वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr21 जुलै पृ. १-१२
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२१
  • उपशिर्षक
  • ५-११ जुलै
  • १२-१८ जुलै
  • १९-२५ जुलै
  • २६ जुलै–१ ऑगस्ट
  • २-८ ऑगस्ट
  • ९-१५ ऑगस्ट
  • १६-२२ ऑगस्ट
  • २३-२९ ऑगस्ट
  • ३० ऑगस्ट–५ सप्टेंबर
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२१
mwbr21 जुलै पृ. १-१२

जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

५-११ जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  अनुवाद ११-१२

“यहोवा कशा प्रकारच्या उपासनेची अपेक्षा करतो”

इन्साइट-२ १००७ ¶४

जीव

पूर्ण “जीवाने” सेवा करणं. “जीव” म्हणजे संपूर्ण व्यक्‍ती. तरी काही शास्त्रवचनांमध्ये असं म्हटलं आहे, की आपण ‘पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने’ देवाची सेवा केली पाहिजे किंवा त्यावर प्रेम केलं पाहिजे. (अनु ४:२९; ११:१३, १८) मग जर मन एखाद्या व्यक्‍तीच्या शरीराचाच भाग आहे, तर त्याचा वेगळा उल्लेख का करण्यात आला आहे? कारण एक व्यक्‍ती स्वत:ला (त्याच्या जीवाला म्हणजे शरीराला) दास म्हणून एखाद्याला विकेल. पण तो पूर्ण मनाने किंवा आनंदाने त्याची सेवा करेलच असं नाही. (इफि ६:५ सोबत तुलना करा; कल ३:२२.) तेव्हा “जीव ओतून” यहोवाची सेवा करणं म्हणजे, आपल्या पूर्ण ताकदीने, क्षमतेने आणि मनाने त्याची सेवा करणं.—मत्त ५:२८-३० सोबत तुलना करा; लूक २१:३४-३६; इफि ६:६-९; फिलि ३:१९; कल ३:२३, २४.

इन्साइट-१ ८४ ¶३

वेदी

इस्राएलांना अशी आज्ञा देण्यात आली होती की मूर्तीपूजेसाठी असलेल्या सगळ्या वेदी आणि पूजेचे स्तंभ तसंच खांब त्यांनी फोडून टाकावे. (निर्ग ३४:१३; अनु ७:५, ६; १२:१-३) कनानी लोकांसारख्या अशा कोणत्याही घृणास्पद गोष्टी त्यांना करायच्या नव्हत्या आणि त्यांच्यासारखं आपल्या मुलामुलींना आगीत अर्पणही करायचं नव्हतं. (अनु १२:३०, ३१; १६:२१) कनानी लोकांसारख्या अनेक वेदी उभ्या करण्याऐवजी त्यांना खऱ्‍या देवाची उपासना करण्यासाठी एकच वेदी उभी करायची होती आणि तेही यहोवाने निवडलेल्या जागेवर. (अनु १२:२-६, १३, १४, २७; या वचनांची तुलना बॅबिलोनशी करा, जिथे एकट्या इश्‍तार देवतेसाठीच १८० वेदी उभारलेल्या होत्या.)

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-१ ९२५-९२६

गरिज्जीम, डोंगर

इस्राएली लोक कनानमध्ये पोचल्यावर थोड्याच काळात, मोशेने सांगितल्याप्रमाणे इस्राएलचे सर्व वंश गरिज्जीम आणि एबाल पर्वताजवळ एकत्र आले. तिथे त्यांना यहोवाच्या आज्ञा पाळल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळतील आणि जर पाळल्या नाहीत, तर कोणते शाप मिळतील याबद्दल वाचून दाखवण्यात आलं. त्या वेळी शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ आणि बन्यामीन वंश गरिज्जीम पर्वतासमोर उभे होते. तसंच लेवी, कराराची पेटी घेऊन खोऱ्‍यात उभे होते, आणि इतर सहा वंश एबाल पर्वतासमोर उभे होते.—अनु ११:२९, ३०; २७:११-१३; यहो ८:२८-३५.

१२-१८ जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  अनुवाद १३-१५

“नियमशास्त्रातून यहोवाला गरीबांची काळजी आहे हे दिसून येतं”

इन्साइट-२ १११० ¶३

दशांश

असं दिसतं, की लेव्यांसाठी जो दशांश वेगळा काढून ठेवला जायचा त्यासोबत दरवर्षी आणखी एक दशांश वेगळा केला जायचा. आणि या दशांशाचा वापर, दरवर्षी इस्राएली लोक यरुशलेमला जायचे तेव्हा केला जायचा. जी इस्राएली कुटुंबं यरुशलेमपासून खूप दूर राहायची, त्यांना आपला दशांश (प्राणी किंवा धान्यासारख्या गोष्टी) इतक्या लांब घेऊन जाता येत नव्हता. अशा वेळी ते हा दशांश विकून त्याचे पैसे यरुशलेममध्ये सणाच्या वेळी खाण्या-पिण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी वापरायचे. (अनु १२:४-७, ११, १७, १८; १४:२२-२७) पण दर तिसऱ्‍या आणि सहाव्या वर्षी यरुशलेममधल्या सणासाठी हा दशांश वापरण्याऐवजी, इस्राएली लोक आपापल्या शहरांमध्ये असलेल्या लेवी, विदेशी, विधवा आणि अनाथ या लोकांना तो द्यायचे.—अनु १४:२८, २९; २६:१२.

इन्साइट-२ ८३३

शब्बाथ वर्ष

शब्बाथाच्या वर्षी लोकांचं कर्जसुद्धा माफ केलं जायचं. आणि त्यामुळे यहोवाच्या नावाचा आदर व्हायचा. काही लोकांचं असं म्हणणं आहे, की या वर्षी खरंतर कर्ज माफ केलं जात नव्हतं, पण कर्ज देणारी इस्राएली व्यक्‍ती कर्ज घेणाऱ्‍या इस्राएली व्यक्‍तीवर ते देण्याची जबरदस्ती करत नव्हती. कारण ते शब्बाथाचं वर्ष असल्यामुळे या वर्षी शेतीचं उत्पन्‍न होत नव्हतं. पण विदेश्‍यांकडून मात्र कर्ज फेडण्याची मागणी केली जाऊ शकत होती. (अनु १५:१-३) काही धर्मपुढाऱ्‍यांच्या मते गरीबांना मदतीसाठी दिलेलं कर्ज माफ केलं जायचं. पण व्यापारासाठी दिलेलं कर्ज वेगळ्या प्रकारे हाताळलं जायचं.

इन्साइट-२ ९७८ ¶६

दास

मालक आणि दास यांच्याबद्दल असलेले नियम.  एक इस्राएली व्यक्‍ती आपल्या इस्राएली दासाला एका विदेशी दासासारखी वागणूक देऊ शकत नव्हता. विदेशी दासावर त्याच्या मालकाचा पूर्ण अधिकार होता आणि हा अधिकार तो कायमचा वासरा म्हणून आपल्या मुलालाही देऊ शकत होता. (लेवी २५:४४-४६) पण इस्राएली दासाच्या बाबतीत मात्र असं नव्हतं. सातवं वर्ष किंवा शब्बाथ वर्ष, यापैकी जे पहिलं येईल, त्या वर्षी या दासाला सुटका मिळायची. तसंच इब्री दासाला एका दासासारखी नाही तर मजूरीवर ठेवलेल्या कामगारासारखी वागणूक दिली जायची. (निर्ग २१:२; लेवी २५:१०; अनु १५:१२) कारण जेव्हा या इस्राएली दासाला सुटका मिळायची, तेव्हा त्याला त्याच्या मालकाकडून भरपूर भेटवस्तू दिल्या जायच्या. त्यामुळे एक स्वतंत्र व्यक्‍ती म्हणून त्याला आपलं जीवन नव्याने सुरू करता यायचं.—अनु १५:१३-१५.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०६ ६/१ ३१

वाचकांचे प्रश्‍न

निर्गम २३:१९ मध्ये म्हटले आहे: “करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.” या आदेशावरून आपण कोणता धडा शिकतो?

मोशेच्या नियमशास्त्रातील हा आदेश बायबलमध्ये तीनदा आढळतो. यावरून आपल्याला, जे उचित आहे त्याबद्दल यहोवाचा दृष्टिकोन, त्याचा कनवाळूपणा आणि कोमलता यांबद्दल शिकायला मिळते. खोट्या उपासनेबद्दल त्याला किती घृणा आहे यावरही हा आदेश जोर देतो.—निर्गम ३४:२६; अनुवाद १४:२१.

एखाद्या करडाला अथवा कोणत्याही इतर पिल्लाला त्याच्या आईच्या दुधात शिजवणे, यहोवाने बनवलेल्या निसर्ग नियमाच्या विरुद्ध जाणे ठरेल. देवाने, आईचे दूध पिल्लाचे पोषण करून त्याची वाढ व्हावी म्हणून पुरवले आहे. एखाद्या पिल्लाला त्याच्या आईच्या दुधात शिजवणे म्हणजे, “पालक आणि पाल्य यांमध्ये देवाने जे नाते ठरवले आहे व पवित्र केले आहे त्याबद्दल घोर अनादर दाखवणे,” असे एका विद्वानाने म्हटले.

शिवाय, पिल्लाला त्याच्या आईच्या दुधात शिजवण्याची प्रथा, पाऊस पाडण्याकरता केली जाणारी मूर्तीपूजक लोकांमधली प्रथा असावी, असे काहींचे म्हणणे आहे. जर असे असेल तर मग, या आदेशामुळे इस्राएली लोकांचे, त्यांच्या आजूबाजूच्या राष्ट्रांच्या निरर्थक व निर्दयी धार्मिक प्रथांपासून संरक्षण झाले असावे. मोशेच्या नियमशास्त्राने इस्राएलांना त्यांच्या आजूबाजूच्या राष्ट्रांच्या चालीरीतींचे अनुकरण न करण्याविषयी स्पष्ट इशारा दिला.—लेवीय २०:२३.

या विशिष्ट नियमातून आपल्याला यहोवाच्या कोमल दयेचा देखील प्रत्यय येतो. खरे तर, नियमशास्त्रात अशाप्रकारचे अनेक नियम होते जे प्राण्यांविरुद्ध क्रूरता न दाखवण्याबाबतीत तसेच निसर्ग नियमाच्या विपरीत न वागण्याबद्दल होते. जसे की, एखाद्या पिल्लाचे अर्पण आपल्या आईबरोबर निदान सात दिवस पूर्ण व्हायच्या आधी करू नये; किंवा, आई व तिचे पिल्लू यांचा एकाच दिवशी वध करू नये; किंवा घरट्यातून आईला आणि तिच्या अंड्यांना किंवा पिल्लांना एकत्र घेऊ नये, अशाप्रकारचे आदेश नियमशास्त्रात होते.—लेवीय २२:२७, २८; अनुवाद २२:६, ७.

नियमशास्त्र, आज्ञांचा व प्रतिबंधात्मक आदेशांचा जटिल संग्रह नव्हता, हे स्पष्ट होते. नियमशास्त्राचे अनेक फायदे आहेत; त्यांपैकी एक म्हणजे या नियमशास्त्रातील नियमांमागील तत्त्वे आपल्यामध्ये, नैतिकतेची जाणीव वाढवतात. कारण या नैतिकतेवरून यहोवाचे अद्‌भुत गुण प्रदर्शित होतात.—स्तोत्र १९:७-११.

१९-२५ जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  अनुवाद १६-१८

“नीतीने न्याय करण्यासाठी लागणारी काही तत्त्वं”

इन्साइट-१ ३४३ ¶५

आंधळेपणा

लाच घेऊन पक्षपात करणारी व्यक्‍ती आंधळी असते, असं बायबल म्हणतं. नियमशास्त्रात लाच किंवा भेटवस्तू घेण्याविरुद्ध इशारा दिला होता. तसंच कोणत्याही प्रकारे पक्षपात करू नये म्हणून सांगण्यात आलं होतं. कारण यामुळे न्यायाधीश पक्षपात न करता योग्यपणे न्याय करू शकत नव्हता. “लाच माणसाला आंधळं बनवते.” (अनु १६:१९) न्याय करणारी व्यक्‍ती कितीही नीतिमान किंवा समजूतदार असली तरी लाच किंवा भेटवस्तू स्वीकारल्यामुळे कळत-नकळतपणे ती आपला निर्णय बदलू शकते. तसंच फक्‍त लाच घेतल्यामुळेच नाही, तर भावनांमुळेसुद्धा एक व्यक्‍ती चुकीचा न्याय करू शकते. म्हणूनच नियमशास्त्रात असं लिहिलं होतं की, “फक्‍त गरीब आहे म्हणून एखाद्याला दया दाखवू नका आणि श्रीमंताचा पक्ष घेऊ नका.”—लेवी १९:१५.

इन्साइट-२ ५११ ¶७

संख्या

दोन. न्यायिक बाबींमध्ये ‘दोन’ या संख्येचा वारंवार उल्लेख आल्याचं दिसून येतं. न्याय करताना एका साक्षीदारापेक्षा दोन साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीला जास्त महत्त्व दिलं जायचं. न्यायाधीशासमोर एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी दोन ते तीन साक्षीदारांची गरज होती. आज ख्रिस्ती मंडळीतसुद्धा एखादं प्रकरण हाताळताना हेच तत्त्व लागू केलं जातं.—अनु १७:६; १९:१५; मत्त १८:१६; २कर १३:१; १ती ५:१९; इब्री १०:२८.

इन्साइट-२ ६८५ ¶६

याजक

न्यायाधीशांना एखादं प्रकरण सोडवायला अवघड जात असेल तर ते याजकांकडे जाऊ शकत होते. मग त्या प्रकरणाचा योग्य निर्णय लावण्यासाठी याजक न्यायाधीशांना मदत करायचे.— अनु १७:८, ९

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-१ ७८७

समाजातून घालवून देणं

दोषी व्यक्‍तीला दगडमार करून ठार मारण्यासाठी सर्वात आधी साक्षीदारांनीच आपला हात उचलायचा होता. (अनु १७:७) असं केल्यामुळे नियमशास्त्र पाळण्याबद्दल आणि देवाच्या लोकांना पवित्र राखण्याबद्दल त्यांना किती आवेश आहे, हे ते दाखवू शकत होते. तसंच, या आज्ञेमुळे कोणीही खोटी साक्ष देण्याचा किंवा अविचारीपणे साक्ष देण्याचा प्रयत्न करत नव्हता.

२६ जुलै–१ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  अनुवाद १९-२१

“प्रत्येक व्यक्‍तीचं जीवन यहोवासाठी मौल्यवान आहे”

टेहळणी बुरूज१७.११ १४ ¶४

यहोवाच्या न्यायीपणाचं आणि दयाळूपणाचं अनुकरण करा

४ पळून जाणाऱ्‍या व्यक्‍तीला सहज पोहचता येईल अशा अंतरावर यहोवाने सहा शरणपुरांची व्यवस्था केली होती. यार्देन नदीच्या एका बाजूला तीन आणि दुसऱ्‍या बाजूला तीन अशी सहा नगरं निवडण्यासाठी यहोवाने सांगितलं होतं. ते का? कारण, त्यामुळे पळून जाणाऱ्‍या व्यक्‍तीला त्या शहरात लवकर व सहजपणे पोहचता येणार होतं. (गण. ३५:११-१४) शरणपुरांकडे जाणारे रस्ते सुव्यवस्थित होते. (अनु. १९:३) तसंच, पळून येणाऱ्‍या व्यक्‍तीला शरणपुर लगेच मिळावं म्हणून यहुदी लोक रस्त्यांवर काही पाट्यासुद्धा लावायचे. इस्राएलमध्ये असलेल्या शरणपुरांच्या व्यवस्थेमुळे, अजाणतेत खून केलेल्या एखाद्या इस्राएली व्यक्‍तीला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी परदेशात पळून जाण्याची गरज नव्हती. आणि यामुळे त्या व्यक्‍तीचा तिथल्या खोट्या दैवतांची उपासना करण्याच्या मोहापासून बचाव व्हायचा.

टेहळणी बुरूज१७.११ १५ ¶९

यहोवाच्या न्यायीपणाचं आणि दयाळूपणाचं अनुकरण करा

९ निर्दोष रक्‍त सांडल्यामुळे लागणाऱ्‍या हत्येच्या दोषापासून इस्राएली व्यक्‍तींचं संरक्षण व्हावं, हेसुद्धा शरणपुरांची व्यवस्था करण्यामागचं एक मुख्य कारण होतं. (अनु. १९:१०) यहोवाच्या नजरेत जीवन अमूल्य आहे आणि खून करणाऱ्‍यांचा तो द्वेष करतो. (नीति. ६:१६, १७) तो न्यायी व पवित्र असल्यामुळे खुनाकडे दुर्लक्ष करू शकत नाही; मग तो खून अजाणतेत झाला असला तरीही. अजाणतेत खून केलेल्या व्यक्‍तीला दया दाखवली जाऊ शकत होती, पण त्यासाठी तिने आधी वडिलांना स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं. खून अजाणतेत झाला आहे, असं जर वडिलांना आढळून आलं, तर पळून येणारी व्यक्‍ती शरणपुरात राहू शकत होती. पण त्या व्यक्‍तीला महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत त्या नगरातच राहावं लागायचं. त्यासाठी तिला कदाचित आयुष्यभरसुद्धा शरणपुरात राहावं लागू शकत होतं. या व्यवस्थेमुळे, देवाच्या नजरेत जीवन पवित्र आहे ही गोष्ट सर्व इस्राएली लोकांना समजण्यास मदत झाली. इतरांच्या प्राणांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी होईल तितकी काळजी घ्यायची होती. असं करण्याद्वारे ते आपल्या जीवनदात्याला आदर दाखवू शकत होते.

इन्साइट-१ ३४४

रक्‍त

जर एक व्यक्‍ती आपल्या भावाचा द्वेष करत असेल आणि तो मरून जावा अशी इच्छा बाळगत असेल, किंवा जर तो आपल्या भावाबद्दल खोटी साक्ष देत असेल आणि त्याच्यावर खोटा आरोप लावत असेल, तर तो आपल्या भावाचा जीव धोक्यात घालत होता. आणि त्यामुळे त्या व्यक्‍तीवर आपल्या भावाचा रक्‍तदोष यायचा.—लेवी १९:१६; अनु १९:१८-२१; १यो ३:१५.

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-१ ५१८ ¶१

न्यायनिवाडा करायचं ठिकाण

“फाटक” म्हणजे शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली मोकळी जागा. जमिनीची खरेदी-विक्री किंवा यासारख्या गोष्टींसाठी निर्णय देताना या ठिकाणी साक्षीदार शोधणं सोपं जायचं. कारण शहराच्या फाटकाजवळ दिवसभर लोकांची ये-जा असायची. आणि अशा गर्दीच्या ठिकाणी हे न्यायनिवाडा करण्याचं ठिकाण असल्यामुळे काय निर्णय दिला जातो हे पाहण्यासाठी बरेच लोक असायचे. त्यामुळे न्यायाधीश सावधगिरीने न्याय करायचे आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यायचे.

२-८ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  अनुवाद २२-२३

“नियमशास्त्रातून यहोवाला प्राण्यांची काळजी आहे हे दिसून येतं”

इन्साइट-१ ३७५-३७६

ओझं

एका इस्राएली व्यक्‍तीने जर एखाद्या गाढवाला ओझ्याखाली दबलेलं पाहिलं, आणि ती द्वेष करत असलेल्या व्यक्‍तीचं ते गाढव असलं, तरी तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नव्हतं. उलट त्या प्राण्याला ओझ्याखालून सोडवण्यासाठी त्या व्यक्‍तीची मदत करायची होती.—निर्ग २३:५.

इन्साइट-१ ६२१ ¶१

अनुवाद

कोणत्याही इस्राएली व्यक्‍तीने, आपल्या पिल्लांना सांभाळण्यासाठी घरट्यात बसलेल्या पक्ष्याला पकडायचं नव्हतं. कारण घरट्यात बसलेला पक्षी आपल्या पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी बसतो. अशा वेळी त्या पक्ष्याला पकडणं हे त्याच्या परिस्थितीचा फायदा उचलण्यासारखं झालं असतं. त्यामुळे इस्राएली लोक पिल्लांना घेऊ शकत होते, पण त्यांनी त्या पक्ष्याला सोडून द्यायचं होतं. असं केल्यामुळे तो पक्षी पुन्हा अंडी घालून पिल्लांना वाढवू शकत होता.—अनु २२:६, ७.

टेहळणी बुरूज०३ १०/१५ ३२ ¶१-२

“विजोड होऊ नका”

या पानावरील चित्रात एक ऊंट आणि एक बैल नांगराला जुंपल्याचे दिसत आहे; किती विचित्र वाटते ही जोडी! दोघांना एकत्र ठेवण्यासाठी अर्थात एकाच उंचीच्या व शक्‍तीच्या दोन प्राण्यांसाठी बनवण्यात आलेल्या त्यांच्या मानेवरील जोखडामुळे दोघांनाही त्रास होतो. अशाप्रकारचे जू ज्या प्राण्यांना लावले जात, त्या प्राण्यांच्या हिताविषयी, देवाने इस्राएली लोकांना असे सांगितले, की “बैल व गाढव ह्‍यांची जोडी जुंपून जमीन नांगरू नको.” (अनुवाद २२:१०) हेच तत्त्व बैल आणि उंटाच्या जोडीला देखील लागू होते.

सहसा, एक शेतकरी आपल्या प्राण्यांना असा त्रास देणार नाही. पण त्याच्याकडे जर दोन बैल नसतील तर तो कदाचित त्याच्याकडे असलेल्या दोन प्राण्यांना जोखडाला जुंपेल. असे दिसते, की या चित्रातील या १९ व्या शतकातील शेतकऱ्‍याने हेच करायचे ठरवले. प्राण्यांची उंची आणि वजन यांत फरक असल्यामुळे, कमी शक्‍तीच्या प्राण्याला, जास्त शक्‍तीच्या प्राण्याच्या बरोबरीने चालायला खूप प्रयास करावा लागत असेल आणि जास्त शक्‍तीच्या प्राण्यावर अधिक ओझे आले असेल.

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-१ ६००

कर्ज, कर्जदार

एक इस्राएली व्यक्‍ती जर आर्थिक संकटात सापडली असेल तरच ती कर्ज घ्यायची. कर्ज घेणं हे त्या व्यक्‍तीसाठी अगदी शेवटचा पर्याय असायचा. कारण त्या व्यक्‍तीला त्यामुळे कधीकधी कर्ज देणाऱ्‍याचा दास व्हावं लागायचं. (नीत २२:७) म्हणून देवाने इस्राएली लोकांना असं सांगितलं होतं, की त्यांनी आपल्या गरजू इस्राएली भावाला निस्वार्थपणे आणि उदारतेने मदत करावी. त्याच्या अडचणीतून स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी त्यांनी त्याच्यावर व्याज लादायचं नव्हतं. (निर्ग २२:२५; अनु १५:७, ८; स्तो ३७:२६; ११२:५) पण विदेश्‍यांकडून ते व्याज घेऊ शकत होते. (अनु २३:२०) काही यहूदी तज्ञांचं असं मत आहे, की हे गरजवंताला दिलेल्या कर्जाला नाही तर व्यवसायासाठी दिलेल्या कर्जाला लागू व्हायचं. कारण इस्राएलमध्ये येणारे विदेशी फक्‍त काही काळासाठीच म्हणजे व्यापारासाठीच तिथे यायचे. शिवाय ते इतरांना व्याजाने कर्ज देत असल्यामुळे त्यांच्याकडूनसुद्धा व्याजाची अपेक्षा केली जायची.

९-१५ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  अनुवाद २४-२६

“नियमशास्त्रातून यहोवाला स्त्रियांची काळजी होती हे दिसून येतं”

इन्साइट-२ ११९६ ¶४

स्त्री

नुकतंच लग्न झालेल्या व्यक्‍तीला एका वर्षासाठी सैन्यात न जाण्यासाठी सूट मिळायची. त्यामुळे आपलं कुटुंब वाढवायची संधी त्यांना मिळायची. शिवाय, पती सोबत नसताना आईचं मुलांमध्ये मन गुंतून राहायचं. खासकरून लढाईत जर तिच्या पतीचा मृत्यू झाला, तर मुलांमुळे तिला आधार मिळायचा.—अनु २०:७; २४:५.

इन्साइट-१ ९६३ ¶२

उरलेलं पीक गोळा करायची तरतूद

दावीदने म्हटलं: “मी एकाही नीतिमान माणसाला निराधार झालेलं, किंवा त्याच्या मुलाबाळांना अन्‍नासाठी भीक मागत असलेलं पाहिलं नाही.” (स्तो ३७:२५) नियमशास्त्रानुसार गरीब लोक उरलेलं पीक गोळा करू शकत होते. त्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलांवर भीक मागायची पाळी येत नव्हती. उलट, अन्‍न मिळवण्यासाठी ते कष्ट करायचे आणि स्वतःचं पोट भरायचे.

टेहळणी बुरूज११-E ३/१ २३

तुम्हाला माहीत होतं का?

प्राचीन इस्राएलमध्ये जर एका व्यक्‍तीचा मृत्यू झाला आणि त्याला एकही मुल नसेल तर त्याच्या पत्नीशी त्याच्या भावाने लग्न करून त्याचा वंश पुढे चालवायचा होता. (उत्पत्ती ३८:८) या तरतुदीला नंतर नियमशास्त्रात समाविष्ट करण्यात आलं आणि त्याला ‘दिराचं कर्तव्य’ असं म्हटलं जायचं. (अनुवाद २५:५, ६) रुथ पुस्तकात बवाजने जे केलं त्यावरून कळतं, की मृत झालेल्या व्यक्‍तीच्या कुटुंबात त्याला एकही भाऊ नसेल तर जवळच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्‍ती हे कर्तव्य पूर्ण करू शकत होती.—रूथ १:३, ४; २:१९, २०; ४:१-६.

मार्क १२:२०-२२ या वचनात सदुकी लोकांनी येशूला जे म्हटलं, त्यावरून येशूच्या दिवसांमध्येसुद्धा ही गोष्ट पाळली जायची, हे दिसून येतं. पहिल्या शतकातल्या फ्लेव्हियस जोसिफस नावाच्या एका यहूदी इतिहासकाराने म्हटलं, की या तरतूदीमुळे मृत व्यक्‍तीचं घराणं पुढे चालू राहायचं, संपत्तीचा वारसा त्याच्या कुटुंबातच राहायचा आणि विधवा झालेल्या स्त्रीलाही आधार मिळायचा. कारण त्या काळात पत्नीला आपल्या पतीच्या संपत्तीवर अधिकार नव्हता. पण दिरासोबत लग्न केल्यामुळे झालेल्या संततीला मात्र या संपत्तीचा वारसा मिळायचा.

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-१ ६४० ¶५

घटस्फोट

सोडचिठ्ठी. नियमशास्रात घटस्फोट घेण्याबद्दल जो नियम देण्यात आला होता त्याचा लोकांनी गैरफायदा घेतल्यामुळे इस्राएली पतीने आपल्या पत्नीला घटस्फोट देणं सोपं होतं असा त्याचा अर्थ होत नाही. कारण घटस्फोट घेण्यासाठी पतीला काही पाऊलं उचलावी लागायची. जसं की “त्याने तिला सोडचिठ्ठी लिहून” द्यायची होती आणि ती सोडचिठ्ठी हातात देऊन तिला “आपल्या घरातून पाठवून” द्यायचं होतं. (अनु २४:१) बायबलमध्ये याबद्दल जास्त माहिती दिलेली नसली, तरी असं दिसून येतं की हा निर्णय घेण्याआधी त्या व्यक्‍तीला अधिकाऱ्‍यांशी बोलावं लागायचं. आणि हे अधिकारी त्यांच्यात समेट करून देण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे सोडचिठ्ठी तयार करण्यात आणि कायदेशीर पाऊलं उचलण्यात बराच वेळ जायचा आणि या काळात पतीला आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करायची संधी मिळायची. यासोबतच घटस्फोट घेण्यासाठी त्याच्याकडे ठोस कारण असणंसुद्धा गरजेचं होतं. जर त्यांनी ही कायदेशीर पाऊलं नीट उचलली तर टोकाचा निर्णय घेण्यापासून त्यांचं संरक्षण व्हायचं. यासोबत, पत्नीच्या अधिकाराचं रक्षण व्हायचं आणि निर्णय घेताना तिच्या हिताचा विचार केला जायचा.

१६-२२ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  अनुवाद २७-२८

“हे सर्व आशीर्वाद तुमच्यावर येऊन तुम्हाला गाठतील”

टेहळणी बुरूज१० १२/१५ १९ ¶१८

देवाच्या आत्म्याने मार्गदर्शित असलेल्या राजाद्वारे आशीर्वाद मिळवा!

१८ देवाची ‘वाणी ऐकणे’ याचा अर्थ, त्याच्या वचनात जे काही सांगितले आहे त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आणि तो पुरवत असलेल्या आध्यात्मिक अन्‍नाचा फायदा घेणे. (मत्त. २४:४५) तसेच, देवाच्या व त्याच्या पुत्राच्या आज्ञांचे पालन करणे असादेखील त्याचा अर्थ होतो. येशूने म्हटले: “मला ‘प्रभुजी, प्रभुजी,’ असे म्हणणाऱ्‍या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल.” (मत्त. ७:२१) आणि देवाची वाणी ऐकणे म्हणजे त्याने लावून दिलेल्या व्यवस्थेला अर्थात ख्रिस्ती मंडळीला, तसेच, मानवरूपी ‘देणग्यांना’ अर्थात नियुक्‍त वडिलांना स्वेच्छेने अधीनता दाखवणे.—इफिस. ४:८.

टेहळणी बुरूज०१ ९/१५ १० ¶२

यहोवाचा आशीर्वाद तुम्हाला गाठेल का?

२ अनुवाद २८:२ येथे “[सतत] ऐकशील” असे भाषांतर केलेल्या इब्री क्रियापदावरून निरंतर सुरू असणारी क्रिया सूचित होते. यहोवाच्या लोकांनी केवळ अधूनमधून त्याचे ऐकू नये तर त्याची वाणी ऐकणे त्यांच्या जीवनाचा भाग बनले पाहिजे. तरच देवाचे आशीर्वाद त्यांना गाठणार होते. “गाठतील” असे भाषांतर केलेले इब्री क्रियापद शिकारीच्या संदर्भात वापरले जात होते व सहसा त्याचा अर्थ “पकडणे” किंवा “पोचणे” असा होतो.

टेहळणी बुरूज१० ९/१५ ८ ¶४

यहोवाचे आशीर्वाद मिळवण्यास झटा

४ इस्राएल लोकांनी कोणत्या मनोवृत्तीने देवाच्या आज्ञांचे पालन करायचे होते? देवाने इस्राएल लोकांना दिलेल्या नियमशास्त्रात सांगितले होते, की त्याच्या लोकांनी “आनंदाने व उल्हासित मनाने” त्याची सेवा केली पाहिजे. त्यांनी असे न केल्यास देव नाखूष होणार होता. (अनुवाद २८:४५-४७ वाचा.) प्राणी व दुरात्मे यांत्रिकपणे आज्ञांचे पालन करतात तशा स्वरूपाची आज्ञाधारकता यहोवा आपल्याकडून अपेक्षित नाही. तर, आपण मनापासून त्याच्या आज्ञांचे पालन करावे अशी तो अपेक्षा करतो. (मार्क १:२७; याको. ३:३) आपण असे करतो तेव्हा त्याच्यावर आपले किती प्रेम आहे हे दाखवतो. देवाच्या आज्ञा कठीण नाहीत आणि “त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे” असा विश्‍वास असल्यामुळे आपण आनंदाने त्याच्या आज्ञांचे पालन करतो.—इब्री ११:६; १ योहा. ५:३.

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-१ ३६०

सीमारेषा

सहसा जमिनीचा मालक त्याच्या जागेवर येणाऱ्‍या उत्पन्‍नावर अवलंबून असायचा. त्याच्या जागेची सीमारेषा हलवणं हे त्याच्या मिळकतीचा काही भाग हडपण्यासारखं होतं. त्यामुळे ही गोष्ट एका अर्थाने चोरी करण्यासारखीच होती.—ईयोब २४:२.

२३-२९ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  अनुवाद २९-३०

“यहोवाची सेवा करणं कठीण नाही”

टेहळणी बुरूज१० ७/१ २७ ¶२

यहोवा आपल्याला निवड करण्याची संधी देतो

देव आपल्याकडून काय अपेक्षितो हे समजून घेणे व त्याप्रमाणे वागणे खरोखरच कठीण आहे का? मोशेने म्हटले: “ही जी आज्ञा मी तुला आज देत आहे ती तुला अवघड नाही व ती तुझ्या आवाक्याबाहेर नाही.” (वचन ११) यहोवा आपल्याकडून अशक्य गोष्टींची अपेक्षा करत नाही. त्याच्या अपेक्षा रास्त व पूर्ण करता येण्याजोग्या आहेत. त्या काय आहेत हे आपण जाणून घेऊ शकतो. देव आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला “स्वर्गात” अथवा “समुद्रापलीकडे” जाण्याची गरज नाही. (वचन १२, १३) आपण जीवन कसे जगले पाहिजे हे बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगते.—मीखा ६:८.

टेहळणी बुरूज१० ७/१ २७ ¶१

यहोवा आपल्याला निवड करण्याची संधी देतो

“मी यहोवाला विश्‍वासू राहू शकणार नाही, अशी भीती मला उगीचच वाटायची.” असे उद्‌गार एका ख्रिस्ती स्त्रीने काढले. लहानपणी तिला आलेल्या वाईट अनुभवांमुळे ती पुढे कधीच यशस्वी होऊ शकणार नाही, अशी तिच्या मनात भीती होती. हे खरे आहे का? आपण खरोखरच परिस्थितीचे गुलाम आहोत का? नाही. यहोवाने आपल्याला इच्छा स्वातंत्र्याची देणगी दिली आहे. यामुळे आपल्या जीवनाचा उपयोग कसा करायचा हे आपण निवडू शकतो. आपण योग्य निर्णय घ्यावेत अशी यहोवाची इच्छा आहे व आपण हे कसे करू शकतो याविषयी त्याचे वचन बायबल आपल्याला सांगते. अनुवादाच्या ३० व्या अध्यायात यहोवाने मोशेद्वारे जे सांगितले त्यावर आपण जरा विचार करूया.

टेहळणी बुरूज१० ७/१ २७ ¶४

यहोवा आपल्याला निवड करण्याची संधी देतो

आपण जी निवड करतो तिचा यहोवावर काही परिणाम होतो का? अर्थात! देवाच्या प्रेरणेने मोशेने असे म्हटले: “तू जीवन निवडून घे.” (वचन १९) आपण जीवन कसे निवडू शकतो? मोशेने हेही सांगितले. तो म्हणाला: ‘आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर प्रीति करून, त्याची वाणी ऐकून व त्याला धरून राहून’ आपण जीवन निवडू शकतो. (वचन २०) आपले जर यहोवावर प्रेम असेल तर आपण आज्ञाधारकपणे त्याचे म्हणणे ऐकू आणि काहीही झाले तरी त्याच्याशी जडून राहू. असे करण्याद्वारे आपण जीवन निवडतो. आपण केलेल्या निवडीमुळे आपले सध्याचे जीवन सर्वोत्तम बनते आणि भवितव्यात आपल्याला देवाच्या येणाऱ्‍या नवीन जगात सदासर्वदा जिवंत राहण्याची आशा ही मिळते.—२ पेत्र ३:११-१३; १ योहान ५:३.

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-१ ६६५ ¶३

कान

हे जणू असं होतं, की त्यांचे कान एका अशा गोष्टीमुळे बंद होते, ज्यामुळे त्यांना ऐकू येत नव्हतं. आणि त्यांचे हे बंद झालेले कान यहोवा उघडणार नव्हता. जेव्हा एका व्यक्‍तीची यहोवाचं मन आनंदित करायची इच्छा असते, तेव्हा यहोवा तिचे कान उघडतो किंवा वेगवेगळ्या गोष्टींना समजून घेण्यासाठी तिला मदत करतो. पण जर तिने देवाची आज्ञा मोडली, तर यहोवा तिचे कान बधिर होऊ देतो. त्यामुळे ती व्यक्‍ती यहोवाचे विचार समजू शकत नाही.—अनु २९:४; रोम ११:८

३० ऑगस्ट–५ सप्टेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  अनुवाद ३१-३२

“देवप्रेरित गीतांमधल्या शब्दचित्रांवरून शिका”

टेहळणी बुरूज२०.०६ १० ¶८-९

“तुझ्या नावाचं भय धरण्यासाठी माझं चित्त एकाग्र कर”

८ इस्राएली लोकांनी वचन दिलेल्या देशात प्रवेश केला त्याच्या थोड्याच काळाआधी यहोवाने मोशेला एक गीत शिकवलं. (अनु. ३१:१९) पुढे मोशेला हे गीत इस्राएली लोकांना शिकवायचं होतं. (अनुवाद ३२:२, ३ वाचा.*) आपण जेव्हा २ आणि ३ वचनांवर मनन करतो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते; ती म्हणजे आपलं नाव लोकांपासून लपून ठेवलं जावं किंवा ते खूप पवित्र असल्यामुळे उच्चारलं जाऊ नये अशी यहोवाची मुळीच इच्छा नाही. उलट, सगळ्यांना आपलं नाव माहीत असावं असं त्याला वाटतं. मोशेकडून यहोवाबद्दल आणि त्याच्या गौरवशाली नावाबद्दल ऐकणं हा इस्राएली लोकांसाठी खरंच किती मोठा बहुमान होता! पावसाच्या बारीक सरींमुळे जशी रोपं वाढतात, अगदी तसंच मोशेने इस्राएली लोकांना शिकवलेल्या गोष्टींमुळे त्यांचा विश्‍वास वाढला आणि त्यांना प्रोत्साहन मिळालं. आपण जेव्हा लोकांना शिकवतो तेव्हा त्यांच्या मनावरसुद्धा असाच परिणाम व्हावा यासाठी आपण काय करू शकतो?

९ आपण जेव्हा घरोघरचं किंवा सार्वजनिक साक्षकार्य करतो, तेव्हा आपण बायबलमधून लोकांना देवाचं नाव यहोवा आहे हे दाखवू शकतो. तसंच आपण त्यांना आपलं साहित्य, आपले व्हिडिओ आणि वेबसाईटवर असलेली माहिती दाखवून यहोवाच्या नावाचा गौरव करू शकतो. याशिवाय आपण कामावर, शाळेत किंवा प्रवास करत असताना आपल्या प्रिय देवाबद्दल लोकांशी बोलू शकतो. यहोवा आपल्यासाठी आणि या पृथ्वीसाठी किती चांगल्या गोष्टी करणार आहे हे आपण त्यांना सांगू शकतो. या गोष्टी ऐकल्यावर कदाचित पहिल्यांदाच त्यांच्या लक्षात येईल की यहोवा किती प्रेमळ आहे. आपण जेव्हा इतरांना आपल्या प्रेमळ देवाबद्दलचं सत्य सांगतो तेव्हा त्याचं नाव पवित्र करायला मदत करत असतो. त्यांना देवाबद्दल खोट्या गोष्टी शिकवण्यात आल्या आहेत हे आपण त्यांना समजून घ्यायला मदत करत असतो. आपण त्यांना बायबलमधून जे काही शिकवतो त्यामुळे त्यांना खूप तजेला मिळू शकतो.—यश. ६५:१३, १४.

टेहळणी बुरूज०९-E ५/१ १४ ¶४

बायबलमधली शब्दचित्रं—तुम्ही त्यांना समजू शकता का?

बायबलमध्ये यहोवाची तुलना निर्जीव वस्तूंसोबत केली आहे. त्याला “इस्राएलचा खडक” आणि “मजबूत गड” असं म्हटलं आहे. (२ शमुवेल २३:३; स्तोत्रं १८:२; अनुवाद ३२:४) मग या गोष्टींमध्ये आणि यहोवामध्ये काय साम्य आहे? जसं एखादा मोठा खडक अढळ असतो आणि लोकांना आश्रय देतो, त्याचप्रमाणे यहोवा त्याच्या लोकांसाठी मजबूत आश्रय आहे आणि तो त्याच्या लोकांना संरक्षण देतो.

टेहळणी बुरूज०१ १०/१ ९ ¶७

मुलांना वळण लावताना यहोवाचे अनुकरण करा

७ यहोवाने इस्राएल लोकांशी व्यवहार करताना कशाप्रकारे प्रेम दाखवले याचा विचार करा. इस्राएल राष्ट्र अद्याप बाल्यावस्थेत असताना यहोवाने त्यांच्यावर कशाप्रकारे प्रेम केले याचे वर्णन करण्यासाठी मोशेने एक हृदयस्पर्शी रूपक वापरले. त्याने म्हटले: “गरुड पक्षीण आपले कोटे हालविते, आपल्या पिलांवर तळपत असते, आपले पंख पसरून त्यांवर त्यांना घेते व आपल्या पंखावर वाहते, त्याप्रमाणे परमेश्‍वरानेच [याकोबाला] चालविले.” (अनुवाद ३२:९, ११, १२) आपल्या पिलांना उडायला शिकवण्यासाठी गरुड पक्षीण “आपले कोटे हालविते;” घरट्यातून बाहेर पडण्यास पिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ती आपले पंख जोरजोराने फडफडवते. पिलाने घरट्यातून (जे सहसा उंच डोंगराच्या कड्यावर असते) एकदाची भरारी मारली, की आई सतत आपल्या पिलावर “तळपत असते.” नुकतेच पंख फुटलेले ते पिलू जमिनीवर पडणार असे दिसताच आई क्षणार्धात झेप घेऊन त्याला आपल्या ‘पंखांवर’ उचलून घेते. इस्राएलच्या नवजात राष्ट्राची यहोवाने अशाच प्रकारे काळजी वाहिली. त्याने त्यांना मोशेचे नियमशास्त्र दिले. (स्तोत्र ७८:५-७) यानंतर देवाने या राष्ट्रावर बारकाईने नजर ठेवली; ते संकटात आहे असे पाहताच तो त्यांना सावरून घेत असे.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०४ ९/१५ २७ ¶११

अनुवादाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

३१:१२. मंडळीच्या सभेत लहान मुलांनीही मोठ्यांसोबत बसून ऐकण्याचा व शिकून घेण्याचा प्रयत्न करावा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा