संपूर्ण जगभरात किती यहोवाचे साक्षीदार आहेत?
तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांची संख्या कशी मोजता?
प्रत्येक महिन्याला देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश लोकांना सांगण्यात सहभाग घेणाऱ्यांना आम्ही यहोवाच्या साक्षीदारांमध्ये मोजतो. (मत्तय २४:१४) यात बाप्तिस्मा झालेल्या साक्षीदारांसोबत, बाप्तिस्मा न झालेल्या पण प्रचार करण्यासाठी पात्र असलेल्यांचाही समावेश होतो.
साक्षीदार बनण्यासाठी एखाद्या व्यक्तीला पैसे दान म्हणून द्यावे लागतात का?
नाही. दान देऊन एखादी व्यक्ती साक्षीदार बनत नाही. सोबतच, त्याला दान देऊन संघटनेत एखादी जबाबदारी किंवा काम मिळतं असंही नाही. (प्रेषितांची कार्यं ८:१८-२०) उलट, बऱ्याच वेळा कोणी किती दान दिलंय हे कोणालाच माहीत नसतं. संपूर्ण जगभरात होत असलेल्या प्रचाराच्या कामाला हातभार लावण्यासाठी प्रत्येक साक्षीदार आपल्या इच्छेप्रमाणे आणि परिस्थितीप्रमाणे त्याच्या वेळेचा, ताकदीचा आणि साधनांचा उपयोग करतो.—२ करिंथकर ९:७.
किती यहोवाचे साक्षीदार प्रचार करत आहेत हे तुम्हाला कसं कळतं?
दर महिन्याला साक्षीदार त्यांच्या प्रचाराच्या कामाचा रिपोर्ट स्थानिक मंडळीला पाठवतात. ते त्यांच्या इच्छेने हा रिपोर्ट पाठवतात.
मग मंडळी या रिपोर्टची एकूण संख्या मोजते आणि संपूर्ण गोळाबेरीज त्यांच्या देशाच्या शाखा कार्यालयाला पाठवते. प्रत्येक शाखा कार्यालय आपल्या देशाच्या क्षेत्राची गोळाबेरीज जागतिक मुख्यालायाला पाठवतं.
दर सेवा वर्षाच्याa शेवटी, त्या संपूर्ण वर्षात प्रत्येक देशातल्या साक्षीदारांची संख्या किती होती याचा हिशोब लावला जातो. मग या संख्येची गोळाबेरीज करून संपूर्ण जगभरात किती यहोवाचे साक्षीदार आहेत हे समजतं. आमच्या वेबसाईटवर “पूरी दुनिया के कोने-कोने में” या भागात प्रत्येक देशाची बारीकसारीक माहिती दिली जाते. पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना काहीसा असाच रिपोर्ट मिळायचा आणि त्यांना खूप प्रोत्साहन मिळायचं. अगदी तसंच, हा रिपोर्ट वाचल्यावर आम्हालासुद्धा खूप प्रोत्साहन मिळतं.—प्रेषितांची कार्यं २:४१; ४:४; १५:३.
तुमच्या संघटनेसोबत संगती करत असलेल्या पण प्रचारात सहभाग घेत नसलेल्या लोकांची तुम्ही साक्षीदार म्हणून मोजणी करता का?
खरंतर, आम्ही अशा लोकांची मोजणी साक्षीदार म्हणून करत नाही. पण आमच्या मंडळ्यांमध्ये आम्ही त्यांचं स्वागत नक्कीच करतो. यातले बरेचसे लोक दरवर्षी साजरा केल्या जाणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या स्मारकविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. या कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांच्या संख्येतून साक्षीदारांच्या संख्येला वेगळं केलं, तर असे एकूण किती लोक आहेत हे आपल्याला कळेल. २०२५ साली स्मारकविधीची उपस्थिती २,०६,३५,०१५ इतकी होती.
बरेचसे लोक आमच्या सभांना येत नसले तरी ते बायबल अभ्यास करतात आणि यासाठी आम्ही त्यांच्याकडून पैसे घेत नाही. २०२५ मध्ये आम्ही दर महिन्याला सरासरी ७६,०३,१८२ इतके बायबल अभ्यास चालवले. यातले काही अभ्यास असे होते, ज्यात एकापेक्षा जास्त लोक एकाच वेळी अभ्यास करायचे.
सरकारच्या रेकॉर्डमध्ये साक्षीदारांची संख्या तुम्ही सांगता त्या संख्येपेक्षा जास्त का आहे?
सरकारी जनगणना विभाग सहसा लोकांना, ते कोणत्या धार्मिक समूहाचे आहेत असं विचारतात आणि मग त्याचा रेकॉर्ड ठेवतात. उदाहरणार्थ, अमेरिका जनगणना विभाग असं सांगतं, की “सर्वेमध्ये भाग घेणारे स्वतःला कोणत्या धार्मिक गटातले मानतात याची त्यांना माहिती काढायची असते.” ते विभाग असंही सांगतं, की “लोकांनी दिलेल्या मताच्या आधारावरच” हा आकडा दिला जातो. पण साक्षीदार असल्याचा दावा करणाऱ्या सगळ्यांचीच मोजणी आम्ही साक्षीदारांमध्ये करत नाही. तर, जे प्रचार करतात आणि त्यांच्या प्रचाराच्या कामाचा रिपोर्ट देतात त्यांनाच आम्ही यहोवाचे साक्षीदार म्हणतो.
a सेवा वर्ष १ सप्टेंबर ते पुढच्या वर्षाच्या ३१ ऑगस्टपर्यंत असतं. उदाहरणार्थ, २०१५ चं सेवा वर्ष १ सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑगस्त २०१५ पर्यंत होतं.