यहोवाच्या साक्षीदारांनी स्वतःच्या शिकवणींनुसार बायबलमध्ये बदल केलाय का?
नाही, आम्ही तसं केलेलं नाही. उलट आम्हाला जेव्हा कळलं की आमच्या शिकवणी पूर्णपणे बायबलप्रमाणे नाहीत, तेव्हा आम्ही त्या शिकवणी बदलल्या.
१९५० मध्ये पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर (इंग्रजी) याची छपाई सुरू करण्याआधी आम्ही बायबलचं परीक्षण केलं. त्या वेळी जी-जी भाषांतरं उपलब्ध होती, त्यांचा आम्ही वापर केला आणि आमच्या शिकवणी त्यांच्यावर आधारल्या. यहोवाचे साक्षीदार बऱ्याच काळापासून ज्या गोष्टी मानायचे त्याची काही उदाहरणं पाहा आणि त्या खरंच बायबलनुसार आहेत की नाही हे स्वतःच ठरवा.
१. आम्ही काय मानतो: देव त्रैक्य नाही. झायन्स वॉच टावरच्या जुलै १८८२ च्या अंकात असं म्हटलं होतं: “आमच्या वाचकांना हे माहीत आहे, की आम्ही यहोवावर, येशूवर आणि पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो. पण एकाच व्यक्तीमध्ये तीन देव आहेत किंवा काही जण म्हणतात त्याप्रमाणे, तीन व्यक्तींमध्ये एक देव आहे अशी शिकवण शास्त्रवचनांच्या पूर्णपणे विरोधात असल्यामुळे आम्ही ती नाकारतो.”
बायबल काय म्हणतं: “यहोवा आमचा देव एकच यहोवा आहे.” (अनुवाद ६:४, रॉबर्ट यंग यांचं द होली बायबल) “आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता आहे, ज्याच्यापासून सर्वकाही निर्माण झाले, आणि ज्याच्यासाठी आपण जगतो; आणि फक्त एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याच्याद्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्याद्वारे आपण जगतो.” (१ करिंथकर ८:६, अमेरिकन बायबल युनियन व्हर्शन) येशूने स्वतः म्हटलं होतं: “माझा पिता माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.”—योहान १४:२८, डूए-ऱ्हेईम्स व्हर्शन.
२. आम्ही काय मानतो: धगधगत्या आगीच्या नरकात कोणीही अनंतकाळ यातना भोगत नाही. झायन्स वॉच टावर या नियतकालिकाने किंग जेम्स व्हर्शन बायबलच्या रोमकर ६:२३ या वचनाचा संदर्भ घेतला आणि जून १८८२ च्या अंकाचं शीर्षक, “पापाची मजुरी मृत्यू आहे” असं ठेवलं. या अंकात असं सांगण्यात आलं होतं, की “हे विधान अगदी सरळ आणि सोपं आहे. पण बायबल हे देवाचं वचन आहे, असा दावा करणारे लोकच या विधानाचा विरोध करतात आणि ठामपणे असं मानतात, की पापाची मजुरी ही अनंतकाळ यातना भोगणं आहे, आणि बायबलसुद्धा तेच शिकवतं असं ते म्हणतात.”
बायबल काय म्हणतं: “जो जीव पाप करेल तो मरेल.” (यहेज्केल १८:४, २०, किंग जेम्स व्हर्शन) देवाचा विरोध करणाऱ्यांसाठी शेवटची शिक्षा अनंतकाळ यातना भोगणं नाही, तर ‘सर्वकाळाचा नाश’ आहे.—२ थेस्सलनीकाकर १:९, किंग जेम्स व्हर्शन.
३. आम्ही काय मानतो: देवाचं राज्य मनाची स्थिती नाही, तर खरोखरचं सरकार आहे. देवाच्या राज्याबद्दल, झायन्स वॉच टावरच्या डिसेंबर १८८१ च्या अंकात असं म्हटलं होतं, की “या राज्याच्या स्थापनेसाठी पृथ्वीवरच्या सगळ्या राज्यांचा नाश केला जाईल.”
बायबल काय म्हणतं: “त्या राज्यांच्या कारकिर्दीत स्वर्गाचा देव एक असं राज्य स्थापन करेल, ज्याचा कधीच नाश होणार नाही. ते राज्य दुसऱ्या लोकांच्या हातात सोपवलं जाणार नाही. तर ते या सगळया राज्यांचा चुराडा करेल आणि ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:४४, किंग जेम्स व्हर्शन.
आपल्या शिकवणींना पाठिंबा देण्यासाठी यहोवाचे साक्षीदार नवे जग भाषांतर या बायबल भाषांतरावर अवलंबून आहेत का?
नाही, आम्ही आमच्या साक्षकार्यात अजूनही बायबलच्या इतर बऱ्याच भाषांतरांचा उपयोग करतो. खरंतर, आमच्या मोफत बायबल अभ्यास कार्यक्रमाचा भाग म्हणून आम्ही नवे जग भाषांतराची प्रत मोफत देत असलो, तरी ज्यांना इतर भाषांतरांचा उपयोग करायची इच्छा असते त्यांच्यासोबतही आम्ही बायबल अभ्यास करायला तयार असतो.