अंत्यविधींबद्दल यहोवाच्या साक्षीदारांचा दृष्टिकोन काय आहे?
अंत्यविधींबद्दल असलेला आमचा दृष्टिकोन आणि आमच्या पद्धती बायबलच्या शिकवणींवर आधारित आहेत. त्यांपैकी काही शिकवणी खाली दिल्या आहेत:
जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे होणारं दुःख व्यक्त करणं स्वाभाविक आहे. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तेव्हा येशूच्या शिष्यांनीसुद्धा शोक केला. (योहान ११:३३-३५, ३८; प्रेषितांची कार्यं ८:२; ९:३९) त्यामुळे अशा वेळी आम्हीसुद्धा शोक व्यक्त करतो. ही वेळ दारू प्यायची किंवा मौजमजा करायची वेळ आहे असं मानत नाही. (उपदेशक ३:१, ४; ७:१-४) उलट, ही वेळ दुःखात असलेल्यांचं सांत्वन करायची वेळ आहे असं आम्ही मानतो.—रोमकर १२:१५.
मेलेल्या व्यक्तीला काहीच कळत नसतं. बऱ्याच संस्कृतींमध्ये असं मानलं जातं, की मेल्यानंतरही एक व्यक्ती कोणत्यातरी अवस्थेत जिवंत असते आणि ती इतरांच्या जीवनावर प्रभाव पाडू शकते. पण आम्ही कोणत्याही संस्कृतीतले असलो, तरी बायबलवर आधारित नसलेल्या अशा रूढीपरंपरा मानत नाही. (उपदेशक ९:५, ६, १०) जसं की यामध्ये मृत व्यक्तीजवळ बसून जागरण करायची प्रथा, अंत्यविधी आणि पुण्यतिथी धुमधडाक्यात साजरी करणं, मेलेल्यांसाठी बलिदान देणं, मेलेल्या व्यक्तीशी बोलणं किंवा तिच्याकडे एखाद्या गोष्टीची मागणी करणं. तसंच, यात विधवा किंवा विधूर बनायच्या प्रथांचासुद्धा समावेश होतो. आम्ही अशा सगळ्या प्रथा आणि चालीरीती टाळतो, कारण बायबलमध्ये अशी आज्ञा दिली आहे: “स्वतःला त्यांच्यापासून वेगळं करा, आणि अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका.”—२ करिंथकर ६:१७.
मेलेल्या लोकांना आशा आहे. बायबल असं शिकवतं, की मेलेल्या लोकांना जिवंत केलं जाईल आणि असा एक काळ येईल जेव्हा कोणीही मरणार नाही. (प्रेषितांची कार्यं २४:१५; प्रकटीकरण २१:४) या आशेमुळे आम्ही पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांसारखंच जवळच्या व्यक्तीसाठी दुःख करतो, पण दुःखात पार बुडून जात नाही.—१ थेस्सलनीकाकर ४:१३.
बायबल म्हणतं की आपण दिखावा करू नये. (नीतिवचनं ११:२) अंत्यविधीचा प्रसंग हा आपल्या श्रीमंतीचा आणि समाजातल्या आपल्या स्थानाचा “दिखावा” करायचा प्रसंग नाही असं आम्ही मानतो. (१ योहान २:१६) लोकांच्या मनोरंजनासाठी किंवा आपल्याकडे किती पैसा आहे हे दाखवण्यासाठी आम्ही धुमधडाक्यात अंत्यविधी करत नाही. तसंच, लोकांना प्रभावित करण्यासाठी आम्ही खूप जास्त सजवलेली आणि महागडी शवपेटी आणत नाही किंवा दागदागिने आणि महागडे कपडे घालत नाही.
अंत्यविधीबद्दल असलेले आमचे विश्वास आम्ही इतरांवर लादत नाही. या बाबतीत बायबलचं हे तत्त्व आम्ही पाळतो: “आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतःबद्दल देवाला हिशोब देईल.” (रोमकर १४:१२) पण संधी मिळाली तर आम्ही “सौम्यतेने आणि मनापासून आदर दाखवून” आमचे विश्वास इतरांना समजावून सांगतो.—१ पेत्र ३:१५.
यहोवाच्या साक्षीदारांमध्ये अंत्यविधी कसा केला जातो?
ठिकाण: एखाद्या कुटुंबाला जर अंत्यविधी करायचा असेल तर ते तो कुठेही करू शकतात; मग ते घरात असो, राज्य सभागृहात असो, स्मशानघाटात असो किंवा कबरस्थानात असो.
अंत्यविधी: ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याच्या कुटुंबाचं आणि मित्रपरिवाराचं सांत्वन करण्यासाठी एक भाषण दिलं जातं. त्या भाषणात, मृत्यूबद्दल बायबल काय सांगतं आणि भविष्यात आपल्या मृत प्रियजनांना पुन्हा कसं जिवंत केलं जाईल याबद्दल सांगितलं जातं. (योहान ११:२५; रोमकर ५:१२; २ पेत्र ३:१३) अंत्यविधीच्या कार्यक्रमात सहसा मृत व्यक्तीच्या चांगल्या गुणांबद्दल सांगितलं जातं. तसंच, ती देवाला कशी विश्वासू होती आणि तिच्याकडून आपण काय शिकू शकतो याबद्दल सांगितलं जातं.—२ शमुवेल १:१७-२७.
अशा वेळी सहसा शास्त्रवचनांवर आधारित एखादं गीतसुद्धा गायलं जातं. (कलस्सैकर ३:१६) आणि अंत्यविधीच्या शेवटी दिलासा देणारी प्रार्थना केली जाते.—फिलिप्पैकर ४:६, ७.
पैसे किंवा वर्गणी घेतली जात नाही: आम्ही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी, मग तो अंत्यविधीचा कार्यक्रम जरी असला तरी त्यासाठी पैसे घेत नाही. शिवाय, आमच्या सभांमध्ये दानसुद्धा गोळा केलं जात नाही.—मत्तय १०:८.
कोण येऊ शकतं? साक्षीदार नसलेले लोकसुद्धा अंत्यविधीचं भाषण ऐकण्यासाठी राज्य सभागृहात येऊ शकतात. आमच्या इतर सभांप्रमाणेच अंत्यविधीलासुद्धा कोणीही येऊ शकतं.
यहोवाचे साक्षीदार इतर धर्मातल्या लोकांच्या अंत्यविधीला जातात का?
प्रत्येक साक्षीदार बायबलमधून शिकलेल्या गोष्टींच्या आधारावर जायचं की नाही हे स्वतः ठरवतो. (१ तीमथ्य १:१९) पण, जर आम्हाला असं वाटलं की तिथे केल्या जाणाऱ्या धार्मिक विधी बायबलच्या शिकवणींनुसार नाहीत तर आम्ही त्यांत सहभाग घेत नाही.—२ करिंथकर ६:१४-१७.