वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w24 एप्रिल पृ. २-७
  • प्रौढ ख्रिस्ती बनण्यासाठी प्रयत्न करत राहा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रौढ ख्रिस्ती बनण्यासाठी प्रयत्न करत राहा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आध्यात्मिक रित्या प्रौढ होणं म्हणजे काय?
  • आपण आध्यात्मिक रितीने प्रौढ कसे होऊ शकतो?
  • बायबलची गहन सत्यं समजून घेतल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?
  • आपल्याला प्रगती करत राहायची गरज का आहे?
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • शेवटपर्यंत विश्‍वासूपणे धीर धरायला मदत करणारं पत्र
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • ख्रिस्तासारखी प्रौढता प्राप्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ विभागीय पर्यवेक्षकांसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
w24 एप्रिल पृ. २-७

अभ्यास लेख १४

गीत ५६ सत्याच्या मार्गावर चालत राहा!

प्रौढ ख्रिस्ती बनण्यासाठी प्रयत्न करत राहा!

“प्रौढतेपर्यंत पोहोचण्यासाठी खटपट करू या.”​—इब्री ६:१.

या लेखात:

एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती देवाच्या इच्छेप्रमाणे कसा विचार करते आणि कसं वागते आणि मग योग्य निर्णय कसे घेते ते पाहा.

१. यहोवा आपल्याकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा करतो?

बाळाचा जन्म हा आईवडिलांसाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो. त्यांना त्यांच्या नवीन जन्मलेल्या बाळाचं खूप कौतुक असतं. पण त्यांच्या बाळाने नेहमी बाळच राहावं असं त्यांना वाटत नाही. उलट, जर त्यांच्या बाळाची वाढ होत नाही असं त्यांना समजलं तर त्यांना खूप चिंता वाटेल. त्याच प्रकारे येशूचे अनुयायी म्हणून आपण पहिली पावलं उचलतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. पण आपण आध्यात्मिक रित्या बाळांसारखंच असावं असं त्याला वाटत नाही. (१ करिंथ. ३:१) उलट आपण देवाच्या गोष्टी समजण्याच्या बाबतीत “प्रौढांसारखं व्हावं” असं त्याला वाटतं.​—१ करिंथ. १४:२०.

२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

२ या लेखात, आपण पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं पाहणार आहोत: आध्यात्मिक रित्या प्रौढ असण्याचा काय अर्थ होतो? त्यासाठी आपण काय करू शकतो? बायबलमधल्या गहन सत्यांचा अभ्यास केल्यामुळे आध्यात्मिक रित्या आपण कसं मजबूत होतो? आणि आपण आध्यात्मिक रित्या प्रौढ आहोत आणि आपल्याला आणखी प्रगती करायची गरज नाही असा विचार आपण का करू नये?

आध्यात्मिक रित्या प्रौढ होणं म्हणजे काय?

३. एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती बनणं म्हणजे काय?

३ बायबलमधल्या ज्या ग्रीक शब्दाचं भाषांतर “प्रौढ” असं करण्यात आलंय, त्याचा अर्थ “पूर्ण वाढ झालेला” आणि “पूर्ण” असा होतो.a (१ करिंथ. २:६) त्यामुळे असं म्हणता येईल की जसं एक लहान मूल वाढत जातं आणि एक प्रौढ व्यक्‍ती बनतं त्याच प्रकारे आपणही यहोवासोबतच्या आपल्या नात्यात वाढत गेलं पाहिजे. म्हणजे त्याच्यासोबतचं आपलं नातं मजबूत केलं पाहिजे आणि पुढे जाऊन आपण एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती बनलं पाहिजे. तसंच, हे ध्येय गाठल्यावर आपण प्रगती करायचं थांबवलं नाही पाहिजे. (१ तीम. ४:१५) आपल्यापैकी सगळेच, म्हणजे जे वयाने तरुण आहेत तेसुद्धा आध्यात्मिक रित्या प्रौढ होऊ शकतात. पण एखादी व्यक्‍ती आध्यात्मिक रित्या प्रौढ आहे हे कशावरून समजतं?

४. एक प्रौढ ख्रिस्ती कसा असतो?

४ एक प्रौढ ख्रिस्ती देवाच्या फक्‍त ठरावीक अपेक्षांप्रमाणे नाही, तर सगळ्याच अपेक्षांप्रमाणे जगायचा प्रयत्न करतो. हे खरंय, की असं करत असताना अपरिपूर्णतेमुळे त्याच्याकडून काही चुका होतील. पण असं असलं तरी तो त्याच्या रोजच्या जीवनातून हे दाखवून देतो की त्याचे विचार आणि त्याचं वागणं यहोवाच्या इच्छेनुसार आहे. त्याने नवीन व्यक्‍तिमत्त्व धारण केलेलं असतं आणि तो देवासारखा विचार करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. (इफिस. ४:२२-२४) त्याने यहोवाच्या नियमांवर आणि तत्त्वांवर आधारित असलेले योग्य निर्णय घेण्यासाठी स्वतःला प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यामुळे आपलं वागणं कसं असलं पाहिजे यासाठी त्याला नियमांची मोठी यादी बनवावी लागत नाही. जेव्हा तो एखादा निर्णय घेतो, तेव्हा त्यानुसार करण्याची त्याने स्वतःला शिस्त लावलेली असते.​—१ करिंथ. ९:२६, २७.

५. आध्यात्मिक रितीने लहान मुलांसारख्या असलेल्या व्यक्‍तीला कोणत्या धोक्यांचा सामना करावा लागू शकतो? (इफिसकर ४:१४, १५)

५ दुसरीकडे जो आध्यात्मिक रितीने लहान मुलांसारखाच असतो तो “धूर्त” आणि ‘चलाख माणसांकडून फसवला जाऊ’ शकतो. आणि चुकीच्या बातम्या, अफवा आणि मिडियाद्वारे खोट्याच पण खऱ्‍या असल्याचं भासवल्या जाणाऱ्‍या बातम्यांना, तसंच धर्मत्यागी लोकांनाही तो बळी पडू शकतो.b (इफिसकर ४:१४, १५ वाचा.) तसंच, इतरांबद्दल हेवा वाटणं, वाद घालणं किंवा इतरांच्या वागण्या-बोलण्यामुळे लगेच वाईट वाटून घेणं अशा गोष्टी त्याच्याकडून होऊ शकतात. तसंच, मोह आला की त्याच्याकडून एखादी चुकीची गोष्टही होऊ शकते.​—१ करिंथ. ३:३.

६. आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्याची तुलना आपण एका लहान मुलाच्या वाढीशी का करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

६ आधी चर्चा केल्याप्रमाणे बायबलमध्ये आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्याची तुलना एका लहान मुलाच्या वाढीशी करण्यात आली आहे. लहान मुलाला जास्त समज नसते. त्यामुळे त्याला मोठ्या माणसाच्या संरक्षणाची आणि देखरेखीची गरज असते. उदाहरणार्थ, एक आई तिच्या लहान मुलीला रस्ता ओलांडताना तिचा हात धरायला सांगेल. आणि जेव्हा ती मुलगी थोडी मोठी होईल, तेव्हा आई त्या मुलीला स्वतःहून रस्ता ओलांडायला सांगेल. पण तेव्हासुद्धा ती त्या मुलीला रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला बघायची आठवण करून देईल. आणि जेव्हा ती मुलगी आणखी मोठी होईल, तेव्हा ती स्वतःच ते धोके टाळेल. जसं लहान मुलांना असे धोके टाळण्यासाठी मोठ्या व्यक्‍तीची गरज असते. तसंच, आध्यात्मिक रितीने लहान मुलांसारखे असलेल्या लोकांना आध्यात्मिक धोके टाळण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी प्रौढ ख्रिस्ती लोकांच्या मदतीची गरज असते. याउलट जेव्हा एका प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍तीला निर्णय घ्यायची वेळ येते, तेव्हा ती बायबल तत्त्वांच्या आधारावर एखाद्या विषयावर यहोवाचे विचार काय आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करते आणि त्यानुसार निर्णय घेते.

कोलाज: १. एक तरुण बहीण तिच्या आईवडिलांचं ऐकत आहे. तिच्या टॅबवर तिने एक लेख उघडला आहे आणि तिच्या आईवडिलांच्या हातात बायबल उघडलेलं आहे. २. तीच बहीण टॅब, बायबल आणि तिची नोटबूक घेऊन वैयक्‍तिक अभ्यास करत आहे. गोलात: १. आईने आपल्या लहान मुलीचा हात धरला आहे आणि रस्ता ओलांडण्याआधी तिला दोन्ही बाजूला बघायला सांगत आहे. २. मोठी झालेली मुलगी आता स्वतःहून रस्ता ओलांडत आहे.

आध्यात्मिक रितीने लहान मुलांसारख्या असणाऱ्‍या ख्रिश्‍चनांनी बायबल तत्त्वांच्या आधारावर योग्य निर्णय कसे घ्यायचे हे शिकून घेतलं पाहिजे (परिच्छेद ६ पाहा)


७. आध्यात्मिक रितीने प्रौढ असलेल्यांना इतरांच्या मदतीची गरज असते का?

७ मग याचा अर्थ असा होतो का, की जे आध्यात्मिक रितीने प्रौढ आहेत त्यांना इतरांच्या मदतीची कधीच गरज पडत नाही? नाही. त्यांनासुद्धा इतरांच्या मदतीची गरज पडू शकते. पण जे या बाबतीत लहान मुलांसारखेच असतात, त्यांना असं वाटतं, की एखाद्या परिस्थितीत त्यांनी काय केलं पाहिजे हे त्यांना कोणीतरी सांगावं किंवा जे निर्णय त्यांनी घेतले पाहिजेत, ते इतरांनी त्यांच्यासाठी घ्यावेत. या उलट, जो आध्यात्मिक रित्या प्रौढ असतो तो इतरांच्या ज्ञानातून आणि अनुभवातून शिकतो. आणि त्याला याचीही जाणीव असते की आपण “स्वतःचा भार” स्वतः वाहिला पाहिजे.​—गलती. ६:५.

८. आध्यात्मिक रितीने प्रौढ भाऊबहीण कोणत्या बाबतीत एकमेकांपेक्षा वेगळे असू शकतात?

८ जसं मोठं झाल्यावर प्रत्येक व्यक्‍ती सारखीच दिसत नाही, तसंच जे आध्यात्मिक रितीने प्रौढ असतात ते आध्यात्मिक गुणांच्या बाबतीत सारखेच नसतात. जसं की, बुद्धी, धैर्य, उदारता आणि सहानुभूती दाखवण्याच्या बाबतीत ते सारखे नसतात. कदाचित, आध्यात्मिक रितीने प्रौढ असलेल्या दोन व्यक्‍ती सारख्याच परिस्थितीत वेगवेगळे निर्णय घेतील. पण तरी ते दोन्ही निर्णय बायबल तत्त्वांप्रमाणे बरोबर असतील. जेव्हा एखादा निर्णय विवेकानुसार घ्यायचा असतो तेव्हा खासकरून असं होऊ शकतं. अशा वेळी ते एकमेकांची टीका करत नाहीत, उलट एकता टिकवून ठेवायचा प्रयत्न करतात.​—रोम. १४:१०; १ करिंथ. १:१०.

आपण आध्यात्मिक रितीने प्रौढ कसे होऊ शकतो?

९. आपली आध्यात्मिक वाढ आपोआप होत असते का? स्पष्ट करा.

९ काळाच्या ओघात आपली शारीरिक वाढ आपोआप होत असते. पण, आध्यात्मिक वाढ आपोआप होत नाही. उदाहरणार्थ, करिंथमधल्या भाऊबहिणींनी सत्य स्वीकारलं, त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्यांना यहोवाकडून पवित्र शक्‍ती मिळाली. त्यासोबतच, प्रेषित पौलने त्यांना वैयक्‍तिकपणे जो सल्ला दिला होता त्यामुळेसुद्धा त्यांना फायदा झाला. (प्रे. कार्यं १८:८-११) असं असलं तरी, याच्या काही वर्षांनंतर त्यांच्यातले बरेच जण अजूनही आध्यात्मिक रितीने प्रौढ झाले नव्हते. (१ करिंथ. ३:२) आपल्या बाबतीत असं होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?

१०. आपल्याला आध्यात्मिक रितीने प्रौढ व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? (यहूदा २०)

१० तुम्हाला जर आध्यात्मिक रितीने प्रौढ व्हायचं असेल तर सर्वात आधी तुमच्या मनात तशी इच्छा असली पाहिजे. ज्यांचं ‘अज्ञानावर प्रेम’ असतं त्यांना आध्यात्मिक रितीने लहानच राहायचं असतं. आणि त्यामुळे त्यांची प्रगती होत नसते. (नीति. १:२२) आपल्याला अशा मुलांसारखं व्हायचं नाही, ज्यांची शारीरिक वाढ तर झाली आहे पण तरीसुद्धा ते निर्णय घेण्यासाठी त्यांच्या पालकांवर अवलंबून असतात. याउलट आपल्याला प्रौढ व्यक्‍तीसारखं व्हायचं आहे. कारण यहोवासोबतचं आपलं नातं मजबूत करणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे हे आपण ओळखतो. (यहूदा २० वाचा.) तर मग, तुम्ही आध्यात्मिक रितीने प्रगती करण्यासाठी मेहनत घेत असाल, तर यहोवाने तुम्हाला त्यासाठी “इच्छा” आणि “ताकदही” द्यावी म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करा.​—फिलिप्पै. २:१३.

११. आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्यासाठी यहोवाने आपल्याला कोणती मदत पुरवली आहे? (इफिसकर ४:११-१३)

११ आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्यासाठी आपण स्वतःहून प्रगती करावी अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करत नाही. त्याने मंडळीत आपल्याला मेंढपाळ आणि शिक्षक दिले आहेत. आणि ते आपल्याला आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्यासाठी मदत करू शकतात. त्यासोबतच, “प्रौढता प्राप्त करून ख्रिस्ताच्या पूर्णतेची उंची” गाठायलाही ते आपल्याला मदत करू शकतात. (इफिसकर ४:११-१३ वाचा.) “ख्रिस्ताचं मन” समजावं म्हणून यहोवा आपल्याला पवित्र शक्‍तीसुद्धा देतो. (१ करिंथ. २:१४-१६) तसंच, पृथ्वीवर सेवा करत असताना येशू कसा विचार करायचा, कसं बोलायचा, कसं वागायचा हे आपल्याला समजावं म्हणून त्याने शुभवर्तमानाची चार पुस्तकं लिहिण्यासाठी बायबल लेखकांना प्रेरित केलं. येशूच्या विचारांचं आणि त्याच्या वागण्याचं अनुकरण करून आपण ख्रिस्ती प्रौढतेपर्यंत पोहचण्याचं आपलं ध्येय गाठू शकतो.

बायबलची गहन सत्यं समजून घेतल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

१२. ‘ख्रिस्ताबद्दलच्या प्राथमिक शिकवणी’ काय आहेत?

१२ आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्यासाठी “आपण ख्रिस्ताबद्दलच्या प्राथमिक शिकवणींच्या पुढे,” म्हणजे मूलभूत ख्रिस्ती शिकवणींच्या पुढे गेलं पाहिजे. या शिकवणींमध्ये पश्‍चात्ताप, विश्‍वास, बाप्तिस्मा आणि पुनरुत्थान या गोष्टींचा समावेश होतो. (इब्री ६:१, २) या मूलभूत शिकवणी ख्रिस्ती विश्‍वासाचा पाया आहेत. यामुळेच पेन्टेकॉस्टच्या दिवशी जमलेल्या लोकांना प्रचार करताना प्रेषित पेत्रने या गोष्टींचा उल्लेख केला. (प्रे. कार्यं २:३२-३५, ३८) येशूचे शिष्य होण्यासाठी आपण या मूलभूत शिकवणी स्वीकारल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, पौलने म्हटलं की जे पुनरुत्थानावर विश्‍वास ठेवत नाहीत त्यांनी ख्रिस्ती विश्‍वासच नाकारला आहे. (१ करिंथ. १५:१२-१४) पण, सत्याच्या या मूलभूत गोष्टींवरच आपण समाधान नाही मानलं पाहिजे.

१३. इब्री लोकांना ५:१४ मध्ये ज्या जड अन्‍नाबद्दल सांगितलंय त्याचा फायदा करून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.)

१३ मूलभूत शिकवणींच्या अगदी उलट, जड अन्‍नामध्ये यहोवाचे फक्‍त नियमच नाहीत तर तत्त्वंसुद्धा येतात. त्यामुळे आपल्याला यहोवाची विचारसरणी समजून घ्यायला मदत होते. जड अन्‍नाचा फायदा करून घ्यायला आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्यावर मनन केलं पाहिजे आणि देवाचं वचन जीवनात लागू केलं पाहिजे. असं केल्यामुळे आपण यहोवाला आवडतील असे निर्णय घ्यायला स्वतःला प्रशिक्षण देत असतो.c​—इब्री लोकांना ५:१४ वाचा.

एक भाऊ वैयक्‍तिक अभ्यास करतोय. गोलात: भाऊ टिव्हीवर समुद्राबद्दलचा माहितीपट बघायचं ठरवतो.

बायबलमधली गहन सत्यं शिकून घेतल्यामुळे देवाला आवडतील असे निर्णय घ्यायला मदत होते (परिच्छेद १३ पाहा)d


१४. पौलने करिंथमधल्या ख्रिश्‍चनांना आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्यासाठी कशी मदत केली?

१४ बायबल तत्त्वांच्या आधारावर विचार करून निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा आध्यात्मिक रितीने लहान मुलांसारखे असलेल्यांना तसं करणं कठीण जातं. जर एखाद्या गोष्टीबद्दल बायबलमध्ये नियमच नसेल तर काहींना वाटतं, की आपण आपल्या मनाप्रमाणे काहीही करू शकतो. तर काही जण नियमाची गरज नसतानाही नियम शोधायचा प्रयत्न करतील. उदाहरणार्थ, करिंथमधल्या ख्रिश्‍चनांनी पौलला, ‘आपण मूर्तीला वाहिलेले पदार्थ खाऊ शकतो का?’ असं विचारलं. अशा वेळी काय करायचं हे सांगण्याऐवजी पौलने त्यांना विवेकाच्या भूमिकेबद्दल आणि ‘निवड करायच्या त्यांच्या अधिकाराबद्दल’ सांगितलं. पौलने त्यांना काही बायबल तत्त्वांबद्दल सांगितलं. या तत्त्वांमुळे त्यांना असे निर्णय घेता येणार होते ज्यांमुळे त्यांचा विवेक त्यांना नंतर दोष देणार नव्हता आणि इतरांनाही अडखळण होणार नव्हतं. (१ करिंथ. ८:४, ७-९) असं करून पौल करिंथमधल्या ख्रिश्‍चनांना आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्यासाठी मदत करत होता. त्यामुळे ते निर्णय घेण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा नियम शोधण्याऐवजी त्यांच्या समज शक्‍तीचा वापर करून निर्णय घेऊ शकत होते.

१५. आध्यात्मिक रितीने प्रगती करण्यासाठी पौलने इब्री ख्रिश्‍चनांना कशी मदत केली?

१५ पौलने इब्री ख्रिश्‍चनांना जे पत्र लिहिलं त्यातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो. त्या मंडळीतल्या काहींनी अजूनही आध्यात्मिक रितीने प्रगती केली नव्हती. ते “पुन्हा एकदा,  जड अन्‍नाची नाही, तर दुधाची गरज असलेल्यांसारखे” झाले होते. (इब्री ५:१२) मंडळीद्वारे यहोवा ज्या नवीन गोष्टी शिकवत होता त्या त्यांनी शिकून घेतल्या नव्हत्या आणि स्वीकारल्याही नव्हत्या. (नीति. ४:१८) उदाहरणार्थ, येशूच्या बलिदानामुळे ३० वर्षांआधीच मोशेचं नियमशास्त्र रद्द झालं होतं. तरीसुद्धा पूर्वी यहुदी असलेले काही ख्रिस्ती मोशेच्या नियमांवर अडून बसले होते. (रोम. १०:४; तीत १:१०) या ३० वर्षांत त्यांना हे समजून घ्यायला पुरेसा वेळ होता, की आता आपल्याला मोशेचे नियम पाळायची गरज नाही. त्यामुळे पौल त्यांना आपण शिकवलेली गहन सत्यं समजून घ्यायला मदत करत होता. त्याच्या पत्रामुळे त्यांना यहोवाची उपासना करायची पद्धत समजून घ्यायला मदत झाली आणि त्यात येशूची काय भूमिका आहे हेसुद्धा चांगल्या प्रकारे समजलं. त्यामुळे यहुद्यांचा विरोध असतानाही त्यांना धैर्याने प्रचार करायला मदत झाली.​—इब्री १०:१९-२३.

आपल्याला प्रगती करत राहायची गरज का आहे?

१६. आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्यासोबतच आपण आणखी काय केलं पाहिजे?

१६ आपण आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्यासाठीच नाही, तर आपली प्रौढता टिकवून ठेवण्यासाठीसुद्धा मेहनत घेतली पाहिजे. आणि त्यामुळे आपण असा विचार नाही केला पाहिजे, की आपल्याला आणखी प्रगती करायची गरज नाही. (१ करिंथ. १०:१२) उलट आपण आध्यात्मिक रितीने प्रगती करत आहोत की नाही हे आपण “सतत तपासून” पाहिलं पाहिजे.​—२ करिंथ. १३:५.

१७. ख्रिस्ती प्रौढता टिकवून ठेवणं गरजेचं आहे, हे पौलने कलस्सैकरांना लिहिलेल्या पत्रातून कसं समजतं?

१७ पौलने कलस्सैकरांना पत्र लिहिलं तेव्हा त्याने पुन्हा एकदा ख्रिस्ती प्रौढता टिकवून ठेवणं किती गरजेचं आहे यावर जोर दिला. तिथल्या भाऊबहिणींची आध्यात्मिक रितीने वाढ झाली असली, तरी पौलने त्यांना जगाच्या विचारसरणीचा स्वतःवर प्रभाव न होऊ देण्याचा इशारा दिला. (कलस्सै. २:६-१०) तसंच तिथल्या मंडळीतल्या भाऊबहिणींना चांगल्या प्रकारे ओळखत असलेला एपफ्राससुद्धा त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. त्यांनी “स्थिर उभं राहावं” म्हणजेच त्यांनी आध्यात्मिक रितीने प्रौढ व्हावं अशी तो प्रार्थना करत होता. (कलस्सै. ४:१२) यातून आपल्याला काय समजतं? पौल आणि एपफ्रास या दोघांनाही हे माहीत होतं, की आपल्याला जर आपली ख्रिस्ती प्रौढता टिकवून ठेवायची असेल, तर आपल्याला स्वतः मेहनत घ्यावी लागेल आणि त्यासोबतच यहोवाच्या मदतीचीसुद्धा गरज पडेल. पौल आणि एपफ्रास यांची अशी इच्छा होती की, कलस्सैमधल्या भावांना समस्यांचा सामना करावा लागत असला तरी त्यांनी आध्यात्मिक रितीने प्रौढ असावं.

१८. एका प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍तीच्या बाबतीत काय होऊ शकतं? (चित्रसुद्धा पाहा.)

१८ पौलने इब्री ख्रिश्‍चनांना असा इशारा दिला की प्रौढ ख्रिस्ती लोकांनीसुद्धा जर काळजी घेतली नाही तर ते देवाची स्वीकृती गमावू शकतात. त्यांचं हृदय इतकं कठोर होऊ शकतं, की ते पश्‍चात्ताप करणार नाहीत आणि यहोवाला माफी मागणार नाहीत. पण चांगली गोष्ट म्हणजे इब्री ख्रिश्‍चनांची इतकी वाईट परिस्थिती झाली नव्हती. (इब्री ६:४-९) मग आज जे अक्रियाशील होतात किंवा बहिष्कृत होतात पण नंतर पश्‍चात्ताप करतात, त्यांच्या बाबतीत काय? नम्रपणे पश्‍चात्ताप करून ते दाखवतात, की पौल ज्या लोकांबद्दल बोलत होता त्यांच्यासारखे ते नाहीत. पण जे यहोवाकडे परत येतात त्यांना मदतीची गरज असते. (यहे. ३४:१५, १६) मंडळीतले वडील त्यांचं यहोवासोबतचं नातं पुन्हा मजबूत करायला मदत करण्यासाठी एखाद्या अनुभवी भावाला किंवा बहिणीला सांगू शकतात.

एक वयस्कर भाऊ दुसऱ्‍या एका भावाच्या घरी जाऊन त्याला शास्त्रवचनांमधून प्रोत्साहन देतोय.

ज्यांना यहोवासोबतचं नातं पुन्हा मजबूत करायचं आहे त्यांना यहोवा मदत करतो (परिच्छेद १८ पाहा)


१९. आपण कोणतं ध्येय ठेवलं पाहिजे?

१९ जर तुम्ही आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही हे ध्येय नक्कीच गाठू शकता. त्यासाठी बायबलमधली गहन सत्यं शिकत राहा आणि यहोवासारखा विचार करायचा प्रयत्न करत राहा. आणि जर तुम्ही आध्यात्मिक रितीने प्रौढ झाला असाल तर तुमची आध्यात्मिक प्रौढता टिकवून ठेवायचा प्रयत्न करत राहा.

तुमचं उत्तर काय असेल?

  • आध्यात्मिक रितीने प्रौढ असण्याचा काय अर्थ होतो?

  • आपण आध्यात्मिक रितीने प्रौढ कसं बनू शकतो?

  • आपण प्रौढ बनलो आहोत आणि आपल्याला प्रगती करायची गरज नाही, असा विचार करायचं आपण का टाळलं पाहिजे?

गीत ६५ प्रगती करू या!

a हिब्रू शास्त्रवचनांत “प्रौढ” या शब्दाचा वापर करण्यात आलेला नाही. पण या शब्दामागचा अर्थ मात्र त्यात आहे. उदाहरणार्थ, नीतिवचनं या पुस्तकात तरुण आणि भोळ्या व्यक्‍तीची तुलना बुद्धिमान आणि समजशक्‍ती असलेल्या व्यक्‍तीशी करण्यात आली आहे.​—नीति. १:४, ५.

b jw.org आणि JW लायब्ररी  ॲपवर चुकीच्या माहितीचा महापूर—जरा जपून!  हा व्हिडिओ पाहा.

c या अंकामधली “अभ्यासासाठी विषय” याखालची माहिती पाहा.

d चित्राचं वर्णन: एक भाऊ मनोरंजनाची निवड करताना बायबलमधून शिकलेल्या तत्त्वांचा वापर करत आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा