वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w21 ऑक्टोबर पृ. १४-१७
  • यहोवासोबत तुटलेली मैत्री पुन्हा जोडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवासोबत तुटलेली मैत्री पुन्हा जोडा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कोणत्या अडचणी येऊ शकतात?
  • पूर्ण करता येतील अशी ध्येयं ठेवा
  • हार मानू नका!
  • वडिलांची मदत घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • देवाच्या दयेचे आज अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • यहोवाचं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • वडिलांनो, प्रेषित पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
w21 ऑक्टोबर पृ. १४-१७
आपलं उद्ध्‌वस्त झालेलं घर परत उभं करण्यासाठी किती वेळ आणि परिश्रम लागतील याचा विचार करून एका भावाला खूप दडपण येतं.

यहोवासोबत तुटलेली मैत्री पुन्हा जोडा

दरवर्षी, यहोवापासून दूर गेलेली त्याची कित्येक मेंढरं पुन्हा त्याच्याकडे येतात. जेव्हा असं एखादं मेंढरू परत येतं, तेव्हा स्वर्गात किती “आनंद” होत असेल याचा विचार करा! (लूक १५:७, १०) अशा मेंढरांपैकी तुम्ही एक असाल, तर ख्रिस्ती मंडळीत परत येण्यासाठी तुम्ही जी काही मेहनत घेतली ती पाहून येशूला, स्वर्गदूतांना आणि यहोवाला नक्कीच खूप आनंद झाला असेल. पण यहोवासोबत पुन्हा मैत्रीचं नातं जोडताना तुमच्यासमोर काही अडचणी येऊ शकतात. त्या काय आहेत? आणि त्यांचा सामना तुम्ही कसा करू शकता?

कोणत्या अडचणी येऊ शकतात?

ख्रिस्ती मंडळीत परत आल्यानंतरही अनेकांच्या मनात दोषीपणाच्या किंवा निराशेच्या भावना असतात. दावीद राजालासुद्धा असंच वाटलं होतं. यहोवाने आपल्या पापांची क्षमा केली आहे हे माहीत असूनही त्याने म्हटलं: “माझ्या चुकांनी मला घेरलंय.” (स्तो. ४०:१२; ६५:३) यहोवाकडे परत आल्यावरही एखाद्याच्या मनात अपराधीपणाची भावना असू शकते किंवा त्याला स्वतःची लाज वाटू शकते. एलिझाबेथचाचa विचार करा. जवळपास २० वर्षं ती बहिष्कृत होती. ती म्हणते: “मला असं वाटत होतं, की यहोवा मला कधीच माफ करणार नाही.” पण तुम्ही जर असं निराश झालात, तर तुमचा विश्‍वास आणखी कमजोर होईल. (नीति. २४:१०) म्हणून असं कधीच होऊ देऊ नका.

यहोवासोबत पुन्हा जवळची मैत्री करण्यासाठी आपल्याला खूप काही करावं लागेल, आणि ते करणं कदाचित आपल्याला जमणार नाही असं काहींना वाटतं. ॲन्थनीला मंडळीत परत घेण्यात आलं, तेव्हा त्याला कसं वाटत होतं त्याबद्दल तो म्हणतो: “साक्षीदार असताना मी जे काही शिकलो होतो किंवा करत होतो त्यातलं बरंच काही मी विसरून गेलो असं मला वाटत होतं.” ॲन्थनीसारखंच काहींना अशा भावनेमुळे आध्यात्मिक गोष्टींमध्ये पूर्णपणे सहभाग घ्यायला संकोच वाटू शकतो.

हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ या. एखाद्याने खूप हौसेने आपलं घर बांधलं असेल. पण एका मोठ्या वादळामुळे त्या घराची खूप पडझड होते. आणि ते पुन्हा उभं करण्यासाठी आपल्याला किती वेळ आणि परिश्रम घ्यावे लागतील याचा विचार करून त्याला दडपण येतं. अगदी तसंच, एखादं गंभीर पाप केल्यामुळे यहोवासोबतची तुमची मैत्री तुटली, तर ती पुन्हा जोडण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल असं तुम्हाला वाटू शकतं. पण त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही. कारण यहोवा तुम्हाला मदत करू शकतो.

यहोवा म्हणतो: “आता या, आपण आपसात बोलू; म्हणजे मी तुम्हाला पुन्हा माझ्याशी चांगलं नातं जोडायला मदत करीन.” (यश. १:१८) यहोवासोबत चांगलं नातं जोडण्यासाठी तुम्ही आधीच खूप मेहनत घेतली आहे. तुम्ही त्याच्याकडे परत आला आहात हे पाहून त्याला खूप आनंद होतो. कारण तुमचं उदाहरण देऊन तो सैतानाला सडेतोड उत्तर देऊ शकतो.—नीति. २७:११.

यहोवाकडे परत येऊन तुम्ही त्याच्या जवळ आला आहात. आणि तोसुद्धा तुमच्या जवळ यायचं वचन देतो. (याको. ४:८) तुम्ही मंडळीत परत आला आहात हे इतरांना समजणं ही एक चांगली गोष्ट आहे. पण तेवढंच पुरेसं नाही. तर यहोवावरचं तुमचं प्रेम तुम्ही वाढवत राहिलं पाहिजे. कारण तो तुमचा पिता आणि मित्र आहे. मग तुम्हाला हे प्रेम कसं वाढवता येईल?

पूर्ण करता येतील अशी ध्येयं ठेवा

तुम्ही यहोवाबद्दल आणि त्याच्या सुंदर नवीन जगाबद्दल पूर्वी जे काही शिकला होता ते तुमच्या चांगलं लक्षात असेल. कारण या बायबलच्या मूलभूत शिकवणी आहेत. पण यहोवासोबत पुन्हा जवळचं नातं जोडण्यासाठी तुम्ही पूर्वी ज्या गोष्टी करत होता त्या तुम्हाला परत सुरू कराव्या लागतील. जसं की, प्रचार करणं, सभांना हजर राहणं आणि भाऊबहिणींसोबत वेळ घालवणं. त्यासाठी तुम्ही छोट्याछोट्या गोष्टी करू शकता. तुम्ही अशी ध्येयं ठेवू शकता:

नेहमी यहोवाशी बोला:  स्वर्गातल्या तुमच्या पित्याला, यहोवाला हे माहीत आहे, की तुम्ही केलेल्या चुकीमुळे तुमचं मन जर तुम्हाला सतत खात राहिलं, तर प्रार्थना करणं तुम्हाला कठीण जाऊ शकतं. (रोम. ८:२६) पण असं असलं, तरी यहोवाला “प्रार्थना करत राहा,” आणि तुम्हाला त्याच्यासोबत पुन्हा मैत्री करायची किती इच्छा आहे हे त्याला सांगा. (रोम. १२:१२) या बाबतीत ॲन्ड्रू काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या. तो म्हणतो: “मला आठवतं, त्या वेळी माझं मन मला सतत दोष देत होतं. मला स्वतःची खूप लाज वाटत होती. पण प्रत्येक वेळी प्रार्थना केल्यावर मला फार बरं वाटायचं. माझं मन खूप शांत व्हायचं.” पण प्रार्थनेत काय म्हणायचं हे जर तुम्हाला सुचत नसेल, तर स्तोत्र ५१ आणि ६५ मध्ये दिलेल्या प्रार्थनांवर विचार करा. या प्रार्थना दावीद राजाने त्याला पश्‍चात्ताप झाल्यावर केल्या होत्या.

बायबलचा नियमितपणे अभ्यास करा:  यामुळे तुमचा विश्‍वास मजबूत होईल आणि यहोवावरचं तुमचं प्रेम वाढेल. (स्तो. १९:७-११) फिलिप म्हणतो: “मी रोज बायबल वाचत नव्हतो आणि नियमितपणे बायबलचा अभ्यास करत नव्हतो. त्यामुळेच खरंतर माझा विश्‍वास कमजोर झाला आणि मी यहोवाचं मन दुखावलं.” तो पुढे म्हणतो: “मला पुन्हा ती चूक करायची नव्हती. म्हणून मी रोज बायबल वाचायचं आणि नियमितपणे वैयक्‍तिक अभ्यास करायचं ठरवलं.” तुम्हीसुद्धा हेच करू शकता. पण वैयक्‍तिक अभ्यास करण्यासाठी कोणते विषय निवडायचे हे जर तुम्हाला समजत नसेल तर काय? अशा वेळी यहोवासोबत चांगलं नातं असलेल्या एखाद्या भावाची किंवा बहिणीची तुम्ही मदत घेऊ शकता.

मंडळीतल्या भाऊबहिणींशी पुन्हा मैत्री करा.  मंडळीत परत येणाऱ्‍या काहींना अशी चिंता असते, की भाऊबहीण आपल्याबद्दल काय विचार करतील. लीसा म्हणते: “मला खूप लाज वाटत होती. मी माझ्या भाऊबहिणींचं मन फार दुखावलं, त्यांना निराश केलं असं मला वाटत होतं. आणि खूप दिवस मला असंच वाटत राहिलं.” पण हे नेहमी लक्षात असू द्या, की तुम्हाला यहोवासोबत पुन्हा जवळचं नातं जोडता यावं म्हणून मंडळीतल्या वडिलांना आणि इतरांना तुम्हाला मदत करायची खूप इच्छा आहे. (“मंडळीतले वडील कशी मदत करू शकतात?” ही चौकट पाहा) तुम्ही परत आलात याचा त्यांना खूप आनंद होतो आणि तुम्हीही आनंदी असावं असं त्यांना वाटतं.—नीति. १७:१७.

मंडळीतल्या भाऊबहिणींशी पुन्हा जवळची मैत्री करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? त्यासाठी त्यांच्यासोबत सर्व सभांना हजर राहा आणि त्यांच्यासोबत मिळून प्रचार कार्य करा. त्यामुळे कशी मदत होईल? फेलिक्स म्हणतो: “मी कधी यहोवाकडे परत येतो याची मंडळी आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे भाऊबहिणींचं माझ्यावर अजूनही किती प्रेम आहे हे मला जाणवलं. मला पुन्हा मंडळीचा भाग असल्यासारखं वाटलं. यहोवाने मला क्षमा केली आहे आणि त्यामुळे मी परत शुद्ध मनाने त्याची सेवा करू शकतो हे मला समजलं.” (“तुम्ही काय करू शकता?” ही चौकट पाहा)

तुम्ही काय करू शकता?

तुम्ही पूर्वी ज्या आध्यात्मिक गोष्टी करत होता त्या परत सुरू करा

एक वडील यहोवाकडे परत आलेल्या एका भावासोबत प्रार्थना करत आहेत.

नेहमी यहोवाशी बोला

यहोवासोबत परत मैत्री करायची तुमची किती इच्छा आहे हे त्याला सांगा. मंडळीतले वडीलही तुमच्यासाठी आणि तुमच्यासोबत प्रार्थना करतील

ते वडील त्याच्यासोबत “यहोवा के करीब आओ” या पुस्तकातून बायबल अभ्यास करत आहेत.

बायबलचा नियमितपणे अभ्यास करा

यामुळे तुमचा विश्‍वास मजबूत होईल आणि यहोवावरचं तुमचं प्रेम वाढेल

तो भाऊ मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवत आहे.

मंडळीतल्या भाऊबहिणींशी पुन्हा मैत्री करा

भाऊबहिणींसोबत सभांना हजर राहा आणि त्यांच्यासोबत मिळून प्रचारकार्य करा

हार मानू नका!

तुम्ही यहोवासोबत पुन्हा जवळची मैत्री जोडायचा प्रयत्न करता तेव्हा सैतान शांत बसणार नाही. तो सतत तुमच्यासमोर कोणत्या ना कोणत्या समस्या आणेल. (लूक ४:१३) म्हणून आत्तापासूनच यहोवासोबतचं तुमचं नातं मजबूत करत राहा.

आपल्या मेंढरांविषयी यहोवा असं वचन देतो: “मी हरवलेल्या मेंढराला शोधून काढीन आणि भरकटलेल्या मेंढराला परत घेऊन येईन. मी जखमी झालेल्या मेंढराची मलमपट्टी करीन आणि कमजोराला बळ देईन.” (यहे. ३४:१६) यहोवाने अनेकांना त्याच्यासोबत पुन्हा एकदा जवळची मैत्री जोडायला मदत केली आहे. त्यामुळे तो तुम्हालाही त्याच्यासोबत जवळची मैत्री करायला मदत करेल याची खातरी बाळगा.

मंडळीतले वडील कशी मदत करू शकतात?

ते वडील त्या भावाला त्याचं उद्ध्‌वस्त झालेलं घर पुन्हा बांधायला मदत करत आहेत.

मंडळीत परत आलेल्या व्यक्‍तीला यहोवासोबत पुन्हा जवळची मैत्री करायला वडील बरंच काही करू शकतात. अशा व्यक्‍तीला मदत करण्यासाठी वडील काय करू शकतात ते आपण पुढे पाहू या.

त्यांना धीर द्या. प्रेषित पौलला माहीत होतं, की यहोवाकडे परत आलेली व्यक्‍ती “दुःखात बुडून” जाऊ शकते. (२ करिंथ. २:७) तिच्या मनात दोषीपणाची आणि निराशेची भावना असू शकते. म्हणूनच पौलने मंडळीला असा सल्ला दिला, की त्या व्यक्‍तीला “प्रेमळपणे क्षमा करून सांत्वन द्या.” मंडळीत परत आलेल्या व्यक्‍तीला याची जाणीव होणं खूप गरजेचं आहे, की यहोवाचं आणि भाऊबहिणींचं अजूनही तिच्यावर खूप प्रेम आहे. म्हणून तिला प्रोत्साहन देत राहा आणि हवी ती मदत करत राहा, म्हणजे ती निराश होणार नाही.

त्यांच्यासोबत प्रार्थना करा: बायबल म्हणतं: “नीतिमान माणसाने केलेल्या याचनेत खूप ताकद असते.” (याको. ५:१६) आधी उल्लेख केलेली लीसा म्हणते: “माझ्या मनात ज्या शंका होत्या, ज्या गोष्टींची मला भीती वाटत होती, ते सगळं मी वडिलांना सांगितलं. तेव्हा त्यांनी माझ्यासोबत प्रार्थना केली. त्यावरून मला समजलं, की माझ्याबद्दल त्यांच्या मनात राग नाही. उलट, यहोवासोबत जवळचं नातं जोडायला त्यांना मला मदत करायची इच्छा आहे.” तसंच, थॉमस म्हणतो: “वडिलांनी केलेल्या प्रार्थनांमुळे मला याची खातरी मिळाली, की यहोवाचं माझ्यावर खरंच प्रेम आहे आणि तो माझ्यातल्या चांगल्या गोष्टी पाहतो, फक्‍त वाईट नाही.”

त्यांच्याशी मैत्री करा: मंडळीत परत आलेल्या व्यक्‍तीला भाऊबहिणींच्या मैत्रीची खूप गरज असते. म्हणून जस्टीन नावाचे एक वडील म्हणतात: “त्यांना तुमच्यासोबत सेवाकार्य करायसाठी बोलवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटा. कारण त्यांच्याशी मैत्री करणं खूप गरजेचं आहे!” तसंच, हेन्री नावाचे एक वडील म्हणतात: “जेव्हा मंडळीतले वडील अशा व्यक्‍तीशी मैत्री करण्यासाठी पुढे येतात तेव्हा मंडळीतले इतर भाऊबहीणही तेच करायचा प्रयत्न करतात.”

वैयक्‍तिक अभ्यास करण्यासाठी त्यांना मदत करा: यहोवासोबत चांगलं नातं असलेले भाऊबहीण, अशा व्यक्‍तीला नियमितपणे वैयक्‍तिक अभ्यास करायला मदत करू शकतात. डेरिक नावाचे एक वडील म्हणतात: “माझ्या वैयक्‍तिक अभ्यासात मला जे नवीन मुद्दे शिकायला मिळतात ते मी त्यांना सांगतो. त्यामुळे मला स्वतःला किती फायदा आणि आनंद होतो हे त्यांना दिसून येतं. इतकंच नाही, तर कधीकधी एखाद्या लेखाचा आम्ही एकत्र मिळून अभ्यास करतो.” तसंच, क्लेटन नावाचे दुसरे एक वडील म्हणतात: “त्यांच्या परिस्थितीशी मिळतीजुळती उदाहरणं बायबलमधून शोधायचं मी त्यांना प्रोत्साहन देतो.”

एका मेंढपाळासारखी त्यांची काळजी घ्या. मंडळीत परत आलेल्या व्यक्‍तीने वडिलांना न्याय करणारे म्हणून पाहिलेलं असतं. पण तुम्ही एक प्रेमळ मेंढपाळ आहात हेसुद्धा त्यांना दिसलं पाहिजे. (यिर्म. २३:४) त्यामुळे त्यांचं लक्ष देऊन ऐका आणि त्यांना प्रोत्साहन द्या. नेहमी त्यांच्याशी बोला. अशा व्यक्‍तीची मेंढपाळ भेट घेताना मार्कस नावाचे एक वडील काय करतात त्याकडे लक्ष द्या. ते म्हणतात: “आम्ही त्यांच्यासाठी बायबलमधून एखादं वचन वाचतो, त्यांची प्रशंसा करतो. तसंच, मंडळीत परत येण्यासाठी आणि यहोवासोबत जवळचं नातं जोडण्यासाठी ते जी काही मेहनत घेत आहेत त्याची आम्ही किती कदर करतो हेसुद्धा त्यांना सांगतो. आणि शेवटी, आम्ही पुढच्या वेळी परत कधी भेटणार आहोत हेपण त्यांना सांगतो.”

a या लेखातली नावं बदलण्यात आली आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा