वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr25 सप्टेंबर पृ. १-१५
  • “जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका” संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका” संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ—२०२५
  • उपशिर्षक
  • १-७ सप्टेंबर
  • ८-१४ सप्टेंबर
  • १५-२१ सप्टेंबर
  • २२-२८ सप्टेंबर
  • २९ सप्टेंबर–५ ऑक्टोबर
  • ६-१२ ऑक्टोबर
  • १३-१९ ऑक्टोबर
  • २०-२६ ऑक्टोबर
  • २७ ऑक्टोबर–२ नोव्हेंबर
जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ—२०२५
mwbr25 सप्टेंबर पृ. १-१५

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ

© 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

१-७ सप्टेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं २९

बायबलवर आधारित नसलेल्या शिकवणी आणि रितीरिवाजांपासून दूर राहा

टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.६ ६, चौकट

स्वर्गातल्या अदृश्‍य व्यक्‍तींचे दृष्टान्त

आज लाखो लोकांना अंधश्रद्धेने आणि दुष्ट शक्‍तींच्या भीतीने जखडलेलं आहे. ते स्वतःचं रक्षण करण्यासाठी मंतरलेल्या वस्तू, गंडेदोरे आणि जादूटोणा केलेली पेयं यांसारख्या गोष्टींचा वापर करतात. पण हे सगळं आपल्याला करायची गरज नाही. कारण बायबलमध्ये आपल्याला असा दिलासा देण्यात आलाय: “ज्यांचं मन पूर्णपणे यहोवाकडे लागलेलं असतं, त्यांच्यासाठी आपली शक्‍ती प्रकट करायला त्याची नजर संपूर्ण पृथ्वीवर असते.” (२ इतिहास १६:९) सैतानापेक्षा कितीतरी पटीने जास्त शक्‍तिशाली असलेल्या खऱ्‍या देवावर, यहोवावर आपण भरवसा ठेवला, तर तो नक्की आपलं संरक्षण करेल.

पण आपल्याला यहोवाचं संरक्षण हवं असेल तर आपण त्याच्या दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टी योग्य आहेत हे जाणून घेतलं पाहिजे आणि त्यांप्रमाणे वागलं पाहिजे. जसं की, पहिल्या शतकातल्या इफिस शहराच्या ख्रिश्‍चनांनी आपली जादूटोण्याची पुस्तकं गोळा केली आणि ती सगळी जाळून टाकली. (प्रेषितांची कार्यं १९:१९, २०) त्याचप्रमाणे, आपण जर मंतरलेल्या वस्तू, गंडेदोरे, कामुक वस्तू, जादूटोण्याची पुस्तकं, “संरक्षणासाठी असलेले” तावीज आणि भूतवेद्येशी संबंधित असलेल्या गोष्टी टाकून दिल्या तर आपल्याला देवाचं संरक्षण नक्की मिळेल.

टेहळणी बुरूज१९.०४ १७ ¶१३

मृत्यूबद्दलच्या सत्याचं समर्थन करा

१३ एखाद्या प्रथेत किंवा रितीरिवाजात आपण भाग घेऊ शकतो का याबद्दल आपल्याला शंका वाटत असेल, तर आपण बुद्धीसाठी यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. (याकोब १:५ वाचा.) त्यानंतर, आपण आपल्या साहित्यात संशोधन केलं पाहिजे आणि गरज वाटल्यास मंडळीतल्या वडिलांचा सल्लाही घेतला पाहिजे. अशा वेळी आपण काय केलं पाहिजे हे ते आपल्याला सांगणार नाहीत, पण योग्य ती बायबल तत्त्वं आपल्याला दाखवतील. या लेखात काही तत्त्वांवर चर्चा करण्यात आली आहे. या सर्व गोष्टी केल्याने आपण आपल्या ‘समजशक्‍तीला’ प्रशिक्षण देत असतो आणि या समजशक्‍तीमुळे आपल्याला “चांगले व वाईट यांतला फरक ओळखण्यासाठी” मदत होते.—इब्री ५:१४.

टेहळणी बुरूज१८.११ ११ ¶१२

“मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन”

१२ देवाला न आवडणाऱ्‍या प्रथा. कुटुंबाचे सदस्य, कामावरचे सोबती आणि शाळासोबती कदाचित आपल्यावर सण किंवा काही दिवस साजरे करायला दबाव टाकू शकतात. पण यहोवाला या गोष्टी आवडत नसल्यामुळे त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते? यहोवाच्या नजरेत अशा प्रकारचे सण साजरे करणं का चुकीचं आहे हे आपल्या मनात स्पष्ट असलं पाहिजे. यासाठी आपण आपल्या प्रकाशनांमध्ये संशोधन करू शकतो आणि या सणांचा किंवा दिवसांचा उगम कुठून झाला आहे हे पाहू शकतो. आपण हे सण साजरे का करू नये याच्या शास्त्रवचनीय पुराव्यांवर विचार केल्यामुळे, “प्रभूच्या दृष्टीत” आपण चांगल्या गोष्टी करत आहोत याची आपल्याला खातरी मिळेल. (इफिस. ५:१०) आपला यहोवावर आणि त्याच्या वचनावर पूर्ण भरवसा असला, तर आपण इतर लोक काय विचार करतील याची चिंता करणार नाही.—नीति. २९:२५.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट “खोटी स्तुती” ¶१

“खोटी स्तुती”

खोटी स्तुती करणं म्हणजे एखाद्याची कपटीपणे नको तितकी वाहवा करणं. ज्याची स्तुती केली जाते त्याला आपण कोणीतरी खूप खास आहोत असं वाटतं आणि त्यामुळे तो चुकीचे निर्णय घेतो. इतकंच नाही, तर तो घमेंडी आणि स्वार्थी बनतो आणि त्यामुळे त्याचं आणखीनच नुकसान होतं. खोटी स्तुती सहसा एखाद्याची मर्जी मिळवण्यासाठी किंवा त्याच्याकडून फायदा करून घेण्यासाठी केली जाते. खोटी स्तुती करणारा समोरच्याला आपल्यासाठी काहीतरी करायला भाग पाडत असतो. कधीकधी एखाद्याला जाळ्यात अडकवण्यासाठीही त्याची खोटी स्तुती केली जाते. (नीत २९:५) अशा प्रकारची स्तुती करणं हे ‘वरून येणाऱ्‍या बुद्धीचं’ नाही, तर जगाच्या बुद्धीचं लक्षण आहे. जगाची बुद्धी असलेली व्यक्‍ती स्वार्थी, भेदभाव करणारी आणि ढोंगी असते. (याक ३:१७) कपटीपणा, खोटं बोलणं, माणसांची नको तितकी स्तुती करणं आणि एखाद्याच्या अहंकाराला खतपाणी घालणं या गोष्टी देवाला न आवडणाऱ्‍या आहेत.—२कर १:१२; गल १:१०; इफि ४:२५; कल ३:९; प्रक २१:८.

८-१४ सप्टेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं ३०

“मला दारिद्र्‌य किंवा श्रीमंतीही देऊ नकोस”

टेहळणी बुरूज१८.०१ २४-२५ ¶१०-१२

कोणावर प्रेम केल्याने खरा आनंद मिळतो?

१० हे खरं आहे की आपल्या सर्वांनाच पैशाची गरज आहे. पैसा आपल्याला काही प्रमाणात सुरक्षा देतो. (उप. ७:१२) पण आपल्याजवळ मूलभूत गरजा पूर्ण करण्याइतकाच पैसा असला, तरीही आपण आनंदी राहू शकतो का? हो आपण तेव्हाही आनंदी राहू शकतो. (उपदेशक ५:१२ वाचा.) याकेचा मुलगा आगूरने अशी प्रार्थना केली: “दारिद्र्‌य किंवा श्रीमंती मला देऊ नको; मला आवश्‍यक तेवढे अन्‍न खावयास दे.” या व्यक्‍तीला दरिद्री किंवा खूप गरीब का व्हायचं नव्हतं हे समजण्यासारखं आहे. त्याने म्हटलं की यामुळे त्याला चोरी करण्याचा मोह होऊ शकतो आणि या कृत्यामुळे त्याच्या हातून यहोवाचा अनादर होईल. पण मग त्याने असं का म्हटलं की त्याला श्रीमंती नको? याचं कारण देत तो म्हणाला: “माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करेन, आणि परमेश्‍वर कोण आहे, असे म्हणेन.” (नीति. ३०:८, ९) देवाऐवजी पैशावर जास्त भरवसा ठेवणारे लोक तुम्ही नक्कीच पाहिले असतील.

११ पैशावर प्रेम करणारी व्यक्‍ती कधीच देवाचं मन आनंदी करू शकत नाही. येशूने म्हटलं: “कोणीही दोन मालकांची सेवा करू शकत नाही; कारण तो एकतर एका मालकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्‍यावर प्रेम करेल; किंवा एका मालकाशी एकनिष्ठ राहून दुसऱ्‍याला तुच्छ लेखेल. तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.” त्याने असंही म्हटलं: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, जिथे कसर व गंज लागून ती नष्ट होते आणि चोर घरफोडी करून ती लुटतात. त्याऐवजी स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा; तिथे कसर व गंज लागून ती नष्ट होत नाही आणि चोर घरफोडी करून ती लुटत नाहीत.”—मत्त. ६:१९, २०, २४.

१२ आज यहोवाचे बरेच सेवक आपल्या जीवनात बदल करून आपलं जीवन साधं ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं केल्यामुळे त्यांना यहोवाची सेवा करण्यासाठी जास्त वेळ मिळतो आणि या सेवेमुळे त्यांना आनंदही होतो. अमेरिकेत राहणाऱ्‍या जॅकने आपल्या पत्नीसोबत पायनियर सेवा करण्यासाठी आपलं मोठं घर आणि व्यवसाय विकला. तो म्हणतो: “आमचं घर खूप सुंदर आणि शहराबाहेर निसर्गरम्य ठिकाणी होतं. आमच्यासाठी ते विकणं सोपं नव्हतं.” कामाचा ताण असल्यामुळे घरी आल्यावर त्याची चिडचिड व्हायची. बरीच वर्षं असं चालू राहिलं. तो म्हणतो: “माझी बायको पायनियरींग करायची आणि ती नेहमी आनंदी असायची. ती म्हणायची, ‘माझ्या बॉससारखा दुसरा कोणीच नाही!’ आता मी पण पायनियर झाल्यामुळे आम्ही दोघंही एकाच बॉसची, यहोवाची सेवा करत आहोत.”

टेहळणी बुरूज८७ १०/१ २९ ¶८-९

यहोवाचे भय राखा म्हणजे तुम्ही सुखी व्हाल

◆ ३०:१५, १६—या उदाहरणांचा मुद्दा काय आहे?

ते लोभाची अतृप्तता स्पष्ट करतात. जळू स्वतःसाठी अधाशीपणाने रक्‍त पितात, तसाच लोभी मनुष्य अधिक पैसापैसा किंवा सत्तेची लालसा करतो. कबरस्थान [शियोल] ज्याप्रमाणे कधीही तृप्त न होता नेहमीच मृत्यूच्या सावजासाठी आ वासून बसते. वांझ स्त्री लेकरासाठी ‘ओरड करते.’ (उत्पत्ती ३०:१) कोरडी भूमी पावसाचे पाणी फस्त करते व लवकरच सुकून जाते, अग्नी त्यात टाकलेल्या वस्तुंच्या मोबदल्यात इतर ज्वालाग्राही पाठवितो. हेच लोभी मनुष्यांच्या बाबत आहे. परंतु जे इश्‍वरी सुज्ञतेने मार्गदर्शित होतात ते अशा अक्षय स्वार्थीपणावर अंकुश लावतात.

टेहळणी बुरूज१२ १/१ १० ¶३

अंथरूण पाहून पाय पसरा शक्य आहे का?

पैशांची बचत करून वस्तू विकत घ्या. पैशांची बचत करून मग वस्तू विकत घेणे ही जरा जुनी पद्धत वाटत असली तरीसुद्धा, आर्थिक समस्यांपासून दूर राहण्याचा हा सुज्ञ मार्ग आहे. असे केल्याने पुष्कळ जण कर्जबाजारी होण्यापासून आणि त्यामुळे होणाऱ्‍या डोकेदुखीतून जसे की जास्त व्याज फेडण्याच्या त्रासापासून मुक्‍त असतात. कारण, एक व्यक्‍ती जेव्हा काहीही उधारीवर विकत घेते तेव्हा त्याचे व्याजही वाढत असते. बायबलमध्ये मुंगीला ‘अत्यंत शहाणी’ म्हटले आहे. कारण ती, पुढे वापरता यावे म्हणून ‘उन्हाळ्यातच आपले अन्‍न साठवून ठेवते.’—नीतिसूत्रे ६:६-८; ३०:२४, २५.

टेहळणी बुरूज२४.०६ १३ ¶१८

यहोवाचे पाहुणे बनून राहा!

१८ पैशाबद्दल आपला दृष्टिकोन तपासणं चांगलंय. म्हणून स्वतःला विचारा: ‘मी नेहमी पैशांबद्दल आणि पैशांनी काय विकत घेता येईल याबद्दलच विचार करतो का? मी जर पैसे उधार घेतले असतील तर ज्याच्याकडून मी पैसे घेतलेत त्याला पैशाची गरज नाही असं समजून मी ते परत द्यायला उशीर लावतो का? पैशामुळे माझं महत्त्व वाढतंय असं मी समजतो का? पण उदारता दाखवायला मला कठीण जातं का? माझ्या भाऊबहिणींकडे पैसा आहे म्हणून त्यांचं यहोवापेक्षा पैशावर जास्त प्रेम आहे असं मी समजतो का? गरीब लोकांना जास्त महत्त्व न देता मी फक्‍त श्रीमंत लोकांशी मैत्री करतो का?’ हे लक्षात घ्या की आपल्याला यहोवाचे पाहुणे बनण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे आपण आपलं जीवन पैशाच्या प्रेमापासून दूर ठेवून या संधीला जपू शकतो. आपण असं केलं तर यहोवा आपल्याला कधीच सोडणार नाही!—इब्री लोकांना १३:५ वाचा.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज०९ ४/१५ १७ ¶११-१३

सृष्टीतून यहोवाची बुद्धी दिसून येते

११ रॉक बॅजर हा आणखी एक लहान प्राणी आहे, जो आपल्याला महत्त्वाचे धडे देऊ शकतो. (नीतिसूत्रे ३०:२६ वाचा.) हा प्राणी एखाद्या मोठ्या सशासारखाच दिसतो, पण त्याचे कान लहानशेच व गोलाकार असतात आणि पाय आखूड असतात. त्याच्या तीक्ष्ण दृष्टीमुळे आणि तो खडकांतील छिद्रांत व कपारींमध्ये राहात असल्यामुळे, हिंस्र जनावरांपासून त्याचे संरक्षण होते. हे प्राणी सहसा एकत्र समूहाने राहत असल्यामुळे त्यांना संरक्षण तर मिळतेच शिवाय हिवाळ्यात ऊब देखील मिळते.

१२ रॉक बॅजरकडून आपण काय शिकू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे हा प्राणी आपल्यावर हल्ला होणार नाही याची काळजी घेतो. शिकारी प्राण्यांना दुरूनच पाहण्यासाठी तो आपल्या तीक्ष्ण दृष्टीचा उपयोग करतो. तसेच, काही धोका संभवल्यास लगेच लपून जीव वाचवता यावा म्हणून तो खडकांतील छिद्रांच्या व कपारींच्या जवळपासच राहतो. त्याच प्रकारे, आपलीही आध्यात्मिक दृष्टी तीक्ष्ण असली पाहिजे, जेणेकरून सैतानाच्या जगातील सहज दिसून न येणारे धोकेही आपल्याला ओळखता येतील. प्रेषित पेत्राने ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” (१ पेत्र ५:८) पृथ्वीवर असताना, येशूने सतत सावधगिरी बाळगली. सैतानाने कोणत्याही मार्गाने आपली निष्ठा भंग करू नये म्हणून तो सतत जागरूक राहिला. (मत्त. ४:१-११) येशूच्या अनुयायांनी याबाबतीत त्याचे अनुकरण केले पाहिजे.

१३ सावध राहण्याचा एक मार्ग म्हणजे यहोवाने पुरवलेल्या आध्यात्मिक संरक्षणाचा फायदा करून घेणे. देवाच्या वचनाच्या अभ्यासाकडे व ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याकडे आपण कधीही दुर्लक्ष करू नये. (लूक ४:४; इब्री १०:२४, २५) शिवाय, ज्याप्रमाणे रॉक बॅजर एकत्र समूहाने राहतो त्याचप्रमाणे आपणही आपल्या ख्रिस्ती बांधवांच्या निकट सहवासात राहिले पाहिजे. यामुळे आपल्याला व त्यांनाही “उत्तेजन” प्राप्त होईल. (रोम. १:१२) यहोवा आपल्याला पुरवत असलेल्या संरक्षणाचा लाभ घेण्याद्वारे आपण स्तोत्रकर्त्या दाविदाच्या पुढील शब्दांशी सहमत असल्याचे दाखवतो: “परमेश्‍वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करितो; तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरूज आहे.”—स्तो. १८:२.

१५-२१ सप्टेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं ३१

एका आईने दिलेल्या प्रेमळ सल्ल्यातून शिकायला मिळणारे धडे

टेहळणी बुरूज११ ७/१ २७ ¶७-८

आपल्या मुलांमध्ये नैतिक मूल्ये रुजवा

सेक्सबद्दलच्या खऱ्‍या गोष्टी त्यांना शिकवा. इशारा देणे आवश्‍यक आहे. (१ करिंथकर ६:१८; याकोब १:१४, १५) पण बायबलमध्ये, सेक्स हे सैतानाचा पाश नव्हे तर देवाकडून मिळालेली एक देणगी आहे, असे सांगण्यात आले आहे. (नीतिसूत्रे ५:१८, १९; गीतरत्न १:२) सेक्सबद्दलच्या फक्‍त धोक्यांविषयी तुम्ही आपल्या किशोरवयीनांना सांगितले तर सेक्सबद्दलचा विकृत व बायबलनुसार नसलेला दृष्टिकोन त्यांच्या मनात वाढत राहील. कोरिना नावाच्या फ्रान्समधील एका तरुणीने म्हटले: “माझे आईवडील लैंगिक अनैतिकता याविषयी इतके बोलत राहिले, की लैंगिक संबंधांबद्दलचा माझा दृष्टिकोनच नकारात्मक झाला.”

तेव्हा, सेक्सबद्दलच्या खऱ्‍या गोष्टी त्यांना शिकवा. मेक्सिकोतील नाडिया नावाची एक आई म्हणते: “मी माझ्या मुलांना हे सांगायचा प्रयत्न करते, की शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा नैसर्गिक, तृप्तीदायक आहे व यहोवा देवानेच ती मानवांना उपभोगण्यासाठी दिली आहे. पण सेक्सलाही उचित स्थान आहे म्हणजे फक्‍त विवाहाच्या चाकोरीतच हे संबंध असले तर तुम्ही आनंदी होऊ शकता, नसले तर दुःखी.”

कुटुंबासाठी मदत लेख ४ ¶११-१३

आपल्या मुलांसोबत मद्याच्या योग्य वापराबद्दल बोला

या विषयावर चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्या. ब्रिटनमध्ये राहणारे एका मुलाचे वडील मार्क असं म्हणतात, “दारू पिण्याबद्दल मुलांच्या मनात बरेच प्रश्‍न असू शकतात. मी माझ्या आठ वर्षांच्या मुलाला ड्रिंक करणं योग्य आहे का असं विचारलं. मी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात त्याच्याशी बोललो. त्यामुळे त्याला काय वाटतं हे त्याला अगदी मनमोकळेपणाने सांगता आलं.”

तुम्ही जर या विषयावर मुलांशी बऱ्‍याचदा बोललात तर त्यांना तो विषय चांगल्या प्रकारे कळेल आणि त्याचं गांभीर्यही लक्षात येईल. मुलांचं वय लक्षात घेऊन त्यांना लैंगिक शिक्षण देणं, रस्त्यावरून येता-जाता स्वतःची काळजी घेणं यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर बोलत असताना त्यांच्यासोबत मद्याच्या विषयावरही चर्चा करा.

चांगलं उदाहरण ठेवा. मुलं स्पंजसारखी असतात. ती आजूबाजूचं सगळं काही पटकन शोषून घेतात. एका संशोधनातून असं दिसून आलंय, की पालकांचा त्यांच्या मुलांवर सगळ्यात जास्त प्रभाव पडत असतो. त्यामुळे तुम्ही जर मन शांत ठेवण्यासाठी किंवा ताणतणाव कमी करण्यासाठी दारू पित असाल, तर मुलांना असं वाटेल, की जीवनातल्या चिंतांवर दारू हा एकमात्र उपाय आहे. म्हणून स्वतःचं चांगलं उदाहरण मांडा आणि मद्याचा विचारपूर्वक वापर करा.

सावध राहा!१७.३ ९ ¶५

मुलांना नम्र बनायला शिकवणं

देण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन द्या. तुमच्या मुलाला खात्री पटवून द्या, की “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.” (प्रेषितांची कार्ये २०:३५) तुम्ही हे कसं करू शकता? तुम्ही कदाचित अशा लोकांची यादी बनवू शकता, ज्यांना काही कामांत मदतीची गरज आहे. जसं की, खरेदी करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी किंवा दुरुस्तीच्या कामासाठी. त्यानंतर गरज असलेल्यांना साहाय्य करताना तुम्ही आपल्या मुलाला सोबत नेऊ शकता. असं केल्यामुळे इतरांना मदत करताना तुम्हाला मिळणारा आनंद आणि समाधान तो पाहील. आपल्या उदाहरणाने तुम्ही तुमच्या मुलाला नम्र बनायला शिकवाल. आणि शिकवण्याचा हा सर्वात प्रभावशाली मार्ग आहे.—बायबल तत्त्वं: लूक ६:३८.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज९३ २/१ ४-५ ¶७-८

पवित्र शास्त्र काळातील शिक्षण

७ इस्राएलात मुलांना अगदी लहानपणापासून बाप तसेच आई या दोघांकडून शिक्षण दिले जात होते. (अनुवाद ११:१८, १९; नीतीसूत्रे १:८; ३१:२६) डिक्शनरी डे ला बायबल या फ्रेंच शब्दकोषात ई. मॅनझेनो हे पवित्र शास्त्र प्रामाण्य म्हणतातः “मूल बोलायला लागताच ते नियमशास्त्रातील काही उतारे शिकत असे. त्याची आई एखादे वचन परत परत सांगे आणि ते मुलाने शिकून घेतल्यावर आई त्याला दुसरे वचन सांगत असे. नंतर, स्मरणात आधीच संग्रहीत केलेल्या शास्त्रवचनाचे लिखाण मुलाला आपल्या हाताने करावयाला शिकवले जाई. अशाप्रकारे त्याला वाचनाची ओळख करून देण्यात येत असे व मग मोठा झाल्यावर तो स्वतःच प्रभूच्या नियमांचे वाचन व मनन करून आपले धार्मिक शिक्षण पुढे नेत असे.”

८ याद्वारे असे दिसते की, त्या काळी पाठांतर करणे ही मूळ शिक्षण पद्धत होती. यहोवाचे नियम व त्याचे लोकांशी असणारे दळणवळण यासंबंधीच्या शिकून घेतलेल्या गोष्टी अंतःकरणात खोलवर जावयाच्या होत्या. (अनुवाद ६:६, ७) त्यावर मनन करायचे होते. (स्तोत्रसंहिता ७७:११, १२) युवक तसेच वयस्करांनी शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पुष्कळ स्मरणसाधने वापरली जात. यामध्ये स्तोत्राच्या प्रत्येक ओळीत आरंभाला असलेली बाराखडी व त्यामुळे तयार होणारे नाव वा शब्द यांचे पठन (जसे की, नीतीसूत्रे ३१:१०-३१); अनुप्रास (किंवा त्याच अक्षराने वा ध्वनीने सुरू होणारे अक्षर); आणि नीतीसूत्रे याच्या ३०व्या अध्यायात दुसऱ्‍या भागात दिसणाऱ्‍या संख्यांचा वापर हे प्रकार होते. प्राचीन इब्री लेखनाचे उदाहरण समजले जाणारे गेझेर पंचाग वस्तुतः एका शाळकरी मुलाने स्मरणात असलेला लिहून काढलेला धडा आहे असे काही प्रामाण्यांना वाटते हे मोठे मनोरंजक आहे.

२२-२८ सप्टेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं उपदेशक १-२

पुढच्या पिढीला प्रशिक्षण देत राहा

टेहळणी बुरूज१७.०१ २७-२८ ¶३-४

योग्य अशा विश्‍वासू माणसांवर जबाबदारी सोपवून दे

३ आपणही यहोवाची मनापासून सेवा करतो आणि मिळालेल्या नेमणुकीला मौल्यवान लेखतो. आपल्यापैकी अनेकांना आपली नेमणूक फार आवडते, आणि शक्य आहे तोपर्यंत ती नेमणूक पार पाडण्याची आपली इच्छा असते. पण दुःखाची गोष्ट म्हणजे वयोमानामुळे पूर्वीप्रमाणे काम करणं आपल्याला शक्य होतं नाही. (उप. १:४) आज प्रचाराचं कार्य मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुवार्ता पोहचवण्यासाठी यहोवाची संघटना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. पण कधीकधी वयस्कर बांधवांना तंत्रज्ञानाच्या नवीन पद्धती शिकून घेणं कठीण जातं. (लूक ५:३९) तसंच, वृद्धापकाळात शारीरिक ताकद आणि क्षमता गमावनं हेदेखील साहजिकच आहे. (नीति. २०:२९) त्यामुळे यहोवाच्या लोकांना काही खास प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो. म्हणून यहोवाच्या संघटनेत जास्त जबाबदाऱ्‍या हाताळण्यासाठी, वयस्कर बांधवांनी तरुणांना प्रशिक्षित करणं हे व्यावहारिक आहे, आणि असं करणं हा त्यांच्या प्रेमळपणाचा एक पुरावादेखील ठरेल.—स्तोत्र ७१:१८ वाचा.

४ आपली जबाबदारी इतरांवर सोपवून देणं, जबाबदारीच्या पदावर असलेल्यांसाठी कदाचित अवघड जाऊ शकतं. कारण, आपल्याला प्रिय असलेली नेमणूक आपण गमावू या विचाराने त्यांना वाईट वाटू शकतं. तसंच त्या नेमणुकीतून मिळणारा आनंद यापुढे आपल्याला मिळणार नाही याचं दुःख त्यांना होऊ शकतं. किंवा कदाचित त्यांना अशीही चिंता वाटते की, इतर जण ही जबाबदारी व्यवस्थित रीत्या हाताळू शकणार नाहीत. आपल्याकडे इतरांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळ नाही असाही विचार कदाचित ते करतील. दुसरीकडे पाहता, जेव्हा आपल्यावर अधिक जबाबदारी सोपवण्यात येत नाही तेव्हा तरुण बांधवांनीदेखील धीर दाखवण्याची गरज आहे.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट “उपदेशक” ¶१

उपदेशक

उपदेशक पुस्तकाचं हिब्रू नाव कोहिलेथ असं आहे. या नावाचा अर्थ ‘सभा भरवणारा’ किंवा ‘लोकांना एकत्र करणारा’ असा होतो. त्यामुळे इस्राएली लोकांना देवाची उपासना करण्यासाठी ‘एकत्र करायची’ राजाची जी भूमिका होती त्याबद्दल आपल्याला समजतं. (उप १:१, १२) देवाच्या लोकांना यहोवाला विश्‍वासू राहायला मदत करणं आणि खरी उपासना करण्यात पुढाकार घेणं हे राजाचं काम होतं. (१रा ८:१-५, ४१-४३, ६६) राजाने आपली ही भूमिका योग्यपणे पार पाडली तर तो एक चांगला राजा आहे असं समजलं जायचं. (२रा १६:१-४; १८:१-६) शलमोन राजाने लोकांना यहोवासोबत जवळचं नातं जोडण्यासाठी एकत्र आणलं होतं. उपदेशक पुस्तकात त्याने त्यांना जगातल्या चुकीच्या गोष्टींवर लक्ष लावण्याऐवजी देवाचा सन्मान होईल अशा गोष्टी करायचं प्रोत्साहन दिलं.

२९ सप्टेंबर–५ ऑक्टोबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं उपदेशक ३-४

तीन धाग्यांनी बनलेली दोरी मजबूत करा

कुटुंबासाठी मदत लेख १० ¶२-८

तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करावा?

● तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यामुळे वैवाहिक जीवनात बरेच फायदे होऊ शकतात. उदाहरणार्थ, पती-पत्नी दिवसभर एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी त्याचा वापर करतात.

“‘आय लव यू’ किंवा ‘आय मीस यू’ यांसारखे साधेसे मेसेजसुद्धा बरंच काही सांगून जातात.”—जॉनथन.

● पण तंत्रज्ञानाचा अविचारीपणे वापर केल्यामुळे वैवाहिक नातं कमजोर होऊ शकतं. जसं की, काही जण आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये इतके गढून गेलेले असतात, की ते आपल्या जोडीदाराला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत.

“मी जर माझ्या मोबाईलवर जास्त वेळ घालवला नसता, तर माझ्या पतीला नक्कीच माझ्याशी जास्त बोलावसं वाटलं असतं.”—जुलिसा.

● काहींना असं वाटतं, की ते मोबाईलचा वापर करता करता आपल्या जोडीदाराशी एखाद्या विषयावर चांगली चर्चाही करू शकतात. पण समाजशास्त्रज्ञ शेरी टर्कल यांच्या मते, “एकाच वेळी बरीच कामं करता येणं हा एक गोड गैरसमज आहे.” असं दिसून आलंय, की ही काही चांगली क्षमता नाही. उलट, “एकाच वेळी जितकी जास्त कामं आपण करतो तितकी आपली कार्यक्षमता कमी होत जाते,” असं त्या पुढे म्हणतात.

“मला माझ्या पतीशी बोलायला छान वाटतं, पण तो आपला मोबाईल वापरत नसेल तर. कारण तसं असेल, तर माझ्यापेक्षा त्याला मोबाईल वापरण्यातच जास्त रस आहे असं वाटतं.”—सारा.

तर थोडक्यात: तुम्ही तंत्रज्ञानाचा ज्या प्रकारे वापर करता त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात एक तर फायदा होईल किंवा नुकसान.

टेहळणी बुरूज२३.०५ २३-२४ ¶१२-१४

“याहची ज्वाला” जळत राहू द्या

१२ पती-पत्नींनो तुम्ही अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकता? तुम्ही दिवसभरात बरीच कामं करत असाल. पण यांतली काही कामं एक-एकटं करण्याऐवजी तुम्ही सोबत मिळून करू शकता का? उदाहरणार्थ अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांनी सोबत मिळून प्रचारकार्य केलं. तुम्हीसुद्धा असंच करण्यासाठी काही योजना करू शकता का? अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांनी सोबत मिळून व्यवसाय केला. तुम्ही कदाचित सोबत मिळून नोकरी करत नसाल पण तुम्ही घरची काही कामं सोबत मिळून करू शकता का? (उप. ४:९) जेव्हा एखादं काम करण्यासाठी तुम्ही सोबत मिळून एकमेकांना मदत कराल तेव्हा तुम्हाला एका टीमसारखं वाटेल आणि त्यामुळे एकमेकांसोबत बोलायची संधीसुद्धा मिळेल. रॉबर्ट आणि लिंडा यांच्या लग्नाला ५० पेक्षा जास्त वर्षं झाली आहेत. तो म्हणतो: “खरं सांगायचं तर आम्हाला सोबत मिळून करमणुकीसाठी जास्त वेळ घालवता येत नाही. पण जेव्हा मी भांडी धुत असतो आणि माझी पत्नी ती पुसून ठेवत असते किंवा मी बागेत काम करत असताना ती येऊन मला हातभार लावते तेव्हा मला खूप बरं वाटतं. सोबत मिळून काम केल्यामुळे आम्ही एकमेकांच्या जवळ येतो आणि आमचं प्रेम आणखी वाढत जातं.”

१३ पती-पत्नींनो एक लक्षात घ्या की आपण एकमेकांसोबत राहतो म्हणून आपण एकमेकांच्या जवळ येतो असं नाही. ब्राझीलमधली एक बहीण म्हणते, की “धावपळीच्या या जगात कधी-कधी आपल्याला असं वाटू शकतं की आपण एका छताखाली राहत आहोत म्हणजेच आपण एकमेकांसोबत टाईम घालवतोय. पण सोबत राहणं ही फक्‍त एक गोष्ट आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जोडीदाराला पुरेसा वेळ देणं.” ब्रुनो आणि त्यांची पत्नी टाईस एकमेकांना कसा वेळ देतात त्याकडे लक्ष द्या. ब्रुनो म्हणतो: “जेव्हा आम्ही एकमेकांसोबत मोकळा वेळ घालवत असतो, तेव्हा आम्ही आमचे मोबाईल फोन बाजूला ठेवून एकमेकांना चांगला वेळ द्यायचा प्रयत्न करतो.”

१४ पण तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायलाच आवडत नसेल तर काय? कदाचित तुमच्या आवडी-निवडी वेगळ्या असतील किंवा तुम्ही एकमेकांना चीड आणत असाल. मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता? आधी दिलेलं शेकोटीचं उदाहरण आठवा. शेकोटी लगेच पेटत नसते. आधी त्यात छोटी-छोटी लाकडं आणि मग हळूहळू मोठी लाकडं घालावी लागतात. तसंच, सुरुवातीला तुम्ही दररोज काही मिनिटं सोबत घालवू शकता का? आणि या वेळेत दोघांना राग येईल असं काहीतरी करण्याऐवजी असं काहीतरी करा जे दोघांनाही आवडेल. (याको. ३:१८) अशा प्रकारे सुरुवातीला थोडा-थोडा वेळ एकत्र घालवल्यामुळे तुमच्या प्रेमाची ज्योत पुन्हा पेटत राहील.

टेहळणी बुरूज२३.०५ २१ ¶३

“याहची ज्वाला” जळत राहू द्या

३ “याहची ज्वाला” जर जिवंत ठेवायची असेल, तर पती-पत्नी दोघांनीही यहोवासोबतचं त्यांचं नातं मजबूत ठेवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. पण यामुळे त्याचं प्रेम कसं टिकून राहील? जेव्हा एक विवाहित जोडपं आपल्या स्वर्गातल्या पित्यासोबतच्या नात्याला महत्त्व देतं तेव्हा ते त्याच्याकडून मिळालेला सल्ला पाळायलाही नेहमी तयार असतं. यामुळे, आपसातलं प्रेम कमी होईल अशा गोष्टी टाळायला आणि त्यांवर मात करायला मदत होते. (उपदेशक ४:१२ वाचा.) शिवाय, यहोवासोबतचं नातं मजबूत असेल तर ते त्याच्या गुणांचं अनुकरण करायचाही प्रयत्न करतं. जसं की, दयाळूपणा, धीर आणि क्षमा करायची वृत्ती. (इफिस. ४:३२–५:१) पती-पत्नी असे गुण दाखवत राहिले तर त्यांच्यातलं प्रेम बहरत राहील. लेना नावाच्या बहिणीचं लग्नं होऊन २५ पेक्षा जास्त वर्षं झाली आहेत. ती म्हणते, “ज्याचं यहोवासोबत मजबूत नातं आहे अशा व्यक्‍तीवर प्रेम करायला आणि त्याचा आदर करायला जास्त सोपं जातं.”

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट “प्रेम” ¶३९

प्रेम

“प्रेम करण्याची वेळ.” जे लोक यहोवाच्या नजरेत प्रेमाच्या लायकीचे नाहीत किंवा जे वाईट कामं करतच राहतात अशांवर प्रेम केलं जात नाही. तसं तर प्रेम सगळ्यांवरच केलं जातं. पण जर एखाद्या व्यक्‍तीने दाखवून दिलं, की ती देवाचा द्वेष करते तर मग तिला प्रेम दाखवलं जात नाही. यहोवा देव आणि येशू ख्रिस्त नीतीवर प्रेम करतात आणि वाइटाचा द्वेष करतात. (स्तो ४५:७; इब्री १:९) जे लोक खऱ्‍या देवाचा द्वेष करतात ते प्रेमाच्या लायकीचे नसतात. अशा लोकांना प्रेम दाखवण्यात काहीच अर्थ नाही. कारण देवाच्या प्रेमाचा पुरावा पाहूनसुद्धा ते त्याला प्रतिसाद देत नाहीत. (स्तो १३९:२१, २२; यश २६:१०) म्हणूनच अशा लोकांचा देव द्वेष करतो आणि ठरवलेल्या वेळी तो त्यांना शिक्षा करेल.—स्तो २१:८, ९; उप ३:१, ८.

६-१२ ऑक्टोबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं उपदेशक ५-६

आपल्या महान देवाचा आपण गाढ आदर कसा करतो?

टेहळणी बुरूज०८ ८/१५ १५-१६ ¶१७-१८

सन्माननीय आचरणाने यहोवाचे गौरव करा

१७ यहोवाची उपासना करतेवेळी आपले आचरण सन्माननीय असण्यासाठी आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. उपदेशक ५:१ मध्ये असे म्हटले आहे: “तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा संभाळून पाऊल टाक.” पवित्र ठिकाणी असताना मोशे व यहोशवा यांना पायातील जोडे काढण्याची आज्ञा देण्यात आली होती. (निर्ग. ३:५; यहो. ५:१५) देवाप्रती आदर व सन्मान व्यक्‍त करण्यासाठी त्यांनी असे करायचे होते. इस्राएली याजकांना आपले ‘अंग झाकण्यासाठी’ तागाचे चोळणे घालणे बंधनकारक होते. (निर्ग. २८:४२, ४३) यामुळे, वेदीजवळ सेवा करताना त्यांचे शरीर अनुचितपणे उघडे पडणार नव्हते. याजकाच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने देवाच्या स्तरांचा सन्मान होईल अशा प्रकारे वागायचे होते.

१८ आपण पाहिल्याप्रमाणे, यहोवाच्या उपासनेत सन्मान व आदर यांना विशेष महत्त्व आहे. इतरांनी आपला सन्मान व आदर करावा असे आपल्याला वाटत असेल, तर आपली वागणूक आदरपूर्वक असली पाहिजे. पण, ही आदरपूर्वक वागणूक केवळ वरवरची किंवा इतरांना प्रभावित करण्यासाठी असू नये. इतरांचे लक्ष वेधण्याऐवजी, आपल्या वागणुकीमुळे हृदय पारखणारा देव आनंदित झाला पाहिजे. (१ शमु. १६:७; नीति. २१:२) अशा प्रकारचे सन्माननीय आचरण आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचे अविभाज्य अंग बनले पाहिजे. आपल्या मनोवृत्तीवर, इतरांसोबतच्या आपल्या नातेसंबंधावर, आणि स्वतःबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनावरही याचा प्रभाव पडला पाहिजे. खरेतर सर्व वेळी, आपण जे काही बोलतो किंवा करतो ते सन्माननीय असले पाहिजे. आपले वागणे-बोलणे, केशभूषा व वेशभूषा कशी असावी, याबद्दल आपण प्रेषित पौलाच्या शब्दांचे मनापासून पालन करतो: “आम्ही करीत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याहि प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही; तर सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो.” (२ करिंथ. ६:३, ४) अशा प्रकारे, आपण ‘आपला तारणारा देव ह्‍याच्या शिक्षणास शोभा आणतो.’—तीत २:१०.

टेहळणी बुरूज०९ ११/१५ ११ ¶२१

बायबल अभ्यासाद्वारे आपल्या प्रार्थना अधिक अर्थपूर्ण बनवा

२१ येशूने पूर्ण विश्‍वासाने आदरपूर्वक देवाला प्रार्थना केली. उदाहरणार्थ, लाजराला पुनरुत्थित करण्याआधी, “येशूने दृष्टि वर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो; मला माहीत आहे की, तू सर्वदा माझे ऐकतोस.” (योहा. ११:४१, ४२) तुमच्या प्रार्थनांतून अशा प्रकारचा आदर व विश्‍वास दिसून येतो का? येशूने आदरपूर्वक केलेल्या आदर्श प्रार्थनेचे परीक्षण केल्यास दिसून येईल, की यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण, त्याचे राज्य येणे आणि त्याची इच्छा पूर्ण होणे हे त्या प्रार्थनेतील काही मुख्य विषय आहेत. (मत्त. ६:९, १०) आता तुमच्या स्वतःच्या प्रार्थनांचा विचार करा. यहोवाचे राज्य येणे, त्याची इच्छा पूर्ण होणे आणि त्याच्या नावाचे पवित्रीकरण यांविषयी तुम्हाला मनस्वी आस्था असल्याचे तुमच्या प्रार्थनांतून दिसून येते का? तसे दिसून येणे अतिशय महत्त्वाचे आहे.

टेहळणी बुरूज१७.०४ ६ ¶१२

दिलेलं वचन नेहमी पाळा

१२ तुम्ही बाप्तिस्मा घेतला तेव्हा संपूर्ण आयुष्य यहोवाची सेवा करण्याचं आणि बायबल तत्त्वांनुसार जीवन जगण्याचं वचन दिलं होतं. पण, खरंतर बाप्तिस्मा ही फक्‍त एक सुरवात आहे. त्यामुळे वेळेसोबत आपण स्वतःचं परीक्षण करत राहिलं पाहिजे. यासाठी आपण स्वतःला विचारू शकतो: ‘बाप्तिस्म्यानंतर यहोवासोबत असलेला माझा नातेसंबंध आणखी मजबूत झाला आहे का? मी अजूनही पूर्ण हृदयाने त्याची सेवा करत आहे का? (कलस्सै. ३:२३) नियमित रीत्या मी प्रार्थना करतो का? दररोज बायबलचं वाचन करतो का? सभांना नियमित रीत्या उपस्थित राहतो का? जेव्हा-जेव्हा शक्य असेल तेव्हा-तेव्हा मी प्राचारकार्यासाठी जातो का? की, या सर्व गोष्टी करण्याचा माझा आवेश आता कमी होत चालला आहे?’ आपल्याला वेळोवेळी स्वतःचं परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. कारण यहोवाच्या सेवेत आपण थंड पडण्याचा धोका आहे, अशी ताकीद प्रेषित पेत्रने दिली. पण, आपण जर मेहनत घेऊन विश्‍वासात, ज्ञानात, धीर दाखवण्यात आणि सुभक्‍तीची कार्यं करण्यात वाढत गेलो, तर हा धोका आपण टाळू शकतो.—२ पेत्र १:५-८ वाचा.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज२०.०९ ३१ ¶३-५

वाचकांचे प्रश्‍न

उपदेशक ५:८ या वचनामध्ये अशा एका अधिकाऱ्‍याबद्दल सांगितलं आहे, जो गरिबांवर जुलूम आणि अन्याय करतो. पण त्याने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्‍याची त्याच्यावर नजर आहे. आणि या मोठ्या अधिकाऱ्‍यावरही आणखी बरेच मोठे अधिकारी आहेत. पण दुःखाची गोष्ट म्हणजे मानवी सरकारात असलेले हे सगळे अधिकारी भ्रष्ट असू शकतात. आणि त्यामुळे सामान्य माणसांना खूप काही सोसावं लागू शकतं.

पण परिस्थिती कितीही वाईट वाटत असली तरी एक गोष्ट जाणून आपल्याला खूप दिलासा मिळतो. ती म्हणजे, मानवी सरकारात मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्‍यांवरही यहोवाची नजर असते. त्यामुळे आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो आणि आपला भार त्याच्यावर टाकू शकतो. (स्तो. ५५:२२; फिलिप्पै. ४:६, ७) तसंच, आपल्याला हेसुद्धा माहीत आहे, की “परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करतो.”—२ इति. १६:९.

शेवटी, उपदेशक ५:८ या वचनातून आपल्याला काय कळतं? हेच, की मानवी सरकारात प्रत्येक अधिकाऱ्‍यावर नेहमी एक मोठा अधिकारी असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वचनातून यहोवाबद्दल एक मुख्य गोष्ट लक्षात येते; ती म्हणजे, यहोवा सर्वोच्च अधिकारी आहे. त्याच्यावर कोणताही मोठा अधिकारी नाही. आज तो त्याच्या मुलाद्वारे, म्हणजेच येशू ख्रिस्ताद्वारे राज्य करत आहे. यहोवा सर्वशक्‍तिशाली देव आहे आणि तो सगळं काही पाहू शकतो. त्याची नजर सगळ्यांवर आहे. तो न्यायी आहे. आणि त्याचा मुलगाही तितकाच न्यायी आहे.

१३-१९ ऑक्टोबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं उपदेशक ७-८

‘शोक करणाऱ्‍याच्या घरी जा’

इन्साइट “शोक करणं” ¶९

शोक करणं

शोक करण्याची वेळ. उपदेशक ३:१, ४ मध्ये म्हटलंय, की “रडण्याची वेळ आणि हसण्याची वेळ; आक्रोश करण्याची वेळ आणि आनंदाने नाचण्याची वेळ” असते. आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी मरायचं आहे याची जाणीव असल्यामुळे बुद्धिमान माणसाचं मन मेजवानीच्या घरापेक्षा “शोकाच्या घराकडे” लागलेलं असतं. (उप ७:२, ४; नीत १४:१३ सोबत तुलना करा) अशा प्रकारे बुद्धिमान माणूस स्वतःच्या आनंदाचा विचार न करता मिळालेल्या संधीचा वापर शोक करणाऱ्‍यांचं सांत्वन करण्यासाठी करतो. त्यामुळे आपणही नाशवंत आहोत हे लक्षात ठेवायला आणि आपल्या निर्माणकर्त्याकडे लक्ष लावायला आपल्याला मदत होते.

टेहळणी बुरूज१९.०६ २३ ¶१५

तणावाचा सामना करण्यासाठी इतरांना मदत करा

१५ विल्यम नाव असलेल्या बांधवाच्या पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. ते म्हणतात: “इतर जण माझ्या पत्नीच्या चांगल्या आठवणी मला सांगतात तेव्हा मला खूप बरं वाटतं. मला याची खात्री पटते की सर्व तिच्यावर खूप प्रेम करायचे आणि तिचा आदर करायचे. अशा प्रकारच्या आधारामुळे मला खूप मदत झाली. त्यांच्या शब्दांमुळे मला खूप सांत्वन मिळालं. माझी पत्नी माझ्यासाठी मौल्यवान होती आणि ती माझ्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग होती.” बियान्का नावाच्या बहिणीने आपल्या पतीला गमावलं. ती म्हणते: “इतर जण माझ्यासोबत प्रार्थना करतात आणि वचनांतून काही सांगतात तेव्हा मला खूप सांत्वन मिळतं. ते माझ्या पतीबद्दल बोलतात तेव्हा मला खूप बरं वाटतं, आणि मी जेव्हा त्यांच्याबद्दल बोलते तेव्हा ते माझं ऐकूनही घेतात.”

टेहळणी बुरूज१७.०७ १६ ¶१६

शोक करणाऱ्‍यांसोबत शोक करा

१६ दुःखात असलेल्या बंधुभगिनींना आपल्या प्रार्थनांमुळे मदत होऊ शकते. आपण त्यांच्यासाठी किंवा त्यांच्यासोबतही प्रार्थना करू शकतो. प्रार्थना करताना आपल्याला रडू आवरणार नाही आणि त्यामुळे प्रार्थना करणं कठीण जाईल असं कदाचित आपल्याला वाटेल. पण लक्षात ठेवा, अंतःकरणापासून केलेल्या प्रार्थना सांत्वन मिळण्याचा चांगला मार्ग असू शकतो. डेलिन म्हणते: “जेव्हा बहिणी मला सांत्वन देण्यासाठी येतात तेव्हा मी त्यांना प्रार्थना करायची विनंती करते. त्या प्रार्थना करण्यास सुरुवात करतात तेव्हा सहसा त्यांना थोडं अवघड जातं. पण एकदोन वाक्यांनंतर त्या पूर्ण अंतःकरणापासून चांगल्या प्रकारे प्रार्थना करतात. त्यांचा विश्‍वास, प्रेम आणि काळजी यांमुळे माझाही विश्‍वास वाढवण्यास मदत होते.”

टेहळणी बुरूज१७.०७ १६ ¶१७-१९

शोक करणाऱ्‍यांसोबत शोक करा

१७ एखाद्याचं दुःख किती मोठं आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला किती काळ लागेल हे आपण सांगू शकत नाही. प्रियजनांचा मृत्यू होतो तेव्हा सांत्वन देण्यासाठी आलेले मित्र आणि नातेवाईक काही काळानंतर त्यांच्या दैनंदिन व्यवहारात व्यस्त होतात. पण शोक करणाऱ्‍यांना अजूनही सांत्वनाची गरज असू शकते. त्यामुळे त्यांना सांत्वन देण्यासाठी नेहमी तयार राहा. बायबल सांगतं: “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो.” (नीति. १७:१७) शोक करत असलेल्या व्यक्‍तींना गरज आहे तोपर्यंत आपण त्यांना सांत्वन देत राहिलं पाहिजे.—१ थेस्सलनीकाकर ३:७ वाचा.

१८ लक्षात असू द्या, दुःखात असलेल्या व्यक्‍तीला एकाएकी गहिवरून येऊ शकतं. उदाहरणार्थ, लग्नाच्या वाढदिवशी, विशिष्ट संगीत ऐकल्यानंतर, फोटो पाहिल्यावर, एखादी गोष्ट करताना, इतकंच नाही तर विशिष्ट सुगंध, आवाज किंवा ऋतू यांमुळेही तिला रडू कोसळू शकतं. विवाहसोबत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच एखादी गोष्ट एकट्याने करावी लागते, तेव्हा ते फार कठीण जाऊ शकतं; जसं की, संमेलनाला किंवा स्मारकविधीला जाणं. एक बांधव म्हणतो: “माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतरचा आमच्या लग्नाचा वाढदिवस माझ्यासाठी फार कठीण जाईल हे मला माहीत होतं; आणि तो तसा होताही. पण मला त्या दिवशी एकटं वाटू नये म्हणून काही बंधुभगिनींनी माझ्या जवळच्या मित्रांसोबत मिळून एक लहानसा कार्यक्रम आयोजित केला.”

१९ दुःखात असलेल्या व्यक्‍तींना फक्‍त विशिष्ट प्रसंगीच धीराची आणि सांत्वनाची गरज असते असं नाही. ज्यूलिया म्हणते, की विशिष्ट प्रसंगांशिवाय इतर दिवशी केलेली मदत आणि संगतीही सहसा चांगली मदत ठरू शकते. पुढे ती म्हणते: “अशी अचानक मिळालेली मदत खूप मोलाची असते आणि त्यामुळे बरंच सांत्वन मिळतं.” हे खरं आहे, की शोक करत असलेल्या व्यक्‍तीचा एकटेपणा आणि दुःख आपण पूर्णपणे नाहीसं करू शकत नाही. पण, त्यांच्यासाठी काही गोष्टी करून आपण नक्कीच त्यांना सांत्वन मिळवण्यास मदत करू शकतो. (१ योहा. ३:१८) गॅबी म्हणते: “दुःखाचा सामना करताना मंडळीतल्या वडिलांकडून मिळालेल्या मदतीसाठी मी यहोवाचे खूप खूप आभार मानते. यहोवाच्या प्रेमळ हातांमध्ये मी सुरक्षित आहे याची जाणीव त्यांनी मला करून दिली.”

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज२३.०३ ३१ ¶१८

“यावरूनच सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात”

१८ पण ज्या भावाने किंवा बहिणीने आपलं मन दुखावलंय त्यांच्याशी आपल्याला बोलायची गरज आहे असं काही वेळा आपल्याला वाटेल. पण त्यांच्याशी बोलण्याआधी आपण या प्रश्‍नांवर विचार केला पाहिजे: ‘जे काही घडलं त्याबद्दल मला सगळं काही माहीत आहे का?’ (नीति. १८:१३) ‘तो नकळत माझ्याशी असा वागला असेल का?’ (उप. ७:२०) ‘माझ्याकडूनही कधी अशी चूक झाली आहे का?’ (उप. ७:२१, २२) ‘मी जर त्याच्याशी जाऊन बोललो तर विषय मिटण्याऐवजी आणखीनच जास्त वाढेल का?’ (नीतिवचनं २६:२० वाचा.) या प्रश्‍नांवर विचार केल्यामुळे त्या भावाबद्दल किंवा बहिणीबद्दल आपलं प्रेम वाढेल आणि त्याने केलेल्या चुकीकडे दुर्लक्ष करून त्याला माफ करायला आपण प्रवृत्त होऊ.

२०-२६ ऑक्टोबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं उपदेशक ९-१०

परीक्षांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवा

टेहळणी बुरूज१३ ८/१५ १४ ¶२०-२१

यहोवावर कधीच नाराज होऊ नका

२० आपल्या समस्यांचे कारण काय ते नेहमी लक्षात असू द्या. का बरे? कारण आपल्या काही समस्यांसाठी आपण स्वतःच जबाबदार असू. आणि तसे जर असेल तर आपण ते मान्य केले पाहिजे. (गलती. ६:७) आपल्या समस्यांसाठी देवाला जबाबदार धरू नका. असे करणे अविचारीपणाचे ठरेल. एक उदाहरण विचारात घ्या: एखादी कार भरधाव वेगाने धावू शकत असेल. पण, समजा वाहनचालकाने धोक्याच्या वळणावर वेगमर्यादा ओलांडली आणि त्यामुळे अपघात झाला तर त्यासाठी कारच्या उत्पादकाला जबाबदार धरावे का? मुळीच नाही! त्याचप्रमाणे, यहोवाने आपल्याला इच्छास्वातंत्र्य दिले आहे. पण, योग्य निर्णय कसे घ्यावेत याबद्दल त्याने आपल्याला उचित मार्गदर्शनही दिले आहे. मग, आपल्या चुकांसाठी आपण देवाला का जबाबदार धरावे?

२१ अर्थात, सर्वच समस्या आपल्या स्वतःच्या चुकांमुळे निर्माण होत नसतात. काही दुर्घटना, “समय व प्रसंग” यांमुळे घडतात. (उप. ९:११, पं.र.भा.) पण शेवटी, एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, सर्व दुष्टाईचे मूळ कारण दियाबल सैतान आहे. (१ योहा. ५:१९; प्रकटी. १२:९) तोच आपला शत्रू आहे, यहोवा नाही!—१ पेत्र ५:८.

टेहळणी बुरूज१९.०९ ४ ¶१०

यहोवा आपल्या नम्र सेवकांची कदर करतो

१० नम्र असल्यामुळे आपल्याला जीवन जगणंसुद्धा सोपं जातं. खरंतर, कधीकधी आपल्याला अशा गोष्टी घडताना दिसतात ज्या आपल्याला योग्य वाटत नाहीत. एखाद्यावर अन्याय झाला आहे असं आपल्याला वाटतं. बुद्धिमान राजा शलमोन याने मान्य केलं: “चाकर घोड्यावर बसताना व सरदार चाकराप्रमाणे जमिनीवर पायी चालताना मी पाहिले.” (उप. १०:७) कधीकधी ज्यांच्याकडे कौशल्यं असतात त्यांची नेहमीच प्रशंसा होते असं नाही आणि ज्यांच्याकडे कमी कौशल्यं असतात त्यांना कधीकधी बराच मान दिला जातो. असं असलं तरी शलमोन राजाने मान्य केलं की आपल्या जीवनातल्या नकारात्मक गोष्टींमुळे चिंतित होण्यापेक्षा आपण आपलं जीवन जसं आहे तसं स्वीकारलं पाहिजे. (उप. ६:९) नम्रता असल्यामुळे आपण असा विचार करणार नाही की सगळं आपल्याच इच्छेप्रमाणे असावं, तर याऐवजी आपण जीवन आहे तसं स्वीकारू.

टेहळणी बुरूज११ १०/१५ ८ ¶१-२

तुम्ही जी करमणूक निवडता ती हितकारक आहे का?

संपूर्ण बायबलमध्ये अशी अनेक विधाने आढळतात ज्यांवरून हे सूचित होते, की आपण केवळ जीवन जगावे अशी यहोवाची इच्छा नाही, तर आपण जीवनाचा आनंद घ्यावा अशी त्याची इच्छा आहे. उदाहरणार्थ, स्तोत्र १०४:१४, १५ म्हणते की यहोवा, “मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षारस; त्याचे मुख टवटवीत करणारे तेल, मनुष्याच्या जिवाला आधार देणारी भाकर” उत्पन्‍न करतो. जीवन जगण्यासाठी आवश्‍यक असलेले अन्‍न यहोवाच आपल्याला देतो. तो वनस्पती उगवतो ज्यातून आपल्याला अन्‍नधान्य, तेल व द्राक्षारस मिळतो. जीवन जगण्यासाठी द्राक्षारसाची गरज नसली, तरी द्राक्षारसामुळे ‘मनुष्याचे अंतःकरण आनंदित होऊ शकते.’ (उप. ९:७; १०:१९) होय, आपण आनंदी असावे व आपले मन ‘हर्षाने भरून तृप्त’ व्हावे अशी यहोवाची इच्छा आहे.—प्रे. कृत्ये १४:१६, १७.

२ त्यामुळे, ‘आकाशातील पाखरे’ व “रानातील फुले” निरखून पाहण्यासाठी किंवा मनाला तजेला देणाऱ्‍या व आपले जीवन समृद्ध करणाऱ्‍या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी आपण अधूनमधून काही वेळ काढतो तेव्हा आपल्याला दोषी वाटण्याची गरज नाही. (मत्त. ६:२६, २८; स्तो. ८:३, ४) सुखी व समृद्ध जीवन ही “देवाची देणगी आहे.” (उप. ३:१२, १३) आणि आपण करमणुकीसाठी जो वेळ खर्च करतो तो देवाने दिलेल्या या देणगीचा भाग आहे. तेव्हा, आपण या वेळेचा उपयोग अशा रीतीने केला पाहिजे ज्यामुळे देवाचे मन आनंदित होईल.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट “एखाद्याच्या मागे बोलणं, बदनामी” ¶४, ८

एखाद्याच्या मागे बोलणं, बदनामी

एखाद्याविषयी त्याच्या मागे बोलता-बोलता त्याची बदनामीही होऊ शकते. त्यामुळे बदनामी करणाऱ्‍याचंपण नुकसान होऊ शकतं. उपदेशक १०:१२-१४ मधले शब्द अगदी खरे आहेत. तिथे म्हटलंय: “मूर्खाच्या ओठांतून निघणारे शब्द त्याचा नाश करतात. त्याच्या तोंडून निघणारे सुरुवातीचे शब्द मूर्खपणाचे असतात आणि त्याचे शेवटचे शब्द वेडेपणाचे आणि नुकसानकारक असतात. तरी तो मूर्ख बोलतच राहतो.”

एखाद्याबद्दल त्याच्या मागे बोलणं नेहमीच चुकीचं नसलं तरी बोलता-बोलता त्याची केव्हा बदनामी होईल ते सांगता येत नाही. निंदा किंवा बदनामी करणं, मग ती जाणूनबुजून केलेली असो किंवा नकळतपणे, नेहमीच वाईट असते. त्यामुळे एखाद्याचं मन दुखावलं जाऊ शकतं आणि वाद होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे बदनामी करणारा यहोवाची मर्जी गमावून बसू शकतो. कारण निंदा करणारा “भावाभावांत भांडणतंटे उत्पन्‍न करणारा” ठरतो आणि या गोष्टीचा देवाला वीट आहे. (नीत ६:१६-१९) “निंदा” किंवा “बदनामी” यांसाठी मूळ ग्रीक भाषेत दियाबोलोस हा शब्द आहे. बायबलमध्ये हा शब्द देवाची निंदा करणाऱ्‍या “दियाबल” सैतानासाठी वापरण्यात आलाय. (योह ८:४४; प्रक १२:९, १०; उत्प ३:२-५) यावरून कळतं, की निंदा आणि बदनामी यांसारख्या वाईट गोष्टी सैतानापासूनच आहेत.

२७ ऑक्टोबर–२ नोव्हेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं उपदेशक ११-१२

सुदृढ राहा आणि जीवनाचा आनंद घ्या

सावध राहा! ३/१५ १३ ¶६-७

शुद्ध हवा आणि सूर्यप्रकाश—नैसर्गिक ‘औषधं?’

सूर्यप्रकाशात नैसर्गिक रित्या जंतूंचा नाश करण्याची क्षमता आहे. एका वैद्यकीय मासिकात सांगितल्याप्रमाणे, “हवेतून पसरणारे जंतू सूर्यप्रकाशात जिवंत राहू शकत नाहीत.”

म्हणून तुम्ही शुद्ध हवा आणि सूर्यप्रकाश घेण्यासाठी थोडा वेळ मोकळ्या वातावरणात घालवला पाहिजे. यामुळे तुमच्या आरोग्यावर नक्कीच चांगला परिणाम होईल.

टेहळणी बुरूज२३.०२ २१ ¶६-७

देवाने दिलेल्या जीवनाच्या देणगीची कदर करा

६ बायबल हे आरोग्याबद्दलचं किंवा आहाराबद्दलचं पुस्तक नसलं, तरी त्या बाबतींत यहोवा कसा विचार करतो हे आपल्याला त्यातून कळतं. उदाहरणार्थ, तो आपल्याला बायबलमधून सांगतो, की “नुकसान करणाऱ्‍या गोष्टी आपल्या शरीरापासून दूर” ठेवा. (उप. ११:१०) दारूबाजीमुळे आणि अधाशीपणामुळे आपल्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी खूप वाईट आहेत असं बायबलमध्ये म्हटलंय. (नीति. २३:२०) आपण काय आणि किती प्रमाणात खावं-प्यावं हे ठरवताना आपण संयम राखावा अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो.—१ करिंथ. ६:१२; ९:२५.

७ यहोवाने दिलेल्या जीवनाच्या देणगीची आपल्याला कदर आहे हे दाखवण्यासाठी आपण आपल्या विचारशक्‍तीचा उपयोग करून चांगले निर्णय घेऊ शकतो. (स्तो. ११९:९९, १००; नीतिवचनं २:११ वाचा.) उदाहरणार्थ, आपण काय खातो, काय पितो या गोष्टींकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला आवडत असेल, पण ती खाल्ल्यामुळे जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण ती टाळली पाहिजे. तसंच, जेव्हा आपण पुरेशी झोप घेतो, नियमितपणे व्यायाम करतो, स्वच्छ राहतो आणि आपलं घरसुद्धा स्वच्छ ठेवतो तेव्हा आपण समंजसपणा दाखवत असतो.

टेहळणी बुरूज२४.०९ २ ¶२-३

वचनाप्रमाणे चालणारे बना!

२ जे यहोवाची उपासना करतात ते आनंदी असतात. का बरं? याची बरीच कारणं आपल्याकडे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, आपण देवाचं वचन दररोज वाचतो आणि जे काही शिकायला मिळालं ते लागू करायचा प्रयत्न करतो.—याकोब १:२२-२५ वाचा.

३ आपण जेव्हा ‘वचनाप्रमाणे चालणारे बनतो,’ तेव्हा आपल्याला बऱ्‍याच मार्गांनी फायदा होतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपण बायबलमध्ये शिकायला मिळालेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करतो, तेव्हा आपण यहोवाचं मन आनंदित करत असतो आणि हे माहीत असल्यामुळे आपल्या स्वतःलासुद्धा आनंद होतो. (उप. १२:१३) देवाच्या प्रेरित वचनात आपल्याला जे काही वाचायला मिळतं ते जेव्हा आपण आपल्या जीवनात लागू करतो, तेव्हा आपलं कौटुंबिक जीवन सुधारतं आणि भाऊबहिणींसोबतचं आपलं नातंही आणखी मजबूत होतं. हे तुमच्याही बाबतीत कदाचित खरं ठरलं असेल. यासोबतच, आपण यहोवाच्या मार्गांचं पालन न केल्यामुळे येणाऱ्‍या बऱ्‍याच समस्याही टाळू शकतो. दावीद राजाने जे म्हटलं, तसं आपल्यालाही वाटतं. त्याने आपल्या गीतात यहोवाच्या नियमांचा, त्याच्या आदेशांचा आणि त्याच्या निर्णयांचा उल्लेख केल्यानंतर असं म्हटलं: “त्यांचं पालन केल्यामुळे मोठं प्रतिफळ मिळतं.”—स्तो. १९:७-११.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट “देवाच्या प्रेरणेने” ¶१०

देवाच्या प्रेरणेने

पुराव्यांवरून दिसून येतं, की देवाने शास्त्रवचनांचं लिखाण करण्यासाठी ज्यांचा वापर केला त्यांनी रोबोटसारखं फक्‍त सांगितलेल्या गोष्टी लिहायचं काम केलं नाही. प्रेषित योहानबद्दल आपण असं वाचतो, की एका स्वर्गदूताद्वारे त्याला “चिन्हांच्या रूपात” सगळं काही प्रकट करण्यात आलं आणि “देवाने दिलेल्या वचनाबद्दल आणि येशू ख्रिस्ताने दिलेल्या साक्षीबद्दल” म्हणजे “आपण पाहिलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल योहानने साक्ष दिली.” (प्रक १:१, २) देवाच्या “पवित्र शक्‍तीच्या प्रभावाखाली येऊन” योहान ‘प्रभूच्या दिवसात पोचला’ आणि त्याला असं सांगण्यात आलं, की “तुला जे काही दिसतं ते गुंडाळीत लिही.” (प्रक १:१०, ११) अशा प्रकारे देवाने बायबलच्या लेखकांना योग्य शब्दांची निवड करण्यासाठी आणि त्यांनी पाहिलेल्या दृष्टान्तांचं वर्णन करण्यासाठी त्यांच्या बुद्धीचा वापर करू दिला. (हब २:२) पण असं करत असताना त्यांनी जे लिहिलं ते अचूक आणि खरं असण्यासोबतच देवाच्या उद्देशाप्रमाणे असावं म्हणून देवाचं त्यांच्यावर पुरेसं नियंत्रण होतं आणि त्याने त्यांना मार्गदर्शन दिलं. (नीत ३०:५, ६) शास्त्रवचनांचं लिखाण करताना बायबल लेखकांचीही त्यात मेहनत होती ही गोष्ट आपल्याला उपदेशक १२:९, १० मध्ये जे म्हटलंय त्यावरून कळते. बायबल लेखकांनी बराच विचार करून, बारकाईने संशोधन करून आणि शब्द योग्य क्रमाने लावून “सुंदर शब्द आणि सत्याची अचूक वचनं शोधण्यासाठी बरेच परिश्रम घेतले.”—लूक १:१-४ सोबत तुलना करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा