५२ मार्क
“मला त्याची खूप मदत होईल”
मार्कला योहान या नावानेसुद्धा ओळखलं जायचं. त्याने तरुण असताना कमालीचं धैर्य दाखवलं होतं. जेव्हा येशू ख्रिस्ताला अटक करण्यात आली आणि सैनिक त्याला घेऊन जात होते, तेव्हा सगळे प्रेषित पळून गेले. पण बायबल म्हणतं, की एक “तरुण माणूस” धैर्याने त्याच्यामागे चालत राहिला. पण तो लोकांच्या नजरेत आला आणि त्यांनी त्याला पकडायचा प्रयत्न केला. त्या वेळी फक्त त्याचं मलमलीचं वस्त्र त्यांच्या हातात आलं, पण तो त्यांच्या हातून निसटला. तो “उघडाच” किंवा जेमतेम कपड्यांवरच पळाला. या घटनेबद्दल फक्त मार्कच्या शुभवर्तमानातच सांगितलं आहे. त्यामुळे अनेकांचं असं म्हणणं आहे, की तो ‘तरुण माणूस’ दुसरा कोणी नसून स्वतः मार्कच असावा.
मार्क यरुशलेममध्ये आपल्या आईसोबत राहत असावा. असं दिसतं, की ती खूप श्रीमंत होती. कारण येशूच्या मृत्यूनंतर तिच्याच घरात मंडळीच्या सभा भरायच्या. म्हणूनच स्वर्गदूताने जेव्हा मध्यरात्री पेत्रची तुरुंगातून सुटका केली, तेव्हा तो सरळ इथेच आला. त्यामुळे साहजिकच मार्क येशूच्या बऱ्याच प्रेषितांना आणि शिष्यांना भेटला असेल आणि त्यांच्याशी त्याची चांगली ओळख झाली असेल. त्यांच्याकडूनच तो धैर्य दाखवण्याबद्दल बरंच काही शिकला असेल.
इ.स. ४६ च्या आसपास मार्कचा नातेवाईक बर्णबा आणि प्रेषित पौल यरुशलेमला आले, तेव्हा मार्कला यहोवाच्या सेवेत प्रशिक्षण देणं चांगलं ठरेल असं त्यांना वाटलं. त्यामुळे ते अंत्युखियाला परत गेले तेव्हा मार्कलाही सोबत घेऊन गेले. मग जवळजवळ एक वर्षानंतर पौल आणि बर्णबाने त्याला त्यांच्यासोबत मिशनरी दौऱ्यावर यायचं आमंत्रण दिलं. या आवेशी मिशनरी भावांसोबत जाऊन त्यांचा सहायक बनायला आणि नम्रपणे “त्यांची सेवा करायला” मार्क धैर्याने तयार झाला.
त्या काळात प्रवास करणं खूप कठीण आणि धोकादायक असायचं. प्रवास करताना पौलला कोणकोणती संकटं सोसावी लागली त्यांबद्दल त्याने लिहिलं. त्याने म्हटलं, की त्याला ‘नद्यांवरची संकटं, लुटारूंकडून संकटं, शहरातली आणि ओसाड रानातली संकटं आणि समुद्रावरची संकटं’ सोसावी लागली. (२ करिंथ. ११:२६) मार्कला माहीत होतं, की पौल आणि बर्णबा मंडळीच्या कामांमध्ये खूप व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना हवी ती मदत करायला तो तयार असायचा. हे काम करणं त्याला खूप कठीण गेलं का? याबद्दल बायबल काहीही सांगत नाही. पण बायबलमधून आपल्याला इतकं कळतं, की जेव्हा पौल आणि बर्णबा पंफुल्या इथे पोहोचले तेव्हा मार्क त्यांना सोडून यरुशलेमला घरी निघून गेला. त्यामुळे त्या दोन भावांना आणि खासकरून पौलला नक्कीच खूप वाईट वाटलं असेल.
पहिला मिशनरी दौरा पूर्ण केल्यानंतर पौल आणि बर्णबा आता दुसऱ्या दौऱ्याची तयारी करू लागले. या वेळीसुद्धा बर्णबाला मार्कला सोबत घ्यायचं होतं. पण पौल या गोष्टीच्या विरोधात होता. याआधी मार्क त्यांना मध्येच सोडून गेला होता. त्यामुळे तो भरवशालायक नाही असं पौलला वाटलं असेल. यावरून पौल आणि बर्णबामध्ये मोठा वाद झाला आणि त्यांच्यामध्ये “कडाक्याचं भांडण झालं.” मग बर्णबा मार्कला घेऊन कुप्रला गेला आणि तिथे ते प्रचाराचं काम करत राहिले, तर पौलने सीलाला सोबत घेतलं आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रचार करत राहिले.
यामुळे मार्कला खरंच खूप वाईट वाटलं असेल. शेवटी, तो ज्याचा मनापासून आदर करत होता त्या पौलचं मन त्याने दुखावलं होतं. आणि त्याच्यामुळे दोन जवळचे मित्र एकमेकांपासून वेगळे झाले होते. पण त्याच वेळी, पौल आपल्याशी चुकीचं वागला असा त्याने विचार केला का? त्याने पौलबद्दल मनात राग धरला का? किंवा तो स्वतःलाच दोष देत राहिला का? मुळीच नाही.
मार्कने सेवेचा एक मोठा बहुमान गमावला. पण तो निराश झाला नाही, तर विश्वासूपणे यहोवाची सेवा करत राहिला
उलट मार्क जमेल त्या मार्गाने आपल्या भाऊबहिणींना मदत करत राहिला. इ.स. ६०-६१ च्या आसपास पौल रोममध्ये नजरकैदेत होता. त्या वेळी त्याने लिहिलेल्या एका पत्रात तो मार्कचा उल्लेख करतो. तेव्हा मार्क त्याच्यासोबतच होता. त्याच्याबद्दल पौलने म्हटलं, की त्याने “मला खूप सांत्वन दिलं आहे.” मग इ.स. ६२ आणि ६४ च्या मध्ये कधीतरी, प्रेषित पेत्रने त्याच्या पत्रात मार्कचा उल्लेख केला. त्या वेळी पेत्र बाबेलमध्ये होता आणि त्याचं खूप वय झालं होतं. असं दिसतं, की त्याला मदत करण्यासाठी आणि धीर देण्यासाठी मार्क खूप लांबचा प्रवास करून त्याच्याकडे बाबेलला गेला होता. यामुळे पेत्रला किती बरं वाटलं असेल! म्हणूनच पेत्रने आपल्या पत्रात मार्कला “माझा मुलगा” असं म्हटलं. येशूसोबत घालवलेल्या काळात पेत्रने बऱ्याच गोष्टी पाहिल्या होत्या, स्वतः अनुभवल्या होत्या. त्यांबद्दल त्याने मार्कला नक्कीच सांगितलं असेल. त्यामुळे देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या शुभवर्तमानात मार्कने पेत्रकडून ऐकलेल्या अनेक बारीकसारीक गोष्टींचा उल्लेख केला. (मार्कने आपलं शुभवर्तमान कदाचित रोममधून लिहिलं असेल.)
बायबलमध्ये शेवटच्या वेळी मार्कचा उल्लेख येतो तो पौलने तीमथ्यला लिहिलेल्या पत्रात. या वेळीसुद्धा पौल तुरुंगातच होता. पत्रात त्याने तीमथ्यला आग्रह केला की त्याने मार्कला सोबत घेऊन यावं. का? “कारण सेवाकार्यात मला त्याची खूप मदत होईल” असं पौलने म्हटलं. तीमथ्य आणि मार्क पौलला भेटायला नक्कीच खूप उत्सुक होते. कारण आपल्या या प्रिय प्रेषिताचा मृत्यू होण्याआधी त्याला भेटायची आणि त्याला धीर द्यायची त्यांची मनापासून इच्छा होती. यहोवाची सेवा करताना मार्कला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. पण त्याने हार मानली नाही. उलट तो आपल्या भाऊबहिणींना आनंदाने मदत करत राहिला. म्हणूनच हा धाडसी सेवक यहोवासाठी इतका प्रिय होता!
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
मार्कने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. मार्क श्रीमंत कुटुंबातला होता हे कशावरून म्हणता येईल? (टेहळणी बुरूज१० ३/१५ ६ ¶६-७ ¶१)
२. मार्कने कोणकोणत्या मार्गांनी बर्णबा आणि पौलची “सेवा” केली असावी? (प्रे. कार्यं १३:५; टेहळणी बुरूज१० ३/१५ ७ ¶५)
३. मार्कने कोणकोणत्या ठिकाणी प्रवास केला? (टेहळणी बुरूज१० ३/१५ ८ ¶६-८) १
चित्र १: मार्कने कदाचित या ठिकाणांना भेट दिली असावी
४. मार्कने त्याच्या शुभवर्तमानात लिहिलेल्या काही गोष्टी कदाचित पेत्रकडून ऐकल्या असतील. याचं एक उदाहरण द्या. (टेहळणी बुरूज०८ २/१ २६ ¶१-wcgr)
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
मार्कला कधीच प्रेषित किंवा संदेष्टा म्हटलेलं नाही. पण त्याने नेहमीच नम्रपणे इतरांची सेवा केली. आज आपणही इतरांची सेवा कशी करू शकतो?
मार्कने काही काळासाठी पौलसोबत सेवा करायचा बहुमान गमावला. पण तरी तो विश्वासूपणे यहोवाची सेवा करत राहिला. आज आपल्याला सेवेचा एखादा बहुमान गमवावा लागला तर मार्ककडून आपण काय शिकू शकतो? २
चित्र २
मार्कसारखंच तुम्हीही तुमच्या जीवनात धैर्य कसं दाखवू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
मार्कला येशूसोबत स्वर्गात राज्य करायला निवडलंय याचा विचार करून तुम्हाला कसं वाटतं, आणि का?
आणखी शिका
मार्कचं शुभवर्तमान इतकं खास का आहे?
काहीही झालं तरी आपण हार मानू नये ही गोष्ट आपल्या मुलांना मार्कच्या उदाहरणातून शिकवा.