वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr26 जुलै पृ. १-१२
  • “जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका” संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका” संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ—२०२६
  • उपशिर्षक
  • ६-१२ जुलै
  • १३-१९ जुलै
  • २०-२६ जुलै
  • २७ जुलै–२ ऑगस्ट
  • ३-९ ऑगस्ट
  • १०-१६ ऑगस्ट
  • १७-२३ ऑगस्ट
  • २४-३० ऑगस्ट
  • ३१ ऑगस्ट–६ सप्टेंबर
जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ—२०२६
mwbr26 जुलै पृ. १-१२

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ

© 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

६-१२ जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यिर्मया १३-१५

नेहमी यहोवाच्या आज्ञा पाळा

जेरमाया अध्या. ४ ¶१७-१८

धोका देणाऱ्‍या हृदयापासून स्वतःचं रक्षण करा

१७ यिर्मयाला त्याची नेमणूक पूर्ण करायला देवाची आज्ञा पाळणं गरजेचं होतं. तुम्ही यिर्मयाच्या जागी असता तर काय केलं असतं? एकदा यहोवाने त्याला मलमलीचा पट्टा विकत घ्यायला आणि तो घालायला सांगितलं. पुढे यहोवाने त्याला तो पट्टा घेऊन ५०० कि.मी. दूर असलेल्या फरात नदीकडे जायला सांगितलं. तिथे त्याला तो पट्टा एका खडकाच्या कपारीत लपवून ठेवायचा होता. आणि मग पुन्हा यरुशलेमला यायचं होतं. नंतर यहोवाने त्याला पुन्हा जाऊन तो पट्टा आणायला सांगितलं. (यिर्मया १३:१-९ वाचा.) यिर्मयाला जाऊन-येऊन जवळपास १९०० कि.मी. चा प्रवास करावा लागला असावा. पण यिर्मयाने इतके महिने पायी चालून हा प्रवास केला असेल, हे काही बायबल टिकाकारांना पटत नाही. (एज्रा ७:९) तरी, बायबल सांगतं की देवाने त्याला हे करायला सांगितलं होतं आणि त्यानेही ते केलं.

१८ यिर्मयाचा प्रवास कसा असेल याचा विचार करा. त्याला फरात नदीकडे जायला यहूदाच्या डोंगराळ भागातून आणि ओसाड रानातून प्रवास करावा लागला. हे सगळं त्याला फक्‍त एक पट्टा लपवण्यासाठी करावं लागलं. त्याच्या शेजाऱ्‍यांना तो बरेच दिवस दिसला नसल्यामुळे, तो नेमका कुठे गेलाय असा त्यांना प्रश्‍न पडला असेल. काही दिवसांनी तो परत आला तेव्हा त्याच्याकडे तो पट्टा नव्हता. मग देवाने त्याला पुन्हा लांबचा प्रवास करून तो पट्टा आणायला सांगितलं. आता “तो पट्टा पूर्णपणे खराब झाला होता; तो वापरण्याच्या लायकीचा राहिला नव्हता.” यिर्मया सहज असा विचार करू शकला असता: ‘हे सगळं करायचा काय फायदा आहे?’ पण तो देवासारखा विचार करायचा. म्हणून तक्रार करण्याऐवजी त्याने देवाची आज्ञा जशीच्या तशी पाळली.

जेरमाया अध्या. ४ ¶१९

धोका देणाऱ्‍या हृदयापासून स्वतःचं रक्षण करा

१९ यिर्मया पुन्हा फरात नदीकडे जाऊन आल्यावर यहोवाने त्याला सगळ्या गोष्टींचा उलगडा करून सागितलं. यिर्मयाने जे केलं त्यामुळे त्याला हा जबरदस्त संदेश सांगता आला: “हे दुष्ट लोक माझ्या आज्ञा पाळत नाहीत, ते हट्टी आहेत आणि आपल्या मनाला येईल तसं वागतात. ते इतर देवांच्या नादी लागलेत. ते त्यांची सेवा करतात आणि त्यांच्या पाया पडतात. म्हणून या दुष्ट लोकांची अवस्था या पट्ट्यासारखीच होईल; ते कुठल्याच कामाचे राहणार नाहीत.” (यिर्म. १३:१०) खरंच, यहोवाने त्याच्या लोकांना किती अनोख्या मार्गाने शिकवलं! यहोवाने दिलेली आज्ञा तर्काला पटणारी नसली तरी त्याने ती मनापासून पाळली. आणि त्याने आज्ञा पाळल्यामुळे लोकांना यहोवाचा संदेश चांगल्या प्रकारे समजून घेता आला.—यिर्म. १३:११.

टेहळणी बुरूज२२.१२ २१ ¶१६

कठीण परिस्थितीतही शांती अनुभवा

१६ आपल्या कामावर प्रतिबंध लावला जातो किंवा बंदी घातली जाते तेव्हा आपल्याला शाखा कार्यालयाकडून आणि मंडळीतल्या वडिलांकडून काही सूचना मिळू शकतात. आपल्याला सुरक्षित राहता यावं, आध्यात्मिक अन्‍न मिळत राहावं आणि जितकं शक्य असेल तितकं प्रचारकार्य करता यावं, म्हणून या सूचना आपल्याला दिल्या जातात. या सूचना देण्यामागचं कारण जरी समजलं नसलं, तरी या सूचनांचं पूर्णपणे पालन करायचा प्रयत्न करा. (याको. ३:१७) तसंच आपल्या भाऊबहिणींबद्दल आणि मंडळीबद्दल ज्यांना जाणून घ्यायचा हक्क नाही अशा कोणत्याही व्यक्‍तीला त्याबद्दल सांगू नका.—उप. ३:७.

टेहळणी बुरूज०८ ६/१५ १९ ¶७

यहोवाचा अधिकार मान्य करा

७ यहोवाच्या वचनात दिलेल्या एखाद्या आज्ञेमागचे कारण आपल्याला पूर्णपणे समजले नाही तरीसुद्धा आपण त्याचा अधिकार मान्य करतो आणि त्याच्या आज्ञांचे पालन करतो. अंधविश्‍वासामुळे किंवा भोळसटपणामुळे नव्हे, तर देवावर असलेल्या भरवशामुळे आपण असे करतो. कोणती गोष्ट आपल्या हिताची आहे हे यहोवाला माहीत आहे याची आपल्याला मनःपूर्वक खात्री असल्याचे यावरून दिसून येते. आपण यहोवाच्या आज्ञांचे पालन का करतो याचे आणखी एक कारण म्हणजे आपले त्याच्यावर प्रेम आहे. प्रेषित योहानाने लिहिले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय.” (१ योहा. ५:३) पण आज्ञापालनाचा आणखी एक पैलू आहे व त्याकडे आपण दुर्लक्ष करू नये.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज०७ ३/१५ १० ¶३

यिर्मया पुस्तकातील ठळक मुद्दे

१५:१६, १७. यिर्मयाप्रमाणे आपणही निराशेवर मात करू शकतो. अर्थपूर्ण वैयक्‍तिक बायबल अभ्यास करण्याद्वारे, प्रचार कार्यात यहोवाच्या नावाचे गौरव करण्याद्वारे व वाईट संगती टाळण्याद्वारे आपण असे करू शकतो.

१३-१९ जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यिर्मया १६-१७

तुम्ही योग्य व्यक्‍तीवर भरवसा ठेवताय का?

टेहळणी बुरूज०९ ३/१ १७ ¶२

“ज्याची पाने कोमेजत नाहीत” असे झाड

प्राचीन काळांत, सीरिया व पॅलेस्टाईनमध्ये नद्यांच्या व ओहळांच्याकाठी वाळुंजांची मोठमोठी वृक्षे वाढायची. बायबलमध्ये, जेव्हा जेव्हा वाळुंजांचा उल्लेख येतो तेव्हा तेव्हा त्यांचा संबंध सहसा जलप्रवाह किंवा ‘ओहळ’ यांजशी आहे. (लेवीय २३:४०; यहेज्केल १७:५) विलो नावाचा वृक्ष वाळुंजाच्याच जातीतला आहे. हे वृक्षही मुबलक पाणी असलेल्या ठिकाणी वाढत असल्याचे दिसून येते. या मोठमोठ्या, सदाहरित झाडांवरून आपल्याला, स्तोत्रकर्ता आणि यिर्मया जे काही सांगू पाहत होते ते लगेच समजते. त्या दोघांनाही असे म्हणायचे होते, की देवाच्या नियमांचे पालन करणारे व त्याच्यावर पूर्ण मनाने भरवसा ठेवणारे लोक, आध्यात्मिक अर्थाने सुदृढ राहतात आणि ते ‘जे काही हाती घेतात ते सिद्धीस जाते.’ आपल्याला आणखी काय हवे आहे? आपल्याला जीवनात यशच तर हवे आहे, नाही का?

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज२२.०२ ४ ¶७-८

यहोवा जे काही करतो ते योग्यच असतं असा भरवसा ठेवा

७ यहोवा जे काही करतो ते नेहमी योग्यच असतं याबद्दल आपल्याला कोणतीही शंका नाही. पण पृथ्वीवर आपल्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी यहोवाने ज्या बांधवांना नेमलं आहे त्यांच्यावर भरवसा ठेवणं काही वेळा आपल्याला कठीण जाऊ शकतं. यहोवाच्या संघटनेत ज्यांना अधिकार देण्यात आला आहे, ते खरंच यहोवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करतात, की स्वतःच्या मनाप्रमाणे, असा प्रश्‍न कदाचित आपल्याला पडेल. बायबल काळातल्या काही लोकांनाही असा प्रश्‍न पडला असावा. तिसऱ्‍या परिच्छेदात आपण जी उदाहरणं पाहिली होती, त्यांचाच विचार करा. शब्बाथाचा नियम मोडणाऱ्‍या त्या इस्राएली माणसाच्या एखाद्या नातेवाइकाला कदाचित असा प्रश्‍न पडला असेल, की मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्याआधी मोशेने खरंच यहोवाला विचारलं असेल का? तसंच, उरीयाच्या एखाद्या मित्रानेही कदाचित असा विचार केला असेल, की दावीद तर राजा आहे, त्यामुळे शिक्षेपासून वाचण्यासाठी त्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर तर केला नसेल ना? आज यहोवाने त्याच्या संघटनेत आणि मंडळीत नेतृत्व करण्यासाठी ज्या बांधवांना नेमलं आहे, त्यांच्यावर तो पूर्ण भरवसा ठेवतो. त्यामुळे आपण जर या बांधवांवर भरवसा ठेवला नाही, तर यहोवावर आपला भरवसा आहे असं म्हणता येणार नाही.

८ आज यहोवा ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाद्वारे’ आपल्या संघटनेच्या पृथ्वीवरच्या भागाचं नेतृत्व करत आहे. (मत्त. २४:४५) पहिल्या शतकातल्या नियमन मंडळाप्रमाणे हा ‘दास’ जगभरातल्या देवाच्या लोकांची देखरेख करतो आणि मंडळीतल्या वडिलांना मार्गदर्शन पुरवतो. (प्रे. कार्यं १६:४, ५ वाचा.) मग वडील मिळालेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मंडळीत काम करतात. आज आपण संघटनेकडून आणि मंडळीतल्या वडिलांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचं पालन करतो, तेव्हा हेच दाखवत असतो की यहोवावर आपलाही पूर्ण भरवसा आहे.

२०-२६ जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यिर्मया १८-१९

देवासोबत पुन्हा नातं जोडणं शक्य आहे

टेहळणी बुरूज२५.०४ ४ ¶१०

“आजच ठरवा तुम्ही कोणाची उपासना करणार”

१० येशूप्रमाणेच, यहोवाची सेवा करायचं आपलं मुख्य कारण म्हणजे, त्याच्यावरचं आपलं प्रेम. (मत्तय २२:३७ वाचा.) आपण जेव्हा यहोवाच्या चांगल्या गुणांबद्दल शिकतो तेव्हा आपल्याला त्याच्या आणखी जवळ जावंसं वाटतं. उदाहरणार्थ, तो आपल्या लोकांशी धीराने कसा वागतो त्याचा विचार करा. जेव्हा इस्राएली लोकांनी त्याची आज्ञा मोडली तेव्हा त्याने त्यांना अशी विनंती केली: “कृपा करून तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून द्या.” (यिर्म. १८:११) यहोवाला माहीत आहे की आपण अपरिपूर्ण आहोत, म्हणून तो आपल्याशी धीराने वागतो. (स्तोत्र १०३:१३, १४ वाचा.) तुम्ही जेव्हा यहोवाच्या या आणि इतर चांगल्या गुणांवर मनन करता, तेव्हा तुम्हाला कायमसाठी त्याची सेवा करावीशी वाटत नाही का?

टेहळणी बुरूज२५.०८ २३ ¶११

तुम्ही चुकीच्या इच्छांविरुद्धची लढाई जिंकू शकता!

११ जेव्हा आपल्याला दुर्बळ असल्यासारखं वाटतं आणि आपण चुकीच्या इच्छांविरुद्धच्या आपल्या लढाईत विजयी होऊ शकत नाही असं वाटतं, तेव्हा जणू काय आपल्यातली पापी स्थितीच आपल्याला हे सांगत असते. पण आपण तिचं मुळीच ऐकू नये. आपण असं का केलं पाहिजे? कारण बायबल आपल्याला सांगतं, की आपण पापाला आपल्यावर “राजा म्हणून राज्य” करू देऊ नये. (रोमकर ६:१२ वाचा.) याचा अर्थ, आपण चुकीच्या इच्छांनुसार काम न करायचं निवडू शकतो. (गलती. ५:१६) यहोवाला पूर्ण खातरी आहे की आपण मोहांचा प्रतिकार करू शकतो. जर त्याला अशी खातरी नसती तर त्याने आपल्याकडून तशी अपेक्षाच केली नसती. (अनु. ३०:११-१४; रोम. ६:६; १ थेस्सलनी. ४:३) तर स्पष्टच आहे, चुकीच्या इच्छांविरुद्धच्या आपल्या लढाईत आपण दुर्बळ नाही.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज१६.०६ ६-७ ¶२-३

महान कुंभाराला तुम्हाला आकार देऊ द्या

२ पण जेव्हा आदामाने आपल्या निर्माणकर्त्याविरूद्ध बंड केला, तेव्हा “देवाचा पुत्र” असण्याचा बहुमान त्यानं गमावला. तरी, आदामाच्या संततीपैकी अनेकांनी मात्र यहोवाला आपला शासक म्हणून निवडलं आहे. (इब्री १२:१) नम्रपणे आपल्या निर्माणकर्त्याच्या आज्ञेत राहण्याद्वारे त्यांनी हे दाखवून दिलं आहे, की आपला पिता आणि कुंभार म्हणून सैतानाला नाही तर यहोवाला त्यांनी निवडलं आहे. (योहा. ८:४४) त्यांच्या एकनिष्ठेवरून आपल्याला पश्‍चात्तापी इस्राएली लोकांनी जे म्हटलं त्याची आठवण होते. त्यांनी म्हटलं: “हे परमेश्‍वरा, तू आमचा पिता आहेस; आम्ही माती आहो, तू आमचा कुंभार आहेस; आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहो.”—यश. ६४:८.

३ यहोवाचे खरे उपासक आजदेखील नम्रता आणि आज्ञाधारकता दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. यहोवाला पिता म्हणणं एक बहुमानच आहे असं त्यांना वाटतं. आणि तो त्यांचा कुंभार असावा अशीही त्यांची इच्छा आहे. तुम्हालाही असंच वाटतं का? आकार देऊन जिला देव एका मौल्यवान पात्रात रूपांतरित करू शकतो, अशी मऊ माती होण्याची तुमची तयारी आहे का? यहोवा आपल्या सर्व बंधुभगिनींमध्ये चांगले बदल घडवून आणत आहे आणि त्यांना अजूनही आकार दिला जात आहे हे तुम्ही पाहू शकता का? याबाबतीत योग्य दृष्टिकोन बाळगण्यासाठी आता आपण पुढील तीन गोष्टींवर चर्चा करू या: (१) आकार देण्यासाठी यहोवा एखाद्या व्यक्‍तीची निवड कशी करतो, (२) तो तिला आकार का देतो, आणि (३) तो हे कशा प्रकारे करतो.

२७ जुलै–२ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यिर्मया २०-२१

तो एक धाडसी प्रचारक होता

टेहळणी बुरूज११ ३/१५ ३० ¶९

यिर्मयाप्रमाणे जागृत राहा

९ यहोवा पहिल्यांदा यिर्मयाशी बोलला तेव्हा त्याने कारणे सांगण्याचा प्रयत्न केला. यावरून दिसून येते, की त्याने पुढे जे धाडस व खंबीरपणा दाखवला तो जन्मतःच त्याच्यामध्ये नव्हता. तर, संदेष्टा या नात्याने यिर्मयाने आपल्या कार्यकाळात दाखवलेले असामान्य सामर्थ्य त्याला खरेतर पूर्णपणे देवावर विसंबून राहिल्यामुळे मिळाले होते. होय, यहोवा एका “पराक्रमी वीराप्रमाणे” यिर्मया संदेष्ट्याबरोबर होता. याचा अर्थ, यहोवा त्याच्या पाठीशी होता आणि त्याची कामगिरी पार पाडण्यास यहोवाने त्याला सामर्थ्य दिले. (यिर्म. २०:११) यिर्मया आपल्या धाडसासाठी व धैर्यासाठी इतका प्रसिद्ध होता, की पृथ्वीवरील येशूच्या सेवाकार्यादरम्यान काहींना असे वाटले की यिर्मयाच पुन्हा जिवंत होऊन आला आहे!—मत्त. १६:१३, १४.

टेहळणी बुरूज१० २/१५ ७ ¶८-९

‘देवाचे वचन धैर्याने बोला’

८ त्याच प्रकारे, यिर्मया संदेष्ट्याला धैर्य मिळवण्यास कशामुळे साहाय्य मिळाले याचाही विचार करा. यहोवाने त्याला संदेष्टा म्हणून नेमले तेव्हा यिर्मयाने असे उत्तर दिले: “पाहा, मला बोलावयाचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.” (यिर्म. १:४-६) पण, नंतर यिर्मयाने देवाचे संदेश घोषित करण्याचे कार्य इतक्या चिकाटीने व प्रभावीपणे केले की सतत संकटाची घोषणा करणारा म्हणून लोक त्याला ओळखू लागले. (यिर्म. ३८:४) यिर्मया ६५ वर्षांपेक्षा जास्त काळ यहोवाचे न्यायसंदेश धैर्याने घोषित करत राहिला. त्याच्या निडर व धैर्यवान प्रचारासाठी तो इस्राएलात इतका प्रसिद्ध होता की जवळजवळ ६०० वर्षांनंतर जेव्हा लोकांनी येशूला धैर्याने प्रचार करताना ऐकले तेव्हा यिर्मयाच जिवंत झाला आहे असा काहींचा ग्रह झाला. (मत्त. १६:१३, १४) सुरुवातीला संदेष्टा बनायला कचरणाऱ्‍या यिर्मयाने आपल्या बुजऱ्‍या स्वभावावर कशी मात केली? तो सांगतो: “माझ्या हाडांत कोंडलेला अग्नि जळत आहे असे [परमेश्‍वराचे वचन] माझ्या हृदयाला झाले; मी स्वतःला आवरिता आवरिता थकलो, पण मला ते साधेना.” (यिर्म. २०:९) होय, यहोवाच्या वचनाने यिर्मयावर शक्‍तिशाली प्रभाव पाडून त्याला यहोवाविषयी बोलण्यास प्रवृत्त केले.

९ इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलाने म्हटले: “देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्‍यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्‍यांचे परीक्षक असे आहे.” (इब्री ४:१२) देवाच्या वचनाने ज्या प्रकारे यिर्मयावर प्रभाव पाडला त्याच प्रकारे ते आपल्यावरही शक्‍तिशाली प्रभाव पाडू शकते. बायबल लिहिण्यास जरी मानवांचा उपयोग करण्यात आला असला, तरी हा मानवांच्या बुद्धीने रचलेला ग्रंथ नसून देवाने प्रेरित केलेला ग्रंथ आहे हे लक्षात असू द्या. २ पेत्र १:२१ येथे आपण असे वाचतो: “संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.” आपण व्यक्‍तिशः बायबलचा अर्थपूर्ण अभ्यास करतो तेव्हा पवित्र आत्म्याने प्रेरित केलेला बायबलमधील संदेश आपल्या मनावर गहिरा प्रभाव पाडतो. (१ करिंथकर २:१० वाचा.) हा संदेश आपल्या मनात ‘कोंडलेल्या अग्निप्रमाणे’ होईल. आपण तो स्वतःजवळ ठेवू शकणार नाही तर इतरांना सांगण्यास प्रवृत्त होऊ.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज१३ ३/१५ १० ¶११

यहोवाला “ओळखणारे हृदय” तुमच्याजवळ आहे का?

११ यहोवाची अशी इच्छा आहे, की आपल्यापैकी प्रत्येक जण त्याला स्वीकारयोग्य अशा स्थितीत असावे. यिर्मयाने नीतिमान व्यक्‍तीबद्दल म्हटले, की सेनाधीश परमेश्‍वर यहोवा “धार्मिकांचे सत्व” पाहतो, त्यांचे “अंतर्याम व हृदय” पारखतो. (यिर्म. २०:१२) सर्वशक्‍तिमान देव यहोवा नीतिमानांच्याही हृदयाचे परीक्षण करतो, तर आपण स्वतःचे प्रामाणिकपणे परीक्षण करू नये का? (स्तोत्र ११:५ वाचा.) असे करताना कदाचित आपल्याला दिसून येऊ शकते की आपल्यामध्ये अशी एखादी मनोवृत्ती, ध्येय, किंवा खोलवर रुजलेली भावना आहे ज्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आपल्या हृदयाची संवेदनशीलता कमी करणारी एखादी गोष्ट, जणू हृदयाच्या अग्रत्वचेप्रमाणे आपल्यामध्ये आहे हे कदाचित आपल्या लक्षात येईल आणि ती आपण काढून टाकली पाहिजे याची आपल्याला जाणीव होईल. असे करणे हृदयाची लाक्षणिक शस्त्रक्रिया करण्यासारखे आहे. आपल्या लाक्षणिक हृदयाचे परीक्षण करणे हे चांगलेच आहे याच्याशी जर तुम्ही सहमत असाल, तर हृदयाचे परीक्षण करताना तुम्ही कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे? आणि काही सुधार करण्याची गरज असल्यास ते सुधार तुम्ही कसे करू शकता?—यिर्म. ४:४.

३-९ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यिर्मया २२-२३

चांगल्या मेंढपाळांचं महत्त्व

टेहळणी बुरूज९४ ३/१ ८ ¶४

खोट्या शिक्षकांविरूद्ध यहोवाचा न्यायदंड

४ होय, त्या संदेष्ट्यांनी व शिक्षकांनी स्वतःचे असे खूपच वाईट, नैतिक उदाहरण राखले होते व त्याद्वारे लोकांनाही तेच करण्याचे प्रोत्साहन दिले. आजच्या ख्रिस्ती धर्मजगताची स्थिती बघा! ती देखील यिर्मयाच्या काळाप्रमाणेच दिसत नाही का? आज पाळक जारकर्मी व पुरुषगाम्यांना, पाळकांच्या वर्गातील सदस्य म्हणून राहू देतात, शिवाय चर्च सेवेची कर्तव्य पार पाडू देतात. मग, चर्चमध्ये भरती झालेले बहुतेक सदस्य हे देखील अनैतिक आहेत हे आश्‍चर्याचे वाटावे का?

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज०७ ४/१ ११ ¶१

यिर्मया पुस्तकातील ठळक मुद्दे

२३:३३—यहोवाचे “भारी वचन” कशास सूचित करत होते? यिर्मयाने जेरूसलेमच्या नाशाविषयी घोषित केलेले भारी न्यायसंदेश त्याच्या काळातल्या लोकांकरता एखाद्या ओझ्यासारखे वाटत होते. दुसरीकडे पाहता, यहोवाच्या संदेशांकडे दुर्लक्ष करणारे हे लोक त्याला एखाद्या ओझ्यासारखे वाटू लागले आणि त्याने त्यांना सोडून देण्याचे ठरवले. त्याचप्रकारे ख्रिस्ती धर्मजगतातील लोकांना त्यांच्यावर येणार असलेल्या नाशाविषयीचे शास्त्रवचनांतील संदेश एखाद्या ओझ्यासारखे वाटतात आणि जे लोक या संदेशाकडे लक्ष देत नाहीत ते देवाला त्रासदायक वाटतात.

१०-१६ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यिर्मया २४-२५

चांगली आणि खराब अंजिरं

टेहळणी बुरूज९४ ३/१ १४ ¶६

चांगली आणि वाईट—फळे

६ यकोन्या किंवा यहोयाकीम याने नबुखद्‌नेस्सराला, यरूशलेम स्वेच्छेने स्वाधीन करण्यापूर्वी तो यहूदाचा केवळ तीन महिने आणि दहा दिवसांसाठी राजा होता. त्याने धरुन नेलेल्या बंदिवानांपैकी दानीएल आणि त्याचे तीन इब्री साथीदार हनन्या, मासेया, अजऱ्‍या तसेच यहेज्केल हे होते. यांचे जीवन बाबेलच्या राजाने सुरक्षित ठेवले, आणि यामुळे असे म्हटले जाऊ शकते की, यहोवाने या सर्व बंदिवानांना चांगल्या मार्गाने खालड्यांच्या [खास्दी] भूमीकडे निरवले. यहोवाने त्यांच्यावर “कृपादृष्टी” ठेवण्याचे अभिवचन दिले हे तुम्ही पाहिले का? हे कशाप्रकारे पूर्ण झाले? सामान्य युग पूर्व ५३७ मध्ये, ८० वर्षांनंतर, यहोवाने कोरेश राजाला त्यांच्या वंशजाच्या शेषांना यहूदाच्या देशी जाण्याविषयीचा जाहीरनामा काढण्यास कारणीभूत केले. या विश्‍वासू यहूद्यांनी यरुशलेम शहराला बांधले; त्यांचा देव, यहोवा याच्या उपासनेसाठी त्यांनी नव्या यरुशलेम मंदिराची उभारणी केलीः व ते पूर्ण हृदयाने त्याच्याकडे परत गेले. तर या सर्वांमध्ये, हे बंदिवान आणि त्यांचे वंशज यहोवासाठी अगदी चांगल्या अंजिराप्रमाणे होते.

टेहळणी बुरूज९४ ३/१ १५ ¶१०

चांगली आणि वाईट—फळे

१० यास्तव सिदकीया खरेपणाने यहोवाच्या नजरेत ‘वाईट अंजीर’ शाबीत झाला. त्याने नबुखद्‌नेस्सर राजाबरोबर यहोवाच्या नावाने वाहिलेली निष्ठेची शपथ तोडून, त्याच्याविरूद्ध केवळ बंडच केले नाही तर, यिर्मयाद्वारे यहोवाने पुरविलेल्या दयेला त्याने पूर्णपणे नाकारले. वास्तविकपणे, त्याने याहीपेक्षा पुढे जाऊन यिर्मयावर पहारा ठेवला! दुसरे इतिहास ३६:१२ मध्ये एज्राने राजाच्या वृत्तीचा याप्रकारे सारांश दिला: “त्याने आपला देव परमेश्‍वर [यहोवा, न्यूव] याच्या दृष्टीने जे वाईट ते केले; तो त्याजसमोर नम्र झाला नाही.” यहोवाच्या नजरेत सिदकीया आणि यरुशलेमेत राहणारे, टोपलीतल्या वाईट, नासक्या अंजिराप्रमाणे होते!

टेहळणी बुरूज१३ ३/१५ ८ ¶३

यहोवाला “ओळखणारे हृदय” तुमच्याजवळ आहे का?

३ सर्वात आधी आपण यिर्मयाच्या दिवसांत देवाने अंजिरांविषयी काय म्हटले होते ते पाहू या. इ.स.पू. ६१७ मध्ये यहुदा राष्ट्राची आध्यात्मिक स्थिती फार वाईट होती. भविष्यात काय घडेल याविषयी देवाने यिर्मयाला एक दृष्टान्त दिला. त्यात त्याने दोन प्रकारचे अंजीर म्हणजे “फार चांगले अंजीर” आणि “फार वाईट अंजीर” यिर्मयाला दाखवले. (यिर्मया २४:१-३ वाचा.) वाईट अंजीर हे सिद्‌कीया राजा आणि त्याच्यासारख्या इतर जणांना सूचित करत होते ज्यांना नबुखद्‌नेस्सर राजाकरवी व त्याच्या सैन्याकरवी अतिशय क्रूर वागणूक दिली जाणार होती. पण, आधीपासूनच बॅबिलोनमध्ये असलेल्या यहेज्केल, दानीएल व त्याच्या तीन साथीदारांबद्दल आणि काही यहुदी ज्यांना लवकरच तेथे नेले जाणार होते त्यांच्याबद्दल काय म्हणता येईल? ते चांगल्या अंजिरांप्रमाणे होते. त्यांच्यापैकी काही शेषजन जेरूसलेम व त्यातील मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी जेरूसलेमला परतणार होते, आणि कालांतराने तसेच घडले.—यिर्म. २४:८-१०; २५:११, १२; २९:१०.

टेहळणी बुरूज१३ ३/१५ १० ¶१०-११

यहोवाला “ओळखणारे हृदय” तुमच्याजवळ आहे का?

१० देव आपल्याला आपल्या लाक्षणिक हृदयाचे परीक्षण करण्यास सांगतो याबद्दल आपण किती कृतज्ञ असू शकतो! ‘पण, आज यहोवाच्या साक्षीदारांनी याबद्दल काळजी का केली पाहिजे?’ असा प्रश्‍न काहींना पडू शकतो. आज मंडळ्यांतील अनेक ख्रिस्ती वाईट मार्गांत चालत आहेत किंवा अनेक जण यिर्मयाच्या दिवसांतील वाईट अंजिरांसारखे बनत आहेत असे नाही. उलट, आज देवाचे सेवक त्याची एकनिष्ठपणे सेवा करणारे शुद्ध लोक आहेत. तरीसुद्धा, दाविदाने यहोवाला केलेल्या विनंतीचा विचार करा. त्याने म्हटले: “हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा.”—स्तो. १७:३; १३९:२३, २४.

११ यहोवाची अशी इच्छा आहे, की आपल्यापैकी प्रत्येक जण त्याला स्वीकारयोग्य अशा स्थितीत असावे. यिर्मयाने नीतिमान व्यक्‍तीबद्दल म्हटले, की सेनाधीश परमेश्‍वर यहोवा “धार्मिकांचे सत्व” पाहतो, त्यांचे “अंतर्याम व हृदय” पारखतो. (यिर्म. २०:१२) सर्वशक्‍तिमान देव यहोवा नीतिमानांच्याही हृदयाचे परीक्षण करतो, तर आपण स्वतःचे प्रामाणिकपणे परीक्षण करू नये का? (स्तोत्र ११:५ वाचा.) असे करताना कदाचित आपल्याला दिसून येऊ शकते की आपल्यामध्ये अशी एखादी मनोवृत्ती, ध्येय, किंवा खोलवर रुजलेली भावना आहे ज्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आपल्या हृदयाची संवेदनशीलता कमी करणारी एखादी गोष्ट, जणू हृदयाच्या अग्रत्वचेप्रमाणे आपल्यामध्ये आहे हे कदाचित आपल्या लक्षात येईल आणि ती आपण काढून टाकली पाहिजे याची आपल्याला जाणीव होईल. असे करणे हृदयाची लाक्षणिक शस्त्रक्रिया करण्यासारखे आहे. आपल्या लाक्षणिक हृदयाचे परीक्षण करणे हे चांगलेच आहे याच्याशी जर तुम्ही सहमत असाल, तर हृदयाचे परीक्षण करताना तुम्ही कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे? आणि काही सुधार करण्याची गरज असल्यास ते सुधार तुम्ही कसे करू शकता?—यिर्म. ४:४.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट “देवाचं राज्य” ¶३६

देवाचं राज्य

यहोवाने सांगितलं होतं, की तो राष्ट्रांना इस्राएल आणि यहूदावर हल्ला करायला ‘आणेल’. त्याप्रमाणे अश्‍शूर आणि बाबेलने इस्राएल आणि यहूदावर हल्ला केला. (अनु २८:४९; यिर्म ५:१५; २५:८, ९; यहे ७:२४; आम ६:१४) इस्राएली लोक हट्टी होते आणि यहोवाच्या आज्ञा पाळत नव्हते. म्हणून यहोवाने त्यांना शिक्षा केली. त्यांना युद्ध, महामारी आणि दुष्काळाचा सामना करावा लागला. (यिर्म ३४:१७) यहोवानेच अश्‍शूर आणि बाबेल या राष्ट्रांना यहूदा आणि इस्राएलवर हल्ला करू दिला असला, तरी ती राष्ट्रं यहोवाच्या नजरेत निर्दोष नव्हती. कारण त्यांनी निर्दयीपणे इस्राएल आणि यहूदाचा, तसंच यरुशलेम आणि तिथल्या मंदिराचा नाश केला. सर्व पृथ्वीचा न्यायाधीश असलेल्या यहोवाने असं म्हटलं, की त्यांनी ‘माझा वारसा लुटला’ आणि त्यासाठी त्यांना नक्की शिक्षा होईल. त्यांनी देवाच्या लोकांचा जसा नाश केला, तसाच त्यांचाही नाश होणार होता.—यश १०:१२-१४; १४:४-६, १२-१४, ४७:५-७; यिर्म ५०:११, २९.

१७-२३ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यिर्मया २६-२८

खोट्या संदेष्ट्यांकडून भुलवले जाऊ नका

टेहळणी बुरूज२४.०७ ११-१२ ¶१३-१५

सत्य आणि असत्य यातला फरक ओळखा

१३ “फायदेकारक वचनांच्या नमुन्याला धरून राहा.” (२ तीम. १:१३) बायबलमध्ये ज्या ख्रिस्ती शिकवणी आहेत त्यांना या ठिकाणी ‘फायदेकारक वचनांचा नमुना’ असं म्हटलंय. (योहा. १७:१७) या शिकवणी आपल्या विश्‍वासाचा आधार आहेत. यहोवाच्या संघटनेने आपल्याला या नमुन्याला धरून राहायला शिकवलंय. जोपर्यंत आपण असं करू, तोपर्यंत आपल्याला आशीर्वाद मिळत राहतील.

१४ आपण जर ‘फायदेकारक वचनांच्या नमुन्यापासून’ भरकटलो तर काय होऊ शकतं? याचं एक उदाहरण विचारात घ्या. पहिल्या शतकात काही ख्रिश्‍चनांमध्ये अशी अफवा पसरली होती की यहोवाचा दिवस आलाय. कदाचित एका पत्रामुळे त्यांची अशी समजूत झाली असेल. आणि हे पत्र प्रेषित पौलकडून आहे असं वाटल्यामुळे त्यांनी त्यावर विश्‍वास ठेवला असेल. पण वस्तुस्थिती काय आहे हे तपासण्याऐवजी थेस्सलनीका इथल्या काही ख्रिश्‍चनांनी या अफवेवर विश्‍वास ठेवला आणि ती आणखी पसरवली. पौल त्यांच्यासोबत असताना त्याने त्यांना जे शिकवलं होतं त्या गोष्टी जर त्यांनी लक्षात ठेवल्या असत्या तर त्यांची अशी फसवणूक झाली नसती. (२ थेस्सलनी. २:१-५) म्हणून पौलने त्यांना असा सल्ला दिला की ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्‍वास ठेवू नका. आणि भविष्यात त्यांना या बाबतीत मदत व्हावी म्हणून पौलने थेस्सलनीकाकरांना लिहिलेल्या दुसऱ्‍या पत्राच्या शेवटी असं म्हटलं: “मी पौल स्वतःच्या अक्षरांत तुम्हाला माझा नमस्कार सांगतो. प्रत्येक पत्रात हीच माझी खूण आहे; मी अशाच पद्धतीने लिहितो.”—२ थेस्सलनी. ३:१७.

१५ पौलने थैस्सलनीकाकरांना लिहिलेल्या पत्रातून आपण काय शिकू शकतो? जेव्हा एखादी गोष्ट बायबलमधून शिकलेल्या गोष्टींप्रमाणे नसते किंवा एखादी खळबळजनक अफवा आपण ऐकतो, तेव्हा आपण समजबुद्धीने वागलं पाहिजे. पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमध्ये आपल्या शत्रूंनी एकदा एक पत्र भाऊबहिणींना पाठवलं होतं. हे पत्र जणू जागतिक मुख्यालयातूनच आलंय असं वाटत होतं. या पत्रात आपल्या भावांना वेगळं होऊन एक स्वतंत्र संघटना स्थापन करण्याबद्दल प्रोत्साहन दिलं होतं. हे पत्र अगदी खरं असल्यासारखं भासत होतं. पण आपले विश्‍वासू भाऊबहीण यात फसले नाहीत. त्यांना कळलं, की या पत्रातला संदेश शिकलेल्या गोष्टींशी जुळत नाही. आजसुद्धा सत्याचे काही शत्रू कधीकधी आपल्याला गोंधळात टाकण्याच्या किंवा आपल्यात फूट पाडण्याच्या प्रयत्नात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. पण आपण ‘लगेच गोंधळून न जाता,’ जे ऐकतो किंवा वाचतो ते शिकलेल्या गोष्टींप्रमाणे आहे की नाही याचा विचार केला पाहिजे आणि स्वतःचं रक्षण केलं पाहिजे.—२ थेस्सलनी. २:२; १ योहा. ४:१.

आध्यात्मिक रत्नं शोधा

जेरमाया अध्या. १० ¶१८

“यहोवा कुठे आहे?” असं तुम्ही दररोज विचारता का?

१८ संदेष्टा म्हणून काम करत असताना यिर्मया इतर संदेष्ट्यांच्या अनुभवातून शिकला. त्यांपैकी एक उरीया होता. त्याने यहोयाकीम राजाच्या शासनकाळत यरुशलेम आणि यहूदाविरुद्ध संदेश दिला. पण तो राजाला घाबरून इजिप्तला पळून गेला. म्हणून राजाने त्याला परत आणण्यासाठी माणसं पाठवली आणि मग त्याला मारून टाकलं. (यिर्म. २६:२०-२३) यिर्मया उरीयाच्या अनुभवातून शिकला असेल का? हो, नक्कीच! तो उरीयासारखा घाबरला नाही. उलट त्याने यहुद्यांवर येणाऱ्‍या संकटांबद्दल त्यांना वारंवार ताकीद दिली. इतकंच काय तर, त्याने मंदिरात सगळ्यांसमोर हे केलं. यिर्मया धैर्य दाखवत राहिला. आणि यहोवाने शाफानचा मुलगा अहीकाम याचा वापर करून त्याचा जीव वाचवला.—यिर्म. २६:२४.

२४-३० ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यिर्मया २९-३०

यहोवा त्याच्या सेवकांना योग्य प्रमाणात शिस्त लावतो

जेरमाया अध्या. १० ¶३

“यहोवा कुठे आहे?” असं तुम्ही दररोज विचारता का?

३ “यहोवा कुठे आहे” असं यहुद्यांनी विचारायला पाहिजे होतं. त्यांनी अगदी छोटे-छोटे निर्णय घेताना यहोवाचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. म्हणून यिर्मयाने अशी भविष्यवाणी केली, की त्यांना बाबेलच्या बंदिवासात नेलं जाईल. पण यिर्मयाने असंही सांगितलं, की ते त्यांच्या मायदेशी परत येतील आणि त्यांना यहोवाचा शोध घ्यावा लागेल. तसंच, त्यांना यहोवाचे मार्ग शिकून घ्यावे लागतील. (यिर्मया २९:१३, १४ वाचा.) मग हे ते कसं करू शकणार होते? एक मार्ग म्हणजे, मार्गदर्शनासाठी त्यांनी यहोवाला मनापासून प्रार्थना करणं गरजेचं होतं. खरंतर, यहोवा स्वतः त्यांना असं म्हणाला: “मला हाक मार आणि मी तुला उत्तर देईन. मी तुला मोठ्या आनंदाने अशा गोष्टी सांगीन ज्या अद्‌भुत आणि समजण्यापलीकडे आहेत; अशा गोष्टी ज्या तुला माहीत नाहीत.” (यिर्म. ३३:३) जर त्यांनी यहोवाला हाक मारली, तर तो त्यांना “समजण्यापलीकडे” असलेल्या म्हणजेच, यरुशलेमच्या नाशाविषयी आणि ७० वर्षांनंतरच्या त्याच्या पुनर्बांधणीविषयी सांगणार होता.

जेरमाया अध्या. १४ ¶२

नवीन करारामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो

२ यहोवा यहुद्यांना परत त्यांच्या मायदेशी आणेल असं यिर्मयाने सांगितलं. पण जे चुकीचं वागणार होते त्यांना तो मदत करणार नव्हता किंवा त्यांच्यासाठी आपले स्तर बदलणार नव्हता. तो त्यांना नक्की शिक्षा देणार होता. (यिर्म. १६:१७, १८) यिर्मयाच्या काळात, यरुशलेममधले बरेच लोक ‘न्यायाने वागणारे आणि विश्‍वासू राहण्याचा प्रयत्न करणारे’ नव्हते. म्हणून यहोवा त्यांना आणखी दया दाखवणार नव्हता. तो म्हणाला: “त्यांना सारखी-सारखी दया दाखवून मी वैतागलोय.” (यिर्म. ५:१; १५:६, ७) ‘त्यांच्या वाडवडिलांनी पूर्वी जे अपराध केले होते, तेच अपराध ते करत होते.’ त्यांनी खोट्या देवांची उपासना करून यहोवाला चीड आणली होती. (यिर्म. ११:१०; ३४:१८) म्हणून यहोवा म्हणाला, की मी त्यांना ‘योग्य प्रमाणात शिस्त लावीन.’ यामुळे त्यांना पश्‍चात्ताप करायला आणि त्याच्याकडे परत यायला मदत होणार होती.—यिर्म. ३०:११; ४६:२८.

टेहळणी बुरूज२२.११ २१-२२ ¶६

एकनिष्ठतेची परीक्षा होते तेव्हा योग्यपणे विचार करा

६ ताडन दिलं जातं तेव्हा साहजिकच आपल्याला दुःख होतं. पण जर आपण त्या दुःखाकडेच लक्ष देत राहिलो तर आपल्याला मिळालेलं ताडन योग्य नव्हतं, आपल्यावर अन्याय झाला आहे किंवा आपल्याशी खूप कठोरपणे व्यवहार करण्यात आला असं आपल्याला वाटू शकतं. आणि यामुळे एका महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. ती म्हणजे, यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे तो आपल्याला हे ताडन देतो. (इब्री लोकांना १२:५, ६, ११ वाचा.) आपल्याला किती वाईट वाटलं याचाच जर आपण विचार करत राहिलो तर सैतानाला आपल्या या भावनांचा गैरफायदा घ्यायची संधी मिळेल. आपण यहोवाकडून मिळणारं ताडन स्वीकारू नये आणि इतकंच काय तर यहोवाशी आणि मंडळीशी आपण संबंध तोडून टाकावा अशी सैतानाची इच्छा आहे. तुम्हाला जर ताडन मिळालं असेल तर तुम्ही योग्यपणे विचार कसा करू शकता?

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज१४ १०/१ १२ ¶१-४

मुलांना शिस्त कशी लावावी?

यहोवा नेहमी “योग्य प्रमाणातच” शिस्त लावतो. (यिर्मया ३०:११; ४६:२८, मराठी कॉमन लँग्वेज) शिस्त लावताना तो सर्व गोष्टी विचारात घेतो; अगदी न दिसणाऱ्‍या गोष्टीसुद्धा. पालक त्याचे अनुकरण कसे करू शकतात? लेखाच्या सुरुवातीला उल्लेख करण्यात आलेले स्टीफन म्हणतात: “नॅटली तिची चूक कबूल करायला तयारच नाही हे पाहून आम्हाला खूप वाईट वाटलं; ती असं का वागत आहे हे आम्हाला कळत नव्हतं. पण ती वयानं लहान आहे, नासमज आहे हे आम्ही लक्षात घेतलं.”

नीकोलचे पती रॉबर्टसुद्धा सर्व गोष्टी विचारात घेण्याचा प्रयत्न करतात. मुलं चुकीचं वागतात तेव्हा ते वारंवार स्वतःला हे प्रश्‍न विचारतात: ‘आपलं मूल पहिल्यांदाच असं वागलं, की नेहमीच असं वागतं? मूल थकलंय, की त्याला बरं वाटत नाही? त्याचं हे वागणं दुसऱ्‍या एखाद्या समस्येचं लक्षण तर नसेल?’

समंजस पालक हेदेखील लक्षात ठेवतात, की मुले ही मुलेच असतात. प्रेषित पौलानेसुद्धा ही गोष्ट मान्य केली. त्याने म्हटले: “मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत.” (१ करिंथकर १३:११) रॉबर्ट म्हणतात: “लहान असताना मी कसा वागायचो ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळं योग्य दृष्टिकोन बाळगण्यास आणि टोकाची प्रतिक्रिया टाळण्यास मला मदत मिळते.”

पालकांनी मुलांकडून वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा करू नये. हे खूप महत्त्वाचे आहे. पण त्याच वेळी, मुलांच्या चुकीच्या वागण्याकडे किंवा चुकीच्या सवयींकडे त्यांनी डोळेझाक करू नये. मुलाची क्षमता, त्याच्या कमतरता आणि इतर गोष्टी विचारात घेतल्याने त्याला योग्य प्रमाणात शिस्त लावणे शक्य होईल.

३१ ऑगस्ट–६ सप्टेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यिर्मया ३१

“मी . . . एक नवीन करार करीन”

जेरमाया अध्या. १४ ¶४

नवीन करारामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो

४ नवीन करार समजून घेण्यासाठी, आधी आपल्याला जुन्या कराराचा उद्देश समजून घेणं गरजेचंय. यहोवाने इस्राएली लोकांना सीनाय पर्वतावर नियमशास्त्र देऊन त्यांच्यासोबत हा करार केला होता. इस्राएली लोकांनी हा करार स्वीकारला तेव्हा ते यहोवाची “खास प्रजा” बनले. या कराराप्रमाणे, लेवी याजक म्हणून सेवा करणार होते. हा करार केल्यावर यहोवाने त्यांना सांगितलं: “तुम्ही माझ्यासाठी याजकांनी बनलेलं राज्य आणि पवित्र राष्ट्र बनाल.” (निर्ग. १९:५-८) पण हे नेमकं कधी आणि कसं घडेल हे त्याने त्यांना सांगितलं नव्हतं. पण हे घडेपर्यंत असं दिसून आलं, की इस्राएली लोकांना नियमशास्त्राचं तंतोतंत पालन करणं शक्य नाही. तसंच, यामुळे त्यांना त्यांच्या पापी वृत्तीचीही जाणीव झाली. नियमशास्त्राप्रमाणे त्यांच्या पापांची क्षमा मिळवायला त्यांना नियमितपणे बलिदानं द्यायची गरज होती. पण प्राण्यांच्या बलिदानामुळे त्यांच्या पापांची कायमची क्षमा होणार नव्हती. म्हणून त्यांना एका मोठ्या बलिदानाची गरज होती. ते बलिदान परिपूर्ण असण्याची आणि एकदाच दिलं जाण्याची गरज होती. (गलती. ३:१९-२२) म्हणून, यहुदी लोक येणाऱ्‍या संततीची वाट पाहत होते. त्या संततीमुळे बऱ्‍याच जणांना आशीर्वाद मिळणार होते.—उत्प. २२:१७, १८.

जेरमाया अध्या. १४ ¶९

नवीन करारामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो

९ काही आईवडील आपल्या मुलांना शिस्त लावत नाहीत. ते त्यांच्या मुलांना वाटेल ते करू देतात. पण यहोवा तसा नाही. ही गोष्ट नवीन करारामधून आणखी स्पष्ट होते. यहोवा त्याच्या लोकांच्या पापांची असंच क्षमा करत नाही. तर त्यासाठी त्याने एक तरतूद केली आहे. आणि खरंतर यासाठी त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. असं करून स्वतः ठरवलेल्या न्यायाच्या स्तरांशी त्याने तडजोड केली नाही. हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पौलने नवीन कराराबदद्‌ल काय म्हटलं याचा विचार करा. (इब्री ९:१५, २२, २८) पौलने “खंडणी देऊन सुटका” मिळवण्याबद्दल सांगितलं आणि म्हटलं, की “रक्‍त ओतल्याशिवाय पापांची क्षमा मिळणं शक्य नाही.” जुन्या कराराप्रमाणे प्राण्यांचं रक्‍त ओतून बलिदान दिलं जायचं. पण नवीन करारात येशूचं रक्‍त ओतलं जाणार होतं. येशूच्या बलिदानामुळे यहोवाला एकदाच कायमसाठी पापं माफ करता येणार होती. (प्रे. कार्यं २:३८; ३:१९) पण मग या नवीन कराराचा भाग कोण असणार होतं आणि कोणाच्या पापांची क्षमा होणार होती? येशूने म्हटलं, की यहोवा यहुद्यांना नाकारेल आणि दुसऱ्‍या एका राष्ट्राला निवडेल. (मत्त. २१:४३; प्रे. कार्यं ३:१३-१५) हे राष्ट्र म्हणजे ‘देवाचं इस्राएल.’ म्हणजेच, पवित्र शक्‍तीने अभिषिक्‍त झालेले ख्रिस्ती. थोडक्यात सांगायचं झालं तर, जुना करार हा यहोवा आणि इस्राएल राष्ट्रामध्ये करण्यात आला होता. आणि नवीन करार हा यहोवा आणि अभिषिक्‍त जनांमध्ये करण्यात आला आहे. तसंच, येशू त्यांचा मध्यस्त आहे.—गलती. ६:१६; रोम. ९:६.

टेहळणी बुरूज१० ३/१५ २७ ¶१४

एक कळप, एक मेंढपाळ

१४ त्याच्या राज्याच्या शासनाखाली जे पृथ्वीवर राहतील त्यांच्याविषयी काय? हे नव्या करारापासून लाभ प्राप्त करणारे आहेत. (गलती. ३:८, ९) भागीदार नसले तरी ते या कराराच्या अटींचे पालन करण्याद्वारे, यशया संदेष्ट्याने भाकीत केले होते त्याप्रमाणे या करारास “दृढ धरून राहतात.” यशयाने लिहिले: “परमेश्‍वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नामाची आवड धरण्यासाठी व त्याचे सेवक होण्यासाठी जे विदेशी त्याच्या चरणी जडले आहेत, त्यातील जे कोणी शब्बाथ अपवित्र न करावा म्हणून जपतात व माझा करार दृढ धरून राहतात, त्यांस मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थनामंदिरात त्यांस हर्षित करीन.” यहोवा पुढे म्हणतो: “कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनामंदिर आहे असे म्हणतील.”—यश. ५६:६, ७.

जेरमाया अध्या. १४ ¶१८

नवीन करारामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो

१८ तसंच, नवीन करारामुळे यहोवा पापी माणसांशी कसा वागतो हेसुद्धा दिसून येतं; मग ते नवीन कराराचा भाग असलेले अभिषिक्‍त जन असोत किंवा पृथ्वीची आशा असलेले असोत. आपण याची खातरी ठेवू शकतो, की एकदा यहोवाने आपल्याला क्षमा केली तर तो आपली पापं पुन्हा कधीही आठवणार नाही. यावरून आपल्याला एक महत्त्वाचा धडासुद्धा शिकायला मिळतो. आपण जर एखाद्याला माफ केलंय असं म्हटलं, तर आपण पुन्हा त्याच्या चुका उकरून काढू नये. (मत्त. ६:१४, १५) मग त्या छोट्यामोठ्या चुका असोत किंवा गंभीर पापं असोत. जर एखाद्याच्या जोडीदाराने अनैतिक काम केलं असेल आणि निर्दोष जोडीदाराने त्याला माफ केलं असेल, तर माफ केलेली पापं पुन्हा आठवणं योग्य ठरेल का? हे खरंय, की इतरांना क्षमा करणं इतकं सोपं नसतं. पण तरी आपण असं करतो तेव्हा आपण यहोवासारखं वागत असतो.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज१४ १२/१५ २१ ¶५-६

वाचकांचे प्रश्‍न

राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे असे जे यिर्मयाने म्हटले त्याचा काय अर्थ होतो?

यिर्मयाचे पुस्तक लिहिण्यात आले तोपर्यंत उत्तरेकडील दहा वंशांच्या राज्यावर अश्‍शूऱ्‍यांनी कब्जा केला होता आणि या राज्यातील बऱ्‍याच लोकांना बंदिवान करण्यात आले होते. पण, कदाचित एफ्राईमाच्या वंशजांपैकी काही जणांनी यहूदाच्या राज्यात पळ काढला असावा. इ.स.पू. ६०७ मध्ये बॅबिलोनी लोकांनी दक्षिणेकडील दोन वंशांच्या यहूदा राज्यावर विजय मिळवला. त्या वेळी, त्यांनी कित्येक बंदिवानांना जेरूसलेमच्या उत्तरेकडे आठ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या रामा या ठिकाणी एकत्रित केले होते असे दिसते. (यिर्म. ४०:१) बन्यामीन वंशाच्या क्षेत्रात जेथे राहेलला पुरण्यात आले होते तेथे या बंदिवानांपैकी काहींचा संहार करण्यात आला असावा. (१ शमु. १०:२) त्यामुळे, राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे असे जे म्हणण्यात आले, त्यावरून ती एकंदरीत सर्व बन्यामीन वंशजांसाठी किंवा खास ज्यांचा रामा येथे संहार करण्यात आला होता त्यांच्यासाठी लाक्षणिक अर्थाने शोक करत होती असे सूचित होऊ शकते. आणखी एक शक्यता म्हणजे, इस्राएल राष्ट्रातील सर्व माता आपल्या मुलांचा मृत्यू झाल्यामुळे किंवा त्यांना बंदिवान करून नेण्यात आल्यामुळे रडत होत्या असे या शब्दांवरून सूचित होत असावे.

काहीही असो, राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे असे जे यिर्मयाने म्हटले त्यातून अनेक शतकांनंतर घडणार असलेल्या एका घटनेविषयी भाकीत करण्यात आले. येशूचा जन्म झाल्यानंतर हेरोद राजाने अशी आज्ञा केली की बेथलेहेमातल्या दोन वर्षांखालील सर्व मुलांना जिवे मारले जावे. त्या वेळी आपल्या मुलांना गमावलेल्या स्त्रियांनी किती आक्रोश केला असेल त्याची कल्पना करा! बेथलेहेम हे जेरूसलेमच्या दक्षिणेकडे होते. पण, या रडणाऱ्‍या स्त्रियांचा आक्रोश जणू जेरूसलेमच्या उत्तरेकडील रामापर्यंत ऐकू येत होता.—मत्त. २:१६-१८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा