अभ्यासासाठी टीप
संबंधित वचनांच्या सूचीचा फायदा करून घ्या
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतराचं एक वैशिष्ट्य म्हणजे संबंधित वचनांची सूची किंवा मार्जिनल रेफरेन्स. हे बायबल वाचत असताना तुम्हाला काही वचनांपुढे अंक दिसतील. ही अंक तुम्ही छापील आवृत्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला शोधलीत, तर तुम्हाला त्यापुढे संबंधित वचनांची सूची दिसेल. JW लायब्ररी ॲपवर किंवा jw.org वर असलेल्या बायबलमध्ये जर तुम्ही अंकांवर क्लिक केलं, तर तुम्हाला ही सूची दिसेल. या सूचीमधल्या वचनांमुळे बायबलचे वेगवेगळे भाग एकमेकांशी कसे संबंधित आहेत हे कळतं. आणि आपल्याला अमुक एका विषयाबद्दल आणखी माहिती मिळते.
संबंधित वचनांच्या सूचीत खाली दिलेल्या गोष्टींबद्दलची आणि आणखी इतर गोष्टींबद्दलची वचनं असतील:
एकसारखे अहवाल: या वचनांत तुम्हाला बायबलच्या दुसऱ्या पुस्तकातली तीच घटना वाचायला मिळेल. जसं की, २ शमुवेल २४:१ आणि १ इतिहास २१:१ पाहा.
सारखे शब्द: या वचनांतून तुम्हाला अमुक एक वाक्यांश किंवा शब्द कुठून आला हे कळतं. जसं की, मत्तय ४:४ आणि अनुवाद ८:३ पाहा.
पूर्ण झालेली भविष्यवाणी: या वचनांतून भविष्यवाणी किंवा मग तिची पूर्णता कळते. जसं की, मत्तय २१:५ आणि जखऱ्या ९:९ पाहा.