अभ्यास लेख ४७
गीत ३८ तो तुला बळ देईल
तुम्ही देवासाठी खूप मौल्यवान आहात!
“तू देवाला खूप प्रिय [मौल्यवान] आहेस.”—दानी. ९:२३, तळटीप.
या लेखात:
कमीपणाची भावना असलेल्यांना यहोवाच्या नजरेत ते मौल्यवान आहेत हे समजून घ्यायला कशी मदत होऊ शकते ते पाहा.
१-२. आपण यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहोत याची आपण स्वतःला खातरी कशी पटवून देऊ शकतो?
यहोवाचे सगळेच सेवक त्याच्यासाठी खूप मौल्यावान आहेत. पण काहींना कमीपणाची भावना सतावते. कदाचित इतर जण त्यांना किंमत देत नसल्यामुळे त्यांना असं वाटत असेल. तुम्हालाही असंच वाटतं का? जर असेल, तर यहोवाच्या नजरेत तुम्ही मौल्यवान आहात याची खातरी तुम्ही कशी ठेवू शकता?
२ आपल्याला कशी वागणूक मिळावी याबद्दल यहोवाला कसं वाटतं हे बायबलमधल्या बऱ्याच अहवालांवरून कळतं. म्हणून असे अहवाल वाचून, त्यांवर मनन करून आपल्याला फायदा होऊ शकतो. येशू नेहमी इतरांशी आदराने वागायचा; कमीपणाची भावना असलेल्यांशीही. असं करून त्याने दाखवलं की ते त्याच्यासाठी आणि यहोवासाठी मौल्यवान आहेत. (योहा. ५:१९; इब्री १:३) या लेखात आपण पाहू: (१) येशूने इतरांना ते मौल्यवान आहेत हे समजून घ्यायला कशी मदत केली? (२) आपण यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहोत याची आपण स्वतःला खातरी कशी पटवून देऊ शकतो?—हाग्ग. २:७.
येशूने इतरांना ते मौल्यवान आहेत हे समजून घ्यायला मदत केली
३. येशू गालीलच्या लोकांशी कसा वागला?
३ गालीलमध्ये प्रचार करताना बरेच लोक येशूकडे त्याचं ऐकायला आणि बरं व्हायला आले. येशूने पाहिलं की “ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे जखमी झालेले आणि भरकटलेले होते.” (मत्त. ९:३६; हिंदी अध्ययन नोट पाहा.) त्यांचे धर्मगुरू त्यांना तुच्छ लेखायचे. इतकंच काय तर ते त्यांना “शापित लोक” म्हणायचे. (योहा. ७:४७-४९) पण येशूने या लोकांना शिकवायला वेळ काढून आणि त्यांना बरं करून ते त्याच्यासाठी मौल्यवान असल्याचं दाखवलं. (मत्त. ९:३५) तसंच, जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा म्हणून त्याने त्याच्या शिष्यांना प्रचाराचं प्रशिक्षण दिलं. शिवाय, त्यांना आजार आणि दुखणी बरी करायचा अधिकारही दिला.—मत्त. १०:५-८.
४. येशू लोकांशी जसं वागला त्यातून आपण काय शिकू शकतो?
४ येशू त्याचं ऐकणाऱ्यांशी दयेने आणि आदराने वागला. असं करून त्याने दाखवलं की सहसा लोक ज्यांना खालच्या नजरेने पाहतात, त्यांनाही तो आणि त्याचा पिता मौल्यवान समजतात. जर तुम्ही यहोवाची उपासना करत असाल, पण तरीही तुमच्यात कमीपणाची भावना असेल, तर येशू लोकांशी कसा वागला याचा विचार करा. असं केल्यामुळे यहोवाच्या नजरेत तुम्ही मौल्यवान आहात या गोष्टीची तुम्हाला खातरी पटेल.
५. गालीलमध्ये येशूला भेटलेल्या स्त्रीची परिस्थिती कशी होती?
५ येशूने लोकांच्या जमावाला तर शिकवलंच, पण वैयक्तिक रित्यासुद्धा लोकांकडे लक्ष दिलं. जसं की, गालीलमध्ये प्रचार करताना १२ वर्षांपासून रक्तस्रावाचा आजार असलेली स्त्री जेव्हा त्याच्याकडे आली, तेव्हा त्याने तिच्याकडे लक्ष दिलं. (मार्क ५:२५) खरंतर नियमशास्त्राप्रमाणे ती अशुद्ध होती. तसंच तिला स्पर्श करणाराही अशुद्ध व्हायचा. शिवाय, तिला लोकांसोबत मिसळून राहता येत नव्हतं. इतकंच काय, तर तिला सणासुदीला किंवा सभास्थानात इतरांसोबत मिळून यहोवाची उपासनाही करता येत नव्हती. (लेवी. १५:१९, २५) खरंच, ती स्त्री फक्त शारीरिक रित्या आजारी नव्हती, तर कोणालाच आपली काळजी नाही किंवा काहीच किंमत नाही असंही कदाचित तिला वाटत असावं.—मार्क ५:२६.
६. रक्तस्रावाचा आजार असलेली स्त्री कशी बरी झाली?
६ येशूने आपल्याला बरं करावं अशी त्या स्त्रीची इच्छा होती. पण तिने स्वतःहून येशूला यासाठी विचारलं नाही. तिने असं का केलं असेल? कदाचित तिच्या परिस्थितीमुळे तिला लाजल्यासारखं किंवा अवघडल्यासारखं वाटलं असेल. किंवा मग नियमशात्राप्रमाणे अशुद्ध असूनही आपण लोकांमध्ये आलो म्हणून येशू आपल्याला रागवेल, असंही तिला वाटलं असेल. त्यामुळे तिने फक्त येशूच्या कपड्यांना हात लावला. तिला विश्वास होता की तिने फक्त असं केलं तरी ती बरी होईल. (मार्क ५:२७, २८) आणि असंच घडलं! ती बरी झाली. मग जेव्हा येशूने विचारलं, की त्याच्या कपड्यांना कोणी स्पर्श केला तेव्हा ती पुढे आली. मग येशू तिच्याशी कसा वागला?
७. येशू रक्तस्रावाचा आजार असलेल्या स्त्रीशी कसं वागला? (मार्क ५:३४)
७ येशू त्या स्त्रीशी दयेने आणि आदराने वागला. कारण त्याने पाहिलं की ती “घाबरत आणि थरथर कापत” होती. (मार्क ५:३३) तिच्या भावना लक्षात घेऊन येशू तिच्याशी प्रेमाने बोलला. तो तिला “मुली” असं म्हणाला. (मार्क ५:३४ वाचा.) येशूने फक्त याच स्त्रीला मुली म्हटल्याचं आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतं. ती स्त्री किती घाबरली आहे हे पाहून कदाचित येशू तिला असं म्हटला असावा. विचार करा, येशूचे शब्द ऐकून तिला खरंच किती बरं वाटलं असेल! जर येशू तिच्याशी प्रेमाने बोलला नसता तर ती बरी तर झाली असती, पण आपण काहीतरी चूक केली आहे असं तिच्या मनात कायम राहिलं असतं. तिच्याशी दयेने बोलून यहोवा तिच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो हे येशूने तिला दाखवून दिलं. यहोवासाठी ती त्याची प्रिय मुलगी होती!
८. मारीयाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं?
८ आजसुद्धा बऱ्याच भाऊबहिणींना आजारपणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे ते निराश होतात आणि आपली काहीच किंमत नाही असं त्यांना वाटतं. ब्राझीलमध्ये पायनियर म्हणून सेवा करणाऱ्या मारीयाचाa विचार करा. जन्मापासूनच तिला दोन्ही पाय आणि डावा हात नाही. ती म्हणते: “शाळेत मुलं माझी सारखी टिंगल करायची आणि मला नावं ठेवायची. त्यामुळे मी खूप खचून जायचे. इतकंच काय, तर माझे घरचेसुद्धा माझ्याशी वाईट वागायचे आणि त्यामुळे मला काहीच किंमत नसल्यासारखं वाटायचं.”
९. आपण यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहोत हे समजून घ्यायला मारीयाला कशामुळे मदत झाली?
९ मारीयाला कशामुळे मदत झाली? जेव्हा ती यहोवाची साक्षीदार बनली, तेव्हा भाऊबहिणींनी तिला सांत्वन दिलं आणि स्वतःकडे यहोवाच्या नजरेने पाहायला मदत केली. ती म्हणते: “मला मदत करणाऱ्या भाऊबहिणींची नावं लिहायचं जर मी ठरवलं, तर पानं कमी पडतील! मला इतकं चांगलं कुटुंब दिल्याबद्दल मी यहोवाची खूप आभारी आहे.” भाऊबहिणींच्या मदतीमुळे मारीयाला समजलं, की ती यहोवासाठी खूप मौल्यवान आहे.
१०. मरीया मग्दालीयाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला? (चित्रंसुद्धा पाहा.)
१० येशूने मरीया मग्दालीयाला कशी मदत केली याचा विचार करा. तिच्यात सात दुष्ट स्वर्गदूत होते. (लूक ८:२) त्यामुळे ती खूप विचित्र वागायची. म्हणून लोक तिच्यापासून दूर राहायचे. खरंच, तिच्या आयुष्याच्या या कठीण काळात तिला किती एकटं पडल्यासारखं, लाचार आणि असुरक्षित वाटलं असेल! येशूने तिच्यातून दुष्ट स्वर्गदूतांना काढल्यानंतर ती त्याची शिष्या बनली. मग यहोवा तिला अनमोल समजतो हे समजून घ्यायला येशूने तिला आणखी कोणत्या मार्गाने मदत केली?
येशूने मरीया मग्दालीयाला ती यहोवाच्या नजरेत मौल्यवान असल्याची खातरी कशी पटवून दिली? (परिच्छेद १०-११ पाहा)
११. मरीया मग्दालीया यहोवासाठी मौल्यवान आहे हे समजून घ्यायला येशूने तिला कशी मदत केली? (चित्रंसुद्धा पाहा.)
११ येशू त्याच्या शिष्यांसोबत गावोगावी प्रचारासाठी गेला, तेव्हा त्याने मरीया मग्दालीयालासुद्धा आपल्यासोबत यायचा बहुमान दिला.b येशूला इतरांना शिकवताना पाहून तिला त्याच्याकडून खूपकाही शिकता आलं असेल. तसंच, येशूचं पुनरुत्थान झालं त्याच दिवशी तो तिला भेटला. खरंतर पुनरुत्थान झाल्यानंतर आपल्या सगळ्या शिष्यांपैकी तो सगळ्यात आधी तिच्याशीच बोलला. इतकंच काय, तर येशूने तिला इतर शिष्यांना त्याच्या पुनरुत्थानाची बातमी सांगायचं कामही दिलं. या सगळ्या गोष्टींवरून कळतं, की ती यहोवासाठी अनमोल होती.—योहा. २०:११-१८.
१२. आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही असं लिडीयाला का वाटायचं?
१२ मरीया मग्दालीयासारखं आज बऱ्याच जणांना वाटतं की आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही. स्पेनमध्ये राहणाऱ्या लिडीयालासुद्धा असंच वाटायचं. लिडीया पोटात असताना तिची आई गर्भपाताचा विचार करत होती. ती लहान असताना तिची आई तिच्याकडे लक्षही द्यायची नाही आणि तिला काहीही वाईटसाईट बोलायची. लिडीया म्हणते: “मला इतरांकडून प्रेमाशिवाय दुसरं काहीही नको होतं. मी खूप वाईट आहे असं माझ्या आईने माझ्या मनावर बिंबवलं होतं. म्हणून मी कोणाच्याही प्रेमाच्या लायक नाही असं मला वाटायचं.”
१३. आपण यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहोत हे समजून घ्यायला लिडीयाला कशी मदत झाली?
१३ बायबलचा अभ्यास सुरू केल्यानंतर लिडीयाच्या जीवनात बऱ्याच गोष्टी बदलल्या. प्रार्थनेमुळे, बायबल वाचल्यामुळे आणि भाऊबहिणींच्या प्रेमळ वागण्या-बोलण्यामुळे आपणही यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहोत याची तिला खातरी पटली. ती म्हणते: “माझ्या नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम आहे हे तो नेहमी मला बोलून दाखवतो. माझ्यात असलेल्या चांगल्या गुणांची तो नेहमी प्रशंसा करतो. भाऊबहीणसुद्धा असंच करतात.” आपण यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहोत हे समजून घेण्याची गरज असलेल्या एखाद्या भावाला किंवा बहिणीला तुम्हीसुद्धा मदत करू शकता का?
स्वतःला यहोवाच्या नजरेतून पाहा
१४. १ शमुवेल १६:७ या वचनामुळे आपल्याला स्वतःकडे यहोवाच्या नजरेतून पाहायला कशी मदत होते? (“यहोवा त्याच्या सेवकांना मौल्यवान का समजतो?” ही चौकटसुद्धा पाहा.)
१४ जग तुमच्याकडे पाहतं तसं यहोवा पाहत नाही हे लक्षात असू द्या. (१ शमुवेल १६:७ वाचा.) जग तुमचं मोल तुम्ही कसे दिसता, तुम्ही गरीब आहात की श्रीमंत, तुमचं शिक्षण किती झालंय या गोष्टींवरून ठरवतं. पण यहोवा तसं करत नाही. (यश. ५५:८, ९) म्हणून जगासारखं नाही, तर यहोवा जसं तुमच्याकडे पाहतो तसं स्वतःकडे पाहण्याचा प्रयत्न करा. एलीया, नामी आणि हन्नालासुद्धा कमीपणाच्या भावनेचा सामना करावा लागला. पण यहोवाने त्यांना दाखवून दिलं, की त्याच्या नजरेत ते मौल्यवान आहेत. बायबलमधले त्यांचे अहवाल वाचल्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तसंच, यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी मौल्यवान आहात हे तुम्हाला कधी न् कधी जाणवलं असेल. असे प्रसंग तुम्ही लिहून ठेवू शकता. यासोबतच, आपल्या प्रकाशनांमध्ये कमीपणाच्या भावनेवर मात करण्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्ही वाचू शकता.c
१५. कोणत्या गोष्टीमुळे दानीएल यहोवासाठी खूप मौल्यवान होता? (दानीएल ९:२३)
१५ तुमच्या विश्वासूपणामुळे तुम्ही यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहात हे लक्षात असू द्या. दानीएल सुमारे ९५-९८ वर्षांचा असताना एकदा खूप निराश झाला होता आणि ‘फार दमून गेला होता.’ (दानी. ९:२०, २१) मग यहोवाने त्याला कसं प्रोत्साहन दिलं? त्याने गब्रीएल स्वर्गदूताला पाठवून त्याला याची आठवण करून दिली की तो ‘देवाला खूप प्रिय [मौल्यवान] आहे’ आणि त्याने त्याच्या प्रार्थना ऐकल्या आहेत. (दानीएल ९:२३ आणि तळटीप वाचा.) कोणत्या गोष्टीमुळे दानीएल यहोवासाठी मौल्यवान होता? दानीएलमध्ये बरेच चांगले गुण होते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो यहोवाच्या नजरेत नीतिमान आणि विश्वासू होता. (यहे. १४:१४) आज आपल्यालाही सांत्वन मिळावं, म्हणून यहोवाने दानीएलचा हा अहवाल बायबलमध्ये लिहून ठेवला आहे. (रोम. १५:४) यहोवा तुमच्याही प्रार्थना ऐकतो. तुम्ही त्याच्या नजरेत योग्य ते करता आणि त्याला विश्वासू राहता म्हणून तो तुम्हाला खूप मौल्यवान समजतो.—मीखा ६:८, तळटिपा; इब्री ६:१०.
१६. यहोवाकडे एक प्रेमळ पिता म्हणून पाहायला तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?
१६ यहोवाकडे एक प्रेमळ पिता म्हणून पाहा. त्याला तुमच्या चुका काढायच्या नाहीत, तर तुम्हाला मदत करायची आहे. (स्तो. १३०:३; मत्त. ७:११; लूक १२:६, ७) या गोष्टीवर मनन केल्यामुळे बऱ्याच लोकांना कमीपणाच्या भावनेवर मात करता आली आहे. स्पेनमध्ये राहणाऱ्या एलीयानाचा विचार करा. तिला तिचा नवरा खूप घालूनपाडून बोलायचा. तिने बरीच वर्षं हा त्रास सहन केला. त्यामुळे आपण काहीच कामाचे नाही आणि आपली काहीच किंमत नाही असं तिला वाटायचं. ती म्हणते: “जेव्हाजेव्हा मला कमीपणाच्या भावनेशी लढावं लागायचं, तेव्हातेव्हा मी अशी कल्पना करायचे की यहोवाने मला प्रेमाने त्याच्या कुशीत घेतलंय. त्यामुळे मला खूप सुरक्षित वाटायचं.” (स्तो. २८:९) दक्षिण आफ्रिकेतली लॉरेन म्हणते: “मी स्वतःला या गोष्टीची आठवण करून देते, की जर यहोवाने मला त्याच्या जवळ आणलंय, इतकी वर्षं त्याच्या जवळ ठेवलंय आणि इतरांना त्याच्याबद्दल शिकवायला माझा वापर केलाय, तर याचा अर्थ मी त्याच्या नजरेत नक्कीच मौल्यवान आहे.”—होशे. ११:४.
१७. यहोवा तुमच्यावर खूश आहे आणि तो तुम्हाला आशिर्वाद देईल याची खातरी ठेवायला तुम्हाला कशामुळे मदत होईल? (स्तोत्र ५:१२) (चित्रसुद्धा पाहा.)
१७ यहोवा तुमच्यावर खूश आहे आणि तो तुम्हाला आशीर्वाद देईल हे लक्षात ठेवा. (स्तोत्र ५:१२ वाचा.) दावीद म्हणाला, की जर आपण यहोवाला खूश केलं तर तो आपल्यासाठी एका ‘मोठ्या ढालीसारखा’ होईल आणि आपलं संरक्षण करेल. यहोवा तुमच्यावर खूश आहे आणि त्याचा तुम्हाला पाठिंबा आहे हे माहीत असल्यामुळे, कमीपणाच्या भावनेवर मात करायला तुम्हाला मदत होईल. मग यहोवा तुमच्यावर खूश आहे याची तुम्हाला खातरी कशी पटेल? आतापर्यंत आपण पाहिलं, की यहोवा आपल्याला त्याच्या वचनातून याची खातरी देतो. त्यासोबतच, तो वडिलांचा, जवळच्या मित्रांचा आणि इतर भाऊबहिणींचा वापर करूनसुद्धा आपण त्याच्या नजरेत मौल्यवान असल्याची आपल्याला खातरी करून देतो. मग जर तुम्हालाही अशा प्रकारे प्रोत्साहन मिळालं तर तुम्ही काय कराल?
यहोवा आपल्यावर खूश आहे हे माहीत असल्यामुळे कमीपणाच्या भावनेवर मात करायला आपल्याला मदत होते (परिच्छेद १७ पाहा)
१८. इतर जण तुमची प्रशंसा करतात तेव्हा तुम्ही त्यावर विश्वास का ठेवला पाहिजे?
१८ तुम्हाला ओळखणारे, तुमच्यावर प्रेम करणारे जेव्हा तुमची प्रशंसा करतात, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका; तर त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. तुम्ही यहोवासाठी मौल्यवान आहात याची तुम्हाला खातरी करून द्यायला यहोवा त्यांचा वापर करत असेल ही गोष्ट लक्षात ठेवा. आधी उल्लेख केलेली एलीयाना म्हणते: “इतर जण माझ्याशी प्रेमाने बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला मी हळूहळू शिकत आहे. हे खरंतर माझ्यासाठी सोपं नाहीए. पण मला माहितीए की मी हेच करावं अशी यहोवाची इच्छा आहे.” वडिलांनी प्रेमळपणे केलेल्या मदतीमुळे एलीयानाला खूप फायदा झाला. आता ती पायनियर म्हणून सेवा करत आहे. तसंच, घरून बेथेलच्या कामातही मदत करत आहे.
१९. आपण यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहोत याची आपण खातरी का ठेवू शकतो?
१९ आपण यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहोत या गोष्टीची येशूने आपल्याला प्रेमळपणे आठवण करून दिली आहे. (लूक १२:२४) म्हणून आपण याची पूर्ण खातरी ठेवू शकतो, की यहोवा आपल्याला मौल्यवान समजतो. तसंच, इतरांनाही यहोवाच्या नजरेत ते मौल्यवान आहेत हे समजायला नेहमी मदत करत राहा!
गीत १३९ नव्या जगी स्वतःला पहा!
a काही नावं बदलण्यात आली आहेत.
b येशू प्रचार करायला गेला तेव्हा त्याच्यासोबत ज्या स्त्रिया होत्या त्यांत मरीया मग्दालीयाही होती. त्या स्त्रिया स्वतःच्या संपत्तीतून येशूची आणि त्याच्या शिष्यांची सेवा करायच्या.—मत्त. २७:५५, ५६; लूक ८:१-३.
c उदाहरणार्थ, यहोवा के करीब आओ या पुस्तकाचा धडा २४ आणि ख्रिस्ती जीवनासाठी उपयोगी शास्त्रवचनं या पुस्तकाच्या “कमीपणाची भावना” या विषयाखालची बायबलची वचनं आणि अहवाल वाचा.