अभ्यास लेख ४१
आपला देव यहोवा “खूप दयाळू” आहे
“यहोवा सर्वांना चांगुलपणा दाखवतो, त्याची दया त्याच्या सर्व कार्यांतून दिसून येते.”—स्तो. १४५:९.
गीत ३८ आपला भार यहोवावर टाक
सारांशa
१. दयाळू व्यक्ती म्हटलं की आपल्या मनात कोणतं चित्र तयार होतं?
दयाळू व्यक्ती म्हटलं, की एका प्रेमळ, सहानुभूती असणाऱ्या, उदार व्यक्तीचं चित्र आपल्या मनात तयार होतं. तसंच, तुम्हाला कदाचित येशूने सांगितलेल्या चांगल्या शोमरोनी माणसाची गोष्टही आठवली असेल. लुटारूंच्या हातात सापडलेल्या एका यहुदी माणसाशी हा शोमरोनी माणूस “दयाळूपणे वागला.” जखमी झालेल्या यहुदी माणसाला पाहून “त्याला कळवळा आला” आणि त्याची चांगली काळजी घेतली जाईल याची व्यवस्थाही त्याने केली. (लूक १०:२९-३७) येशूच्या या गोष्टीतून देवाच्या एका सुंदर गुणाबद्दल, दयेबद्दल आपल्याला शिकायला मिळतं. देवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळेच तो दररोज कितीतरी मार्गांनी आपल्याला दया दाखवतो.
२. दया दाखवण्याचा आणखी एक मार्ग कोणता?
२ दया दाखवण्याचा आणखी एक मार्ग आहे. तो म्हणजे, दया दाखवण्यासाठी जेव्हा योग्य कारण असतं, तेव्हा शिक्षा करण्यापासून आपले हात आवरणं. आणि ही गोष्ट लक्षात घेतली, तर असं म्हणता येईल की यहोवाने आपल्याला आत्तापर्यंत खूप दया दाखवली आहे. म्हणूनच स्तोत्रकर्त्यानेही म्हटलं की, “त्याने आपल्या पापांप्रमाणे आपल्याला शिक्षा दिली नाही.” (स्तो. १०३:१०) पण गरज असते तेव्हा यहोवा आपल्याला कडक शिस्तही लावतो.
३. या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
३ या लेखात, आपण तीन प्रश्नांवर विचार करणार आहोत: यहोवा दया का दाखवतो? एखाद्याला कडक शिस्त लावली जाते तेव्हासुद्धा त्यातून दया कशी दिसून येते? आणि आपणही इतरांना कशा प्रकारे दया दाखवू शकतो? बायबल या प्रश्नांची काय उत्तरं देतं, ते आता आपण पाहू या.
यहोवा दया का दाखवतो?
४. यहोवा आपल्याला दया का दाखवतो?
४ यहोवा प्रेमापोटी दया दाखवतो. प्रेषित पौलने असं म्हटलं, की देव “खूप दयाळू” आहे. इथे तो देवाने अभिषिक्त जनांना कशा प्रकारे दया दाखवली याबद्दल बोलत होता. कारण ते अपरिपूर्ण असतानाही देवाने त्यांना स्वर्गातल्या जीवनाची आशा दिली आहे. (इफिस. २:४-७) पण यहोवाची दया त्याहूनही जास्त आहे, कारण तो फक्त अभिषिक्त जनांनाच नाही तर इतरांनाही दया दाखवतो. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, की “यहोवा सर्वांना चांगुलपणा दाखवतो, त्याची दया त्याच्या सर्व कार्यांतून दिसून येते.” (स्तो. १४५:९) यहोवाचं खरंच आपल्यावर मनापासून प्रेम आहे. म्हणूनच दया दाखवण्यासाठी छोटसं कारण जरी त्याला मिळालं, तरी तो लगेच आपल्याला दया दाखवतो.
५. यहोवाच्या दयेबद्दल येशूला सर्वात जास्त माहीत आहे, असं का म्हणता येईल?
५ यहोवा दया दाखवण्यासाठी किती आतुर असतो, हे येशूपेक्षा चांगलं कोणीच सांगू शकत नाही. कारण पृथ्वीवर येण्याआधी येशूने आपल्या पित्यासोबत स्वर्गात लोखो-करोडो वर्षं घालवली आहेत. (नीति. ८:३०, ३१) आणि आपल्या पित्याने पापी माणसांना अनेकदा दया कशी दाखवली हे येशूने स्वतः पाहिलं होतं. (स्तो. ७८:३७-४२) म्हणूनच लोकांना शिकवताना, त्याने आपल्या पित्याच्या या सुंदर गुणाचा बऱ्याचदा उल्लेख केला.
हरवलेला मुलगा घरी परत आला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला अपमानित केलं नाही, तर मोठ्या मनाने त्याला स्वीकारलं (परिच्छेद ६ पाहा)c
६. यहोवा दया दाखवण्यासाठी किती आतूर आहे, हे उधळ्या पुत्राच्या गोष्टीतून येशूने कसं दाखवून दिलं?
६ आधीच्या लेखात आपण उधळ्या पुत्राच्या गोष्टीवर चर्चा केली होती. दया दाखवण्यासाठी यहोवाचं मन किती आतुर आहे, याचं एक सुंदर चित्र येशूने या गोष्टीत उभं केलं आहे. गोष्टीतल्या त्या मुलाने आपलं घर सोडलं, आणि “आपली सगळी संपत्ती ऐशआरामात उधळून टाकली.” (लूक १५:१३) पण नंतर त्याला आपल्या चुकीच्या कामाचा पस्तावा झाला. तो नम्र झाला आणि आपल्या घरी परत आला. मग त्याच्या वडिलांनी काय केलं? येशूने म्हटलं: “तो दूर असतानाच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिलं आणि त्यांना त्याचा कळवळा आला. त्यांनी धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि प्रेमाने त्याचे मुके घेतले.” यावरून दिसतं, की वडिलांनी लगेच त्याला माफ केलं आणि दया दाखवली. त्यांनी त्याचा अपमान केला नाही, त्याला त्याच्या चुका दाखवून दिल्या नाहीत. उलट, त्यांनी मोठ्या आनंदाने त्याला आपल्या घरात पुन्हा घेतलं. त्या मुलाने अनेक चुका केल्या होत्या, मोठं पाप केलं होतं. पण पश्चात्ताप केल्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला माफ केलं. या गोष्टीतला हा दयाळू पिता यहोवाला चित्रित करतो. या सुंदर गोष्टीतून येशूने हे दाखवून दिलं, कि जे मनापासून पश्चात्ताप करतात, त्यांना यहोवा माफ करायला नेहमी तयार असतो.—लूक १५:१७-२४.
७. यहोवा आपल्याला दया दाखवतो त्यावरून त्याची बुद्धी कशी दिसून येते?
७ यहोवा सगळ्यात बुद्धिमान असल्यामुळे दया दाखवतो. बायबल म्हणतं, की “वरून येणारी बुद्धी ही . . . दया आणि चांगल्या फळांनी परिपूर्ण” असते. (याको. ३:१७) एका प्रेमळ पित्यासारखंच यहोवाला हे माहीत आहे, की आपल्या मुलांना, म्हणजे आपल्या सेवकांना दया दाखवली तर त्यांचं भलंच होईल. (स्तो. १०३:१३; यश. ४९:१५) आपण अपरिपूर्ण असलो, तरी देवाच्या दयेमुळेच आपल्याला एक सुंदर आशा मिळते. यहोवा अतिशय बुद्धिमान आहे. त्यामुळे दया कधी दाखवायची आणि कधी नाही हे त्याला चांगलं माहीत आहे. त्याला आपल्यामध्ये दया दाखवण्याचं एक छोटसं कारण जरी दिसलं, तरी तो लगेच दया दाखवतो. पण एखादी व्यक्ती जर मनापासून पश्चात्ताप करत नसेल, तर मात्र तो तिला दया दाखवत नाही. यातूनसुद्धा यहोवाची बुद्धी दिसून येते.
८. कधीकधी काय करणं गरजेचं असतं, आणि का?
८ यहोवा दयाळू जरी असला, तरी तो चुकीच्या कामांकडे दुर्लक्ष करतो असं नाही. हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ. समजा मंडळीतला एक भाऊ किंवा बहीण जाणूनबुजून पाप करत आहे. अशा वेळी मंडळीने काय करावं याबद्दल पौलने म्हटलं: “अशा माणसाची संगत सोडून द्या.” (१ करिंथ. ५:११) म्हणून पश्चात्ताप न करणाऱ्या व्यक्तीला मंडळीतून बहिष्कृत केलं जातं. मंडळीतल्या भाऊबहिणींचं संरक्षण करण्यासाठी आणि यहोवाच्या स्तरांना आदर दाखवण्यासाठी असं करणं खूप गरजेचं आहे. पण एखाद्याला बहिष्कृत केलं जातं तेव्हा काहींना असं वाटेल, की यहोवाने त्याला दया दाखवली नाही. पण हे खरं आहे का? त्याचं उत्तर आपण पुढे पाहू या.
बहिष्कृत केल्यामुळे दया कशी दिसून येते?
आजारी मेंढराला जरी वेगळं ठेवलं, तरी मेंढपाळ त्याची खूप काळजी घेतो (परिच्छेद ९-११ पाहा)
९-१०. इब्री लोकांना १२:५, ६ मध्ये सांगितल्याप्रमाणे बहिष्कृत करणं ही एक प्रेमळ व्यवस्था आहे असं का म्हणता येईल? उदाहरण द्या.
९ मंडळीत जेव्हा अशी घोषणा केली जाते, की अमुक एक व्यक्ती आता यहोवाची साक्षीदार नाही, तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. खासकरून ती आपली जवळची व्यक्ती असते तेव्हा. तिला बहिष्कृत करण्याची खरंच गरज होती का, असा प्रश्न कदाचित आपल्याला पडेल. पण मग त्यातून खरंच देवाची दया दिसून येते का? हो नक्कीच. कारण एखाद्याला ताडनाची गरज असताना, जर त्याला ताडन दिलं गेलं नाही तर ते शहाणपणाचं आणि प्रेमळपणाचं ठरणार नाही. (नीति. १३:२४) पण बहिष्कृत केल्यामुळे एखाद्याला पश्चात्ताप करायला आणि आपला चुकीचा मार्ग सोडून द्यायला मदत होऊ शकते का? अनेकांनी असं म्हटलं आहे, की वडिलांनी बहिष्कृत करण्याच्या जो निर्णय घेतला, त्यामुळेच त्यांना भानावर यायला आणि आपला चुकीचा मार्ग सोडून यहोवाकडे परत यायला मदत झाली.—इब्री लोकांना १२:५, ६ वाचा.
१० बहिष्कृत केल्यामुळे दया कशी दिसून येते हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहू या. मेंढपाळ जेव्हा पाहतो की कळपातलं एखादं मेंढरू आजारी आहे तेव्हा तो काय करतो? तो त्या मेंढरावर उपचार करण्यासाठी त्याला कळपापासून वेगळं ठेवतो. पण मेंढरांना सहसा कळपात राहायला आवडतं. त्यामुळे वेगळं ठेवलेल्या मेंढराला ते आवडत नाही. ते पुन्हा कळपात जाण्यासाठी धडपडू लागतं. मग मेंढपाळाने केलेली ही गोष्ट क्रूरपणाची किंवा चुकीची आहे असं म्हणावं का? मुळीच नाही. कारण मेंढपाळाला हे माहीत असतं, की त्या मेंढराला कळपात राहू दिलं तर इतर मेंढरांनाही तो आजार होऊ शकतो. त्यामुळे त्या एका मेंढराला वेगळं ठेवून तो बाकीच्या मेंढरांचं संरक्षणच करत असतो.—लेवीय १३:३, ४ सोबत तुलना करा.
११. (क) बहिष्कृत केलेली व्यक्ती आजारी मेंढरासारखी असते असं का म्हणता येईल? (ख) बहिष्कृत केलेल्या व्यक्तीला मंडळीत पुन्हा येण्यासाठी कोणत्या गोष्टी मदत करू शकतात?
११ मंडळीतून बहिष्कृत केलेली व्यक्ती ही त्या आजारी मेंढरासारखीच असते. असं म्हणता येईल, की देवासोबतचं तिचं नातं कमजोर झाल्यामुळे ती एका अर्थाने आजारीच असते. (याको. ५:१४) आणि खरोखरच्या आजारासारखंच हा आजारसुद्धा तिच्यामुळे इतरांना होऊ शकतो. म्हणून काही वेळा अशा व्यक्तीला मंडळीपासून दूर ठेवणं गरजेचं असतं. तिला मंडळीतून बहिष्कृत केलं जातं, तेव्हा यहोवाला मंडळीतल्या इतर विश्वासू सदस्यांची काळजी आहे, हे दिसून येतं. तसंच, बहिष्कृत केलेल्या व्यक्तीलासुद्धा आपल्या गंभीर चुकांची जाणीव होते आणि पश्चात्ताप करायला मदत होते. पण ती व्यक्ती बहिष्कृत असली तरी मंडळीच्या सभांना येऊ शकते. तसंच, व्यक्तिगत अभ्यासासाठी ती मंडळीतून प्रकाशनं घेऊ शकते. आणि JW ब्रॉडकास्टिंगसुद्धा पाहू शकते. या सगळ्या गोष्टींमुळे ती देवासोबतचं आपलं नातं पुन्हा बळकट करू शकते. इतकंच नाही, तर ती स्वतःमध्ये बदल करत आहे, हे पाहून मंडळीतले वडीलसुद्धा वेळोवेळी तिला सल्ला आणि मार्गदर्शन देत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीला पुन्हा एकदा मंडळीत साक्षीदार म्हणून स्वीकारलं जाऊ शकतं.b
१२. पश्चात्ताप न करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत काही वेळा वडिलांना कोणता निर्णय घ्यावा लागतो?
१२ आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की फक्त पश्चात्ताप न करणाऱ्या व्यक्तीलाच बहिष्कृत केलं जातं. ही गोष्ट खूप गंभीर आहे हे वडिलांना माहित असतं. आणि म्हणून या बाबतीत ते खूप विचार करून निर्णय घेतात. ते ही गोष्ट लक्षात ठेवतात, की यहोवा “योग्य प्रमाणात” शिस्त लावतो. (यिर्म. ३०:११) ख्रिस्ती वडिलांचं मंडळीतल्या सगळ्या भाऊबहिणींवर प्रेम असतं. त्यामुळे त्यांच्या बाबतीत ते असा कोणताही निर्णय घेत नाहीत, ज्यामुळे भाऊबहिणींचं यहोवासोबतचं नातं धोक्यात येईल. पण, कधीकधी त्यांच्या या प्रेमामुळे आणि दयेमुळेच त्यांना गंभीर चूक केलेल्या व्यक्तीला मंडळीतून काही काळासाठी बहिष्कृत करावं लागतं.
१३. करिंथ मंडळीतल्या एका व्यक्तीला बहिष्कृत करण्याची गरज का होती?
१३ पहिल्या शतकात प्रेषित पौलने अशाच एका पश्चात्ताप न करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत काय केलं ते लक्षात घ्या. करिंथ मंडळीत एक धक्कादायक गोष्ट घडत होती. त्या मंडळीतल्या एका माणसाचे आपल्या वडिलांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. या बाबतीत यहोवाने इस्राएली लोकांना असं सांगितलं होतं: “जो आपल्या वडिलांच्या बायकोशी शरीरसंबंध ठेवतो, तो आपल्या वडिलांची लाज उघडी करतो. त्या दोघांना कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं.” (लेवी. २०:११) पण साहजिकच पौल त्या व्यक्तीला मृत्यूची शिक्षा देऊ शकत नव्हता. पण त्याने त्या व्यक्तीला मंडळीतून बहिष्कृत करायला सांगितलं. कारण त्या माणसाच्या अनैतिक कामाचा मंडळीतल्या इतरांवरसुद्धा परिणाम होत होता. काहींना तर असंही वाटत होतं, की तो जे करत आहे ते काही गंभीर पाप नाही!—१ करिंथ. ५:१, २, १३.
१४. पौलने बहिष्कृत झालेल्या त्या व्यक्तीला दया कशी दाखवली, आणि का? (२ करिंथकर २:५-८, ११)
१४ काही काळानंतर पौलला हे समजलं, की त्या माणसाने स्वतःमध्ये बदल केले आहेत. त्याने खरा पश्चात्ताप दाखवला होता. त्याने मंडळीच्या नावाला जरी कलंक लावला होता, तरी पौलने मंडळीतल्या वडिलांना जे सांगितलं, त्यावरून दिसून येतं की पौलला त्या व्यक्तीशी खूप कठोरपणे वागायचं नव्हतं. पौलने तिथल्या वडिलांना सांगितलं, की “तुम्ही त्याला प्रेमळपणे क्षमा करून सांत्वन द्या, नाहीतर तो दुःखात बुडून जाईल.” पौलला त्या व्यक्तीची दया आली. त्याला असं वाटत होतं, की तो दुःखात बुडून कदाचित असा विचार करेल की आपल्याला माफी मिळणारच नाही. पण त्याने असा विचार करून आशाच सोडून द्यावी असं पौलला वाटत नव्हतं.—२ करिंथकर २:५-८, ११ वाचा.
१५. मंडळीतले वडील शिस्त लावण्यासोबतच दयाळूपणा कसा दाखवतात?
१५ यहोवासारखंच मंडळीतले वडीलसुद्धा प्रेमापोटीच दया दाखवतात. जेव्हा चूक करणाऱ्या व्यक्तीला शिस्त लावण्याची गरज असते तेव्हा ते त्याला जरूर शिस्त लावतात. पण दया दाखवण्यासाठी योग्य कारण असतं तेव्हा ते तिला तितकीच दयासुद्धा दाखवतात. त्यांनी जर तिची चूक सुधारली नाही, तर ते दयाळूपणाचं ठरणार नाही. उलट त्या व्यक्तीला चुकीचं काम करत राहायची सूट मिळेल. पण फक्त वडिलांनीच दया दाखवली पाहिजे का?
आपण इतरांना दया का दाखवली पाहिजे?
१६. नीतिवचनं २१:१३ या वचनानुसार आपण दया का दाखवली पाहिजे?
१६ आपण सर्वांनीच यहोवासारखा दयाळूपणा दाखवला पाहिजे. नाहीतर यहोवा आपल्या प्रार्थना ऐकणार नाही. (नीतिवचनं २१:१३ वाचा.) आणि यहोवाने असं करावं असं आपल्यापैकी कोणालाच वाटत नाही. म्हणून आपण कोणाशीही कठोरपणे वागू नये. दुःखात असलेल्या आपल्या भाऊबहिणींच्या ‘आक्रोशाकडे’ आपण कधीच दुर्लक्ष करू नये. तर पुढे दिलेला सल्ला आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे: “जो दया दाखवत नाही त्यालाही, न्याय करताना दया दाखवली जाणार नाही.” (याको. २:१३) दयेची आपल्यालाच किती गरज आहे, हे जर आपण लक्षात ठेवलं, तर इतरांना दया दाखवायला आपल्याला कठीण जाणार नाही. चूक केलेली व्यक्ती जेव्हा पश्चात्ताप करून पुन्हा मंडळीत येते, तेव्हा खासकरून तिला दया दाखवण्याची जास्त गरज असते.
१७. दावीद राजाने दया कशी दाखवली?
१७ कठोरपणे न वागता इतरांना दया दाखवण्यासाठी बायबलमधली बरीच उदाहरणं आपल्याला मदत करतात. दावीद राजाचंच उदाहरण घ्या. त्याने बऱ्याच वेळा दया दाखवली. शौल राजा त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता. पण तरीसुद्धा दावीदने कधीच बदला घेतला नाही किंवा त्याचं वाईट केलं नाही. उलट देवाने निवडलेल्या राजाला त्याने दया दाखवली.—१ शमु. २४:९-१२, १८, १९.
१८-१९. कोणत्या दोन प्रसंगी दावीद दयाळूपणे वागला नाही?
१८ पण दावीद नेहमीच दयाळूपणे वागला असं नाही. उदाहरणार्थ, तो नाबालशी कसा वागला याचा विचार करा. नाबाल एक उद्धट स्वभावाचा माणूस होता. त्याने दावीद आणि त्याच्या माणसांना अन्नसामग्री दिली नाही. उलट त्याने दावीदचा अपमान केला. हे ऐकून दावीद इतका भडकला, की त्याने नाबालला आणि त्याच्या घराण्यातल्या सगळ्या माणसांना ठार मारायचं ठरवलं. पण नाबालची बायको समंजस होती. तिने लगेच दावीदला आणि त्याच्या लोकांना जे हवं होतं ते दिलं. आणि त्यामुळे दावीद एका मोठ्या रक्तदोषापासून वाचला.—१ शमु. २५:९-२२, ३२-३५.
१९ आणखी एका वेळी दावीद दयाळूपणे वागला नाही. नाथान संदेष्टा एकदा त्याच्याकडे गेला आणि त्याने एका श्रीमंत माणसाबद्दल त्याला सांगितलं. त्या श्रीमंत माणसाने एका गरीब माणसाची एकुलती एक मेंढी घेतली होती. हे ऐकून दावीद राजाला त्या श्रीमंत माणसाचा भयंकर राग आला आणि तो म्हणाला: “जिवंत देव यहोवाची शपथ, ज्या माणसाने हे केलं त्याला मृत्युदंड मिळालाच पाहिजे!” (२ शमु. १२:१-६) दावीदला मोशेचं नियमशास्त्र चांगलं माहीत होतं. नियमशास्त्रानुसार जर एखाद्याने दुसऱ्याचं मेंढरू चोरलं, तर त्याला चार पटीने भरपाई करावी लागायची. (निर्ग. २२:१) मग दावीदने त्याला मृत्युदंड मिळावा असं का म्हटलं? ही तर खूप कठोर शिक्षा होती? गोष्टीतल्या त्या माणसाने मोठं पाप केलं नव्हतं, तरीसुद्धा दावीदने त्याला खूप मोठी शिक्षा सुनावली. हे लक्षात घ्या, की इथे नाथान खरोखरच्या घटनेबद्दल बोलत नव्हता. तर दावीदने केलेल्या चुका किती गंभीर स्वरूपाच्या होत्या हे त्याच्या लक्षात आणून देण्यासाठी नाथान त्याला ही गोष्ट सांगत होता. आणि त्या माणसाच्या तुलनेत दावीदने तर खूप मोठ्या चुका केल्या होत्या. तरीसुद्धा यहोवाने त्याला दया दाखवून मोठ्या मनाने माफ केलं!—२ शमु. १२:७-१३.
नाथान संदेष्ट्याने दावीद राजाला श्रीमंत माणसाची गोष्ट सांगितली, तेव्हा त्याने त्या माणसाला दया दाखवली नाही (परिच्छेद १९-२० पाहा)d
२०. दावीदच्या उदाहरणातून आपण काय शिकतो?
२० दावीद राजा जेव्हा खूप चिडला होता, तेव्हा नाबाल आणि त्याच्या सर्व लोकांना ठार मारावं, असं त्याला वाटत होतं. तसंच, नाथानने सांगितलेल्या गोष्टीतल्या श्रीमंत माणसालासुद्धा मृत्युदंड द्यावा असं त्याला वाटत होतं. तुम्ही विचार कराल, की दावीदसारखा इतका चांगला आणि प्रेमळ माणूस इतकी कठोर शिक्षा कशी काय देऊ शकतो? त्या वेळी दावीदची परिस्थिती काय होती ते लक्षात घ्या. त्याने जे पाप केलं होतं त्यामुळे त्याचा विवेक त्याला बोचत होता. यावरून दिसून येतं, की यहोवासोबतच आपलं नातं कमजोर झालेलं असतं, तेव्हा आपण इतरांशी कठोरपणे वागतो. त्यांना दया दाखवत नाही. म्हणून येशूने आपल्या शिष्यांना असा इशारा दिला: “तुमचे दोष काढले जाऊ नयेत, म्हणून तुम्ही दुसऱ्यांचे दोष काढायचं सोडून द्या. कारण ज्या प्रकारे तुम्ही दुसऱ्यांचा न्याय करता, त्याच प्रकारे तुमचाही न्याय केला जाईल.” (मत्त. ७:१, २) म्हणून आपण कधीही इतरांशी कठोरपणे वागू नये. तर यहोवासारखं सगळ्यांसोबत नेहमी दयाळूपणे वागलं पाहिजे.
२१-२२. कोण-कोणत्या मार्गांनी आपण दया दाखवू शकतो?
२१ दया ही फक्त एक भावना नाही. तर ‘कृतीतून दाखवला जाणारा’ तो एक गुण आहे. तेव्हा आपल्या कुटुंबात, मंडळीत किंवा आजबाजूच्या लोकांमध्ये कोणाला मदतीची गरज आहे का ते पाहा, आणि त्यांना मदत करा. जसं की, कोणी जर त्रासात किंवा दुःखात असेल, तर तुम्ही त्यांना सांत्वन देऊ शकता. काहींना तुम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू देऊन किंवा इतर मार्गांनी मदत करू शकता. किंवा मग, मंडळीत परत घेण्यात आलेल्या व्यक्तीसोबत वेळ घालवून त्याला दिलासा देऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इतरांना सांत्वन देणारा आनंदाचा संदेश सांगू शकतो.—ईयो. २९:१२, १३; रोम. १०:१४, १५; याको. १:२७.
२२ अशा प्रकारे कोणाला मदतीची गरज आहे याकडे आपण जर लक्ष दिलं, तर आपण वेगवेगळ्या मार्गांनी त्यांना दया दाखवू शकतो. आपण जेव्हा इतरांना दया दाखवतो, तेव्हा अपार दया करणाऱ्या आपल्या पित्याला, यहोवाला खरंच किती आनंद होत असेल!
गीत १३ उपकारस्तुतीची प्रार्थना
a दया हा यहोवाच्या गुणांपैकी एक अतिशय सुंदर गुण आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःमध्ये हा गुण वाढवला पाहिजे. या लेखामध्ये आपण पाहणार आहोत, की यहोवा दया का दाखवतो? तो आपल्याला सुधारतो तेव्हासुद्धा त्याची दया कशी दिसून येते? आणि दयेचा हा सुंदर गुण आपणही कसा दाखवू शकतो?
b बहिष्कृत झालेल्या व्यक्तीला मंडळीत पुन्हा घेतल्यानंतर, ती यहोवासोबत आपलं नातं पुन्हा कसं बळकट शकते आणि त्यासाठी वडील त्याला कशी मदत करू शकतात हे समजून घेण्यासाठी याच अंकातला “यहोवासोबत तुटलेली मैत्री पुन्हा जोडा,” हा लेख पाहा.
c चित्रांचं वर्णन: घराच्या छतावरून वडील आपल्या हरवलेल्या मुलाला घरी येताना पाहतात, तेव्हा ते त्याला घाईघाईने भेटायला धावतात.
d चित्रांचं वर्णन: आपल्या पापांबद्दल दावीदच्या मनात दोषीपणाची भावना होती. त्यामुळे नाथानची गोष्ट ऐकून तो भयंकर चिडतो, आणि त्या श्रीमंत माणसाला मृत्युदंड मिळाला पाहिजे असं म्हणतो.