अणुयुद्धाबद्दल बायबल काय म्हणतं?
जगावर सतत अणुयुद्धाची टांगती तलवार आहे. कारण, जगातली सर्वात शक्तिशाली राष्ट्रं स्वतःकडे आण्विक शस्त्रं बाळगून आहेत, आणि दिवसेंदिवस त्यांचं प्रमाण वाढवत आहेत. त्यामुळे लोकांना अशी भीती वाटत आहे, की जगात जितकी जास्त आण्विक शस्त्रं आहेत, तितकाच अणुयुद्ध होण्याचा धोका जास्त आहे. तसंच, काहींना असंही वाटतं, की एखाद्या देशाने लहानसा अणुबॉम्ब जरी टाकला, तरी इतर राष्ट्रं त्या युद्धात सहभाग घेतील आणि संपूर्ण पृथ्वीचा नाश होईल. लोकांना वाटणारी ही भीती सहाजिकच आहे. कारण, बुलेटिन ऑफ द ॲटोमिक सायंटिस्ट्स यांनी सांगितल्यानुसारसुद्धा आपण “या पूर्वी कधी नव्हे इतका अणुयुद्धाचा धोका” असलेल्या काळात जगत आहोत.
पण, खरंच अणुयुद्धाला सुरुवात होऊ शकते का? जर तसं झालं, तर या पृथ्वीचा आणि आपला बचाव होईल का? अणुयुद्धामुळे वाटणाऱ्या भीतीवर आपण कशी मात करू शकतो? याबद्दल बायबल काय सांगतं?
या लेखात
अणुयद्ध आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांच्या भीतीचा आपल्याला सामना कसा करता येईल?
हर्मगिदोनचं युद्ध हे अणुयुद्ध असेल असं बायबलमध्ये सांगण्यात आलंय का?
बायबलमधल्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात ज्या युद्धाबद्दल सांगितलंय, ते अणुयुद्धाबद्दल आहे का?
अणुयुद्धाबद्दल बायबलमध्ये आधीच काही सांगितलंय का?
बायबलमध्ये अणुयुद्धाबद्दल सांगितलेलं नाही. पण जगावर अणुयुद्धाचं असलेलं सावट कशामुळे आणि कोणत्या घटनांमुळे आहे याबद्दल बायबलमध्ये आधीच सांगण्यात आलंय.
हे समजण्यासाठी, बायबलच्या वचनांत सांगितलेल्या गोष्टींची तुलना आजच्या काळाशी करा:
वचन: येशूच्या शिष्यांनी त्याला विचारलं: “तुझ्या उपस्थितीचं आणि जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीचं चिन्ह काय असेल?” तेव्हा येशूने उत्तर दिलं: “एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल.”—मत्तय २४:३, ७.
जगातल्या घटना: अनेक राष्ट्रं (यांमध्ये अणुबॉम्ब असलेली राष्ट्रंसुद्धा) आज बऱ्याच युद्धांमध्ये सहभागी आहेत.
“अलीकडच्या काही वर्षांत जग कधी नव्हे इतकं हिंसक झालंय: सशस्त्र संघर्षांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.”—द आर्म्ड कॉनफ्लिक्ट लोकेशन ॲन्ड इव्हेंट डेटा प्रोजेक्ट.
वचन: “अंताच्या समयी दक्षिणेचा राजाही [उत्तरेच्या राजाशी] लढाई करेल.”—दानीएल ११:४०.
जगातल्या घटना: बायबलमध्ये भविष्यवाणी केल्याप्रमाणे, आज एकमेकांविरोधात असलेली राष्ट्रं आपल्या मित्र राष्ट्रांसोबत मिळून शत्रूराष्ट्रांना झुकवण्याचा प्रयत्न करत आहेत. अणुबॉम्ब असलेली सर्वांत शक्तिशाली राष्ट्रं एकमेकांविरोधात प्रत्यक्ष युद्ध करायचं टाळत असले, तरी ते आपल्या आण्विक शस्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करत आहेत.
“आम्ही पाहिलंय की मागच्या दहाएक वर्षांत देशा-देशांमध्ये होणारी युद्धं वाढली आहेत, आणि जगातली शक्तिशाली राष्ट्रं यांमध्ये एकमेकांविरोधात बाजू घेत आहेत.”—द अपसाला कॉनफ्लिक्ट डेटा प्रोग्राम.
वचन: “शेवटच्या दिवसांत खूप कठीण काळ येईल हे लक्षात ठेव. कारण, लोक . . . कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे, इतरांची बदनामी करणारे, संयम नसलेले, क्रूर” असतील.—२ तीमथ्य ३:१-३.
जगातल्या घटना: इतर लोकांप्रमाणेच आज जगातले नेतेसुद्धा एकमेकांशी सहमत होत नाहीत. आणि मतभेद शांततेच्या मार्गाने सोडवण्याऐवजी, ते आपल्या सैन्य शक्तीचा वापर करतात. यामुळे अणुयुद्ध भडकण्याचा धोका वाढतो.
“एकमेकांसोबत मिळून काम करण्यासाठी व्यावहारिक पावलं उचलली गेली नाहीत, तर युद्ध भडकण्याचा धोका आणखी मोठा आणि गंभीर होत जाईल.”—एस. सारान आणि जे. हर्मन, वर्ल्ड इकोनॉमिक फोरम.
देव अणुयुद्ध होऊ देईल का?
याविषयी बायबलमध्ये स्पष्टपणे काही सांगितलेलं नाही. पण बायबलमध्ये म्हटलंय “भयानक दृश्यं” किंवा भयानक घटना आपल्या दिवसांत घडतील. (लूक २१:११) याची काही उदाहरणं म्हणजे, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी दोन अणुबॉम्ब टाकण्यात आले होते. असं असलं, तरी देव युद्ध का होऊ देतो याबद्दल बायबलमध्ये सांगितलं आहे. आणखी माहितीसाठी तुम्ही ‘देवाने दुःख का राहू दिलं?’ हा व्हिडिओ पाहू शकता.
पृथ्वीचा बचाव होईल का?
हो. माणसांनी पुन्हा एकदा युद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर केला, तरी संपूर्ण जगाचा त्यात नाश होईल इथपर्यंत देव परिस्थिती चिघळू देणार नाही. कारण, बायबलमध्ये सांगितलंय की असे धोके असले तरी पृथ्वी यांतून नक्की वाचेल. इतकंच नाही तर, माणसं तिच्यावर सर्वकाळासाठी राहतील.
काही जणांना असं वाटतं, की भविष्यामध्ये अणुयुद्धानंतर विद्ध्वंस झालेल्या या पृथ्वीवर फक्त थोडेफार लोकच बचावलेले असतील. पण बायबल सांगतं, की युद्धांमुळे पृथ्वीची झालेली नासाडी आणि विद्ध्वंस भरून काढला जाईल आणि पृथ्वी पुन्हा आधीसारखी होईल.
देवाची इच्छा आहे की आपण या सुंदर पृथ्वीवर आनंदाने जगावं
आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याने या पृथ्वीला अशा प्रकारे बनवलंय की ती स्वतःला पूर्वस्थितीत आणू शकते. तसंच, देव आपल्या शक्तीचा वापर करून या पृथ्वीला पुन्हा पूर्वीसारखं नंदनवन बनवेल, आणि ती मानवजातीसाठी कायमचं सुंदर घर बनेल.—स्तोत्र ३७:११, २९; प्रकटीकरण २१:५.
अणुयद्ध आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांच्या भीतीचा आपल्याला सामना कसा करता येईल?
अणुयुद्धाच्या बातम्यांमुळे काहींना खूप चिंता वाटते, याला तज्ज्ञ “न्युक्लियर ॲन्झायटी” असं म्हणतात. याचा अर्थ अशा लोकांना “अणुयुद्धाची आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांची” अतिप्रमाणात सतत भीती वाटत असते. अशा लोकांना, बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्यांमुळे आणि त्यात भविष्याबद्दल सांगितलेल्या आशेमुळे आपली भीती आणि चिंता कमी करायला मदत होऊ शकते. ते कसं?
बायबलमध्ये या पृथ्वीबद्दल आणि तिच्यावर राहणाऱ्यांबद्दल एक आशेचा संदेश सांगितलाय. हा आशादायक संदेश ‘आपल्या जीवनासाठी एखाद्या नांगरासारखा’ ठरू शकतो. (इब्री लोकांना ६:१९, तळटीप) याशिवाय, भविष्यात काय होऊ शकतं आणि काय नाही, यावर जास्त विचार करत बसण्याऐवजी, आजच्या गरजा आणि गोष्टींवर विचार केला तर चिंता (ॲन्झायटी) कमी करता येईल. येशूनेही एक चांगला सल्ला दिला होता: “ज्या दिवसाची चिंता त्या दिवसाला पुरे.”—मत्तय ६:३४.
खरंतर, आपण सगळ्यांनीच आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण हे कसं करू शकतो? आपण अणुयुद्धाच्या बातम्यांबद्दल जे वाचतो, ऐकतो किंवा टिव्हीवर पाहतो, त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो. उदाहरणार्थ, अशा विषयांबद्दल दाखवल्या जाणाऱ्या चर्चा, अंदाज किंवा वैयक्तिक मतांबद्दलचे कार्यक्रम. पण याचा अर्थ आपण वास्तविकता नाकारली पाहिजे असाही होत नाही. तर, ज्या गोष्टींवर आपलं काही नियंत्रण नाही किंवा ज्या कदाचित कधी घडणारही नाहीत, अशा गोष्टींवर सतत विचार करण्यापासून आपण स्वतःला रोखण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत.
चिंता वाढवणाऱ्या आणि वाईट बातम्यांपासून स्वतःला थोड्या काळासाठी दूर ठेवा. आणि जीवनातल्या सकारात्मक गोष्टींवर लक्ष लावा.
बायबलमध्ये भविष्यासाठी खरी आशा दिली आहे
देवाने ज्या आशादायक भविष्याबद्दल सांगितलंय त्याविषयी शिकून घेतल्यामुळे तुम्हाला आशा, खरा आनंद आणि शांती मिळेल.
हर्मगिदोनचं युद्ध हे अणुयुद्ध असेल असं बायबलमध्ये सांगण्यात आलंय का?
काहींना वाटतं की हर्मगिदोनचं युद्ध हे जागतिक पातळीवर होणारं अणुयुद्ध असेल. त्यामुळे सहाजिकच ते त्यामुळे होणाऱ्या परिणामांवरही विचार करतात.
पण बायबलमध्ये “हर्मगिदोन” हा शब्द ‘संपूर्ण पृथ्वीवरच्या राजांमध्ये’ म्हणजे मानवी सरकारांमध्ये आणि देवामध्ये होणाऱ्या युद्धाला दर्शवतो.a (प्रकटीकरण १६:१४, १६) अणुयुद्धाप्रमाणे हर्मगिदोनच्या युद्धात सगळ्या माणसांचा किंवा या पृथ्वीचा नाश होणार नाही. तर हर्मगिदोनच्या युद्धात देव फक्त दुष्ट लोकांचाच नाश करणार आहे. त्यामुळे इतर लोकांना खरी शांती आणि सुरक्षा अनुभवायला मिळेल.—स्तोत्र ३७:९, १०; यशया ३२:१७, १८; मत्तय ६:१०.
युद्धं होऊ नयेत म्हणून बायबलमध्ये काय सांगितलंय?
यहोवाb देव आपल्या अधिकाराचा आणि शक्तीचा वापर करून युद्ध करणाऱ्या देशांना लगाम घालेल. तो युद्ध थांबवेल आणि त्यांच्या शस्त्रांचा नाश करेल. हे तो कसं करेल? तो त्याच्या राज्याद्वारे, म्हणजे स्वर्गातल्या सरकाराद्वारे हे करेल. हे सरकार पृथ्वीवरच्या सर्व मानवी सरकारांना हटवून पृथ्वीवर राज्य करेल.—दानीएल २:४४.
देवाचं राज्य लोकांना एकमेकांसोबत शांतीने राहायला शिकवेल. त्या वेळी संपूर्ण पृथ्वीवर फक्त एकच सरकार राज्य करत असल्यामुळे देशादेशांमध्ये होणारे वाद आणि मतभेद राहणार नाहीत; लोक पुन्हा युद्ध करायचं शिकणार नाहीत! (मीखा ४:१-३) याचे कोणते चांगले परिणाम होतील? बायबल म्हणतं, “त्यांच्यातला प्रत्येक जण आपल्या द्राक्षवेलाखाली आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल, कोणीही त्यांना घाबरवणार नाही.”—मीखा ४:४.
a “हर्मगिदोन म्हणजे काय?” हा लेख पाहा.
b बायबलमध्ये यहोवा हे देवाचं वैयक्तिक नाव आहे असं सांगितलंय. (स्तोत्र ८३:१८) “यहोवा कौन है?” हा हिंदीमधला लेख वाचा.