जीवन कथा
यहोवाच्या सेवेमुळे मिळालेला आनंद
१९५८ मध्ये मी कॅनडाच्या बेथेलमध्ये सेवा करायला आलो. तेव्हा मी १८ वर्षांचा होतो. सर्वात आधी, जिथे छपाई व्हायची तिथली जागा साफ करायचं काम मला दिलं होतं. आणि लवकरच मला मासिकांच्या कडा कापणारी मशीन चालवायला दिली. बेथेलमध्ये काम करताना मी खूप खूश होतो.
त्याच्या पुढच्याच वर्षी बेथेलमध्ये अशी घोषणा करण्यात आली, की दक्षिण आफ्रिकेच्या शाखा कार्यालयामध्ये एक नवीन रोट्री प्रिंटींग प्रेस आणली जाणार आहे. ती चालवण्यासाठी काही भावांची गरज आहे. त्यासाठी मी माझं नाव दिलं. जेव्हा मला निवडण्यात आलं तेव्हा मी खूप खूश झालो. बेथेलमध्ये काम करणाऱ्या इतर तीन भावांनासुद्धा निवडण्यात आलं. त्यांची नावं होती, डेनिस लीच, बिल मॅकलेलन आणि केन नोर्डिन. आम्हाला तिथे बराच काळ काम करावं लागेल असं आम्हाला सांगण्यात आलं.
मी माझ्या आईला फोन केला आणि म्हणालो, “मला काहीतरी सांगायचंय. मी दक्षिण आफ्रिकेला चाललोय!” तशी माझी आई शांत स्वभावाची होती. पण तिचा यहोवावरचा विश्वास खूप मजबूत होता. ती काही बोलली नाही, पण मला माहीत होतं की माझ्या निर्णयामुळे तिला खूप आनंद झाला असेल. मी लांब जाणार याचं आईबाबांना वाईट वाटत होतं. पण त्यांनी मला अडवलं नाही.
आम्ही दक्षिण आफ्रिकेला गेलो
१९५९ मध्ये डेनिस लीच, केन नोर्डिन आणि बिल मॅकलेलन यांच्यासोबत केपटाउनपासून जोहानिसबर्गला जाण्यासाठी ट्रेनने प्रवास करताना
२०१९ मध्ये ६० वर्षांनंतर आम्ही चौघं दक्षिण आफ्रिकेच्या शाखा कार्यालयात पुन्हा एकत्र आलो
आधी आम्हा चौघांना ब्रुकलिन बेथेलमध्ये पाठवण्यात आलं. तिथे आम्हाला तीन महिन्यांसाठी छपाईची खास ट्रेनिंग देण्यात आली. मग आम्ही जहाजाने दक्षिण आफ्रिकेच्या केपटाउन इथे जायला निघालो. तेव्हा मी नुकताच २० वर्षांचा झालो होतो. आम्ही केपटाउनला पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. तिथून जोहानिसबर्गला आम्ही ट्रेनने गेलो. आमची ट्रेन पहाटे कारू इथल्या एका छोट्याशा शहरात थांबली. तिथे खूप उष्णता आणि धूळ होती. कारण ते एक वाळवंट होतं. आम्ही चौघांनी खिडकीबाहेर पाहिलं आणि विचार करू लागलो, ‘आपण कुठे आलोय? अशा ठिकाणी आपल्याला सेवा करायला जमेल ना?’ पण काही वर्षांनी आम्ही इथे पुन्हा आलो. तेव्हा आम्हाला इथली छोटीछोटी शहरं खूप आवडली. इथल्या लोकांचं जीवन सुखाचं आणि आरामाचं होतं.
काही वर्षं मी लायनोटाईप मशीनवर काम केलं. ती मशीन छान होती. पण वापरायला जरा किचकट होती. टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या मासिकांची छपाई करण्यासाठी आधी आम्हाला अक्षरं जोडून ओळी तयार कराव्या लागायच्या. या शाखा कार्यालयात दक्षिण आफ्रिकेच्या अनेक भाषांमध्ये मासिकांची छपाई व्हायची. तसंच, आफ्रिकेच्या इतर देशांत बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्येही मासिकांची इथे छपाई व्हायची. आम्ही खूश होतो की जी नवीन रोट्री प्रिंटिंग प्रेस चालवण्यासाठी आम्हाला इतक्या लांबून बोलावण्यात आलं होतं तिचा पूर्णपणे उपयोग होत होता.
नंतर मी फॅक्ट्री ऑफिसमध्ये काम केलं. तिथे भाषांतराचं, छपाईचं आणि शिपिंगचं काम पाहिलं जायचं. या कामांत मी खूप व्यस्त असायचो. पण त्यामुळे मला आनंदही मिळायचा.
लग्न आणि नवीन नेमणुका
१९६८ मध्ये मी आणि लॉरा खास पायनियर म्हणून सेवा करताना
१९६८ मध्ये माझं लग्न लॉरा बोवनशी झालं. ती बेथेलजवळच राहायची. ती पायनियरिंग करण्यासोबत भाषांतर विभागासाठी टायपिंगसुद्धा करायची. त्या काळात, नवीन जोडप्यांना सहसा बेथेलमध्ये राहून सेवा करायची परवानगी दिली जात नव्हती. म्हणून आम्हाला खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. पण मला थोडी काळजी वाटत होती. मी दहा वर्षांपासून बेथेलमध्ये होतो. तिथे खाण्यापिण्याची, राहण्याची सगळी सोय होती. त्यामुळे खास पायनियरांना खर्चासाठी जे पैसे मिळायचे त्यांत आमचं भागेल की नाही, याची चिंता मला वाटत होती. दर महिन्याला जर आम्ही सांगितलेले तास पूर्ण केले, पुनर्भेटी केल्या आणि मासिकं दिली तरच आम्हा दोघांना २५ रँड (त्या काळातले ३५ अमेरिकन डॉलर्स) मिळायचे. त्याच पैशांत आम्हाला घराचं भाडं द्यावं लागायचं. तसंच खाण्या-पिण्याचा, येण्या-जाण्याचा, औषधांचा आणि दुसऱ्या गोष्टींचाही खर्च भागवावा लागायचा.
आम्हाला दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन शहराजवळ असलेल्या एका छोट्या गटात सेवा करण्यासाठी पाठवण्यात आलं. हे शहर हिंदी महासागराजवळ आहे. तिथे भारतातून आलेले बरेच लोक होते. जवळपास १८७५ मध्ये त्यांचे पूर्वज इथल्या साखरेच्या कारखान्यात काम करण्यासाठी आले होते. पण आता ते लोक दुसरी कामं करत होते. त्यांनी त्यांची संस्कृती जपली होती. जसं की त्यांचं जेवण. ते वेगवेगळ्या पदार्थांच्या चविष्ट करी बनवायचे. एक चांगली गोष्ट म्हणजे ते इंग्रजी बोलायचे. त्यामुळे त्यांना प्रचार करण्यासाठी आम्हाला नवीन भाषा शिकावी लागली नाही.
त्या काळात खास पायनियरांना महिन्याला १५० तास करावे लागायचे. म्हणून मी आणि लॉराने पहिल्या दिवशी सहा तास करायचं ठरवलं. त्या दिवशी वातावरण उष्ण आणि दमट होतं. आणि आमच्याकडे एकही पुनर्भेट आणि बायबल अभ्यास नव्हता. सहा तास आम्हाला फक्त घरोघरचं प्रचारकार्य करायचं होतं. आम्ही प्रचार करायला सुरुवात केली आणि थोड्या वेळानंतर मी माझं घड्याळ पाहिलं तर फक्त ४० मिनिटं झाले होते. तेव्हा मला प्रश्न पडला, की आमचं पायनियरिंग कसं होईल?
लवकरच आम्ही एक चांगलं श्येड्युल बनवलं. प्रत्येक दिवशी आम्ही पूर्ण तयारीने घराबाहेर पडायचो. म्हणजे आम्ही आमच्यासोबत सॅण्डविच आणि थरमसमध्ये सूप किंवा कॉफी घेऊन जायचो. थांबावंसं वाटलं तर आम्ही आमची गाडी जवळपास असलेल्या झाडाखाली उभी करायचो. कधीकधी तिथली गोंडस भारतीय मुलं आमच्याकडे पाहत राहायची. आम्ही खूप वेगळे दिसायचो ना म्हणून. काही दिवसांतच आम्हाला जाणवलं, की सुरुवातीचे दोनतीन तास केल्यानंतर बाकीचा वेळ खूप पटकन निघून जातो.
ज्या भारतीय लोकांना आम्ही प्रचार करायचो ते आमचा खूप चांगला पाहुणचार करायचे, आमच्याशी आदराने वागायचे. देवावर त्यांचा खूप विश्वास होता. त्यामुळे बरेच हिंदू लोक आमचा संदेश ऐकायचे. त्यांना यहोवाबद्दल, येशूबद्दल, बायबलबद्दल, नवीन जगाबद्दल आणि पुनरुत्थानाच्या आशेबद्दल शिकून घ्यायला आवडायचं. या लोकांना सत्याबद्दल सांगताना आम्हाला खूप आनंद मिळायचा. एका वर्षानंतर आमच्याकडे २० बायबल अभ्यास होते. दररोज आम्ही वेगवेगळ्या बायबल विद्यार्थ्यांसोबत जेवण करायचो. आम्ही खरंच खूप खूश होतो.
लवकरच आम्हाला दुसरं काम करण्यासाठी नेमण्यात आलं. आम्हाला हिंदी महासागराच्या किनारपट्टीवर असणाऱ्या मंडळ्यांना भेटी द्यायला सांगितलं. प्रत्येक आठवडी आम्ही वेगवेगळ्या भावांच्या घरी राहायचो. त्या भागातल्या मंडळीच्या भाऊबहिणींसोबत काम करून त्यांना प्रोत्साहन द्यायचो. आम्ही ज्यांच्याकडे राहायचो ते आम्हाला त्यांच्या घरच्यांसारखंच वागवायचे. आम्ही त्यांच्या मुलांसोबत आणि त्यांच्या घरातल्या प्राण्यांसोबत चांगला वेळ घालवायचो. बघताबघता दोन वर्षं निघून गेली. मग अचानक एक दिवस आम्हाला शाखा कार्यालयातून फोन आला. आमच्याशी बोलणाऱ्या भावाने आम्हाला म्हटलं, ‘तुम्ही परत बेथेलमध्ये यावं अशी आमची इच्छा आहे.’ मी म्हटलं, ‘आम्ही इथे खूप खूश आहोत.’ मी असं म्हणालो खरं, पण नंतर आम्ही बेथेलला गेलो.
परत दक्षिण आफ्रिकेच्या बेथेलमध्ये
बेथेलमध्ये गेल्यावर मी सेवा विभागात काम करू लागलो. तिथे मला अनेक अनुभवी भावांसोबत काम करायची संधी मिळाली. त्या काळात एखाद्या मंडळीला भेट दिल्यानंतर विभागीय पर्यवेक्षक शाखा कार्यालयाला त्या मंडळीचा रिपोर्ट पाठवायचा. मग रिपोर्टनुसार सेवा विभाग त्या मंडळीला प्रोत्साहन आणि आवश्यक सल्ला देण्यासाठी पत्र पाठवायचा. त्यासाठी सेवा विभागातल्या काही भावांना खूप मेहनत घ्यावी लागायची. कारण विभागीय पर्यवेक्षक सहसा झोसा, झुलू आणि इतर भाषांमध्ये रिपोर्ट पाठवायचे. या रिपोर्टचं सेवा विभागातल्या या भावांना इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर करावं लागायचं. मग शाखा कार्यालयाने मंडळ्यांसाठी इंग्रजीत लिहिलेल्या पत्रांचं हे भाऊ वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करायचे. आफ्रिकेतल्या आपल्या काळ्या वर्णाच्या भाऊबहिणींना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे त्या भावांकडून मला समजलं.
त्या काळात दक्षिण आफ्रिकेत वर्णभेद करणारं सरकार होतं. प्रत्येक वंशाला राहण्यासाठी वेगळी जागा देण्यात आली होती. म्हणून ते इतर वंशांच्या लोकांसोबत मिसळू शकत नव्हते. त्यामुळे आफ्रिकेतल्या आपल्या काळ्या वर्णाचे भाऊबहीणसुद्धा आपलीच भाषा बोलायचे, आपल्याच भाषेच्या लोकांना प्रचार करायचे आणि त्याच भाषेतल्या सभांना जायचे.
मी सुरुवातीपासूनच इंग्रजी भाषेच्या मंडळ्यांमध्ये सेवा करत होतो. त्यामुळे काळ्या वर्णाच्या लोकांबद्दल मला जास्त काही माहीत नव्हतं. आता मात्र मला त्यांच्या संस्कृतीबद्दल आणि रीतीरिवाजांबद्दल जाणून घ्यायची संधी मिळाली. मला समजलं, की तिथल्या रूढी-परंपरांमुळे आणि धार्मिक शिकवणींमुळे आपल्या भाऊबहिणींना खूप काही सहन करावं लागतं. पण ते खूप धाडसी होते. कुटुंबातल्या आणि गावातल्या लोकांचा भयंकर विरोध होत असतानाही हे भाऊबहीण बायबलच्या विरोधात असलेल्या रूढी-परंपरा आणि जादूटोणा करायला नकार द्यायचे. खेड्यापाड्यांमध्ये खूप गरिबी होती. अनेकांना तर लिहायला-वाचायलासुद्धा येत नव्हतं. पण बायबलबद्दल त्यांना खूप आदर होता.
त्या काळात आपल्या उपासनेच्या आणि तटस्थ भूमिका घेण्याच्या बाबतीत कोर्टात अनेक खटले लढले जात होते. त्या खटल्यांवर काम करण्याची संधी मला मिळाली. साक्षीदारांच्या काही मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. कारण त्यांनी धार्मिक गीतं आणि प्रार्थना म्हणायला नकार दिला होता. त्या लहान मुलांची निष्ठा आणि ध्येयं पाहून माझा विश्वास मजबूत झाला.
आफ्रिकेच्या एका छोट्या देशामध्ये, ज्याला स्वाझीलँड म्हटलं जायचं, भाऊबहिणींना आणखी एका समस्येचा सामना करावा लागला. जेव्हा सोबूजा दुसरा या राजाचा मृत्यू झाला तेव्हा सर्व नागरिकांना शोक व्यक्त करण्यासाठी एक प्रथा पाळायला सांगितली होती. पुरुषांना आपल्या डोक्याचं मुंडण करायचं होतं, आणि स्त्रियांना आपले केस बारीक कापायचे होते. अनेक भाऊबहिणींनी ते करायला नकार दिला. कारण या प्रथेचा संबंध पूर्वजांच्या उपासनेशी होता. त्यासाठी त्यांचा खूप छळ करण्यात आला. तरीसुद्धा ते यहोवाला एकनिष्ठ राहिले. हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला. आफ्रिकेतल्या या भाऊबहिणींकडून एकनिष्ठेबद्दल, धीराबद्दल आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. त्यामुळे आमचा विश्वास मजबूत झाला.
पुन्हा छपाईच्या विभागात
१९८१ मध्ये पुन्हा मला छपाईच्या विभागात नेमण्यात आलं. तेव्हा छपाईच्या कामासाठी कंप्यूटरचा वापर होऊ लागला होता. त्यामुळे शिकण्यासारखं खूप काही होतं. छपाईच्या क्षेत्रात नवनवीन बदल घडत होते. एका सेल्समॅनने शाखा कार्यालयाला फोटोटाईपसेटर ही मशीन वापरून पाहायला दिली होती. त्या बदल्यात त्याने कोणतेही पैसे घेतले नाही. त्यामुळे नऊ लायनोटाईप मशीनऐवजी आता आम्ही फक्त पाच फोटोटाईपसेटर मशीन वापरू लागलो. त्यासोबतच आम्ही एक नवीन प्रिंटिंग प्रेससुद्धा घेतली. त्यामुळे काम खूप भरभर होऊ लागलं.
कंप्यूटरच्या मदतीने एक नवीन प्रोग्राम तयार करण्यात आला. त्याचं नाव आहे, मल्टीलँग्वेज इलेक्ट्रॉनिक पब्लिशिंग सिस्टम (MEPS). या प्रोग्राममुळे छापण्याआधी माहिती कंप्यूटरवर सुव्यवस्थितपणे मांडायला मदत होते. कॅनडा बेथेलमधून आम्ही चार भाऊ दक्षिण आफ्रिकेमध्ये आलो तेव्हापासून टेक्नोलॉजीमध्ये खूप बदल झाला होता. (यश. ६०:१७) तोपर्यंत आम्हा चौघांचं यहोवावर प्रेम करणाऱ्या पायनियर बहिणींशी लग्न झालं होतं. मी आणि बिल बेथेलमध्ये सेवा करत राहिलो. पण केन आणि डेनिस यांना मुलं झाली होती आणि ते बेथेलच्या जवळपास राहत होते.
शाखा कार्यालयातलं काम खूप वाढलं होतं. बायबल साहित्याचं अनेक भाषांमध्ये भाषांतर केलं जात होतं. आणि त्याची छपाई करून वेगवेगळ्या शाखांना पाठवलं जात होतं. त्यामुळे आता आम्हाला एका मोठ्या बेथेलची गरज होती. जोहानिसबर्गच्या पश्चिमेकडे बांधवांनी एक सुंदर बेथेल बांधलं, आणि १९८७ मध्ये त्याचं समर्पण करण्यात आलं. या वाढीत हातभार लावायची आणि दक्षिण आफ्रिकेच्या शाखा समितीमध्ये अनेक वर्षं सेवा करायची संधी मला मिळाली, याचा मला खूप आनंद आहे.
पुन्हा एक नवीन नेमणूक
२००१ मध्ये अमेरिकेत नवीन शाखा समिती बनवण्यात आली. आणि त्यात सेवा करण्यासाठी मला बोलावण्यात आलं. मी याची अपेक्षाच केली नव्हती. दक्षिण आफ्रिकेतलं आमचं काम आणि मित्रांना सोडून जायला आम्हाला खूप वाईट वाटत होतं. पण त्याच वेळी अमेरिकेतल्या बेथेल कुटुंबाचा भाग होण्यासाठीही आम्ही खूप उत्सुक होतो.
आम्हाला लॉराच्या आईची काळजी वाटत होती. कारण तिचं वय झालं होतं. आणि न्यूयॉर्कमध्ये राहून आम्ही तिच्यासाठी फारसं काही करू शकलो नसतो. पण लॉराच्या तीन बहिणी तिची काळजी घ्यायला तयार झाल्या. त्या म्हणाल्या, “आम्ही पूर्ण-वेळची सेवा तर करू शकत नाही. पण आईची काळजी नक्कीच घेऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सेवा करत राहायला मदत होईल.” त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत.
लॉराच्या बहिणींप्रमाणे कॅनडाच्या टोरॉन्टोमध्ये राहणाऱ्या माझ्या भावाने आणि वहिनीने माझ्या आईची काळजी घेतली. कारण माझे वडील वारले होते आणि ती एकटीच होती. जवळजवळ २० वर्षं आई माझ्या भावाजवळच राहत होती. आम्ही न्यूयॉर्कला आलो त्याच्या काही काळानतंरच आई वारली. माझ्या भावाने आणि वहिनीने आईची खूप प्रेमाने काळजी घेतली. त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. वयस्कर आईवडिलांची काळजी घेणं सोपं नसतं. पण आम्हाला आमची पूर्ण-वेळची सेवा करता यावी म्हणून आमच्या कुटुंबांनी ती जबाबदारी घेतली. आम्हाला अशी कुटुंबं मिळाली याचा आम्हाला खूप आनंद आहे.
अमेरिकेत काही वर्षं मी छपाई विभागात काम केलं. आणि टेक्नोलॉजीमुळे हे काम आणखी सोपं झालं. आता काही काळापासून मी खरेदी विभागात काम करत आहे. या बेथेलमध्ये जवळपास ५,००० भाऊबहीण इथे राहून सेवा करतात आणि २,००० घरून येऊन सेवा करतात. गेल्या २० वर्षांपासून इतक्या मोठ्या शाखा कार्यालयामध्ये सेवा करण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद होत आहे.
साठ वर्षांआधी मी याचा विचारसुद्धा केला नव्हता, की यहोवाच्या सेवेत मला इतकं काही करायला मिळेल. या संपूर्ण काळात लॉराने मला खूप चांगली साथ दिली. आमचं आयुष्य खूप सुंदर होतं. या काळात आम्ही वेगवेगळ्या प्रकारची सेवा केली, वेगवेगळ्या भावांसोबत काम केलं आणि जगभरातल्या अनेक शाखांना भेटी दिल्या. आता मी वयाची ८० ओलांडली आहे. माझं काम कमी करण्यात आलं आहे. कारण ते काम करण्यासाठी अनेक तरुण भाऊ आहेत.
स्तोत्रकर्त्याने म्हटलं, “ज्या राष्ट्राचा देव यहोवा आहे; . . . ते सुखी आहेत!” (स्तो. ३३:१२) हे किती खरं आहे! यहोवाच्या लोकांसोबत मिळून काम केल्याने आनंद मिळतो हे मी स्वतः अनुभवलंय!