यहोवाचे साक्षीदार राजकीय गोष्टींमध्ये तटस्थ का राहतात?
आम्ही यहोवाचे साक्षीदार बायबलमधून जे शिकलोय, त्या आधारावर राजकीय गोष्टींमध्ये तटस्थ राहायची निवड करतो. आम्ही कुठल्याही राजकारण्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत नाही, निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराला किंवा पक्षाला मत देत नाही, निवडणुकीत उभं राहत नाही किंवा सरकार बदलायला कुठलीही खटपट करत नाही. आम्ही असं यासाठी करतो, कारण बायबलमध्ये याची ठोस कारणं आहेत.
येशूने राजकारणात भाग घेतला नाही. म्हणून आम्हीही तसंच करतो. (योहान ६:१५) त्याने त्याच्या शिष्यांना ‘तुम्ही या जगाचे भाग बनू नका’ असं शिकवलं. तसंच, त्यांनी राजकीय गोष्टींच्या बाबतीत कोणाचीही बाजू घेऊ नये, असंही त्याने सांगितलं.—योहान १७:१४, १६; १८:३६; मार्क १२:१३-१७.
येशूने म्हटलं: “[देवाच्या] राज्याचा हा आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला जाईल.” आम्ही याच राज्याला एकनिष्ठपणे पाठिंबा देतो. (मत्तय २४:१४) या राज्याचे प्रतिनिधी असल्यामुळे आम्ही लोकांना सांगतो, की ते राज्य लवकरच येणार आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याच देशाच्या, इतकंच काय तर, आम्ही ज्या देशात राहतो त्या देशाच्या राजकारणातही भाग घेत नाही.—२ करिंथकर ५:२०; इफिसकर ६:२०.
तटस्थ राहिल्यामुळे आम्ही कुठल्याही राजकीय विचारधारेच्या व्यक्तीशी देवाच्या राज्याच्या आनंदाच्या संदेशाबद्दल मनमोकळेपणे बोलू शकतो. आम्ही आमच्या वागण्या-बोलण्यातून हे दाखवतो, की फक्त देवाचं राज्य जगातल्या समस्या काढू शकतं.—स्तोत्र ५६:११.
आमच्यापैकी कोणीच राजकीय पक्षाचा भाग नाही. त्यामुळे जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांमध्ये एकी आहे. (कलस्सैकर ३:१४; १ पेत्र २:१७) याउलट, जे धर्म राजकारणात भाग घेतात, त्यांच्या सदस्यांमध्ये एकी नसते.—१ करिंथकर १:१०.
आम्ही सरकारांचा आदर करतो. आम्ही राजकारणात भाग घेत नसलो, तरी आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथल्या सरकाराचा आदर करतो. बायबलही असंच करायला सांगतं. त्यात म्हटलंय: “प्रत्येकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावं.” (रोमकर १३:१) आम्ही नियम पाळतो, कर भरतो आणि नागरिकांच्या भल्यासाठी सरकार जे प्रयत्न करतं, त्याला सहकार्य करतो. सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आम्ही बायबलमधल्या सल्ल्याप्रमाणे वागतो. त्यात म्हटलंय: “राजे आणि उच्च पदांवर असलेले अधिकारी यांच्यासाठीही प्रार्थना” करा. आमच्या उपासनेवर प्रभाव पडेल असे निर्णय घेतले जातात, तेव्हा खासकरून आम्ही असं करतो.—१ तीमथ्य २:१, २.
तसंच, राजकीय गोष्टींच्या बाबतीत आम्ही इतरांच्या निर्णयाचा आदर करतो. जसं की, मतदानाच्या वेळी आम्ही कोणताही अडथळा आणत नाही किंवा एखादा मतदान करायची निवड करतो तेव्हा आम्ही त्याच्यावर प्रश्न उचलत नाही.
तटस्थ राहणं ही अलीकडेच सुरू झालेली संकल्पना आहे का? नाही. पहिल्या शतकातले येशूचे शिष्य आणि इतर ख्रिश्चनही राजकीय गोष्टींच्या बाबतीत तटस्थ होते. बियॉंड गुड इंटेंश्न्स या पुस्तकात असं म्हटलंय: “आपण सरकारी अधिकाऱ्यांचा आदर केला पाहिजे असं जरी पहिल्या शतकातले ख्रिस्ती मानत असले, तरी आपण राजकारणात भाग घेऊ नये असंही ते मानत होते.” तसंच, ऑन द रोड टू सिविलायझेशन हे पुस्तक म्हणतं, की पहिल्या शतकातले ख्रिस्ती “निवडणुकीत उभे राहत नव्हते.”
आमचं तटस्थ राहणं देशासाठी धोकेदायक आहे का? नाही. आम्ही शांतिप्रिय लोक आहोत आणि सरकारी अधिकाऱ्यांना आमच्यापासून कोणताही धोका नाही. युक्रेनच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायंसेसने २००१ मध्ये एक अहवाल दिला. आमच्या तटस्थेबद्दल त्यात असं म्हटलं होतं: “आज काहींना यहोवाच्या साक्षीदारांची ही भूमिका कदाचित आवडणार नाही. पण या कारणामुळे नात्झी आणि कम्युनिस्ट शासनांनी त्यांचा छळ केला.” इतकंच काय तर, सोव्हियत संघाच्या जुलमी शासनाखाली असूनही साक्षीदारांनी “कायद्याचं पालन केलं. त्यांनी शेतांमध्ये आणि कारखान्यांमध्ये प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे काम केलं. त्यांच्यामुळे कम्युनिस्ट सरकाराला कोणताही धोका नव्हता.” त्या अहवालात शेवटी असं म्हटलं होतं, की यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्वासामुळे आणि कामांमुळे “कुठल्याही देशाच्या सुरक्षेला आणि शांतीला तडा जात नाही.”