क्षेत्र सेवेत असताना दक्षता बाळगणे
१ सेवा कशी करायची याबाबतीत ख्रिस्त येशूने आपल्या शिष्यांना व्यावहारिक व संतुलित सूचना दिल्या. परिस्थिती बदलल्यास त्यांनाही आपल्या पद्धतींत बदल करावे लागतील, हे येशूला माहीत होते. उदाहरणार्थ, आपल्या पहिल्या बारा शिष्यांना क्षेत्र सेवेसाठी पाठवताना त्याने मत्तय १०:९, १० मध्ये असलेल्या सूचना दिल्या. (लूक ९:३) त्यावेळी दिलेला हा सल्ला उचित होता. पण, नंतर मात्र परिस्थिती बदलली. लोक त्यांचे ऐकेनासे झाले. तेव्हा येशूने त्यांना वेगळ्या सूचना दिल्या. या बदललेल्या सूचनांविषयी आपण लूक २२:३५-३७ या वचनांत वाचू शकतो. तसेच आजही आपल्याला सेवेमध्ये परिस्थितीनुसार फेरबदल करावे लागतील.
२ देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे व सार्वकालिक जीवनासाठी योग्य असलेल्यांना शोधून काढणे, हा आपला उद्देश आहे. आपल्या सेवकांच्या आवेशी कार्यावर यहोवाचा आशीर्वाद आहे हे आपल्याला दिसून येते. पण, सर्वच लोकांना आपला हा सद्हेतू समजत नाही किंवा आपला शांतीचा संदेश ते ऐकू इच्छित नाहीत. अर्थात सुवार्तेचा प्रचार व्हावा अशी सैतानाची इच्छा नाही. त्यामुळे आपला विरोध करण्यासाठी तो लोकांना भडकवतो. (१ पेत्र ५:८; प्रकटी. १२:१२, १७) म्हणून आपण क्षेत्र सेवेत व विशेषकरून घरोघरच्या कार्यात दक्षता बाळगली पाहिजे व व्यावहारिक बुद्धीने कार्य केले पाहिजे. (नीति. ३:२१, २२) तुमच्या क्षेत्रात सध्या विरोध होत नसला तरी, आताच दक्षता बाळगून तुम्ही भविष्यात होणाऱ्या समस्या काही प्रमाणात का होईनात, टाळू शकता.—नीति. २२:३.
३ क्षेत्र सेवेच्या सभा: पुस्तक अभ्यासाचे गट ज्याप्रमाणे लहान असतात त्याप्रमाणेच क्षेत्र सेवेचे गट देखील लहान असावेत. एखाद्या बांधवाच्या अथवा भगिनीच्या घरी क्षेत्र सेवेची सभा घेता येऊ शकते. पण या बांधवाचे अथवा भगिनीचे घर, धर्मांध अथवा कट्टर धार्मिक विश्वास बाळगणारे लोक राहात असलेल्या क्षेत्रात असू नये. क्षेत्र सेवेच्या सभा घेण्यासाठी पुरेशी ठिकाणे नसल्यास, या सभा राज्य सभागृहात घेणे उचित ठरेल; कारण, राज्य सभागृहाच्या आजूबाजूच्या लोकांना नाहीतरी, आपल्या येण्याची-जाण्याची सवय झालेली असते. किंवा, ज्या क्षेत्रात प्रचार कार्य करायचे आहे त्या क्षेत्राच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी भेटणे योग्य ठरेल. कोण कोणाबरोबर व कोठे कार्य करेल हे क्षेत्रात जाण्यापूर्वीच ठरवावे, जेणेकरून दोघा-दोघांच्या जोड्या क्षेत्र सेवेत नेमलेल्या ठिकाणी निमूटपणे जाऊ शकतात. प्रचार कार्य होणाऱ्या क्षेत्रात मोठा घोळका करून उभे राहिल्याने, मोठमोठ्याने बोलल्याने, हसल्याने लोकांचे विनाकारण आपल्याकडे लक्ष जाऊ शकते. ज्या बांधवांकडे गाड्या असतील त्यांनी प्रचार कार्य होणाऱ्या क्षेत्राच्या बाहेर कुठेतरी त्या पार्क कराव्यात. यामुळे, गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे आपल्याकडे विनाकारण लक्ष जाणार नाही.
४ आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवा व न्याहाळणी करा: असे पाहण्यात आले आहे, की आपण सेवेत असताना सुरुवातीला केवळ एक जण विरोध करतो मग तो इतरांना जमवतो आणि शेवटी लोकांचा जमाव प्रचारकांवर हल्ला करतो. त्यामुळे अशी परिस्थिती टाळण्याकरता आपण प्रचार कार्यात सावध असले पाहिजे आणि आजूबाजूच्या परिस्थितीवर नजर ठेवली पाहिजे. एक जण घरमालकाबरोबर बोलत असताना दुसरा जण, घरमालकाचे लक्ष विचलित न करता, आजूबाजूच्या लोकांची प्रतिक्रिया काय आहे हे टिपू शकतो. (मत्त. १०:१६) कोणीतरी एखादा आपल्याकडे जास्तच पाहत असेल, कदाचित तो आपल्याकडे पाहतच मोबाईलवर कोणाशी तरी बोलतोय असे दिसताच लगेच संभाषण थांबवून त्या क्षेत्रातून निमूटपणे बाहेर पडणे उचित ठरेल. (नीति. १७:१४) अशावेळी दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात प्रचार कार्य करता येईल, याची आधीच व्यवस्था करावी. अशा प्रकारे पद्धतशीरपणे कार्य करण्यासाठी प्रौढता व बुद्धीची आवश्यकता असल्यामुळे, नवीन प्रचारकांनी अनुभवी प्रचारकांसोबत कार्य करावे.
५ टापटीप पोषाख पण डोळ्यात भरेल असा नाही: क्षेत्रसेवेत आपल्या पोषाखामुळे लोकांचे लक्ष आपल्याकडे विनाकारण जाणार नाही म्हणूनही आपण दक्षता बाळगू शकतो. आपला पोषाख, आपली केशरचना नेहमीच टापटीप, स्वच्छ आणि सभ्य असली पाहिजे. पण, आपल्या समाजातील लोक ज्या प्रकारचा पोषाख घालतात तोच आपणही घातला पाहिजे; हे शास्त्रवचनांनुसार उचित आहे. डोळ्यात भरेल असा पोषाख घालून आपण लोकांचे आपल्याकडे विनाकारण लक्ष आकर्षित करू इच्छित नाही. आपण पाश्चिमात्य लोकांसारखे सुटा-बुटात व टाय लावून क्षेत्र सेवेत गेलो तर लोक कदाचित आपल्या संदेशाबद्दल मनात पूर्वग्रह बाळगतील; हा संदेश इथल्या लोकांसाठी नव्हे तर पाश्चिमात्य लोकांसाठी आहे, असेही म्हणतील. येशू त्याच्या काळातल्या लोकांप्रमाणेच पोषाख घालत असे. त्यामुळेच तर त्याला ओळखण्यासाठी यहुदाला त्याचा मुका घ्यावा लागला. येशूने लोकांच्या डोळ्यात भरेल असा पोषाख घातला नाही. (मत्त. २६:४८; मार्क १४:४४) तेव्हा, आपण प्रत्येकाने या गोष्टीची दखल घ्यावी. जर कोणी बांधव अथवा भगिनी वरील तत्त्वांनुसार किंवा टिपणींनुसार बदल करत असेल तर इतरांनी त्यांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. आपण कोणत्याही बाबतीत सेवेमध्ये इतरांना अडखळण ठरू इच्छित नाही.—२ करिंथ. ६:३.
६ प्रचार कार्य करताना दक्षता बाळगल्यास आपण पुढे उद्भवू शकणाऱ्या समस्या कमी करू शकतो. असे केल्यास, या शेवटल्या काळातही आपण यहोवाची इच्छा पूर्ण करीत राहून त्याची स्तुती व त्याचे गौरव करू शकतो.