अभ्यास लेख २४
यहोवा क्षमा करायला नेहमी तयार असतो
“हे यहोवा, तू चांगला आणि क्षमाशील आहेस; तुला हाक मारणाऱ्या सर्वांवर तुझं अपार प्रेम आहे.”—स्तो. ८६:५.
गीत ६ देवाच्या सेवकाची प्रार्थना
सारांशa
१. उपदेशक ७:२० मध्ये शलमोन राजाने कोणती गोष्ट सांगितली जी अगदी खरी आहे?
शलमोन राजाने एकदा म्हटलं होतं, “जो नेहमी चांगलं करतो आणि कधीच पाप करत नाही, असा एकही नीतिमान माणूस या पृथ्वीवर नाही.” (उप. ७:२०) हे शब्द किती खरे आहेत! कारण आपण सगळेच पापी आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या हातून चुका होतात. (१ योहा. १:८) त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच वाटतं, की देवाने आणि इतरांनी आपल्याला क्षमा करावी.
२. एखादा जवळचा मित्र आपल्याला माफ करतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं?
२ तुम्ही कधी एखाद्या जवळच्या मित्राचं मन दुखावलंय का? नक्कीच असं झालं तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल आणि त्याच्यासोबतची तुमची मैत्री तुटू नये म्हणून तुम्ही त्याच्याकडे जाऊन माफीसुद्धा मागितली असेल. मग तुमच्या मित्राने तुम्हाला माफ केलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? नक्कीच तुमचं मन हलकं झालं असेल आणि तुम्हाला खूप आनंदही झाला असेल.
३. या लेखात आपण कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत?
३ यहोवा आपला सगळ्यात जवळचा मित्र असावा असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण कधीकधी आपण असं काहीतरी बोलतो किंवा करतो, ज्यामुळे त्याचं मन दुखावतं. तरीसुद्धा आपण असं खातरीने का म्हणू शकतो, की तो आपल्याला माफ करायला तयार आहे? शिवाय, आपण जसं एखाद्याला माफ करतो आणि यहोवा ज्या प्रकारे आपल्याला माफ करतो त्यात कोणता फरक आहे? आणि यहोवा कोणाला माफ करतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या लेखात मिळतील.
यहोवा माफ करायला तयार असतो
४. यहोवा क्षमा करायला नेहमी तयार असतो असं आपण खातरीने का म्हणू शकतो?
४ बायबल आपल्याला सांगतं की यहोवा माफ करायला नेहमी तयार असतो. सीनाय पर्वतावर जेव्हा यहोवाने एका स्वर्गदूताद्वारे मोशेला स्वतःबद्दल सांगितलं, तेव्हा तो म्हणाला: “यहोवा, यहोवा, दयाळू, करुणामय आणि सहनशील देव; एकनिष्ठ प्रेम आणि सत्याने भरलेला, हजारोंवर एकनिष्ठ प्रेम करणारा; चुका, अपराध आणि पाप क्षमा करणारा.” (निर्ग. ३४:६, ७) या शब्दांवरून आपल्याला कळतं, की यहोवा एक प्रेमळ आणि दयाळू देव आहे आणि तो पश्चात्ताप करणाऱ्यांना माफ करायला नेहमी तयार असतो.—नहे. ९:१७; स्तो. ८६:१५.
आपल्या व्यक्तिमत्त्वावर कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम झालाय हे यहोवाला माहीत आहे. (परिच्छेद ५ पाहा)
५. स्तोत्र १०३:१३, १४ यात सांगितल्याप्रमाणे यहोवा आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे ओळखत असल्यामुळे काय करतो?
५ यहोवा आपला निर्माणकर्ता असल्यामुळे त्याला आपल्याबद्दल सगळंकाही माहीत आहे. जरा विचार करा! या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्याला खडा न् खडा माहिती आहे. (स्तो. १३९:१५-१७) त्यामुळे, जन्मापासूनच आपल्यामध्ये कोणकोणत्या कमतरता आहेत याची त्याला कल्पना आहे. शिवाय आपल्या जीवनात आजपर्यंत कायकाय घडलंय, आणि आपल्या स्वभावावर आणि व्यक्तिमत्त्वावर त्याचा कसा परिणाम झालाय हेसुद्धा त्याला माहीत आहे. यहोवा आपल्याला इतक्या चांगल्या प्रकारे ओळखत असल्यामुळे तो काय करतो? तो नेहमी आपल्याशी दयाळूपणे वागतो.—स्तो. ७८:३९; स्तोत्र १०३:१३, १४ वाचा.
६. आपल्याला माफ करायची यहोवाची इच्छा आहे हे त्याने कसं दाखवून दिलं?
६ यहोवाने हे दाखवून दिलंय की आपल्याला माफ करायची त्याची खरंच इच्छा आहे. आदामने केलेल्या पापामुळे आपण सगळेच पाप आणि मृत्यूचे गुलाम बनलो आहोत हे यहोवाला माहीत आहे. (रोम. ५:१२) आणि या गुलामीतून स्वतःची किंवा दुसऱ्या कोणाची सुटका करणं आपल्या हातात नाही. (स्तो. ४९:७-९) पण आपल्यावर प्रेम असल्यामुळे यहोवाने दयाळूपणे आपली सुटका करण्यासाठी एक व्यवस्था केली. ही व्यवस्था काय होती? योहान ३:१६ यातून आपल्याला कळतं की त्याने त्याच्या एकुलत्या एका मुलाला आपल्यासाठी मरण सोसायला पृथ्वीवर पाठवलं. (मत्त. २०:२८; रोम. ५:१९) येशूने आपल्या बदल्यात मृत्यूची शिक्षा सोसली आणि त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांची पाप आणि मृत्यूपासून सुटका होणं शक्य झालं. (इब्री २:९) जरा कल्पना करा, जेव्हा यहोवाने आपल्या मुलाला वधस्तंभावर यातना सहन करताना पाहिलं असेल, तेव्हा त्याला किती दुःख झालं असेल! जर आपल्याला माफ करायची यहोवाची इच्छा नसती, तर त्याने आपल्या मुलाला इतक्या यातना सहन करून मरू दिलं असतं का?
७. यहोवा आपल्याला माफ करायला नेहमी तयार असतो हे बायबलमधल्या कोणत्या उदाहरणांवरून दिसून येतं?
७ बायबलमध्ये अशा बऱ्याच जणांची उदाहरणं आहेत, ज्यांना यहोवाने मोठ्या मनाने माफ केलं. (इफिस. ४:३२) तुम्हाला असं एखादं उदाहरण आठवतं का? कदाचित तुम्हाला मनश्शे राजाचं उदाहरण आठवलं असेल. त्याने बऱ्याच वाईट गोष्टी केल्या. जसं की, त्याने आपल्या राज्यातल्या लोकांना मूर्तिपूजा करायचं प्रोत्साहन दिलं. तसंच त्याने खोट्या देवांची उपासना केली आणि स्वतःच्या मुलांचा बळी दिला. इतकंच काय, तर त्याने यहोवाच्या पवित्र मंदिरात एका खोट्या देवाची मूर्ती ठेवली. म्हणूनच बायबलमध्ये मनश्शेबद्दल असं म्हटलंय: “त्याने फार मोठ्या प्रमाणात यहोवाच्या नजेरत जे वाईट ते केलं आणि त्याचा क्रोध भडकवला.” (२ इति. ३३:२-७) पण इतकं सगळं असूनही जेव्हा मनश्शेने मनापासून पश्चात्ताप केला तेव्हा यहोवाने त्याला माफ केलं. आणि त्याचं राज्यसुद्धा त्याला परत दिलं. (२ इति. ३३:१२, १३) तुम्हाला कदाचित दावीद राजाचं उदाहरणही आठवत असेल. त्याने व्यभिचार आणि खून यांसारखी गंभीर पापं केली होती. पण जेव्हा त्याने मनापासून पश्चात्ताप केला आणि आपली चूक कबूल केली, तेव्हा यहोवाने त्यालासुद्धा माफ केलं. (२ शमु. १२:९, १०, १३, १४) तर या उदाहरणांवरून आपण अगदी खातरीने असं म्हणू शकतो, की यहोवा आपल्याला माफ करायला नेहमी तयार असतो. पण आपण ज्या प्रकारे एकमेकांना माफ करतो, आणि यहोवा जसं आपल्याला माफ करतो, यात खूप मोठा फरक आहे. तो फरक काय आहे याबद्दल आता आपण पाहू या.
यहोवाचं क्षमा करणं इतकं वेगळं का?
८. यहोवाच सगळ्यात चांगला न्यायाधीश आहे असं का म्हणता येईल?
८ यहोवा “सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश” आहे. (उत्प. १८:२५) एक चांगला न्यायाधीश तोच असतो, ज्याला कायद्याची आणि नियमांची चांगली समज असते. यहोवाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर तो फक्त आपला न्यायाधीशच नाही तर आपल्याला नियम देणारासुद्धा आहे. (यश. ३३:२२) चूक काय आणि बरोबर काय याची यहोवाइतकी चांगली जाण दुसऱ्या कोणालाही नाही. यासोबतच एका चांगल्या न्यायाधीशाला आणखी कशाची गरज असते? कोणताही निर्णय देण्याआधी एखाद्या केसशी संबंधित असलेल्या सगळ्या बारीकसारीक गोष्टी त्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की यहोवा हाच सगळ्यात चांगला न्यायाधीश आहे, कारण त्याच्यापासून कोणतीही गोष्ट लपलेली नाही.
९. मानवांपेक्षा यहोवा एखाद्या व्यक्तीचा चांगल्या प्रकारे न्याय करू शकतो असं का म्हणता येईल?
९ यहोवा मानवी न्यायाधीशांसारखा नाही. कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत न्याय करताना त्याला त्या गोष्टीच्या सगळ्या बाजू माहीत असतात. (उत्प. १८:२०, २१; स्तो. ९०:८) मानवांसारखा तो फक्त पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींच्या आधारावर न्याय करत नाही. एखाद्या व्यक्तीमध्ये जन्मतःच असलेले गुण, तिच्यावर झालेले संस्कार, ती ज्या वातावरणात वाढली, तसंच तिच्या भावना आणि तिचे विचार या सगळ्या गोष्टींचा तिच्या वागण्यावर कसा परिणाम होतो, हे यहोवा अगदी चांगल्या प्रकारे समजू शकतो. शिवाय, आपल्या मनात काय आहे हेसुद्धा तो पाहू शकतो. त्यामुळे एखादी गोष्ट करण्यामागचा त्या व्यक्तीचा हेतू काय होता हे तो पूर्णपणे समजू शकतो. खरंच, यहोवापासून काहीही लपलेलं नाही! (इब्री ४:१३) त्यामुळे, जेव्हा यहोवा एखाद्या व्यक्तीला माफ करतो, तेव्हा सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच त्याने तो निर्णय घेतलेला असतो.
यहोवा न्यायी आहे. तो कधीच पक्षपात करत नाही आणि त्याला कोणीही लाच देऊ शकत नाही. (परिच्छेद १० पाहा)
१०. यहोवाचे निर्णय नेहमी योग्य आणि न्यायाला धरून असतात असं आपण का म्हणू शकतो? (अनुवाद ३२:४)
१० यहोवाचे निर्णय नेहमीच योग्य आणि न्यायाला धरून असतात. तो कधीच पक्षपात करत नाही. तसंच, एखादी व्यक्ती कशी दिसते, तिच्याजवळ किती पैसा आहे, समाजात तिला किती मान आहे किंवा तिच्याजवळ कोणत्या क्षमता आहेत हे पाहून यहोवा त्या व्यक्तीला माफ करायचा निर्णय घेत नाही. (१ शमु. १६:७; याको. २:१-४) कोणीही यहोवावर एखादा निर्णय घ्यायचा दबाव आणू शकत नाही किंवा त्याला लाच देऊ शकत नाही. (२ इति. १९:७) तसंच, यहोवा कधीही रागाच्या भरात किंवा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाही. (निर्ग. ३४:७) तर, प्रत्येक व्यक्तीला आणि तिच्या परिस्थितीला समजून घेऊन तो निर्णय घेतो. आणि म्हणून तो सगळ्यात चांगला न्यायाधीश आहे असं आपण म्हणू शकतो.—अनुवाद ३२:४ वाचा.
११. यहोवाचं माफ करणं मानवांपेक्षा कसं वेगळं आहे?
११ यहोवाचं माफ करणं मानवांपेक्षा किती वेगळं असतं, ही गोष्ट इब्री शास्त्रवचनांच्या लेखकांनीही ओळखली होती. आणि म्हणून काही ठिकाणी, त्यांनी यासाठी एक खास इब्री शब्द वापरला. एका पुस्तकात असं म्हटलंय, “देव एका पापी व्यक्तीला जसं माफ करतो, ते सांगण्यासाठीच त्यांनी हा शब्द वापरला. मानव ज्या प्रकारे एकमेकांना माफ करतात, त्याबाबतीत त्यांनी कधीही हा शब्द वापरला नाही. कारण मानवांच्या माफ करण्याला मर्यादा असतात.” फक्त यहोवाच पश्चात्ताप करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे माफ करू शकतो. जेव्हा यहोवा आपल्याला माफ करतो, तेव्हा आपल्याला कसा फायदा होतो?
१२-१३. (क) यहोवा एखाद्याला माफ करतो तेव्हा त्या व्यक्तीला कसा फायदा होतो? (ख) एखाद्याला माफ केल्यानंतर यहोवा काय करत नाही?
१२ यहोवाने आपल्याला माफ केलंय ही गोष्ट आपण जेव्हा मान्य करतो, तेव्हा आपल्याला “तजेला” मिळतो. याचा अर्थ, आपलं मन हलकं होतं, आपल्याला मनाची शांती मिळते आणि आपण पुन्हा शुद्ध विवेकाने यहोवाची उपासना करू शकतो. आणि हे फक्त तेव्हाच होतं जेव्हा आपल्याला “खुद्द यहोवाकडून” माफी मिळते. (प्रे. कार्यं ३:१९) आपल्याला माफ केल्यावर यहोवा पुन्हा एकदा आपल्याला मित्र म्हणून स्वीकारतो आणि जणू काही आपण ते पाप कधीच केलं नव्हतं अशा प्रकारे तो आपल्याशी वागतो.
१३ एकदा का यहोवाने आपल्याला माफ केलं, की मग तो पुन्हा कधीही आपल्याला त्या पापासाठी दोषी ठरवत नाही किंवा शिक्षा देत नाही. (यश. ४३:२५; यिर्म. ३१:३४) बायबल म्हणतं की, “पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितकेच त्याने आपले अपराध आपल्यापासून दूर केले आहेत.”b (स्तो. १०३:१२) यहोवा आपल्याला किती मोठ्या मनाने माफ करतो, याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपलं मन भरून येतं. यहोवा किती महान आहे आणि आपल्यावर त्याचं किती प्रेम आहे, याची आपल्याला जाणीव होते. (स्तो. १३०:४) पण यहोवा कोणाला माफ करतो?
यहोवा कोणाला माफ करतो?
१४. यहोवा कोणत्या गोष्टींच्या आधारावर न्याय करतो याबद्दल आत्तापर्यंत आपण काय शिकलो?
१४ आतापर्यंत आपण हे शिकलो, की यहोवा आपला निर्माणकर्ता, आपल्याला नियम देणारा आणि आपला न्यायाधीश आहे आणि त्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. त्याच्यापासून काहीही लपलेलं नाही. आणि न्याय करताना तो या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच न्याय करतो. आपण हेही पाहिलं, की एखाद्याला माफ करायचं की नाही, हे ठरवताना त्याने केलेलं पाप लहान आहे की मोठं हे यहोवा पाहत नाही. तर मग यहोवा कोणत्या गोष्टी पाहतो?
१५. लूक १२:४७, ४८ या वचनांप्रमाणे यहोवा कोणती गोष्ट पाहतो?
१५ एखाद्याला माफ करायचं की नाही, हे ठरवताना सगळ्यात आधी यहोवा हे पाहतो, की आपण चूक करत आहोत हे त्या व्यक्तीला माहीत होतं का? येशूनेही ही गोष्ट स्पष्ट केली. याबद्दल आपण लूक १२:४७, ४८ (वाचा.) या वचनांमध्ये वाचतो. जो जाणूनबुजून एखादी वाईट गोष्ट करतो, तो एक गंभीर पाप करतो. कारण आपण जे करतोय ते चुकीचं आहे आणि ते यहोवाला आवडणार नाही हे माहीत असूनसुद्धा तो वाईट काम करतो. अशा व्यक्तीला कदाचित यहोवा माफ करणार नाही. (मार्क ३:२९; योहा. ९:४१) पण तुम्ही म्हणाल, कधीकधी आपणसुद्धा एखादी गोष्ट चुकीची आहे हे माहीत असून ती करतो. मग यहोवा आपल्याला माफ करण्याची काही शक्यता आहे का? हो! कारण एखाद्याला माफ करायचं की नाही हे ठरवताना यहोवा आणखी एक गोष्ट पाहतो. ती कोणती हे आता आपण पाहू या.
आपण मनापासून पश्चात्ताप केला तर यहोवा आपल्याला नक्की क्षमा करेल (परिच्छेद १६-१७ पाहा)
१६. पश्चात्ताप करणं म्हणजे काय आणि मनापासून पश्चात्ताप करणं का महत्त्वाचं आहे?
१६ आणखी एक गोष्ट जी यहोवा पाहतो, ती म्हणजे चूक केलेल्या व्यक्तीला मनापासून पश्चात्ताप झालाय का? पश्चात्ताप करणं म्हणजे काय? पश्चात्ताप करणं म्हणजे “आपल्या विचारांत आणि मनोवृत्तीत बदल करणं.” तसंच आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी झाल्या आहेत किंवा ज्या चांगल्या गोष्टी आपण केल्या नाहीत त्याबद्दल मनापासून वाईट वाटणं. पश्चात्ताप करणाऱ्या व्यक्तीला फक्त आपल्या चुकांबद्दलच वाईट वाटत नाही, तर आपण यहोवासोबतचं आपलं नातं इतकं कमजोर होऊ दिलं आणि त्यामुळे आपल्या हातून या चुका झाल्या आहेत, याचंही त्याला खूप वाईट वाटतं. मनश्शे आणि दावीद या दोन्ही राजांनी खूप गंभीर पापं केली होती. पण तरीही यहोवाने त्यांना क्षमा केली. कारण त्यांनी मनापासून पश्चात्ताप केला होता. (१ राजे १४:८) तर यावरून हे कळतं, की आपण खरंच पश्चात्ताप केला आहे हे जर यहोवाला दिसलं तरच तो आपल्याला माफ करेल. पण आपण केलेल्या चुकांबद्दल वाईट वाटणं इतकंच पुरेसं नाही. तर त्यासोबत आपण योग्य पावलं उचलायला तयार असलं पाहिजे.c कारण एखाद्याला माफ करायचा निर्णय घेताना यहोवा आणखी एक गोष्ट पाहतो.
१७. स्वतःमध्ये बदल करणं म्हणजे नेमकं काय आणि हे का महत्त्वाचं आहे? (यशया ५५:७)
१७ एखाद्याला माफ करायचा निर्णय घेताना आणखी एक गोष्ट जी यहोवा पाहतो, ती म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःमध्ये बदल केलाय का? स्वतःमध्ये बदल करणं किंवा “मागे वळणं” म्हणजे आपला चुकीचा मार्ग सोडून देणं आणि यहोवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे जगायचा प्रयत्न करणं. (यशया ५५:७ वाचा.) पाप करणाऱ्या व्यक्तीने आपल्या विचार करायच्या पद्धतीत बदल केला पाहिजे आणि यहोवासारखा विचार करायला शिकलं पाहिजे. (रोम. १२:२; इफिस. ४:२३) आपले पूर्वीचे वाईट विचार आणि कामं पूर्णपणे सोडून द्यायचा त्याने निश्चय केला पाहिजे. (कलस्सै. ३:७-१०) हे खरं आहे, की ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर असलेल्या आपल्या विश्वासाच्या आधारावर यहोवा आपल्याला माफ करतो. पण त्यासाठी आपण आपल्या वागणुकीत बदल करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत हे त्याला दिसून आलं पाहिजे. तरच तो या बलिदानाच्या आधारावर आपल्याला माफ करेल.—१ योहा. १:७.
यहोवा तुम्हाला नक्की माफ करेल यावर भरवसा ठेवा
१८. यहोवाच्या क्षमा करण्याबद्दल आपण या लेखात कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी शिकलो?
१८ आत्तापर्यंत आपण कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी शिकलो, हे थोडक्यात पाहू या. आपण पाहिलं, की क्षमा करायच्या बाबतीत यहोवाची तुलना कोणाशीही केली जाऊ शकत नाही. आपण असं का म्हणू शकतो? कारण तो क्षमा करायला नेहमी तयार असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याबद्दल त्याला खडा न् खडा माहीत आहे. तो आपल्याला अगदी पूर्णपणे ओळखतो आणि आपण मनापासून पश्चात्ताप केलाय की नाही हे फक्त तोच पाहू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा यहोवा आपल्या पापांची क्षमा करतो, तेव्हा तो ती जणू कायमची पुसून टाकतो. यामुळे आपण शुद्ध विवेकाने त्याची उपासना करू शकतो आणि तो पुन्हा एकदा आपल्याला मित्र म्हणून स्वीकारतो.
१९. अपरिपूर्ण असतानाही आपण आनंदी का राहू शकतो?
१९ जोपर्यंत आपण अपरिपूर्ण आहोत तोपर्यंत साहजिकच आपल्या हातून पाप होत राहील. पण इन्साईट ऑन द स्क्रिप्चर्स, खंड २ पान ७७१ वर दिलेल्या शब्दांमधून आपल्याला सांत्वन मिळू शकतं. तिथं म्हटलंय: “आपल्या सेवकांचा न्याय करताना यहोवा दयाळूपणे ही गोष्ट लक्षात घेतो की ते सगळे अपरिपूर्ण आहेत. आणि म्हणून अपरिपूर्णतेमुळे होणाऱ्या चुकांबद्दल आपण सतत दुःखी राहायची किंवा मनात दोष भावना बाळगायची गरज नाही. (स्तो १०३:८-१४; १३०:३) जर आपण देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागायचा मनापासून प्रयत्न करत असू तर आपण आनंदी राहू शकतो. (फिलि ४:४-६; १यो ३:१९-२२).” हे समजल्यामुळे खरंच आपल्याला किती दिलासा मिळतो.
२०. पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?
२० तर या लेखात आपण पाहिलं, की आपल्या हातून झालेल्या चुकांबद्दल जेव्हा आपल्याला मनापासून वाईट वाटतं, तेव्हा यहोवा आपल्याला माफ करायला तयार असतो. याबद्दल आपण खरंच त्याचे किती आभार मानले पाहिजेत! पण आपणही यहोवासारखंच इतरांना कसं माफ करू शकतो? आपल्या माफ करण्यात आणि यहोवाच्या माफ करण्यात कोणत्या गोष्टी सारख्या आहेत, आणि कोणत्या गोष्टी वेगळ्या आहेत? आणि हा फरक समजून घेणं का महत्त्वाचं आहे? या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या लेखात पाहू.
गीत २२ “यहोवा माझा मेंढपाळ”
a बायबलमध्ये सांगितलंय की आपल्या हातून पाप झालं तरी, जर आपण पश्चात्ताप केला तर यहोवा आपल्याला क्षमा करायला तयार आहे. पण तरी कधीकधी आपल्याला असं वाटू शकतं की यहोवा मला कधीच माफ करणार नाही. मग यहोवा आपल्याला क्षमा करायला नेहमी तयार असतो असं आपण खात्रीने का म्हणू शकतो? याच विषयावर आपण या लेखात चर्चा करणार आहोत.
c शब्दांचा अर्थ: “पश्चात्ताप करणं” म्हणजे आपल्या मनोवृत्तीत बदल करणं. आपण पूर्वी ज्या प्रकारे जगत होतो, ज्या चुका आपण केल्या किंवा ज्या चांगल्या गोष्टी करण्यात आपण कमी पडलो, त्याबद्दल मनापासून वाईट वाटणं. एखाद्या व्यक्तीला मनापासून पश्चात्ताप होतो तेव्हा ते तिच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येतं. ती चुकीचा मार्ग सोडून देते आणि योग्य मार्गाने चालते.