वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr20 सप्टेंबर पृ. १-५
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२०
  • उपशिर्षक
  • ७-१३ सप्टेंबर
  • १४-२० सप्टेंबर
  • २१-२७ सप्टेंबर
  • २८ सप्टेंबर–४ ऑक्टोबर
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२०
mwbr20 सप्टेंबर पृ. १-५

जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

७-१३ सप्टेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  निर्गम २३-२४

“लोकांचं अनुकरण करू नका”

इन्साइट-१पृ. ३४३परि. ५

अंधत्व

लाच किंवा भेटवस्तू घेणं, तसंच भेदभाव करणं याविरुद्ध नियमशास्त्रात वारंवार ताकीद देण्यात आली होती. कारण अशा गोष्टींमुळे एखाद्या न्यायाधीशाची बुद्धी भ्रष्ट होऊन तो पक्षपात करण्याची किंवा चुकीचा न्याय करण्याची शक्यता होती. “लाच डोळसांना अंधळे करते.” (निर्ग २३:८) “लाच शहाण्यांचे डोळे अंधळे करते.” (अनु १६:१९) एखादा न्यायाधीश कितीही प्रामाणिक आणि बुद्धिमान असला, तरीही लाच किंवा भेटवस्तू स्वीकारल्यामुळे त्याच्या हातून नकळत किंवा जाणूनबुजून अन्याय होण्याची शक्यता होती. देवाच्या नियमशास्त्रात, लाच घेण्याविरुद्धच नाही, तर फक्‍त भावनांच्या आधारावर निर्णय घेण्याविरुद्धही ताकीद देण्यात आली होती. त्यात म्हटलं होतं, “गरिबाच्या गरिबीकडे पाहू नको, आणि समर्थापुढे नमू नको.” (लेवी १९:१५) त्यामुळे, न्यायाधीशाने भावनांच्या आहारी जाऊन किंवा लोकप्रियता मिळवण्यासाठी, फक्‍त एखाद्याच्या श्रीमंतीमुळे त्याच्या विरोधात न्याय देऊन, गरिबाची बाजू घेणं चुकीचं होतं.—निर्ग २३:२, ३.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-२पृ. ३९३

मीखाएल

दानीएलच्या पुस्तकात मीखाएलला “[दानीएलच्या लोकांचा] अधिपती” आणि “[दानीएलच्या] लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती” असं म्हणण्यात आलं आहे. (दान १०:१३, २०, २१; १२:१) यावरून असं सूचित होतं, की अरण्यात इस्राएली लोकांचं मार्गदर्शन करणारा देवदूत हा मीखाएल होता. (निर्ग २३:२०, २१, २३; ३२:३४; ३३:२) शिवाय, “आद्यदेवदूत मीखाएल याचा सैतानासोबत मोशेच्या मृतदेहासंबंधी वाद झाला” या गोष्टीवरूनही या निष्कर्षाला पुष्टी मिळते.—यहू ९.

१४-२० सप्टेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  निर्गम २५-२६

“निवासमंडपातली सगळ्यात महत्त्वाची वस्तू”

इन्साइट-१पृ. १६५

कराराचा कोश

नमुना आणि रचना. यहोवाने मोशेला निवासमंडप बांधण्याची आज्ञा दिली, तेव्हा सगळ्यात आधी त्याने साक्षीच्या (कराराच्या) कोशाचा नमुना आणि तो कसा बनवावा याबद्दल सूचना दिल्या. कारण, साक्षीचा कोश हीच निवासमंडपातली आणि इस्राएली लोकांच्या छावणीतली सगळ्यात महत्त्वाची वस्तू होती. हा कोश पेटीच्या आकाराचा असून त्याची लांबी अडीच हात, रुंदी दीड हात आणि उंची दीड हात (सु. १११ × ६७ × ६७ सेंमी; ४४ × २६ × २६ इंच) इतकी होती. साक्षीच्या कोशाची पेटी बाभळीच्या लाकडापासून बनवून, आतून आणि बाहेरून शुद्ध सोन्याने मढवलेली होती. कोशाच्या “सभोवती” सुंदर नक्षीकाम असलेला“सोन्याचा कंगोरा” होता. कोशाचा दुसरा भाग म्हणजे त्याचं झाकण. हे फक्‍त सोन्याने मढवलेलं नसून, पूर्णपणे सोन्याचं बनवलेलं होतं. त्याचा आकार, कोशाला पूर्णपणे झाकता येईल इतका मोठा होता. या झाकणावर सोन्यापासून बनवलेले घडीव कामाचे दोन करूब होते. हे करूब झाकणाच्या दोन्ही टोकांवर समोरासमोर होते. त्यांची मान झुकलेली होती आणि त्यांचे पंख वरच्या बाजूला पसरलेले असून, त्यांनी आपल्या पंखांनी कोशाला झाकलं होतं. (निर्ग २५:१०, ११, १७-२२; ३७:६-९) कोशाच्या झाकणाला, “दयासन” किंवा “प्रायश्‍चित्ताचं झाकण” असंही म्हटलं जायचं.—निर्ग २५:१७; इब्री ९:५.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-१पृ. ४३२ परि. १

करूब

कराराच्या कोशाच्या झाकणावर दोन्ही टोकांना सोन्यापासून बनवलेले घडीव कामाचे दोन करूब होते. ते एकमेकांसमोर होते आणि त्यांची मान, उपासना करत असल्याप्रमाणे झुकलेली होती. प्रत्येक करूबाला दोन पंख होते आणि ते वरच्या बाजूला पसरलेले होते. पहारा देत असल्याप्रमाणे आणि रक्षण करत असल्याप्रमाणे, त्यांनी आपल्या पंखांनी कोशाला झाकलं होतं.—निर्ग २५: १०-२१; ३७:७-९.

इन्साइट-२पृ. ९३६

समक्षतेच्या भाकरी

निवासमंडपातल्या किंवा मंदिरातल्या पवित्र स्थानात एका मेजावर ठेवल्या जाणाऱ्‍या बारा भाकरी. प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी शिळ्या भाकरी काढून ताज्या भाकरी ठेवल्या जायच्या. (निर्ग ३५:१३; ३९:३६; २रा ७:४८; २इत १३:११; नहे १०:३२,३३) समक्षतेच्या भाकरीसाठी हिब्रू भाषेत असलेल्या शब्दावरून असं सूचित होतं, की ती भाकर एक अर्पण म्हणून सतत यहोवाच्या समक्ष किंवा समोर असायची. समक्षतेच्या भाकरींना “समर्पित भाकरी” असंही म्हणण्यात आलं आहे.—२इत २:४; मार्क २:२६; इब्री ९:२.

२१-२७ सप्टेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  निर्गम २७-२८

“याजकांच्या वस्त्रांवरून आपण काय शिकू शकतो?”

इन्साइट-२पृ. ११४३

उरीम आणि थुम्मीम

बरेच बायबल विद्वान असं मानतात, की उरीम आणि थुम्मीम म्हणजे चिठ्ठ्या होत्या. जेम्स मोफॅट यांच्या भाषांतरात निर्गम २८:३० मध्ये त्यांना “पवित्र चिठ्ठ्या” असं म्हणण्यात आलं आहे. काहींच्या मते, त्यांत तीन चिठ्ठ्या होत्या, एका चिठ्ठीवर “हो,” दुसरीवर “नाही” असं लिहिलेलं होतं, आणि तिसरी चिठ्ठी कोरी होती. या चिठ्ठ्या टाकून त्यातली एक निवडल्यावर, विचारलेल्या प्रश्‍नाचं हो किंवा नाही असं उत्तर मिळायचं. कोरी चिठ्ठी निघाली तर प्रश्‍नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही असं समजलं जायचं. इतरांचं मत आहे, की उरीम आणि थुम्मीम हे दोन चपटे दगड होते, ज्यांची एक बाजू पांढरी तर एक बाजू काळी होती. ते जमिनीवर टाकल्यावर, जर दोन्ही पांढऱ्‍या बाजू वर आल्या तर “हो” असं उत्तर आहे आणि दोन्ही काळ्या बाजू वर आल्या तर “नाही” असं उत्तर आहे असं समजलं जायचं. जर एक पांढरी आणि एक काळी बाजू वर असेल, तर उत्तर मिळालं नाही असं समजलं जायचं.

इन्साइट-१पृ. ८४९ परि. ३

कपाळ

इस्राएलचा महायाजक. इस्राएलमध्ये महायाजकाच्या कपाळावर, त्याच्या मंदिलाला (पगडीला) समोरच्या बाजूला सोन्याची एक पट्टी लावलेली असायची. “जशी मुद्रा कोरतात तशी तिच्यावर,” ‘यहोवासाठी पवित्र’ ही अक्षरं कोरलेली असायची. (निर्ग २८:३६-३८; ३९:३०) महायाजक हा इस्राएलमध्ये यहोवाच्या उपासनेचा मुख्य प्रतिनिधी होता. त्यामुळे, या पट्टीवर कोरलेल्या अक्षरांमुळे त्याला या गोष्टीची आठवण व्हायची की त्याने शुद्ध राहणं खूप महत्त्वाचं होतं. तसंच, या अक्षरांमुळे सगळ्या इस्राएली लोकांना या गोष्टीची आठवण व्हायची, की त्यांनीही यहोवाची सेवा करताना नेहमी शुद्ध राहणं गरजेचं आहे. यासोबतच, श्रेष्ठ महायाजक येशू ख्रिस्त याला यहोवाने याजक म्हणून सेवा करण्यासाठी समर्पित केलं आहे, आणि त्याच्या सेवेमुळे देवाच्या पवित्रतेचा गौरव होतो, ही गोष्टही यामुळे सूचित झाली.—इब्री ७:२६.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज१२-E ८/१ पृ. २६ परि. १-३

तुम्हाला माहीत होतं का?

इस्राएलच्या महायाजकाच्या ऊरपटात लावलेली रत्नं कदाचित कुठून मिळाली असतील?

इजिप्त सोडल्यावर इस्राएली लोक अरण्यात आले, तेव्हा देवाने त्यांना हा ऊरपट बनवण्याची आज्ञा दिली. (निर्ग २८:१५-२१) या ऊरपटात लाल, पुष्कराज, माणिक, पाचू, इंद्रनीलमणी, हिरा, तृणमणी, सूर्यकांत, पद्मराग, लसणा, गोमेद, आणि यास्फे ही मौल्यवान रत्नं होती. इस्राएली लोकांना ही रत्नं कुठून मिळाली असावीत?

बायबलच्या काळात, लोक मौल्यवान रत्नांना खूप महत्त्व द्यायचे आणि त्यांचा व्यापारही करायचे. उदाहरणार्थ, प्राचीन इजिप्तचे लोक खूप दूरदूरच्या ठिकाणांवरून ही रत्नं मिळवायचे, जसं की आजच्या काळातलं इराण, अफगाणिस्तान आणि कदाचित भारतसुद्धा. इजिप्तच्या खाणींमध्ये बरीच वेगवेगळी रत्नं मिळायची. इजिप्तचे सम्राटआपल्या साम्राज्यात इतर लोकांना खाणकाम करू देत नव्हते. ईयोबने त्याच्या काळातले लोक कशा प्रकारे जमिनीखालून मौल्यवान धातू आणि रत्नं मिळवण्यासाठी मेहनत घ्यायचे याबद्दल वर्णन केलं. ईयोबने नीलमणी आणि पुष्कराज या रत्नांचा उल्लेख केला.—ईयोब २८:१-११, १९.

निर्गमच्या अहवालात असं म्हटलं आहे, की इस्राएली लोकांनी इजिप्त सोडताना “मिसरी लोकांना लुटले.” (निर्गम १२:३५, ३६) त्यामुळे, महायाजकाच्या ऊरपटात लावलेली रत्नं इस्राएली लोकांना इजिप्तमधून मिळाली असावीत असं म्हणता येईल.

इन्साइट-१पृ. ११३० परि. २

पवित्रता

प्राणी आणि उपज. गाय, मेंढी आणि बकरी यांचे प्रथम जन्मलेले नर यहोवासाठी पवित्र होते आणि त्यांना खंडणी देऊन सोडवलं जाऊ शकत नव्हतं. त्यांना बलिदानासाठी राखून ठेवलं जायचं आणि त्यांतला काही भाग पवित्र याजकांना दिला जायचा. (गण १८:१७-१९) पवित्रस्थानासाठी पवित्र केलेले बलिदान आणि भेटींप्रमाणेच प्रथम उत्पन्‍न आणि दशमांश हेसुद्धा पवित्र होते. (निर्ग २८:३८) यहोवासाठी राखून ठेवलेल्या सर्व गोष्टी पवित्र होत्या. त्यांना कोणीही कमी लेखायचं नव्हतं आणि गैरवापर करून त्यांचा अनादर करायचा नव्हता.

२८ सप्टेंबर–४ ऑक्टोबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  निर्गम २९-३०

“यहोवासाठी देणगी”

इन्साइट-२पृ. ७६४-७६५

नोंदणी

सीनाय इथे असताना. इजिप्तमधून निघाल्यावर, दुसऱ्‍या वर्षाच्या दुसऱ्‍या महिन्यातजेव्हा इस्राएली लोकांनी सीनाय इथे तळ दिला होता, तेव्हा यहोवाच्या आज्ञेप्रमाणे लोकांची पहिल्यांदा नोंदणी झाली. या कामात मोशेला मदत करण्यासाठी, प्रत्येक वंशातल्या एका प्रधानाला निवडण्यात आलं. त्या प्रत्येकाने आपापल्या वंशातल्या लोकांची नोंदणी करण्याच्या कामाची जबाबदारी घेऊन त्यावर देखरेख करायची होती. सैन्यात सेवा करायला योग्य असलेल्या, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पुरुषाचं नाव नोंदण्यात आलं. त्यासोबतच, नोंदणी झालेल्या प्रत्येकाकडून निवासमंडपाच्या सेवेसाठी अर्धा शेकेलचा कर घेण्यात आला. (निर्ग ३०:११-१६; गण १:१-१६, १८, १९) नोंदणी झालेल्या लोकांची एकूण संख्या ६,०३,५५० इतकी होती. यात लेव्यांना मोजण्यात आलं नव्हतं. त्यांना देशात स्वतःची जमीन दिली जाणार नव्हती. तसंच, त्यांना निवाडमंडपाच्या सेवेसाठी कर देण्याची किंवा सैन्यात सेवा करण्याची गरज नव्हती.—गण १:४४-४७; २:३२, ३३; १८:२०, २४.

इन्साइट-१पृ. ५०२

देणगी

काही देणग्या देणं नियमशास्त्राप्रमाणे आवश्‍यक होतं. मोशेने इस्राएली लोकांची मोजणी केली, तेव्हा २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पुरुषाला, आपल्या जिवाबद्दल खंडणी म्हणून, “पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शेकेल” द्यावा लागला. हे यहोवासाठी “समर्पण” किंवा देणगी होती. लोकांना ती आपल्या जिवाबद्दल प्रायश्‍चित्त करण्यासाठी तसंच ‘दर्शनमंडपाच्या सेवेसाठी’ द्यायची होती. (निर्ग ३०:११-१६) यहुदी इतिहासकार जोसीफस माहिती देतो, की पुढे हा“मंदिराचा कर” लोकांकडून दर वर्षी घेतला जाऊ लागला.—२इत २४:६-१०; मत्त १७:२४.

टेहळणी बुरूज११-E ११/१ पृ. १२ परि. १-२

तुम्हाला माहीत होतं का?

यरुशलेममध्ये असलेल्या यहोवाच्या मंदिरातल्या सेवेचा खर्च कसा चालवला जायचा?

मंदिराच्या सेवेचा खर्च लोकांकडून मिळणाऱ्‍या करातून, खास करून दशांश जो सर्व लोकांना द्यावा लागायचा, त्यातून चालवला जायचा. पण लोकांकडून इतर प्रकारचे करही घेतले जायचे. उदाहरणार्थ, निवासमंडपाच्या बांधकामाच्या वेळी, यहोवाने मोशेला नोंदणी झालेल्या प्रत्येक इस्राएली पुरुषाकडून “परमेश्‍वराप्रित्यर्थ समर्पण” किंवा देणगी म्हणून चांदीचा अर्धा शेकेल घेण्याची आज्ञा दिली होती.—निर्ग ३०:१२-१६.

पुढे, मंदिराचा वार्षिक कर म्हणून ही रक्कम प्रत्येक यहुद्याकडून घेतली जाऊ लागली. येशूने पेत्रला माशाच्या तोंडातून मिळालेलं नाणं घेऊन हाच कर भरायला सांगितलं होतं.—मत्त १७:२४-२७.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-१पृ. १०२९ परि. ४

हात

हात ठेवणं. एखाद्या व्यक्‍तीवर किंवा वस्तूवर हात ठेवण्याचे वेगवेगळे अर्थ होते. पण सहसा याचा असा अर्थ होता, की त्या व्यक्‍तीला किंवा वस्तूला एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी किंवा कामासाठी नेमलं जात आहे, किंवा मान्य केलं जात आहे. याजकांच्या नियुक्‍तीच्या विधीत, अहरोन आणि त्याच्या मुलांनी बलिदानाच्या गोऱ्ह्याच्या आणि दोन बकऱ्‍यांच्या डोक्यावर हात ठेवले. असं करण्याद्वारे त्यांनी हे मान्य केलं, की, त्यांनी यहोवा देवाचे याजक बनावं म्हणून त्यांच्यासाठी या प्राण्यांचं बलिदान केलं जात आहे.—निर्ग २९:१०, १५, १९; लेवी ८:१४, १८, २२.

इन्साइट-१पृ. ११४ परि. १

अभिषिक्‍त, अभिषेक

यहोवाने मोशेला दिलेल्या नियमशास्त्रात, अभिषेकाचं तेल बनवण्यासाठी खास सूचना दिल्या होत्या. हे तेल विशिष्ट प्रमाणात मिसळलेल्या उत्तम प्रतीच्या पदार्थांपासून, म्हणजे गंधरस, सुगंधी दालचिनी, सुगंधी बच, तज आणि जैतुनाचं तेल यापासून बनवायचं होतं. (निर्ग ३०:२२-२५) यासारखं मिश्रण तयार करणं आणि ते इतर कोणत्याही उद्देशासाठी वापरणं हा एक अपराध होता आणि त्यासाठी मृत्युदंड दिला जायचा. (निर्ग ३०:३१-३३) पवित्र तेलाने अभिषेक करून नियुक्‍त केलं जाणं ही एक गंभीर आणि पवित्र गोष्ट आहे,हे सर्वांना समजावं म्हणून असा नियम देण्यात आला होता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा