जीवन कथा
यहोवाच्या सेवेतले सुखद अनुभव आणि शिकायला मिळालेल्या गोष्टी
लहान असताना मी जेव्हा आकाशात विमान उडताना पाहायचो तेव्हा कोणत्या तरी मस्त ठिकाणी विमानाने फिरायला जावं अशी माझी इच्छा व्हायची. पण माझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असं मला वाटायचं.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात माझ्या आईवडिलांनी एस्टोनिया देश सोडला आणि ते जर्मनीला गेले. तिथेच माझा जन्म झाला. त्यानंतर लगेच ते कॅनडाला जायची तयारी करू लागले. आमचं पहिलं घर कॅनडातल्या ओटावाजवळ होतं. आम्ही एका लहानश्या बिल्डींगमध्ये राहायचो जिथं कोंबड्याही ठेवल्या जायच्या. आमची परिस्थिती खूप हलाखीची होती, पण रोज निदान अंडी तरी आम्हाला नाष्ट्याला मिळत होती.
एके दिवशी यहोवाच्या साक्षीदारांनी माझ्या आईला प्रकटीकरण २१:३, ४ वाचून दाखवलं. ते वाचून ती भारावून गेली आणि रडू लागली. सत्याचं बी माझ्या आईवडिलांच्या मनात वाढू लागलं आणि लगेचच त्यांनी बाप्तिस्मा घेण्याइतपत प्रगती केली.
माझ्या आईवडिलांना इंग्रजी भाषा इतकी चांगली येत नव्हती. पण सत्याबद्दल त्यांच्या मनात जबरदस्त आवेश होता. माझे वडील सड्बरी, ओंटारियो इथे धातू वितळवण्याचं काम करायचे. रात्रभर काम करूनही ते दर शनिवारी मला आणि माझ्या बहिणीला म्हणजे सिलव्हियाला प्रचार कार्याला घेऊन जायचे. तसंच आम्ही दर आठवडी कुटुंब मिळून टेहळणी बुरूज अभ्यास करायचो. मम्मी-पप्पांनी माझ्या मनात देवाबद्दल प्रेम वाढवलं. म्हणूनच मी १९५६ मध्ये दहा वर्षांचा असताना यहोवाला माझं जीवन समर्पित करायचा निर्णय घेतला. त्यांचं यहोवावर किती प्रेम होतं याचा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा आजही मला यहोवाची सेवा करत राहायची प्रेरणा मिळते.
पण शाळेचं शिक्षण झाल्यानंतर माझं लक्ष थोडं विचलित झालं होतं. मी जर पायनियर बनलो तर मला जास्त पैसे कमवता येणार नाहीत आणि विमानात बसून जग फिरायचं माझं स्वप्न अर्धवट राहून जाईल असं मला वाटलं. म्हणून मी रेडिओ जॉकी म्हणून एका रेडिओ स्टेशनवर काम करू लागलो. हे काम मला खूप आवडायचं. मी संध्याकाळी काम करायचो त्यामुळे मला सभांना जाता येत नव्हतं. आणि बाहेरच्या लोकांसोबतही माझी मैत्री वाढत चालली होती. शेवटी माझा विवेक मला बोचू लागला आणि मी बदल करायचं ठरवलं.
नंतर मी ऑन्टारियोमधल्या ओशोवा इथे राहायला गेलो. तिथे माझी ओळख रे नॉर्मन आणि त्याची बहीण लेस्ली आणि इतर पायरनियर भाऊबहिणींशी झाली. त्यांनाही माझा स्वभाव आवडला. ते पायनियर सेवेत किती खूश आहेत हे पाहून मीही माझ्या ध्येयांबद्दल विचार करू लागलो. त्यांनी मला पायनियरिंग करायचं प्रोत्साहन दिलं आणि मीही १९६६ ला पायनियर सेवा सुरू केली. मी खूप खूश होतो आणि सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण लवकरच माझं आयुष्य एक वेगळं वळण घेणार होतं.
यहोवा जर आपल्याला बोलवत आहे तर मग ते करून पाहायला काय हरकत आहे
मला लेस्ली खूप आवडायची. पण कॉलेजमध्ये असतानाच मी बेथेलचा फॉर्म भरला होता. नंतर पायनियरिंग करत असताना मला टोरोंटो बेथेलमध्ये चार वर्षांसाठी बोलवण्यात आलं. त्यामुळे माझ्या मनात कुठेतरी भीती होती, की मी जर बेथेलला गेलो तर मला लेस्लीला पुन्हा कधी भेटता येणार नाही. मी यहोवाकडे खूप कळकळून प्रार्थना केली आणि शेवटी बेथेलला जायचं ठरवलं.
बेथेलमध्ये आधी मी लॉन्ड्रीमध्ये काम केलं आणि नंतर सचिव म्हणून काम करू लागलो. त्या दरम्यान लेस्की क्यूबेकच्या गॅटिनेऊ शहरात सेवा करत होती. ती सध्या काय करत असेल आणि मी घेतलेला निर्णय बरोबर होता का याचा मी नेहमी विचार करायचो. पण आयुष्याने मला एक सुखद धक्का दिला. तिचा भाऊ रे यालासुद्धा बेथेलला बोलवण्यात आलं आणि तो माझा रूम पार्टनर बनला. त्यामुळे लेस्लीसोबतची माझी मैत्री पुन्हा एकदा वाढू लागली. आणि ज्या दिवशी माझा बेथेलमधला शेवटचा दिवस होता त्याच दिवशी आम्ही लग्न केलं. तो दिवस होता २७ फेब्रुवारी, १९७१.
१९७५ मध्ये विभागीय कार्य सुरू केलं
लग्नानंतर लेस्ली आणि मला क्यूबेकच्या फ्रेंच भाषेच्या मंडळीत सेवा करण्यासाठी पाठवण्यात आलं. त्यानंतर काही वर्षांनीच मला विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्यासाठी बोलवण्यात आलं. ही नेमणूक माझ्यासाठी खूप आश्चर्याची गोष्ट होती. त्या वेळी माझं वय फक्त २८ होतं. आणि मला नेहमी वाटायचं की मी खूप लहान आहे आणि या कामासाठी माझ्याकडे अनुभव नाही. पण यिर्मया १:७, ८ या वचनांमुळे मला खूप मदत झाली. पण आणखी एक समस्या होती. लेस्लीचा बऱ्याच वेळा कार ॲक्सिडेन्ट झाला होता आणि त्यामुळे तिला झोपेचा त्रास होता. त्यामुळे हे विभागीय कार्य आम्हाला करता येईल का, अशी शंका मला होती. पण लेस्ली म्हणाली, “यहोवा जर आपल्याला बोलवत आहे तर मग ते करून पाहायला काय हरकत आहे?” म्हणून आम्ही ती नेमणूक स्वीकारली आणि पुढे १७ वर्षं आनंदाने सेवा केली.
विभागीय कार्यात मी खूप व्यस्त असायचो. त्यामुळे मला लेस्लीला हवा तितका वेळ देता येत नव्हता. पण हीपण एक अशी गोष्ट होती जी मला शिकावी लागणार होती. एके दिवशी सकाळी माझ्या दरवाजाची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा कोणीच नव्हतं. पण समोर एक पिक्निकची बास्केट ठेवली होती. त्यात एक चादर, फळं, चीझ, ब्रेड, एक वाईनची बॉटल आणि एक चिठ्ठीसुद्धा होती. त्यात लिहिलं होतं, “तुझ्या बायकोला पिक्निकला घेऊन जा.” त्या दिवशी छान ऊन पडलं होतं. लेस्लीपण बाहेर जायला उत्सुक होती. पण मी तिला सांगितलं की मला काही भाषणं तयार करायची आहेत, त्यामुळे आपल्याला काही जाता येणार नाही. तिने समजून घेतलं पण ती थोडी उदास झाली. मग मी भाषणं तयार करायला बसलो. पण माझं मन मला खाऊ लागलं. मग मला इफिसकर ५:२५, २८ हे वचन आठवलं. मी म्हणालो, ‘मी माझ्या बायकोच्या भावनापण समजून घेतल्या पाहिजेत हेच मला यहोवा या वचनांतून शिकवतोय ना?’ मग प्रार्थना केल्यावर मी लेस्लीला म्हणालो, “चल जाऊ या!” तेव्हा ती खूप खूश झाली. मग आम्ही एका छानशा ठिकाणी गेलो. तिथे जवळच एक नदी वाहत होती. आम्ही तिथे चादर टाकली आणि बसलो. तो दिवस आमच्या आठवणीतला एक सुंदर दिवस होता. आणि विशेष म्हणजे, माझी सगळी भाषणंही तयार झाली.
या काळात आम्ही ब्रिटिश कोलंबिया ते न्यूफाउंडलॅन्डपर्यंत सेवा केली. त्यात आम्ही खूप आनंदी होतो. माझं लहानपणीचं स्वप्नसुद्धा त्यात पूर्ण होत होतं. मी गिलीयड प्रशालेचाही विचार केला होता. पण बाहेरच्या देशात मिशनरी म्हणून जायची माझी इच्छा नव्हती. मला वाटायचं की मिशनरी काम करणारे लोक खूप खास असतात आणि माझी तेवढी योग्यता नाही. शिवाय आफिक्रेतल्या एखाद्या देशात नेमणूक मिळाली तर काय होईल याचीही मला चिंता वाटत होती. कारण तिथे रोगराई पसरलेली होती आणि युद्धंही चालू होती. त्यामुळे मी जिथे होतो तिथेच खूश होतो.
एस्टोनिया आणि बाल्टिक प्रदेशात जाण्यासाठी अचानक आलेलं आमंत्रण
बाल्टिक देशांमध्ये प्रवास
१९९२ मध्ये आधी सोव्हियत संघाचा भाग असणाऱ्या देशांमध्ये आता प्रचाराचं काम पुन्हा सुरू होत होतं. त्या दरम्यान आम्हाला मिशनरी म्हणून एस्टोनियामध्ये सेवा करता येईल का, असं विचारण्यात आलं. आम्हाला याचं थोडंसं आश्चर्य वाटलं, म्हणून आम्ही प्रार्थना केली. आणि आम्ही पुन्हा विचार केला, ‘जर यहोवा आपल्याला बोलवतोय तर ते करून पाहायला काय हरकत आहे?’ म्हणून आम्ही ती नेमणूक स्वीकारली आणि म्हटलं, ‘चला निदान आपण आफ्रिकेत तर जात नाहीए!’
मग आम्ही लगेच एस्टोनियाची भाषा शिकू लागलो. काही महिन्यांतच आम्हाला तिथे, विभागीय कार्यावर पाठवण्यात आलं. आम्ही जवळपास ४६ मंडळ्यांना आणि गटांना भेटी द्यायचो. या मंडळ्या आणि हे गट तीन बाल्टिक देशांत तसंच रशियाच्या कॅलिनिनग्रॅडमध्ये होत्या. त्यामुळे आम्हाला लॅटवियन, लिथुएनियन आणि रशियन या भाषाही शिकाव्या लागल्या. भाषा शिकणं खूप अवघड होतं. तरी आम्ही जी मेहनत घेत होतो त्याची भाऊबहीण खूप कदर करायचे. आणि भाषा शिकायला त्यांनीही आम्हाला खूप मदत केली. मग पुढे १९९९ मध्ये, एस्टोनियामध्ये शाखा कार्यालय सुरू झालं. आणि मग माझी नेमणूक पुन्हा बदलली. मला टूमस एडूर, लेम्बीट रायली आणि टोमी काउको यांच्यासोबत शाखा समितीवर नेमण्यात आलं.
डावीकडे: लिथुएनियामध्ये एका अधिवेशनात भाषण देताना
उजवीकडे: १९९९ मध्ये स्थापन झालेली एस्टोनियामधली शाखा समिती
आम्ही अशा अनेक भाऊबहिणींना भेटलो, ज्यांना आधी हद्दपार करून सायबेरीयाला पाठवण्यात आलं होतं. तिथे तुरुंगात त्यांनी खूप छळ सहन केला होता. आणि ते त्यांच्या कुटुंबांपासूनही वेगळे झाले होते. पण तरी त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा राग किंवा द्वेष नव्हता. सेवाकार्यासाठी असलेला त्यांच्यामधला आवेश आणि आनंद टिकून होता. त्यांच्याकडून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं. आम्हाला कळलं की, परिस्थिती कितीही बिकट असली आणि कितीही आपल्या विरोधात असली तरी आपण तिला धीराने तोंड देऊ शकतो आणि आनंदी राहू शकतो.
वर्षं सरत गेली आणि आम्ही सुट्ट्याही खूप कमी घेतल्या होत्या. त्यामुळे लेस्लीला खूप थकवा जाणवू लागला. सुरवातीला आम्हाला कळलं नाही, पण नंतर आमच्या लक्षात आलं की तिला एका आजारामुळे असं होत होतं. म्हणून कॅनडाला जावंच लागेल असा आम्ही विचार केला. त्याच दरम्यान आम्हाला न्यूयॉर्क इथल्या पॅटरसनमध्ये एका प्रशालेसाठी आमंत्रण मिळालं. पण परिस्थिती पाहून आम्हाला त्या प्रशालेला जाता येईल की नाही अशी शंका वाटू लागली. याबद्दल आम्ही खूप कळकळून प्रार्थना केली. आणि शेवटी जायचं ठरवलं. यहोवानेसुद्धा आमच्या या निर्णयावर खूप आशीर्वाद दिला. कारण लेस्लीला ज्या उपचाराची गरज होती, तो तिला या प्रशालेदरम्यानच मिळाला. उपचारामुळे लेस्लीला बरं वाटू लागलं. आणि मग आम्ही आमची सेवा पुढे चालू ठेवू शकलो.
आयुष्याला आणखी एक वळण—एक नवीन नेमणूक
मी जेव्हा २००८ मध्ये एस्टोनियात होतो तेव्हा एका संध्याकाळी मला जागतिक मुख्यालयातून फोन आला होता. त्या वेळी मला विचारण्यात आलं की, मी आफ्रिकेतल्या काँगो या देशात नेमणूक स्वीकारेन का? ते ऐकून मला धक्काच बसला! आणि विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी मला त्याचं उत्तर द्यायचं होतं. सुरवातीला मी लेस्लीला याबद्दल काहीच सांगितलं नाही. कारण मला माहिती होतं की मी जर तिला सांगितलं तर त्या रात्री ती काही झोपणार नाही. पण झालं उलटंच, त्या रात्री मीच झोपलो नाही. आफ्रिकेत जाण्याबद्दल भीती असल्यामुळे मी रात्रभर यहोवाला प्रार्थना करत राहिलो.
दुसऱ्या दिवशी जेव्हा मी लेस्लीला याबद्दल सांगितलं तेव्हा आम्ही असा विचार केला: “यहोवा आपल्याला आफ्रिकेला बोलवतोय, मग तिथे आपल्याला सेवा करता येईल की नाही किंवा तिथल्या सेवेत आपल्याला आनंद मिळेल की नाही हे तिथे गेल्याशिवाय कसं कळेल?” म्हणून एस्टोनियात १६ वर्षं घालवल्यानंतर आम्ही काँगोच्या किनशासामध्ये गेलो. तिथल्या शाखा कार्यालयात सुंदर हिरवळ होती आणि प्रसन्न वातावरण होतं. आम्ही तिथे पोचलो तेव्हा रूममध्ये सगळ्यात आधी लेस्लीने एक कार्ड ठेवलं. आम्ही कॅनडा सोडलं तेव्हापासून तिने हे कार्ड जपून ठेवलं होतं. त्या कार्डवर लिहिलं होतं “पेरलं जाईल तिथे बहरा.” तिथल्या भाऊबहिणींना भेटल्यानंतर, बायबल अभ्यास चालवल्यानंतर आणि मिशनरी म्हणून सेवा करण्याचा आनंद काय असतो हे अनुभवल्यानंतर, आमच्या आयुष्यात एक नवीनच आनंद बहरला. पुढे, आफ्रिकेतल्या १३ देशांमधल्या शाखा कार्यालयांना भेट द्यायचा बहुमान आम्हाला मिळाला. तिथे आम्हाला वेगवेगळे लोक आणि त्यांच्या संस्कृतींतली विविधता फार जवळून पाहायला मिळाली. त्यामुळे आफ्रिकेबद्दल मनात जी भीती होती ती निघून गेली. उलट, आफ्रिकेत आम्हाला सेवा करायला पाठवल्याबद्दल आम्ही यहोवाचे आभार मानले!
काँगोमधल्या लोकांचं जेवण खूप वेगळं होतं. तिथले लोक किडेसुद्धा खायचे. सुरवातीला मला वाटलं, आम्ही हे कधीच खाऊ शकणार नाही. पण जेव्हा आम्ही पाहिलं की भाऊबहीण या गोष्टींचाही किती आस्वाद घेत आहेत, तेव्हा आम्हीही ते खाऊन बघितलं. आणि आम्हालाही ते आवडलं.
काँगोच्या पूर्वीकडच्या प्रदेशामध्ये काही विद्रोही टोळ्या होत्या. त्या गावांवर हल्ला करायच्या आणि तिथल्या स्त्रियांचा आणि मुलांचा छळ करायच्या. पण अशा ठिकाणीही आम्ही भाऊबहिणींना गरजेच्या गोष्टी पोचवू शकलो. आणि यहोवासोबतचं नातं मजबूत करण्यासाठी त्यांना मदत करू शकलो. तिथले भाऊबहीण खूप गरीब होते. पण पुनरुत्थानावर असलेला त्यांचा भक्कम विश्वास, यहोवावरचं त्यांचं प्रेम आणि संघटनेशी असलेली त्यांची एकनिष्ठा पाहून आम्ही भारावून गेलो. त्यांना पाहून आम्ही आमच्या स्वतःच्या विश्वासाबद्दल विचार करू लागलो. आणि यहोवाची सेवा करायचा आमचा निर्धारही आणखी पक्का झाला. काही भाऊबहिणींनी तर आपलं घर, आपली शेती सगळं काही गमावलं होतं. यावरून मला कळलं की या भौतिक गोष्टी खूप क्षणिक आहेत, आणि यहोवासोबतचं आपलं नातंच जीवनात सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यांची परिस्थिती बिकट होती पण त्यांनी कधी कुरकूर केली नाही. त्यांच्या उदाहरणामुळे आम्हालाही आरोग्याच्या आणि इतर समस्यांना धैर्याने तोंड द्यायचं प्रोत्साहन मिळालं.
डावीकडे: शरणार्थी लोकांच्या एका गटाला भाषण देताना
उजवीकडे: काँगोच्या डुंगू शहतात गरजेच्या वस्तू आणि वैद्यकीय उपचाराचं सामान नेताना
आशियामधली नवीन नेमणूक
पुढे आणखी एक अनपेक्षित गोष्ट आमच्या आयुष्यात घडली. आम्हाला हाँगकाँगच्या शाखा कार्यालयात सेवा करण्यासाठी बोलवण्यात आलं. आशियात जाऊन राहायचा आम्ही कधी विचारसुद्धा केला नव्हता. पण आत्तापर्यंत यहोवाने आमच्या प्रत्येक नेमणुकीवर जो आशीर्वाद दिला होता तो आम्ही अनुभवला होता. त्यामुळे ही नेमणूकसुद्धा आम्ही स्वीकारली. मग २०१३ मध्ये आफ्रिकेतल्या त्या सुंदर देशाचा आणि आमच्या तिथल्या मित्रांचा आम्ही निरोप घेतला. त्यांना निरोप देताना आमच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
हाँगकाँग एक गजबजलेलं शहर होतं. आणि तिथे जगाच्या कानाकोपऱ्यांतून लोक यायचे. तिथली कॅन्टोनिज भाषा शिकणं आमच्यासाठी एक आव्हानच होतं. आम्ही तिथे गेलो तेव्हा भाऊबहिणींनी आमचं खूप प्रेमाने स्वागत केलं आणि आम्हाला तिथलं जेवणही आवडलं. आपलं काम तिथे खूप झपाट्याने वाढत होतं, पण तिथल्या प्रॉपर्टीच्या किंमतीसुद्धा तितक्याच वेगाने वाढत होत्या. त्यामुळे नियमन मंडळाने आपली बरीचशी प्रॉपर्टी विकायचा निर्णय घेतला. याच्या काही काळातच, म्हणजे २०१५ ला आम्ही दक्षिण कोरियाला गेलो आणि आता आम्ही तिथेच सेवा करत आहोत. इथेही आम्हाला भाषेचं आव्हान आहे, पण कोरीयन भाषा शिकायला आम्ही जी मेहनत घेतोय त्याची भाऊबहीण खूप कदर करतात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही बरीच प्रगती केली आहे.
डावीकडे: हाँगकाँगमधल्या नेमणुकीसाठी तयार
उजवीकडे: कोरियाचं शाखा कार्यालय
यहोवाच्या सेवेत बरंच काही शिकायला मिळालं
मित्र जोडणं नेहमी सोपं नसतं. पण पाहुणचार दाखवण्यात पुढाकार घेतला, की लोकांसोबत आपली ओळख वाढते ही गोष्ट आम्हाला समजली. वर-वर पाहिलं तर आपल्याला वाटेल की आपले भाऊबहीण खूप वेगळे आहेत. पण आम्ही पाहिलंय, की आपल्यामध्ये बऱ्याच गोष्टी एकसारख्याच आहेत. यहोवाने आपल्याला इतक्या विलक्षण पद्धतीने बनवलंय, की आपण एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलू शकतो आणि एकमेकांशी मैत्री करू शकतो.—२ करिंथ. ६:११.
यहोवा लोकांना ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्याच दृष्टिकोनातून आपणही लोकांना पाहिलं पाहिजे हे आम्हाला समजलंय. तसंच यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे आणि तो आपल्या जीवनात आपलं कसं मार्गदर्शन करतो, हे पाहणंही खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा-जेव्हा आम्हाला निराश वाटायचं आणि भाऊबहिणींना आम्ही आवडतो की नाही अशी मनात शंका यायची, तेव्हा-तेव्हा आम्ही त्यांच्याकडून मिळालेली पत्रं आणि कार्ड पुन्हा-पुन्हा वाचायचो. यहोवाने आमच्या प्रार्थनांचं कशा प्रकारे उत्तर दिलं हे आम्ही अनुभवलंय. आणि त्यामुळे त्याचं आमच्यावर प्रेम आहे याची आम्हाला खातरी मिळाली आहे आणि त्याची सेवा करत राहायचं बळ मिळालंय.
या सर्व काळादरम्यान लेस्लीला आणि मला जाणवलंय, की आम्ही कितीही व्यस्त असलो तरी आम्ही एकमेकांसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही हेही शिकलो की जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा त्या चुकांवर हसणंसुद्धा खूप गरजेचं आहे. खासकरून जेव्हा आपण एखादी नवीन भाषा शिकत असतो तेव्हा. दररोज रात्री आम्ही अशा एखाद्या गोष्टीचा विचार करतो ज्यामुळे आम्हाला आनंद झाला आणि त्यासाठी आम्ही यहोवाचे आभार मानतो.
खरं सांगायचं तर मला कधीच वाटलं नव्हतं की मी मिशनरी म्हणून दुसऱ्या देशात सेवा करेन. पण यहोवाच्या मदतीने आपण सगळ्या गोष्टी आनंदाने शिकू शकतो हे मी अनुभवलंय. यिर्मया संदेष्ट्याचे शब्द मला आठवतात. तो म्हणतो: “हे यहोवा! तू मला फसवलंस.” (यिर्म. २०:७) या संपूर्ण काळादरम्यान यहोवाने आम्हाला बरेच सुखद आणि आम्ही विचारही केले नव्हते असे आशीर्वाद दिले. त्याने माझं विमानातून फिरण्याचं स्वप्नही पूर्ण केलं. मी लहानपणी विचारही केला नव्हता त्यापेक्षा कितीतरी जास्त ठिकाणं मला फिरता आली. आम्ही पाच वेगवेगळ्या खंडांमध्ये शाखा कार्यालयांना भेटी दिल्या. आमच्या सर्व नेमणुकांमध्ये लेस्लीने मला जी साथ दिली, त्याबद्दल मी खरंच तिथे खूप आभार मानतो!
आम्ही ही सेवा का करत आहोत आणि कोणासाठी करत आहोत याची आम्ही नेहमी स्वतःला आठवण करून देत असतो. आता आम्हाला जे आशीर्वाद मिळत आहेत ती भविष्यात मिळणाऱ्या आशीर्वादांची फक्त एक झलक आहे. त्या वेळी यहोवा “आपली मूठ उघडून, प्रत्येक जिवाची इच्छा पूर्ण” करेल.—स्तो. १४५:१६.