वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w22 जून पृ. १४-१९
  • यहोवाचं प्रेम भीतीवर मात करायला मदत करतं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचं प्रेम भीतीवर मात करायला मदत करतं
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कुटुंबाच्या गरजा भागवता येणार नाहीत अशी भीती
  • माणसाची भीती
  • मरणाची भीती
  • तुमच्या भीतीवर मात करा
  • मानवाचे नव्हे तर देवाचे भय का धरावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • मनुष्याचे नव्हे तर देवाचे भय बाळगण्याची पाच कारणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • यहोवाचे भय धरा व त्याच्या पवित्र नामाचे गौरव करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • यहोवाचे भय मानणारे हृदय उत्पन्‍न करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
w22 जून पृ. १४-१९

अभ्यास लेख २६

यहोवाचं प्रेम भीतीवर मात करायला मदत करतं

“यहोवा माझ्या बाजूने आहे; मी घाबरणार नाही.”​—स्तो. ११८:६.

गीत ३ “देव प्रीती आहे”

सारांशa

१. आपल्या काही भाऊबहिणींना कशाची भीती वाटत होती?

खाली दिलेल्या काही खरोखरच्या अनुभवांचा विचार करा. नेल्सन आणि त्याची पत्नी मारीया यांना जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करायची इच्छा होती.b आणि यासाठी त्यांना काटकसरीने राहायला शिकावं लागणार होतं. पण कमी पैशात राहायला आपल्याला जमेल का, आपण खूश राहू का अशी भीती त्यांना होती. बेंजामिन नावाचा एक भाऊ अशा देशात राहतो जिथे आपल्या कामाला विरोध आहे. तो सत्यात आला तेव्हा त्याला माहीत होतं की आपला छळ होऊ शकतो. आणि त्याची त्याला भीतीही वाटत होती. पण यापेक्षा त्याला याची जास्त भीती होती, की तो साक्षीदार बनलाय हे कळल्यावर त्याच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय असेल. अनिता नावाच्या एका बहिणीला कळलं की तिला वेगाने पसरणारा कॅन्सर झालाय. उपचारासाठी तिला ऑपरेशन करावं लागणार होतं. पण रक्‍ताबद्दल आपल्या विश्‍वासाचा आदर करेल असा डॉक्टर तिला सापडत नव्हता. त्यामुळे आपण आता वाचणार नाही अशी भीती तिला वाटत होती.

२. आपण आपल्या भीतीवर मात करणं का गरजेचं आहे?

२ तुम्हालाही कधी या गोष्टींची भीती वाटली आहे का? आपल्यापैकी बऱ्‍याच जणांना अशी भीती वाटते. पण आपण जर या भीतीवर मात केली नाही तर आपण चुकीचे निर्णय घेऊन बसू आणि यामुळे यहोवासोबतचं आपलं नातं बिघडेल. सैतानाची हीच इच्छा आहे. तो आपल्याला वाटणाऱ्‍या भीतीचा फायदा घेतो. आपण यहोवाच्या आज्ञा मोडाव्यात, जसं की आपण राज्याच्या संदेशाचा प्रचार करू नये हाच त्याचा प्रयत्न असतो. (प्रकटी. १२:१७) खरंच सैतान खूप दुष्ट, निर्दयी आणि शक्‍तिशाली आहे. पण तुम्ही त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करू शकता. ते कसं?

३. भीतीवर मात करायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

३ यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि तो आपल्या बाजूने आहे या गोष्टीची जर आपल्याला खातरी असेल तर सैतानाने काही जरी केलं तरी आपल्याला भीती वाटणार नाही. (स्तो. ११८:६) उदाहरणार्थ, स्तोत्र ११८ च्या लेखकाला त्याच्या जीवनात खूप वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्याला बरेच शत्रू होते आणि त्यांच्यापैकी काही उच्च पदावर असलेले अधिकारीसुद्धा होते (वचन ९, १०). कधीकधी तर त्याला खूप मानसिक ताण सहन करावा लागला (वचन १३). यासोबतच त्याला यहोवाकडून ताडनही मिळालं होतं (वचन १८). तरीसुद्धा हे स्तोत्र लिहिणारा लेखक असं म्हणाला, “मी घाबरणार नाही.” आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही असं त्याला का वाटत होतं? कारण जरी यहोवाने त्याला ताडन दिलेलं असलं, तरी आपल्या स्वर्गीय पित्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे ही गोष्ट त्याला माहीत होती. आणि म्हणून त्याला खातरी होती, की त्याच्या जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी यहोवा त्याला प्रेमळपणे मदत करेल.​—स्तो. ११८:२९.

४. देवाचं आपल्यावर प्रेम आहे या गोष्टीची खातरी असल्यामुळे कोणत्या गोष्टींच्या भीतीवर आपल्याला मात करता येईल?

४ यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे या गोष्टीची आपल्याला खातरी असणं खूप महत्त्वाचंय. ही खातरी असल्यामुळे आपल्याला तीन गोष्टींच्या भीतीवर मात करता येईल. (१) कुटुंबाच्या गरजा भागवता येणार नाहीत अशी भीती; (२) माणसाची भीती, आणि (३) मरणाची भीती. पहिल्या परिच्छेदात उल्लेख केलेल्या भाऊबहिणींना त्यांच्या भीतीवर मात करता आली कारण त्यांना याची खातरी होती की देवाचं आपल्यावर प्रेम आहे.

कुटुंबाच्या गरजा भागवता येणार नाहीत अशी भीती

एक भाऊ आपल्या मुलासोबत जाळं टाकून मासे पकडत आहे.

एक भाऊ त्याच्या मुलासोबत आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मासे पकडायचं काम करत आहे (परिच्छेद ५ पाहा)

५. कुटुंबप्रमुखाला कोणत्या गोष्टींची खूप चिंता वाटत असेल? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

५ ख्रिस्ती कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्याच्या जबाबदारीला खूप गंभीरतेने घेतात. (१ तीम. ५:८) तुम्ही जर एक कुटुंबप्रमुख असाल, तर या महामारीच्या काळात आपली नोकरी जाते की काय, अशी भीती कदाचित तुम्हालाही वाटली असेल. घरात लागणाऱ्‍या गोष्टी कशा पुरवायच्या, घराचं भाडं किंवा हफ्ता कसा भरायचा याची चिंता तुम्हालाही लागली असेल. हातातली नोकरी गेली तर दुसरी नोकरी मिळेल की नाही, अशी भीतीसुद्धा तुम्हाला वाटली असेल. किंवा मग नेल्सन आणि मारीयासारखीच तुमचीही काही आध्यात्मिक ध्येयं असतील. पण कमी पैशात राहायला जमेल का, या भीतीमुळे तुम्ही जीवनात फेरबदल करायला घाबरत असाल. अशाच भीतीचा फायदा घेऊन सैतानाने बऱ्‍याच जणांना यहोवाची सेवा करण्यापासून रोखलंय.

६. सैतान आपल्याला काय पटवून द्यायचा प्रयत्न करतो?

६ सैतान आपल्याला असं पटवून द्यायचा प्रयत्न करतो, की यहोवाला आपली काळजी नाही आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाचा सांभाळ आपल्यालाच करावा लागेल. जर आपण असा विचार केला तर आपण आपल्या हातातली नोकरी कशीही करून टिकवायचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी आपण कदाचित बायबलच्या तत्त्वांशी तडजोड करायलाही तयार होऊ.

७. येशूने आपल्याला कोणती खातरी दिली आहे?

७ येशू आपल्या पित्याला जितकं चांगलं ओळखतो तितकं आणखी कोणीच ओळखत नाही. आणि म्हणून तो आपल्याला असं खातरीने सांगतो, की ‘आपल्याला कशाची गरज आहे हे आपण मागायच्या आधीच आपल्या पित्याला माहीत असतं.’ (मत्त. ६:८) आणि आपल्या गरजा पूर्ण करायची यहोवाला इच्छा आहे हेसुद्धा येशूला माहीत आहे. ख्रिस्ती या नात्याने आपण देवाच्या कुटुंबाचा भाग आहोत आणि यहोवा या कुटुंबाचा प्रमुख आहे. म्हणून आपण ही खातरी बाळगू शकतो, की १ तीमथ्य ५:८ मध्ये त्याने ख्रिस्ती कुटुंबप्रमुखासाठी जे तत्त्व दिलंय, त्याप्रमाणे तो स्वतःसुद्धा नक्कीच वागेल.

एक बहीण आणि तिची लहान मुलगी कपडे धूत आहेत. मंडळीतल्या एका जोडप्याने त्यांच्यासाठी जेवण बनवून आणलंय.

आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती यहोवा नक्की पुरवेल. कदाचित तो आपल्या भाऊबहिणींकडून आपल्याला मदत करेल (परिच्छेद ८ पाहा)d

८. (क) कुटुंबाच्या गरजा भागवता येणार नाहीत या भीतीवर मात करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? (मत्तय ६:३१-३३) (ख) चित्रात दाखवलेल्या जोडप्याचं आपण कशा प्रकारे अनुकरण करू शकतो?

८ यहोवाचं आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर प्रेम आहे याची जर आपल्याला खातरी असेल, तर तो आपल्या गरजा नक्की पुरवेल या गोष्टीवर भरवसा ठेवायला आपल्याला कठीण जाणार नाही. (मत्तय ६:३१-३३ वाचा.) आपल्या गरजा पूर्ण करायची यहोवाला खरंच इच्छा आहे, आणि तो एक प्रेमळ आणि उदार देव आहे. विचार करा, यहोवाने जेव्हा पृथ्वी बनवली तेव्हा त्याने जीवनासाठी आवश्‍यक असणाऱ्‍या गोष्टीच पुरवल्या नाहीत तर, जीवनाचा आनंद घेता येईल अशा गोष्टीसुद्धा पुरवल्या. (उत्प. २:९) शिवाय, कधीकधी आपल्याकडे फक्‍त मूलभूत गरजा भागवण्यापुरतं जरी असलं, तरी ते यहोवामुळेच मिळतंय  या गोष्टीचीसुद्धा आपण जाणीव ठेवली पाहिजे. (मत्त. ६:११) आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की यहोवा भविष्यात आपल्याला जे आशीर्वाद देणार आहे त्याच्या तुलनेत आज आपण जे त्याग करतोय ते काहीच नाहीत. इतकंच काय तर तो आपल्याला सर्वकाळाचं जीवनसुद्धा देईल. नेल्सन आणि मारीयाला याच गोष्टीची जाणीव झाली.​—यश. ६५:२१, २२.

९. नेल्सन आणि मारीया यांच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

९ नेल्सन आणि मारीया कोलंबियात राहत होते. त्यांचं एक सुंदर घर होतं आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्‍या होत्या. ते म्हणतात, “आम्ही बऱ्‍याचदा आमचं जीवन साधं ठेवून सेवा वाढवायचा विचार करायचो. पण कमी पैशात आपल्याला राहायला जमेल का? आपण खूश राहू का अशी भीती आम्हाला वाटायची.” मग या भीतीवर मात करायला कोणत्या गोष्टीमुळे त्यांना मदत झाली? यहोवाने आतापर्यंत ज्या मार्गांनी त्यांना आपलं प्रेम दाखवलंय त्यावर त्यांनी विचार केला. तेव्हा त्यांना खातरी पटली की यहोवा आपली काळजी घेईल आणि त्यामुळे त्यांनी आपल्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्‍या सोडून दिल्या. त्यांनी आपलं घर विकलं आणि प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी ते राहायला गेले. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल त्यांना कसं वाटतं? नेल्सन म्हणतात: “मत्तय ६:३३ मधले शब्द किती खरे आहेत ते आम्ही अनुभवलंय. यहोवाने आम्हाला काहीच कमी पडू दिलं नाही. आणि आज आम्ही आधीपेक्षा जास्त खूश आहोत.”

माणसाची भीती

१०. आज माणसालाच माणसाची भीती का वाटते?

१० आदाम आणि हव्वा यांनी यहोवाविरुद्ध बंड केल्यापासून माणूस माणसावर अत्याचार करत आलाय. (उप. ८:९) उदाहरणार्थ, अधिकाराच्या पदावर असलेले बरेच लोक, इतरांवर अत्याचार करतात. गुन्हेगार क्रूर अपराध करतात. शाळा कॉलेजात काही मुलं रॅगींग करतात आणि इतर मुलांना त्रास देतात. आणि काही जण तर आपल्या कुटुंबातल्या सदस्यांशी निर्दयीपणे वागतात. म्हणूनच आज माणसाला माणसाची भीती वाटते! मग सैतान या भीतीचा फायदा घ्यायचा कसा प्रयत्न करतो?

११-१२. माणसाच्या भीतीचा फायदा घेऊन सैतान काय करायचा प्रयत्न करतो?

११ सैतान माणसाच्या भीतीचा वापर करून आपल्याला प्रचारकार्य करण्यापासून थांबवायचा प्रयत्न करतो. तसंच, यहोवा ज्या इतर गोष्टी आपल्याला सांगतो त्या गोष्टी करण्यापासूनही सैतान रोखायचा प्रयत्न करतो. सैतानाच्या प्रभावामुळेच बऱ्‍याच सरकारांनी आपल्या कामावर बंदी आणली आहे आणि आपला छळ केलाय. (लूक २१:१२; प्रकटी. २:१०) तसंच, सैतानाच्या या जगात यहोवाच्या साक्षीदारांबद्दल बरीच चुकीची आणि खोटी माहिती पसरवली जात आहे. काही लोक या गोष्टींवर विश्‍वास ठेवून आपली थट्टा करतात किंवा आपल्याला मारहाणही करतात. (मत्त. १०:३६) पण सैतान करत असलेल्या या गोष्टींचं आपल्याला आश्‍चर्य वाटायला हवं का? नक्कीच नाही. कारण या गोष्टी तो पहिल्या शतकातसुद्धा करत होता. (प्रे. कार्यं ५:२७, २८, ४०) पण सरकारांकडून होणाऱ्‍या विरोधाची भीती ही एकच गोष्ट नाही जिचा फायदा आज सैतान घेत आहे.

एक तरुण भाऊ तयार होऊन सभेला जायला निघालाय, मागून त्याचे आईवडील त्याच्यावर ओरडत आहेत.

आपल्या घरच्यांनी जरी आपल्याला सोडून दिलं तरी यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे हा भरवसा आपण ठेवू शकतो (परिच्छेद १२-१४ पाहा)e

१२ काही जणांना सरकारी अधिकाऱ्‍यांकडून छळ होण्यापेक्षा या गोष्टीची जास्त भीती वाटते की आपण यहोवाचे साक्षीदार झालो हे जर आपल्या घरच्यांना कळालं तर ते काय म्हणतील. कारण त्यांचं त्यांच्या घरच्यांवर प्रेम असतं आणि त्यांनीसुद्धा यहोवाबद्दल जाणून घ्यावं आणि त्याच्यावर प्रेम करावं अशी त्यांची इच्छा असते. पण जेव्हा त्यांच्या घरचे लोक यहोवाबद्दल आणि त्याच्या लोकांबद्दल अपमानास्पद बोलतात तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं. हे खरंय की काही वेळा जे नातेवाईक अगोदर विरोध करायचे ते नंतर सत्यात आले. पण समजा आपल्या बाबतीत तसं झालं नाही आणि जर आपल्या नातेवाइकांनी आपण साक्षीदार झालो म्हणून आपल्यासोबतचे सगळे नातेसंबंध तोडून टाकले तर काय? अशा वेळी आपण काय करू?

१३. देवाच्या प्रेमाची खातरी असल्यामुळे आपण कुटुंबाच्या विरोधाचाही सामना कसा करू शकतो? (स्तोत्र २७:१०)

१३ स्तोत्र २७:१० (वाचा.) या वचनामुळे आपल्याला खूप सांत्वन मिळतं. यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे हे जेव्हा आपण आठवणीत ठेवतो, तेव्हा आपल्या घरच्यांकडून जरी विरोध झाला तरी आपण घाबरून जात नाही. तसंच विरोधाचा धीराने सामना केल्यामुळे यहोवा आपल्याला प्रतिफळ देईल, या गोष्टीवर आपला भरवसा असतो. घरच्यांनी जरी आपल्याला सोडून दिलं तरी यहोवा आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करेल आणि मन शांत ठेवून आनंदी राहायलाही तो आपल्याला मदत करेल. तसंच त्याच्यासोबतचं आपलं नातं टिकवून ठेवायलाही तो आपल्याला मदत करेल. बेंजामिन नावाच्या आपल्या भावानेही हेच अनुभवलं.

१४. बेंजामिनच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

१४ सत्यात आल्यामुळे छळ होऊ शकतो हे माहीत असूनही बेंजामिन यहोवाचा साक्षीदार बनला. यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे हे माहीत असल्यामुळेच बेंजामिनला माणसाच्या भीतीवर मात करता आली. तो सांगतो, “मला वाटलं होतं त्यापेक्षाही जास्त छळाचा मला सामना करावा लागला. पण सरकारकडून होणाऱ्‍या छळापेक्षा, मला घरच्यांकडून होणाऱ्‍या विरोधाची जास्त भीती वाटत होती. यहोवाचा साक्षीदार बनायच्या माझ्या निर्णयावर माझे वडील नाराज होतील आणि इतर नातेवाईक मला खालच्या नजरेने पाहतील अशी भीती मला वाटायची.” पण बेंजामिनला याची पूर्ण खातरी होती, की यहोवा ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांची तो नेहमी काळजी घेतो. तो पुढे सांगतो, “आर्थिक समस्या, भेदभाव आणि जमावाकडून होणाऱ्‍या हल्ल्याचा सामना करत असताना यहोवाने भाऊबहिणींना कशी मदत केली, या गोष्टीचा मी विचार केला. मला माहीत होतं, की मी जर यहोवाला विश्‍वासू राहिलो, तर यहोवा नक्की मला आशीर्वाद देईल. मला बऱ्‍याच वेळा अटक झाली आणि खूप मारहाणही करण्यात आली. पण जर आपण यहोवाला विश्‍वासू राहिलो, तर आपल्या गरजेच्या वेळी तो आपल्याला कशी मदत करतो हे मी प्रत्यक्ष अनुभवलं.” या अनुभवामुळे यहोवाच आपला खरा पिता आहे हे बेंजामिनला जाणवलं. आणि भाऊबहिणींनी रक्‍ताचं नातं असल्यासारखं त्याला प्रेम दिलं.

मरणाची भीती

१५. मरणाची भीती वाटणं ही एक स्वाभाविक गोष्ट का आहे?

१५ बायबलमध्ये मृत्यूला शत्रू म्हटलंय. (१ करिंथ. १५:२५, २६) मरणाच्या विचारानेच आपल्याला भीती वाटते. खासकरून जेव्हा आपण किंवा आपल्या जवळचे लोक गंभीर आजाराचा सामना करत असतात तेव्हा. पण आपल्याला मरणाची भीती का वाटते? कारण आपल्याला निर्माण करतानाच यहोवाने आपल्या मनात कायम जगण्याची इच्छा घातली आहे. (उप. ३:११) मरणाची भीती वाटत असल्यामुळेच आपण आपलं आरोग्य जपायचा प्रयत्न करतो. आणि त्यासाठी आपण चांगला आहार घेतो आणि व्यायाम करतो. तसंच आजारी पडल्यावर आपण लगेच डॉक्टरकडे जातो आणि औषधोपचार घेतो. तसंच आपण विनाकारण आपला जीव धोक्यात घालत नाही. त्यामुळे मरणाच्या भीतीमुळे एक प्रकारे आपलं संरक्षणच होतं असं म्हणता येईल.

१६. सैतान मरणाच्या भीतीचा फायदा घेण्याचा कसा प्रयत्न करतो?

१६ जीवन आपल्यासाठी मौल्यवान आहे, हे सैतानाला माहीत आहे. त्यामुळे त्याचा असा दावा आहे, की जीव वाचवण्यासाठी आपण काहीही करायला तयार होऊ. अगदी यहोवासोबतचं आपलं नातं तोडायलाही तयार होऊ. (ईयो. २:४, ५) सैतानाचा हा दावा किती खोटा आहे! पण सैतानाजवळ “मृत्यू घडवून आणण्याची ताकद” असल्यामुळे तो आपल्याला वाटणाऱ्‍या भीतीचा फायदा घेतो. आणि आपण यहोवाला सोडून द्यावं म्हणून तो आपल्याला मरणाचा धाक दाखवतो. (इब्री २:१४, १५) काही वेळा विरोधक आपल्याला धमकी देतात, की आपण जर आपला विश्‍वास सोडून दिला नाही, तर ते आपल्याला ठार मारतील. तर काही वेळा आपण गंभीर आजाराचा सामना करत असतो, तेव्हा सैतान या परिस्थितीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतो. आपण विश्‍वासाशी तडजोड करावी अशी त्याची इच्छा असते. अशा वेळी डॉक्टर किंवा सत्यात नसलेले आपले नातेवाईक आपल्यावर रक्‍त घेऊन देवाची आज्ञा मोडायचा दबाव टाकू शकतात. किंवा ते अशी एखादी उपचार पद्धत निवडायचा आपल्यावर दबाव टाकतील, जी बायबल तत्त्वांच्या विरोधात आहे.

१७. आपल्याला मृत्यूला घाबरण्याची गरज का नाही? (रोमकर ८:३७-३९)

१७ आपल्यापैकी कोणाचीही मरायची इच्छा नाही. पण काही कारणांमुळे जरी आपल्याला मृत्यू आला, तरी यहोवा आपल्यावर प्रेम करायचं सोडणार नाही हे आपल्याला माहीत आहे. (रोमकर ८:३७-३९ वाचा.) जेव्हा यहोवाचे विश्‍वासू सेवक मरतात, तेव्हा यहोवा त्यांना आठवणीत ठेवतो. ते जणू यहोवासाठी जिवंतच असतात. (लूक २०:३७, ३८) आणि त्यांना पुन्हा उठवण्यासाठी तो आतुर असतो. (ईयो. १४:१५) आपल्याला “सर्वकाळाचं जीवन मिळावं” म्हणून यहोवाने खूप मोठी किंमत मोजली आहे. (योहा. ३:१६) यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे आणि तो आपली किती काळजी करतो, हे आपल्याला माहीत आहे. म्हणून जेव्हा आपण खूप आजारी असतो किंवा आपल्याला ठार मारायची धमकी दिली जाते, तेव्हा यहोवाला सोडून देण्याऐवजी आपण सांत्वन, बुद्धी आणि शक्‍तीसाठी त्याच्याकडे वळलं पाहिजे. अनिता आणि तिच्या पतीनेसुद्धा हेच केलं.​—स्तो. ४१:३.

१८. अनिताच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

१८ अनिता ३५ वर्षांची होती तेव्हा तिला अतिशय दुर्मिळ आणि वेगाने वाढणारा कॅन्सर असल्याचं कळलं. पण यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे, हा भरवसा असल्यामुळेच ती मरणाच्या भीतीवर मात करू शकली. ती म्हणते: “मला कॅन्सर आहे हे कळलं तेव्हा आम्हाला मोठा धक्काच बसला. डॉक्टरांनी सांगितलं की मोठं ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर मी वाचणार नाही. आम्ही बऱ्‍याच डॉक्टरांकडे गेलो, पण कुणीच रक्‍ताशिवाय ऑपरेशन करायला तयार नव्हतं. मी खूप घाबरले होते, पण देवाची आज्ञा मोडून रक्‍त घ्यायचा मी विचारही करू शकत नव्हते. यहोवाने आयुष्यभर माझी खूप प्रेमाने काळजी घेतली होती. आणि आता त्याच्यावर असलेलं माझं प्रेम दाखवायची संधी मला होती. जेव्हा जेव्हा डॉक्टर मला वाईट बातमी द्यायचे, तेव्हा तेव्हा रक्‍त न घ्यायचा माझा निश्‍चय आणखी पक्का व्हायचा. मला कोणत्याही परिस्थितीत सैतानाला जिंकू द्यायचं नव्हतं. यहोवाला माझा अभिमान वाटावा अशी माझी इच्छा होती. शेवटी रक्‍ताशिवाय माझं ऑपरेशन झालं आणि ते व्यवस्थित पार पडलं. अजूनही मला आरोग्याच्या समस्या आहेतच. पण यहोवाने नेहमी आमची काळजी घेतली आहे आणि आम्हाला नेमकी ज्याची गरज होती ते त्याने नेहमी पुरवलंय. याचं एक उदाहरण म्हणजे, मला कॅन्सर आहे हे जेव्हा कळलं त्याच्या आदल्या दिवशी सभेमध्ये ‘दुःखद घटनांना धैर्याने तोंड देऊ या!’c या लेखाचा अभ्यास झाला होता. या लेखामुळे आम्हाला खूप धीर आणि सांत्वन मिळालं. आम्ही तो पुन्हा-पुन्हा वाचला. अशा लेखांमुळे आणि आध्यात्मिक गोष्टी नियमितपणे करत राहिल्यामुळे मला आणि माझ्या पतीला मन शांत ठेवायला खूप मदत झाली. तसंच आम्हाला चांगले निर्णयही घेता आले.”

तुमच्या भीतीवर मात करा

१९. लवकरच काय होणार आहे?

१९ यहोवाच्या मदतीने जगभरातल्या आपल्या भाऊबहिणींनी कठीण परिस्थितीवर मात केली आहे आणि त्यांनी यशस्वीपणे सैतानाचा सामना केला आहे. (१ पेत्र ५:८, ९) तुम्हीसुद्धा नक्कीच असं करू शकता! लवकरच यहोवा, येशूला आणि त्याच्यासोबत राज्य करणाऱ्‍यांना “सैतानाची कार्यं उद्ध्‌वस्त” करायची आज्ञा देईल. (१ योहान ३:८) त्यानंतर पृथ्वीवर असलेल्या देवाच्या सेवकांना “कसलीच भीती वाटणार नाही आणि कोणीही [त्यांना] घाबरवणार नाही.” (यश. ५४:१४; मीखा ४:४) पण तोपर्यंत आपण आपल्या भीतीवर मात करत राहण्यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे.

२०. भीतीवर मात करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

२० यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि तो नेहमी आपलं संरक्षण करेल असा भरवसा आपण दिवसेंदिवस वाढवत राहिलं पाहिजे. प्राचीन काळात यहोवाने त्याच्या सेवकांना कसं सांभाळलं यावर मनन केल्यामुळे आणि त्याबद्दल एकमेकांशी नेहमी बोलल्यामुळे आपल्याला असं करायला मदत होईल. तसंच कठीण परिस्थितीला तोंड देताना त्याने आपल्याला कशी मदत केली, हेसुद्धा आपण आठवणीत ठेवलं पाहिजे. यहोवाच्या मदतीने आपण नक्कीच आपल्या भीतीवर मात करू शकतो!​—स्तो. ३४:४.

खाली दिलेल्या गोष्टींच्या भीतीवर मात करायला यहोवाचं प्रेम आपल्याला कशी मदत करतं?

  • कुटुंबाच्या गरजा पुरवता येणार नाहीत अशी भीती.

  • माणसाची भीती.

  • मरणाची भीती.

गीत ५१ यहोवाला जडून राहू!

a भीती वाटणं नेहमी वाईटच असतं असं नाही. खरंतर त्यामुळे धोक्यांपासून आपलं संरक्षण होऊ शकतं. पण अवाजवी भीतीमुळे आपलं नुकसान होऊ शकतं. ते कसं? सैतान अशा भीतीचा फायदा घेऊ शकतो. म्हणूनच आपण अशा भीतीवर मात करायचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? यहोवा आपल्या बाजूने आहे आणि त्याचं आपल्यावर प्रेम आहे याची जर आपल्याला खातरी असेल, तर आपण कोणत्याही भीतीवर मात करू शकतो. आणि हेच या लेखात सांगण्यात आलंय.

b काही नावं बदलण्यात आली आहेत.

c १५ ऑक्टोबर, २०१२ च्या टेहळणी बुरूज अंकात पान ७-११ पाहा.

d चित्रांचं वर्णन: एक बहीण आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी खूप मेहनत करत आहे. आणि मंडळीतलं एक जोडपं त्यांच्यासाठी जेवण आणत आहेत.

e चित्रांचं वर्णन: एका तरुण भावाचे आईवडील त्याचा विरोध करत आहेत. पण यहोवा आपल्याला मदत करेल याची त्याला पक्की खातरी आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा