वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w22 नोव्हेंबर पृ. २६-३०
  • “मला यहोवासाठी काम करायचं होतं”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मला यहोवासाठी काम करायचं होतं”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चांगल्या मित्रांमुळे मला मदत झाली
  • काही महत्त्वाचे धडे
  • आणखीन जबाबदाऱ्‍या मिळवल्या
  • तीन धाग्यांनी बनलेली दोरी
  • एक पती, पिता आणि प्रवासी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणं
  • मागे वळून पाहताना
  • माझ्या अपेक्षांपेक्षा मला खूप काही मिळालं
    सावध राहा!—१९९९
  • पूर्णवेळेच्या सेवकांची आठवण ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • तुम्ही कोणते ध्येय निवडून घ्याल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • वयाच्या ८० व्या वर्षी नेमणूक बदलली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
w22 नोव्हेंबर पृ. २६-३०

जीवन कथा

“मला यहोवासाठी काम करायचं होतं”

डॅनियल वन मर्ल

डॅनियल वन मर्ल

सुरीनामच्या दाट जंगलात असलेल्या ग्रानबोरी गावाच्या एक गटाला आम्ही भेट द्यायला गेलो होतो. आणि आता त्यांचा निरोप घेऊन आम्ही परत निघत होतो. आम्ही एका छोट्या बोटीने तपानाहोनी नदीतून आमचा प्रवास सुरू केला. नदीच्या जोरदार प्रवाहातून जाताना आमच्या बोटीच्या मोटरचा पंखा एक खडकावर आदळला. काही कळण्याआधीच आमची बोट पाण्याखाली गेली. माझ्या छातीत धडधडायला लागलं. कारण विभागीय पर्यवेक्षक म्हणून काम करताना बरीच वर्षं मी अशा बोटींमधून प्रवास केला होता. पण तरीसुद्धा मला पोहता येत नव्हतं.

पुढे काय झालं हे सांगण्याआधी मला तुम्हाला हे सांगायचंय की मी पूर्ण वेळेच्या सेवेत कसा आलो.

१९४२ मध्ये कुरासाओ या सुंदर बेटावर माझा जन्म झाला. माझे वडील मूळचे सुरीनामचे. पण कामासाठी ते या बेटावर राहू लागले. कुरासाओ बेटावरच्या पहिल्या काही यहोवाच्या साक्षीदारांपैकी ते एक होते.a दर आठवड्याला ते आम्हा मुलांसोबत बायबलचा अभ्यास करायचे. पण आम्ही मुलं त्यांना खूप त्रास द्यायचो. मी १४ वर्षांचा झालो, तेव्हा बाबा आम्हा सगळ्यांना घेऊन पुन्हा सुरीनामला आले. कारण आजीचं वय झालं होतं आणि आता तिची काळजी घ्यायची गरज होती.

दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियनच्या प्रदेशात डॅनियल वन मर्ल जिथे राहिले आणि जिथे त्यांनी प्रवासी कार्य केलं अशी काही ठिकाणं: कुरासाओ, सुरीनाम, तपानाहोनी नदी, गोडो होलो आणि ग्रानबोरी गाव

चांगल्या मित्रांमुळे मला मदत झाली

सुरीनाममध्ये आल्यावर मी मंडळीत उत्साहाने यहोवाची सेवा करणाऱ्‍या तरुण भाऊबहिणींसोबत मैत्री करायला सुरवात केली. ते वयाने माझ्यापेक्षा काही वर्षं मोठे होते आणि पायनियरींग करायचे. जेव्हा ते त्यांचे प्रचारातले अनुभव सांगायचे, तेव्हा त्यांच्या चेहऱ्‍यावर खूप आनंद असायचा. सभा झाल्यावर मी माझ्या मित्रांसोबत बराच वेळ बायबलमधल्या विषयांबद्दल बोलत बसायचो. कधीकधी तर रात्री उशीरापर्यंत आम्ही आकाशातल्या ताऱ्‍यांकडे बघत गप्पा मारत बसायचो. मला जीवनात काय करायचंय, हे समजायला मला याच मित्रांनी मदत केली. मला यहोवाची सेवा करायची होती. म्हणून १६ वर्षांचा झाल्यावर मी बाप्तिस्मा घेतला. आणि मग १८ वर्षी मी पायनियरींग सुरू केली.

काही महत्त्वाचे धडे

डॅनियल सायकलवर

पारामारीबो इथे पायनियरिंग करताना

पायनियरींग करत असताना मी काही महत्त्वाचे धडे शिकलो. आणि यांमुळे मला आजपर्यंत पूर्णवेळच्या सेवेत खूप फायदा झाला. जसं की, इतरांना प्रशिक्षण देणं किती महत्त्वाचंय, हे मला शिकायला मिळालं. मी जेव्हा पायनियरींग सुरू केली तेव्हा विलेम वॉन सेईल नावाच्या मिशनरी भावाने मला खूप मदत केली.b मंडळीतली कामं कशी करायची या बाबतीत त्यांनी मला बरंच काही शिकवलं. माझ्यासाठी हे प्रशिक्षण किती महत्त्वाचं होतं, हे त्या वेळी मला समजलं नाही. पुढच्याच वर्षी मला खास पायनियर म्हणून नियुक्‍त करण्यात आलं. तेव्हापासून, मी सुरीनामच्या दाट जंगलात असलेल्या दूरदूरच्या भागात जाऊन भावाबहिणींच्या छोट्या छोट्या गटांना मदत करू लागलो. अनुभवी भावांनी मला योग्य वेळी जे प्रशिक्षण दिलं, त्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे! मीसुद्धा त्यांच्याप्रमाणेच इतरांना प्रशिक्षण देण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलाय.

आणखीन एक गोष्ट जी मी शिकलो ती म्हणजे, साधं जीवन जगणं आणि सगळ्या गोष्टींचं चांगलं नियोजन करणं खूप फायद्याचं असतं. खास पायनियरींग करत असताना दर महिन्याच्या सुरवातीला मी आणि माझा पायनियर सोबती, आम्हाला त्या महिन्यात कोणकोणत्या गोष्टी लागतील, याची यादी बनवायचो. मग आमच्यापैकी एक जण लांबचा प्रवास करून शहरात जायचा आणि त्या गोष्टी घेऊन यायचा. आम्हाला खर्चासाठी दिले जाणारे पैसे आम्ही फार सांभाळून वापरायचो. आणि आणलेलं सामान महिनाभर पुरवायचा प्रयत्न करायचो. कारण एखादी गोष्ट संपली, तर त्या दाट जंगलात कोणाकडेच मदत मागायची सोय नव्हती. तरुण वयातच असं साधं जीवन जगायला शिकल्यामुळे आणि सगळ्या गोष्टींचं नियोजन करायचं शिकल्यामुळे मला आयुष्यभर यहोवाची सेवा करायला मदत झाली.

तिसरी गोष्टी जी मी शिकलो ती म्हणजे, जेव्हा लोकांना त्यांच्या मातृभाषेत सत्य शिकवलं जातं, तेव्हा त्यांना त्याचा फायदा होता. मी लहानपणापासूनच डच, इंग्रजी, पापीयामेंटो आणि सुरीनाममध्ये बोलली जाणारी स्रानानटाँगो (या भाषेला स्रानान भाषा असंही म्हटलं जातं) ही भाषाही बोलायला शिकलो. पण दूर जंगलांमध्ये प्रचार करत असताना मला जाणवलं, की जेव्हा लोकांना त्यांच्या मातृभाषेत सत्य सांगितलं जातं, तेव्हा ते आणखीन चांगल्या प्रकारे ऐकतात. यांपैकी काही भाषा बोलणं मला कठीण जायचं. जसं की, सारामाक्कन भाषा. कारण या भाषेत वरच्या किंवा खालच्या पट्टीत बोलल्यामुळे शब्दांचे अर्थसुद्धा बदलतात. पण मी या भाषा शिकून घेण्यासाठी मेहनत घेतल्यामुळे खूप चांगले परिणाम झाले. लोकांच्या मातृभाषेत बोलल्यामुळे मला आणखीन जास्त लोकांना सत्य शिकवता आलं.

नवीन भाषा शिकताना माझ्यासोबत काही विचित्र प्रसंगसुद्धा घडले आहेत. जसं की, मी सारामाक्कन बोलणाऱ्‍या एका स्त्रीसोबत बायबल अभ्यास करायचो. एकदा तिच्या पोटात दुखत असल्यामुळे मला विचारायचं होतं, की तिची तब्येत कशी आहे. पण सारामाक्कन भाषेत मी चुकून तिला हे विचारलं, की ती गरोदर आहे का? माझ्या या प्रश्‍नामुळे नक्कीच तिला अवघडल्यासारखं झालं असेल. अशा काही विचित्र घटना घडल्या, तरी मी तिथल्या लोकांच्या मातृभाषा शिकण्यासाठी मेहनत घ्यायचं सोडलं नाही.

आणखीन जबाबदाऱ्‍या मिळवल्या

१९७० मध्ये मला विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. त्या वर्षी जंगलातल्या दूरदूरच्या भागात असलेल्या गटांना मी “यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयाला एक भेट” हा कार्यक्रम दाखवला. हा कार्यक्रम प्रोजेक्टरच्या मदतीने चित्र दाखवून सादर केला जायचा. तिथे पोहोचण्यासाठी मी काही भावांना सोबत घेऊन त्या जंगलातल्या नद्यांमधून एका बोटीने प्रवास करायचो. आमच्या बोटीत एक जनरेटर, पेट्रोलचा डब्बा, पेट्रोलचे दिवे आणि तो कार्यक्रम दाखवण्याचं सामान असायचं. एखाद्या ठिकाणी पोहोचल्यावर आम्ही हे सगळं सामान बोटीतून खाली उतरवायचो आणि जिथे तो कार्यक्रम दाखवला जाणार असेल तिथे ते घेऊन जायचो. हे सगळं करण्यासाठी मेहनत तर लागायची, पण जेव्हा ते लोक हा कार्यक्रम बघायचे तेव्हा त्यांना किती आनंद व्हायचा ही गोष्ट नेहमी माझ्या लक्षात राहिली. यहोवाबद्दल आणि त्याच्या संघटनेबद्दल लोकांना शिकून घ्यायला मदत केल्यामुळे मला खूप समाधान मिळायचं. लोक यहोवाजवळ येत आहेत हे बघितल्यावर माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालंय असं मला वाटायचं.

तीन धाग्यांनी बनलेली दोरी

डॅनियल आणि एथेल वन मर्ल.

एथेल आणि माझं लग्न १९७१ मध्ये झालं

अविवाहित असल्यामुळे यहोवाची सेवा करणं माझ्यासाठी जास्त सोपं होतं. पण आता मला एका जोडीदाराची गरज भासू लागली. म्हणून मी यहोवाकडे प्रार्थना केली, की मला एक अशी बायको दे जी पूर्णवेळच्या सेवेत मला साथ देईल आणि जंगलातल्या या अतिशय कठीण परिस्थितीशी जुळवून घेईल. एका वर्षानंतर माझी एथेलशी भेट झाली. ती खास पायनियर म्हणून सेवा करायची आणि कठीण परिस्थितीतही यहोवाची सेवा करायला ती तयार होती. लहानपणापासूनच तिने प्रेषित पौलचं उदाहरण आपल्या डोळ्यांपुढे ठेवलं होतं. त्याच्याप्रमाणेच तिलासुद्धा सेवाकार्यात स्वतःला झोकून घ्यायचं होतं. १९७१ च्या सप्टेंबर महिन्यात आमचं लग्न झालं आणि आम्ही दोघांनी मिळून विभागीय कार्याला सुरुवात केली.

एथेलच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेमच होती. म्हणून लहानपणापासूनच तिला साध्या राहणीची सवय होती. यामुळे जंगलातल्या या भागांमध्ये प्रवासी कार्याशी जुळवून घेणं तिला सोपं गेलं. आम्ही जेव्हा दूरदूरच्या भागांत मंडळ्यांना भेट द्यायला जायचो तेव्हा फार कमी सामान सोबत घ्यायचो. आम्ही नद्यांमध्ये अंघोळ करायचो आणि तिथेच कपडे धुवायचो. भाऊबहीण आम्हाला जे काही खायला द्यायचे ते आम्ही अगदी आनंदाने खायचो. कधी इग्वाना प्राणी, पिऱ्‍हाना मासा किंवा कधी-कधी ते जंगलातून किंवा नदीतून जे काही पकडून आणायचे ते आम्ही खायचो. ताटं नसली की आम्ही केळीच्या पानावर जेवायचो. काटे-चमचे नसले की आम्ही हातांनीच जेवायचो. आम्हा दोघांनाही वाटतं, की यहोवाच्या सेवेत हे त्याग केल्यामुळे आमच्या विवाहाची तीन धाग्यांची दोरी आणखी मजबूत झाली आहे. (उप. ४:१२) हे सगळे अनुभव आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत. आणि ही सेवा निवडल्याचा आम्हाला कधीही पस्तावा झाला नाही.

मी सुरुवातीला सांगितलेला अनुभव आम्हाला जंगलातल्या अशाच एका दूरच्या ठिकाणाहून येताना आला होता. आमची बोट नदीच्या जोरदार प्रवाहात पाण्याखाली गेली होती. पण काही क्षणांतच ती परत वर आली. बरं झालं आम्ही सगळ्यांनीच लाईफ-जॅकेट घातले होते आणि त्यामुळे आम्ही बुडालो नाही. पण आमच्या बोटीत पाणी भरलं होतं. म्हणून आम्ही भांड्यांमधलं जेवण नदीत फेकून दिलं आणि मग त्याच भांड्यांनी आम्ही बोटीतलं पाणी बाहेर टाकू लागलो.

आता आमच्याजवळ खायला काहीच नव्हतं. म्हणून आम्ही नदीतून प्रवास करताना मासे पकडायचा प्रयत्न करू लागलो. पण आम्हाला एकही मासा सापडला नाही. म्हणून आम्हाला अन्‍न मिळावं अशी आम्ही यहोवाला प्रार्थना केली. प्रार्थना केल्यावर लगेचच एका भावाने मासे पकडण्यासाठी नदीत गळ टाकला आणि एक मोठा मासा गळाला लागला. तो मासा इतका मोठा होता की त्या दिवशी रात्री आम्ही पाच जण अगदी पोटभर जेवलो.

एक पती, पिता आणि प्रवासी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणं

पाच वर्ष सोबत मिळून प्रवासी कार्य केल्यानंतर एथेलला आणि मला एक अनपेक्षित आशीर्वाद मिळाला. आम्ही आईवडील बनणार होतो. मला हे कळलं तेव्हा खूप आनंद झाला. पण आमचं पुढचं जीवन कसं असेल याबद्दल मनात बरेच प्रश्‍न होते. एथेलला आणि मला पुढेही पूर्णवेळची सेवा करत राहायची मनापासून इच्छा होती. आमच्या मोठ्या मुलाचा, एथनियेलचा जन्म १९७६ मध्ये झाला. आणि मग अडीच वर्षांनी जोवानी या आमच्या दुसऱ्‍या मुलाचा जन्म झाला.

पूर्व सुरीनाममध्ये गोडो होलो इथे तपानहोनी नदीजवळ एका भावाच्या बाप्तिस्म्याच्या वेळी​—१९८३

सुरीनामच्या क्षेत्रातली त्या काळातली गरज लक्षात घेऊन शाखा कार्यालयाने मला माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यासोबतच, विभागीय पर्यवेक्षक म्हणून पुढेही सेवा करत राहायला सांगितलं. आमची मुलं लहान होती तोपर्यंत मला कमी मंडळ्या असलेल्या विभागांमध्ये नेमलं जायचं. यामुळे दर महिन्यात मी दोन आठवडे प्रवासी पर्यवेक्षक म्हणून मंडळ्यांना भेटी द्यायचो. आणि राहिलेला वेळ आम्हाला नेमण्यात आलेल्या मंडळीत पायनियर म्हणून सेवा करायचो. जेव्हा मी जवळपासच्या मंडळ्यांना भेटी द्यायचो तेव्हा मी एथेलला आणि मुलांनाही सोबत घेऊन जायचो. पण जंगलातल्या दूरदूरच्या भागांत असलेल्या मंडळ्यांना भेटी देताना आणि संमेलनांसाठी जाताना मी एकटाच प्रवास करायचो.

विभागीय कार्यात मी बऱ्‍याचदा बोटीने प्रवास करून दूरच्या मंडळयांना भेटी द्यायचो

माझ्या सगळ्या जबाबदाऱ्‍या व्यवस्थित पार पाडता याव्यात म्हणून मला सर्व गोष्टींचं खूप चांगल्या प्रकारे नियोजन करावं लागायचं. एकाही आठवड्यात आमचा कौटुंबिक अभ्यास चुकणार नाही याची मी काळजी घ्यायचो. मी मंडळ्यांना भेटी द्यायला जायचो तेव्हा एथेल मुलांसोबत मिळून कौटुंबिक अभ्यास करायची. शक्यतो, आम्ही कुटुंब मिळूनच सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करायचो. आणि आम्हा सगळ्यांना चांगल्या प्रकारचं मनोरंजन करता यावं म्हणून आम्ही मुलांसोबत मिळून खेळ खेळायचो किंवा फिरायला जायचो. भाषण तयार करण्यासाठी तसंच मंडळीची इतर काम करण्यासाठी मला बऱ्‍याचदा रात्री उशिरापर्यंत जागावं लागायचं. आणि एथेलसुद्धा नीतिवचनं ३१:१५ मध्ये सांगितलेल्या सद्‌गुणी बायकोप्रमाणे अगदी पहाटेच उठून कामाला लागायची. यामुळे मुलं शाळेला जाण्याआधी आम्हाला कुटुंब मिळून दैनिक वचनावर चर्चा करणं आणि सोबत मिळून नाष्टा करणं शक्य व्हायचं. एथेलसारखी बायको मला मिळाली याबद्दल मी यहोवाचा खूप आभारी आहे. कारण ती मेहनती, निःस्वार्थी आहे आणि आजपर्यंत तिने माझ्या सगळ्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करायला मला नेहमी मदत केली आहे.

आमच्या मुलांनी यहोवावर प्रेम करावं आणि सेवाकार्यात आवेशी असावं म्हणून त्यांना मदत करण्यासाठी आम्ही भरपूर मेहनत घेतली. आमच्या मुलांनी फक्‍त आम्हाला खूश करण्यासाठी पूर्णवेळची सेवा निवडण्यापेक्षा, स्वतःच्या  इच्छेने ती निवडावी असं आम्हाला नेहमी वाटायचं. पूर्णवेळची सेवा केल्यामुळे किती आनंद आणि आशीर्वाद मिळतात हे आम्ही त्यांना नेहमी सांगायचो. समस्या तर येतातच, पण यहोवाने आपल्या कुटुंबाला नेहमी कशी मदत केली आणि कसे आशीर्वाद दिले हे आम्ही त्यांना सांगायचो. तसंच, जे यहोवाला आपल्या जीवनात पहिलं स्थान देतात अशा भाऊबहिणींच्या सहवासात त्यांना राहायला मिळावं याची आम्ही नेहमी खातरी करायचो.

आमच्या कुटुंबाची काळजी घेत असताना यहोवाने आमच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी मला जे काही करता येईल ते मी नेहमी करायचा प्रयत्न करायचो. लग्नाआधी जेव्हा मी या दाट जंगलाच्या भागात खास पायनियर म्हणून सेवा करत होतो तेव्हा मी काटकसरीने राहायला आणि बचत करायला शिकलो. पण हे सगळं करूनही कधी-कधी आम्हाला आवश्‍यक असलेल्या गोष्टी मिळवणं शक्य नसायचं. पण त्या वेळी यहोवा नेहमी आम्हाला मदत करायचा आणि आमच्या गरजा भागवायचा. उदाहरणार्थ, १९८६ पासून १९९२ पर्यंत सुरीनाममध्ये गृहयुद्ध सुरू होतं. त्या काळात जीवनावश्‍यक गोष्टी मिळवणंही कठीण झालं होतं. पण तरीसुद्धा यहोवाने आमच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या.​—मत्त. ६:३२.

मागे वळून पाहताना

डावीकडून उजवीकडे: माझी पत्नी एथेल हिच्यासोबत

आमचा मोठा मुलगा एथनियेल त्याची पत्नी नटाली हिच्यासोबत

आमचा मुलगा जोवानी त्याची पत्नी क्रिस्टल हिच्यासोबत

आमच्या संपूर्ण जीवनात यहोवाने नेहमी आमची काळजी घेतील आहे. आणि त्यामुळे आम्ही खूप आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकलो. आमची मुलंसुद्धा यहोवाने आम्हाला दिलेला एक मौल्यवान आशीर्वाद आहे. आम्ही त्यांचं चांगल्याप्रकारे संगोपन करू शकलो आणि यहोवाची सेवा करायची इच्छा त्यांच्या मनात निर्माण करू शकलो याबद्दल आम्हाला खूप समाधान वाटतं. त्या दोघांनीही आपल्या जीवनात पूर्णवेळेची सेवा निवडली याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. एथनियेल आणि जोवानी या दोघांनाही ईश्‍वरशासित प्रशालांना उपस्थित राहायची संधी मिळाली. आणि आज ते दोघंही आपल्या पत्नींसोबत सुरीनामच्या शाखा कार्यालयात सेवा करत आहेत.

एथेल आणि माझं आता भरपूर वय झालंय. पण तरीसुद्धा आम्ही आजही खास पायनियर म्हणून यहोवाच्या सेवेत व्यस्त आहोत. खरंतर आम्ही इतके व्यस्त आहोत की मला अजूनही पोहायला शिकायची संधी मिळाली नाही. पण मला कसलाही पस्तावा नाही. आज मागे वळून पाहताना मला प्रामाणिकपणे असं वाटतं, की तरुण वयातच स्वतःला पूर्णवेळच्या सेवेत झोकून देणं हा माझ्या जीवनातला एक सर्वात चांगला निर्णय होता!

a इयरबुक ऑफ जेहोवाज विटनेसेस २००२, या पुस्तकाचं पान ७० पाहा.

b “माझ्या अपेक्षांपेक्षा मला खूप काही मिळालं,” असं शीर्षक असलेली विलेम वॉन सेईल यांची जीवन कथा ८ नोव्हेंबर, १९९९ च्या सावध राहा! अंकात आली आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा