अभ्यास लेख ३७
गीत ११८ दे विश्वासाचं दान
शेवटपर्यंत विश्वासूपणे धीर धरायला मदत करणारं पत्र
“जो विश्वास आपल्यामध्ये सुरुवातीला होता, तो . . . आपण शेवटपर्यंत टिकवून” ठेवतो.—इब्री ३:१४.
या लेखात:
इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रातून व्यावहारिक धडे शिकून घेतल्यामुळे या जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत विश्वासाने धीर धरायला आपल्याला कशी मदत होईल हे पाहा.
१-२. (क) जेव्हा प्रेषित पौलने इब्री लोकांना पत्र लिहिलं तेव्हा यहूदीयामध्ये परिस्थिती कशी होती? (ख) देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं हे पत्र योग्य वेळेला मिळालं होतं असं का म्हणता येईल?
यरुशलेममध्ये आणि यहूदीयामध्ये राहणाऱ्या ख्रिश्चनांना येशूच्या मृत्यूनंतर कठीण काळाचा सामना करावा लागला. ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाल्यानंतर लगेचच त्यांना भयंकर छळाचा सामना करावा लागला. (प्रे. कार्यं ८:१) मग जवळपास २० वर्षांनी कदाचित देशात पडलेल्या दुष्काळामुळे ख्रिस्ताच्या अनुयायांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. (प्रे. कार्यं ११:२७-३०) पण जवळपास इ.स. ६१ मध्ये ख्रिश्चनांना भविष्यात येणाऱ्या काळाच्या तुलनेत काही प्रमाणात शांतीचा काळ अनुभवायला मिळाला. याच काळात त्यांना देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं एक पत्र प्रेषित पौलकडून मिळालं. आणि हे पत्र त्या वेळेसाठी अगदी योग्य होतं.
२ कारण ते ज्या शांतीचा अनुभव घेत होते ती जास्त काळ राहणार नव्हती. पौलने दिलेल्या व्यावहारिक सल्ल्यामुळे त्यांना लवकरच येणाऱ्या संकटाचा धीराने सामना करायला मदत होणार होती. कारण येशूने आधीच सांगितल्याप्रमाणे यहुदी व्यवस्थेचा विनाश लवकरच होणार होता. (लूक २१:२०) हा विनाश नेमका कधी होईल हे पौलला किंवा यहूदीयामधल्या ख्रिश्चनांना माहीत नव्हतं. असं असलं तरी, त्या काळचे ख्रिस्ती विश्वास आणि धीर यांसारखे गुण वाढवून स्वतःची तयारी करायला उरलेल्या वेळेचा चांगला उपयोग करू शकत होते.—इब्री १०:२५; १२:१, २.
३. इब्री लोकांना या पुस्तकावर आज आपण खास लक्ष देणं का गरजेचं आहे?
३ इब्री ख्रिश्चनांना जे संकट सोसावं लागलं त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठ्या संकटाचा आपल्याला सामना करावा लागणार आहे. (मत्त. २४:२१; प्रकटी. १६:१४, १६) म्हणून यहोवाने त्या काळातल्या ख्रिश्चनांना जे व्यावहारिक सल्ले दिले होते, त्यांपैकी काहींवर आता आपण चर्चा करू या. यामुळे आपल्यालाही फायदा होईल.
“प्रौढतेपर्यंत पोहोचण्यासाठी खटपट” करा
४. यहुदी ख्रिश्चनांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला? (चित्रसुद्धा पाहा.)
४ यहुदी ख्रिश्चनांना बरेच मोठमोठे बदल करावे लागणार होते. आणि हे त्यांच्यासाठी काही सोपं नव्हतं. एके काळी यहुदी लोक यहोवाचे निवडलेले लोक होते. यरुशलेममधून राज्य करणारे राजे यहोवाचं प्रतिनिधित्व करायचे. आणि यरुशलेममधलं मंदिर शुद्ध उपासनेचं केंद्रसुद्धा होतं. तसंच सगळे विश्वासू यहुदी त्यांच्या धार्मिक पुढाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मोशेचं नियमशास्त्र पाळत होते. त्यामध्ये खाण्यापिण्याबद्दल, सुंतेबद्दल आणि यहुदी नसलेल्या लोकांशी कसं वागायचं याबद्दल नियम होते. पण येशूच्या मृत्यूनंतर यहोवाने यहुदी लोकांची बलिदानं स्वीकारायचं बंद केलं होतं. यामुळे जे यहुदी ख्रिश्चन वर्षानुवर्षं सवयीप्रमाणे नियमशास्त्र पाळत होते, त्यांच्यासाठी हे एक आव्हान होतं. (इब्री १०:१, ४, १०) इतकंच काय तर प्रेषित पेत्रसारख्या प्रौढ ख्रिश्चनांनासुद्धा यांसारख्या काही बदलांशी जुळवून घ्यायला कठीण गेलं. (प्रे. कार्यं १०:९-१४; गलती. २:११-१४) शिवाय या नवीन विश्वासांमुळे यहुदी धर्मगुरूसुद्धा त्यांचा छळ करू लागले.
ख्रिश्चनांसाठी यहुदी धार्मिक विरोधकांच्या खोट्या शिकवणींपासून दूर राहून सत्याला जडून राहणं गरजेचं होतं (परिच्छेद ४-५ पाहा)
५. कोणत्या गोष्टीमुळे यहुदी ख्रिश्चनांना सावध राहायची गरज होती?
५ इब्री ख्रिश्चनांना दोन गटांकडून भरपूर विरोधाचा सामना करावा लागला. एक गट यहुदी धार्मिक पुढाऱ्यांचा होता. ते त्यांना धर्मत्यागी लोकांसारखं वागवत होते. यासोबतच मंडळीत असे काही लोक होते जे ख्रिश्चनांनी नियमशास्त्र पाळत राहिलं पाहिजे या मतावर ठाम होते. कारण कदाचित त्यांना छळ नको होता. (गलती. ६:१२) मग विश्वासू ख्रिश्चनांना सत्याला धरून राहायला कोणत्या गोष्टीमुळे मदत होणार होती?
६. पौलने भाऊबहिणींना काय करायचं प्रोत्साहन दिलं? (इब्री लोकांना ५:१४–६:१)
६ इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात पौलने भाऊबहिणींना देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास करायचं प्रोत्साहन दिलं. (इब्री लोकांना ५:१४–६:१ वाचा.) हिब्रू शास्त्रवचनांचा वापर करून, पौलने त्यांच्याशी तर्क केला आणि त्यांना पटवून दिलं की यहुदी धर्मापेक्षा ख्रिस्ती उपासनेची पद्धत श्रेष्ठ आहे.a पौलला माहीत होतं की सत्याचं ज्ञान वाढवल्यामुळे आणि सखोल समज मिळवल्यामुळे ख्रिश्चनांना चुकीचे विचार ओळखून त्यांपासून दूर राहता येईल आणि त्यामुळे ते सत्यापासून भरकटणार नव्हते.
७. आज आपल्याला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो?
७ इब्री ख्रिश्चनांप्रमाणेच आज आपल्यालाही अशा लोकांचा सामना करावा लागतो जे यहोवाच्या नैतिक स्तरांविरुद्ध असलेली माहिती आणि विचार पसरवतात. विरोधक आपल्यावर सहसा असा आरोप लावतात, की बायबलमधल्या नैतिक तत्त्वांचं पालन करून आपण खूप टोकाची भूमिका घेतो. आणि आपण खूप क्रूर आहोत असाही ते आरोप लावतात. या जगाची वृत्ती आणि विचार देवाच्या परिपूर्ण दृष्टिकोनापासून खूप दूर गेलेले आहेत. (नीति. १७:१५) त्यामुळे आपण निराश करणाऱ्या किंवा आपली दिशाभूल करणाऱ्या विचारांना ओळखून त्यापासून दूर राहण्याची आपली क्षमता वाढवली पाहिजे.—इब्री १३:९.
८. आपण प्रौढतेपर्यंत पोहोचण्यासाठी खटपट कशी करू शकतो?
८ पौलने इब्री ख्रिश्चनांना प्रौढतेपर्यंत पोहोचण्यासाठी खटपट करत राहण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला आपणही पाळला पाहिजे. म्हणजेच आपण सत्याचं सखोल ज्ञान घेत राहिलं पाहिजे आणि यहोवा जसा विचार करतो, तसा विचार करायला शिकलं पाहिजे. शिवाय हे आपण समर्पण आणि बाप्तिस्मा झाल्यानंतरही करत राहिलं पाहिजे. सत्यात आपल्याला कितीही वर्षं झालेली असली, तरी आपण सगळ्यांनीच देवाच्या वचनाचं नियमित वाचन आणि अभ्यास केला पाहिजे. (स्तो. १:२) नियमितपणे वैयक्तिक अभ्यास केल्यामुळे पौलने इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात ज्या गुणावर भर दिला, तो गुण आपल्याला वाढवता येईल. आणि तो गुण म्हणजे: विश्वास.—इब्री ११:१, ६.
‘आपलं जीवन वाचेल असा विश्वास बाळगा’
९. इब्री ख्रिश्चनांना मजबूत विश्वासाची गरज का होती?
९ इब्री ख्रिश्चनांना यहूदीयामध्ये लवकरच येणाऱ्या संकटातून वाचण्यासाठी मजबूत विश्वासाची गरज होती. (इब्री १०:३७-३९) येशूने त्याच्या अनुयायांना असं म्हणून सावध केलं होतं, की जेव्हा सैन्याने यरुशलेमला वेढा घातलेला पाहतील, तेव्हा त्यांनी तिथून डोंगरांकडे पळून जावं. येशूचा हा सल्ला सगळ्याच ख्रिश्चनांना लागू झाला. मग ते शहरात राहत असोत किंवा शहराबाहेर. (लूक २१:२०-२४) त्या काळी जेव्हा सैन्य एखाद्या शहराला वेढा घालायचं, तेव्हा संरक्षणासाठी लोक यरुशलेमसारख्या तटबंदी असलेल्या शहरात पळून जायचे. त्यामुळे डोंगरांकडे पळून जायचा हा सल्ला तर्काला पटण्यासारखा वाटत नव्हता आणि त्यामुळे तो पाळण्यासाठी मजबूत विश्वासाची गरज होती.
१०. मजबूत विश्वास असल्यामुळे इब्री ख्रिश्चनांना काय करायला सोपं जाणार होतं? (इब्री लोकांना १३:१७)
१० येशू ज्यांचा वापर करून मंडळीचं मार्गदर्शन करत होता, त्यांच्यावर इब्री ख्रिश्चनांनी भरवसा ठेवणं गरजेचं होतं. कारण पुढाकार घेणारे कदाचित काही विशिष्ट सूचना देणार होते. आणि त्यामुळे येशूने दिलेलं मार्गदर्शन अगदी योग्य वेळी आणि पद्धतशीर रितीने पाळायला मंडळीला मदत होणार होती. (इब्री लोकांना १३:१७ वाचा.) प्रेषित पौलने “जे नेतृत्व करत आहेत त्यांच्या आज्ञा पाळा” असं भाऊबहिणींना सांगितलं. पण मंडळीत वडिलांना मार्गदर्शन करायचा अधिकार असल्यामुळे नाही, तर त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे तो असं करायला सांगत होता. म्हणून इब्री ख्रिश्चनांना संकट येण्याआधी, पुढाकार घेणाऱ्या भावांवर आपला भरवसा वाढवणं गरजेचं होतं. जर शांतीच्या काळात त्यांनी त्यांच्या सूचना पाळल्या, तर संकटाच्या काळातही त्यांना तसं करणं आणखी सोपं जाणार होतं.
११. आज आपल्याला मजबूत विश्वासाची गरज का आहे?
११ इब्री ख्रिश्चनांप्रमाणे आज आपल्यालाही विश्वासाची गरज आहे. कारण आपण आज अशा काळात जगत आहोत, जिथे बरेच लोक जगाच्या नाशाबद्दल असलेला बायबलचा इशारा नाकारतात, इतकंच नाही तर त्याची थट्टा करतात. (२ पेत्र ३:३, ४) यासोबतच, बायबल मोठ्या संकटाच्या वेळी काय होणार आहे याबद्दल माहिती देत असलं, तरी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला अजूनही माहीत नाहीत. म्हणून आपल्याला असा मजबूत विश्वास असणं गरजेचं आहे, की जगाच्या व्यवस्थेचा अंत योग्य वेळी येईल आणि त्या वेळी यहोवा आपली काळजी घेईल.—हब. २:३.
१२. मोठ्या संकटातून वाचण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होईल?
१२ यहोवा आज ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाचा’ वापर करून आपलं मार्गदर्शन करतोय. म्हणून इब्री ख्रिश्चनांप्रमाणे आपल्यालाही त्याच्यावर आपला भरवसा मजबूत करण्याची गरज आहे. (मत्त. २४:४५) रोमी सैनिक आले तेव्हा इब्री ख्रिश्चनांना काही विशिष्ट सूचना मिळाल्या असाव्यात. त्याचप्रमाणे आपल्यालाही मोठं संकट सुरू होईल, तेव्हा कदाचित जीवन वाचवणाऱ्या काही विशिष्ट सूचना मिळतील. म्हणून यहोवाच्या संघटनेत पुढाकार घेणाऱ्या बांधवांकडून आपल्याला जे मार्गदर्शन मिळतंय, त्यावर भरवसा ठेवायची आणि आपला विश्वास वाढवायची हीच वेळ आहे. आपण आत्ता जर पुढाकार घेणाऱ्यांच्या आज्ञेत राहिलो नाही, तर मोठ्या संकटाच्या वेळी त्यांनी दिलेलं मार्गदर्शन आपल्याला आत्मविश्वासाने पाळता येईल अशी अपेक्षा आपण करू शकणार नाही.
१३. इब्री लोकांना १३:५ मध्ये दिलेला सल्ला योग्य का होता?
१३ पळून जाण्याच्या सूचनेची वाट पाहण्यासोबतच इब्री ख्रिश्चनांना “पैशाच्या लोभापासून” दूर राहून आपलं जीवनसुद्धा साधं ठेवायचं होतं. (इब्री लोकांना १३:५ वाचा.) त्यांच्यापैकी काही जणांना दुष्काळाचा आणि गरिबीचा सामना करावा लागला होता. (इब्री १०:३२-३४) एकेकाळी ते आनंदाच्या संदेशासाठी संकट सोसायला तयार असले, तरी त्यांच्यापैकी काही जण संरक्षणासाठी पैसा महत्त्वाचा आहे असा विचार करू लागले असतील. पण येणाऱ्या नाशापासून पैसा त्यांना वाचवू शकणार नव्हता. (याको. ५:३) खरंतर, ज्यांचं भौतिक गोष्टींवर प्रेम होतं, त्यांना तिथून पळून जायला, आपली घरं-दारं आणि धनसंपत्ती मागे सोडून जायला आणखीन कठीण जाणार होतं.
१४. आपल्या मजबूत विश्वासाचा आज आपण भौतिक गोष्टींच्या बाबतीत जे निर्णय घेतो त्यावर कसा परिणाम होऊ शकतो?
१४ या दुष्ट जगाचा नाश लवकरच होणार आहे असा जर आपला मजबूत विश्वास असेल, तर भौतिक गोष्टींपासून दूर राहायला आपण प्रवृत्त होऊ. मोठ्या संकटाच्या वेळी पैशाला काहीच किंमत राहणार नाही. बायबल सांगतं, की लोक “आपली चांदी रस्त्यावर फेकून देतील.” कारण त्यांच्या लक्षात येईल, की “यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचं सोनं-चांदी त्यांना वाचवू शकणार नाही.” (यहे. ७:१९) जास्तीत जास्त पैसा गोळा करण्यावर लक्ष लावण्याऐवजी आपण असे निर्णय घेतले पाहिजेत ज्यामुळे आपल्याला साधंच पण संतुलित जीवन जगता येईल. तसंच आपण गरज नसताना कर्ज घेण्याच्या मोहात पडणार नाही किंवा बऱ्याच भौतिक गोष्टींची काळजी घेण्याच्या मागे आपला वेळ खर्च करणार नाही. शिवाय, आपण ही काळजी घेऊ की आपल्याकडे असलेल्या भौतिक गोष्टींना आपण आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देणार नाही. (मत्त. ६:१९, २४) कारण या जगाच्या व्यवस्थेच्या नाशाची वाट पाहत असताना भौतिक गोष्टींच्या आणि इतर गोष्टींच्या बाबतीत आपल्या विश्वासाची परीक्षा होऊ शकते.
“तुम्हाला धीराची गरज आहे”
१५. इब्री ख्रिश्चनांना खासकरून धीराची गरज का होती?
१५ यहूदीयामध्ये परिस्थिती बिघडल्यामुळे इब्री ख्रिश्चनांच्या विश्वासाची परीक्षा होणार होती. (इब्री १०:३६) त्यांच्यापैकी काही जणांनी तीव्र छळाचा सामना केला असला, तरी बऱ्याच जणांनी छळाचा सामना केला नव्हता. शिवाय पौलने सांगितलं की ज्यांनी छळाचा सामना केला होता, त्यांनी येशूसारखा मृत्यूपर्यंत छळाचा सामना केला नव्हता. (इब्री १२:४) पण ख्रिस्ती धर्माचा जसजसा प्रसार होत गेला, तसतसं यहुदी विरोधक आणखीन कट्टर आणि क्रूर होत गेले. त्याच्या काही वर्षांआधी यरुशलेममध्ये पौल दिसल्यामुळे तिथे दंगल उसळली होती. ४० पेक्षा जास्त यहुद्यांनी अशी शपथ घेतली होती, की ‘जोपर्यंत ते पौलला ठार मारत नाहीत, तोपर्यंत ते काहीही खाणार-पिणार नाहीत.’ (प्रे. कार्यं २२:२२; २३:१२-१४) या इब्री खिश्चनांचा असा द्वेष आणि विरोध केला जात असला तरी त्यांना उपासनेसाठी एकत्र यावं लागणार होतं, आनंदाच्या संदेशाचा प्रचार करावा लागणार होता आणि स्वतःला विश्वासात मजबूत ठेवावं लागणार होतं.
१६. इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रामुळे आपल्याला छळाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला कशी मदत होऊ शकते? (इब्री लोकांना १२:७)
१६ कोणत्या गोष्टीमुळे इब्री ख्रिश्चनांना विरोधाचा सामना करायला मदत होणार होती? पौलला माहीत होतं, की त्यांनी परीक्षांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. त्याने त्यांना समजावलं की प्रशिक्षणाचा भाग म्हणून देव एका ख्रिस्ती व्यक्तीवर विश्वासाची परीक्षा येऊ देतो. (इब्री लोकांना १२:७ वाचा.) अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे महत्त्वाचे ख्रिस्ती गुण विकसित करायला आणि स्वतःमध्ये सुधारणा करायला त्याला मदत होऊ शकते. या परिणामांवर लक्ष लावल्यामुळे त्या काळातल्या इब्री ख्रिश्चनांना परीक्षांचा सामना करणं सोपं जाणार होतं.—इब्री १२:११.
१७. छळाचा सामना करण्याच्या बाबतीत पौलला काय शिकायला मिळालं?
१७ पौलने इब्री ख्रिश्चनांना सांगितलं की त्यांनी ठाम निश्चयाने येणाऱ्या परीक्षांना तोंड दिलं पाहिजे. आणि हे सगळं तो यासाठी म्हणू शकला, कारण आधी त्यानेही ख्रिश्चनांचा छळ केला होता. आणि त्याला माहीत होतं की विरोधकांचा छळ करण्यामागे काय हेतू असतो. तसंच छळाचा सामना कसा करायचा हेसुद्धा त्याला माहीत होतं. कारण ख्रिस्ती बनल्यानंतर त्यालाही वेगवेगळ्या प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. (२ करिंथ. ११:२३-२५) त्यामुळे धीर धरण्यासाठी कशाची गरज आहे, हे पौलला चांगलं माहीत होतं. त्याने ख्रिश्चनांना याची आठवण करून दिली की परीक्षांचा सामना करताना त्यांनी स्वतःवर नाही, तर यहोवावर अवलंबून राहणं गरजेचं आहे. यामुळे पौल म्हणू शकला: “यहोवा मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही.”—इब्री १३:६.
१८. भविष्याबद्दल काय माहीत असल्यामुळे आपल्याला परीक्षांचा सामना करायला मदत होऊ शकते?
१८ आपल्या काही भाऊबहिणींना आजही छळाचा सामना करावा लागतोय. अशा वेळी, त्यांना प्रेम आणि आधार द्यायचा एक मार्ग म्हणजे आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो आणि कधीकधी त्यांच्या गरजेच्या गोष्टी पुरवून त्यांना मदत करू शकतो. (इब्री १०:३३) पण बायबल स्पष्टपणे सांगतं की, “ख्रिस्त येशूमध्ये देवाची भक्ती करत जीवन जगू इच्छिणाऱ्या सगळ्यांचा छळ केला जाईल.” (२ तीम. ३:१२) या कारणासाठी आपण सगळ्यांनीच पुढे येणाऱ्या गोष्टींसाठी तयार असलं पाहिजे. म्हणून आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवू या आणि पुढे कुठलीही परीक्षा आली तरी तिचा सामना करायला तो आपल्याला मदत करेल अशी खातरी बाळगू या. काही काळाने, तो सर्व विश्वासू उपासकांची या सगळ्यातून सुटका करेल.—२ थेस्सलनी. १:७, ८.
१९. कोणती व्यावहारिक पावलं उचलल्यामुळे आपल्याला मोठ्या संकटासाठी तयार राहायला मदत होईल? (चित्रसुद्धा पाहा.)
१९ इब्री लोकांना लिहिलेल्या पौलच्या या पत्रामुळे पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना पुढे येणाऱ्या संकटांसाठी तयार राहायला नक्कीच मदत झाली. या पत्रात पौलने भाऊबहिणींना सांगितलं की त्यांनी शास्त्रवचनांचं सखोल ज्ञान आणि समज वाढवणं गरजेचं आहे. असं केल्यामुळे त्यांचा विश्वास कमजोर करणाऱ्या शिकवणी त्यांना ओळखता येणार होत्या आणि त्यांपासून दूर राहता येणार होतं. तसंच त्याने त्यांना त्यांचा विश्वास मजबूत करायचं प्रोत्साहनही दिलं. असं केल्यामुळे त्यांना येशूचं आणि मंडळीत पुढाकार घेणाऱ्या बांधवांचं मार्गदर्शन लगेच पाळायला मदत होणार होती. तसंच त्याने ख्रिश्चनांना परीक्षांकडे योग्य दृष्टिकोनातून बघून आपला धीर वाढवायला मदत केली. अशा प्रकारे येणाऱ्या परीक्षा आपल्या प्रेमळ पित्याकडून मिळणारं प्रशिक्षणच आहे, असा दृष्टिकोन ते ठेवू शकणार होते. आपणसुद्धा देवाच्या प्रेरणेने दिलेला हा सल्ला पाळू या, म्हणजे मग शेवटपर्यंत आपल्याला विश्वासूपणे धीर धरता येईल.—इब्री ३:१४.
विश्वासू ख्रिश्चनांना धीर दाखवल्यामुळे आशीर्वाद मिळाला. यहूदीयातून पळून गेल्यावर ते उपासनेसाठी एकत्र येत राहिले. यावरून आपण काय शिकतो? (परिच्छेद १९ पाहा)
गीत १२६ जागे राहा, सावध व बलशाली व्हा!
a पहिल्याच अध्यायात, पौल हिब्रू शास्त्रवचनांमधल्या जवळपास सात उताऱ्यांचा वापर करून हे सिद्ध करतो, की यहुदी उपासनेच्या पद्धतीपेक्षा ख्रिस्ती पद्धत श्रेष्ठ आहे.—इब्री १:५-१३.