा: एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा किंवा खेळाडूचा आदर्श ठेवल्यामुळे कोणते धोके होऊ शकतात?
तुम्हाला तुमची ध्येयं गाठता येतील की नाही हे तुम्ही कोणाला आदर्श मानता यावरून ठरतं.
बायबल म्हणतं: “बुद्धिमानांसोबत चालणारा बुद्धिमान होईल, पण मूर्खांची संगत धरणाऱ्याचं नुकसान होईल.”—नीतिवचनं १३:२०.
टीप: तुम्हाला स्वतःमध्ये जे गुण वाढवायचे आहेत ते गुण असलेल्या व्यक्तीला आदर्श माना. तुम्ही जितकं जास्त त्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्याकडे लक्ष द्याल, तितकं जास्त तुमच्या ध्येयापर्यंत पोचायला मदत होईल अशी पावलं तुम्हाला उचलता येतील.
“विशिष्ठ ध्येय ठेवा. ‘मला एक जबाबदार व्यक्ती बनायचंय’ असा विचार करण्याऐवजी ‘मला जेनसारखं जबाबदार बनायचंय. ती नेहमी वेळेवर येते आणि सगळ्या गोष्टी मन लावून करते’ असा विचार करा.”—मिरीयम.
थोडक्यात: एक चांगला आदर्श निवडल्यामुळे तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनता येईल.
एका चांगल्या व्यक्तीचा आदर्श ठेवल्यामुळे आपण आपलं ध्येय लवकर गाठू शकतो!
निवड कशी करावी?
खाली दिलेल्या मार्गांचा वापर करून तुम्ही एक चांगला आदर्श निवडू शकता.
१. तुम्हाला स्वतःमध्ये जे गुण वाढवायचे आहेत त्यांतला एक गुण निवडा. आणि तुम्ही मानत असलेल्या कोणत्या व्यक्तीमध्ये तो गुण आहे ते शोधा.
२. तुम्ही ज्यांना मानताय त्यांच्यापैकी एक व्यक्ती निवडा. आणि तिच्यातला कोणता गुण तुम्हाला वाढवायचा आहे हे ठरवा.
यासाठी या लेखासोबत दिलेल्या वर्कशीटमुळे तुम्हाला मदत होईल.
तुम्ही यांचा आदर्श निवडू शकता:
मित्रमैत्रीण. “मला माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीसारखं व्हायला आवडेल. ती नेहमी इतरांची काळजी असल्याचं दाखवते. ती माझ्यापेक्षा लहान असूनसुद्धा तिच्यात माझ्यापेक्षा चांगले गुण आहेत. म्हणूनच मला तिच्यासारखं व्हायचंय.”—मिरीयम.
प्रौढ किंवा वयाने मोठे असलेले. तुम्ही तुमच्या आईवडिलांचा किंवा तुमच्यासारखा विश्वास असलेल्यांचा आदर्श ठेवू शकता. “माझे मम्मी आणि पप्पा माझे आदर्श आहेत. त्यांच्यात खूप चांगले गुण आहेत. त्यांच्याकडून काही चूक होत नाही असं नाही, पण तरीही ते देवाला विश्वासू आहेत. मी त्यांच्या वयाची होईन तेव्हा इतरांनीही माझ्याबद्दल असाच विचार करावा असं मला वाटतं.”—ॲनेट.
बायबल काळातले लोक. “मी बायबलमध्ये दिलेल्या बऱ्याच जणांना माझा आदर्श म्हणून निवडलंय. जसं की, तीमथ्य, रूथ, ईयोब, पेत्र आणि इस्राएली मुलगी. प्रत्येकाला आदर्श निवडण्यामागे वेगळं कारण आहे. बायबलमधल्या या लोकांबद्दल मी जितकी जास्त माहिती घेतली, तितके जास्त ते मला खरेखुरे वाटू लागले. त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा या पुस्तकाचा आणि इंग्रजीमधल्या क्वेश्चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क, या पुस्तकाच्या व्हॉल्यूम १, २ मधल्या ‘रोल मॉडेल इंडेक्स’ या भागात दिलेल्या अहवालांचा अभ्यास करताना मला खूप मजा आली.”—मेलींडा.
टीप: फक्त एकाच व्यक्तीला आदर्श मानू नका. प्रेषित पौलने ख्रिश्चनांना म्हटलं: “आम्ही तुम्हा सर्वांसाठी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे जे चालत आहेत त्यांच्याकडे लक्ष लावा.”—फिलीप्पैकर ३:१७.
तुम्हाला माहीत होतं का? तुम्हीसुद्धा एखाद्याचा आदर्श बनू शकता! बायबल म्हणतं: “बोलण्यात आणि वागण्यात, तसंच प्रेम, विश्वास आणि शुद्धता या बाबतींत विश्वासू जनांसमोर एक चांगलं उदाहरण ठेव.”—१ तीमथ्य ४:१२.
“आपल्यामध्ये जरी काही गुण कमी असले आणि आपण ते वाढवायचा प्रयत्न करत असलो, तरी आपण एखाद्यासाठी आदर्श बनू शकतो. आपल्या नकळत काही जण आपल्याकडे लक्ष देत असतात. म्हणून आपल्या वागण्या-बोलण्याचा त्यांच्यावर चांगला प्रभाव पडू शकतो.”—कियाना.