नियमन मंडळाकडून पत्र
प्रिय सहसाक्षीदारांनो,
प्रेषित पौलाने बंधूभगिनींविषयी त्याला असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांची प्रशंसा करण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घेतला. रोममधील ख्रिश्चनांना त्याने लिहिले: “तुम्हा सर्वांविषयी येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो; कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे.” (रोम. १:८) होय, पहिल्या शतकातील ख्रिश्चनांची त्यांच्या मजबूत विश्वासामुळे व आवेशी प्रचार कार्यामुळे रोमी साम्राज्याच्या कानाकोपऱ्यात ख्याती होती. (१ थेस्सलनी. १:८) म्हणूनच पौलाचे आपल्या बांधवांवर अतिशय गाढ प्रेम होते.
पौलाप्रमाणे आम्ही देखील जेव्हा जेव्हा तुमचा विचार करतो तेव्हा तेव्हा यहोवाचे आभार मानतो. बांधवांनो, तुम्ही सर्व आम्हाला फार प्रिय आहात. आणि यहोवाचे देखील तुमच्या प्रत्येकावर प्रेम आहे ही खातरी बाळगा. तुम्हातील काहींना कड्या विरोधाचा सामना करावा लागत असला तरीसुद्धा तुम्ही प्रचार करायचे सोडलेले नाही. तुम्ही दाखवत असलेले धाडस आणि निर्भयपणा पाहून यहोवाचे मन किती आनंदित होत असावे!—नीति. २७:११.
प्रभू येशू ख्रिस्त, ‘विजयावर विजय मिळवित’ असल्याचा व त्याच्या अनुयायांविरुद्ध ‘चालविण्याकरिता घडिलेले [कोणत्याही प्रकारचे] हत्यार चालणार नसल्याचा’ भरपूर पुरावा तुम्हाला येणाऱ्या वार्षिक पुस्तकातून मिळू शकेल.—प्रकटी. ६:२; यश. ५४:१७.
फिलिप्पैमधील ख्रिश्चनांना पौलाने असे लिहिले: ‘सुवार्तेच्या प्रसारात तुमच्या सहभागितेमुळे मी आपल्या देवाचे आभार मानितो.’ (फिलिप्पै. १:३-५) नियमन मंडळातील आम्हा सर्व सदस्यांना तुमच्याविषयी असेच वाटते. गेल्या वर्षी अर्थात २००७ सालादरम्यान ६६,९१,७९० प्रचारकांनी सबंध पृथ्वीवरील २३६ देशांत सुवार्तेचा प्रचार करण्यात १,४३,१७,६१,५५४ तास खर्च केले. सुवार्तेच्या प्रसारात तुमचा सिंहाचा वाटा आहे! यहोवाच्या स्तुतीसाठी आपण करत असलेल्या सामूहिक प्रयत्नांमुळे लाखो लोकांच्या जीवनावर केवढा प्रभाव पडला आहे!
पौलाला बंधूभगिनींविषयी खूप सहानुभूती होती हे त्याने दुसऱ्या एका प्रसंगी दाखवून दिले. थेस्सलोनिकामधील बांधवांना त्याने असे लिहिले: “आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये . . . आपल्या देवपित्यासमोर . . . आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर ह्यांचे आम्ही निरंतर स्मरण करितो.” (१ थेस्सलनी. १:२, ३) आजच्या काळातले जीवन सहजसोपे नाही, हे आम्ही जाणून आहोत. नवनवीन समस्या येतच राहतात; परंतु यात टिकून राहणे महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणत्या आव्हानांना तोंड देत आहात? पूर्वी तुम्ही यहोवाच्या सेवेत जितके करत होता तितके आता तुम्हाला एखाद्या गंभीर आजारपणामुळे करता येत नाही म्हणून तुम्ही निराश झाला आहात का? कैक वर्षांपासून असलेल्या तुमच्या सोबत्याला सतत आ वासून बसलेल्या शत्रूने अर्थात मृत्यूने गिळंकृत केले आहे का? (नीति. ३०:१५, १६) केवळ प्रभूमध्ये लग्न करा या बायबलमधील सल्ल्याचे तुम्ही विश्वासूपणे पालन करत आहात पण तुमच्याप्रमाणेच यहोवावर प्रेम करणारा उचित जोडीदार तुम्ही शोधत आहात का? (१ करिंथ. ७:३९) शिवाय, अतिशय हलाखीत तुम्ही आपल्या मुलांचे संगोपन करत आहात का? तुमची परिस्थिती कोणतीही असली तरी यहोवाच्या राज्याला प्रथम स्थान दिल्यास तो ‘तुमचे कार्य आणि त्याच्यावर तुम्ही दाखविलेली प्रीति विसरून’ जाणार नाही अशी खातरी तुम्ही बाळगू शकता. तेव्हा प्रिय बंधू आणि भगिनींनो, जे ‘चांगले आहे ते करण्याचा कंटाळा करू नका.’—इब्री ६:१०; गलती. ६:९.
कोणती गोष्ट तुम्हाला धीर धरण्यास मदत करू शकेल? थेस्सलनीकरांच्या बाबतीत होते त्याप्रमाणे ‘आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावरील आशा’ आपल्याला धीर धरण्यास मदत करू शकेल. पौलाने नंतर अगदी उचित कारणासाठी ‘तारणाच्या आशेची’ तुलना एका मजबूत शिरस्त्राणाशी केली. हे शिरस्त्राण नकारात्मक विचारांपासून आणि मनात सतत घोळत असलेल्या शंकांपासून आपले रक्षण करू शकते.—१ थेस्सलनी. ५:८.
सर्वकाही आनंदाने सहन करण्याद्वारे तुम्ही यहोवाच्या विश्वव्यापी सार्वभौमत्वासंबंधी सैतानाने जो वादविषय उपस्थित केला आहे त्याला उत्तर पुरवत आहात. सैतानाचा असा दावा आहे की देवाचे सेवक जन्मतःच स्वार्थी असतात आणि ते काही काळापुरते देवाची सेवा करतात पण त्यांच्यावर जेव्हा परीक्षा येतात किंवा जगाचा नाश त्यांच्या अपेक्षेनुसार लवकर झाला नाही म्हणून ते यहोवाला सोडून देतात. सैतान किती नीच व लबाड आहे याचा पर्दाफाश करण्याची केवढी सुसंधी तुम्हाला मिळाली आहे! तुमच्या जीवनाचा प्रत्येक नवीन दिवस तुम्हाला, तुमची आशा साकार होईल त्या दिवसाजवळ आणतो.
बांधवांचा अविरत विश्वास, प्रचार कार्याला त्यांचे मनःपूर्वक पाठबळ, त्यांचा धीर यांबद्दल त्यांची प्रशंसा करण्यासाठी पौलाला जसा आनंद झाला तसेच आम्हाला देखील तुमची प्रशंसा करण्यास व तुमच्यावर आमचे किती प्रेम आहे हे सांगण्यास आनंद होत आहे. तुमचे उत्तम कार्य असेच चालू ठेवा!
येणारे वर्ष देवाच्या आशीर्वादांनी समृद्ध होवो अशी सदिच्छा आम्ही बाळगतो.
आपले बांधव,
यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ