जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
६-१२ जुलै
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | निर्गम ६-७
“मी आता फारोला काय करतो ते तू पाहशील”
इन्साइट-२ पृ. ४३६ परि. ३
मोशे
मोशेला यहोवाने पाठवलं आहे यावर इस्राएली लोकांनी सुरुवातीला विश्वास ठेवला. पण फारोच्या आदेशावरून जेव्हा इजिप्तचे लोक त्यांच्याकडून जास्त मेहनत करून घेऊ लागले तेव्हा ते कुरकुर करू लागले. त्यांनी इतकी कुरकुर केली की मोशेने शेवटी निराश होऊन यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना केली. (निर्ग ४:२९-३१; ५:१९-२३) त्या वेळी यहोवाने त्याचा विश्वास कशा प्रकारे मजबूत केला? त्याने मोशेला सांगितलं की अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांनी जी भविष्यवाणी पूर्ण होण्याची वाट पाहिली, ती तो आता पूर्ण करणार आहे. त्याने सांगितलं, की तो इस्राएली लोकांची सुटका करून वचन दिलेल्या देशात त्यांच्यापासून एक मोठं राष्ट्र बनवणार आहे. अशा प्रकारे तो आपल्या नावाचा अर्थ पूर्णपणे प्रकट करणार होता. (निर्ग ६:१-८) हे सांगितल्यावरही इस्राएली लोकांनी मोशेचं ऐकलं नाही. पण नवव्या पीडेनंतर ते खंबीरपणे त्याच्यामागे उभे राहिले आणि त्याच्याशी सहकार्य करू लागले. यामुळे दहाव्या पीडेनंतर तो त्यांना संघटित करून सैन्याच्या तुकड्यांप्रमाणे व्यवस्थितपणे इजिप्तमधून बाहेर नेऊ शकला.—निर्ग १३:१८.
इन्साइट-२ पृ. ४३६ परि. १-२
मोशे
इजिप्तच्या फारोसमोर. ही लढाई इजिप्तचे देव आणि यहोवा यांच्यामध्ये होती. एकीकडे यहोवाच्या बाजूने मोशे आणि अहरोन होते, तर त्याच्या विरोधात फारोच्या मांत्रिकांचे प्रमुख यान्नेस आणि यंब्रेस हे होते. (२ती ३:८) या प्रमुखांद्वारे फारोने इजिप्तच्या सगळ्या देवांना प्रार्थना केली की त्यांनी यहोवाच्या विरोधात त्यांची ताकद दाखवावी. मग मोशेच्या मार्गदर्शनाखाली अहरोनने फारोसमोर पहिला चमत्कार केला. या चमत्कारामुळे यहोवा इजिप्तच्या देवांपेक्षा शक्तिशाली आहे हे सिद्ध झालं. पण तरीही, फारोचं मन आणखी कठोर झालं. (निर्ग ७:८-१३) पुढे, तिसऱ्या पीडेनंतर फारोच्या मांत्रिकांनाही कबूल करावं लागलं की “यात देवाचा हात आहे.” तसंच, गळवांच्या (फोडांच्या) पीडेमुळे त्यांना इतका त्रास झाला की त्यांना मोशेचा विरोध करण्यासाठी फारोसमोर उभं राहता आलं नाही.—निर्ग ८:१६-१९; ९:१०-१२.
पीडांमुळे काहींनी विश्वास ठेवला, तर काहींचं मन कठोर झालं. मोशे आणि अहरोनने दहा पीडांपैकी प्रत्येक पीडा घोषित केली. त्यांनी घोषणा केल्याप्रमाणेच प्रत्येक पीडा आली आणि यामुळे मोशेला यहोवाने पाठवलं आहे ही गोष्ट सिद्ध झाली. इजिप्तमध्ये सगळ्यांना यहोवाचं नाव माहीत झालं आणि लोक त्याविषयी चर्चा करू लागले. यामुळे इस्राएली लोकांनी आणि इजिप्तच्या काही लोकांनी यहोवावर विश्वास ठेवला. तर फारोचं आणि त्याच्या सल्लागारांचं, तसंच त्याला पाठिंबा देणाऱ्यांचं मन कठोर झालं. (निर्ग ९:१६; ११:१०; १२:२९-३९) आपण आपल्या देवांना नाराज केल्यामुळे आपल्यावर पीडा येत आहेत असं इजिप्तच्या लोकांना वाटलं नाही. उलट, यहोवा आपल्या देवांवर न्यायदंड आणत आहे हे त्यांना कळून चुकलं होतं. नवव्या पीडेपर्यंत मोशेसुद्धा “फारोचे सेवक आणि सामान्य लोक यांच्या दृष्टीने” खूप महान बनला होता.—निर्ग ११:३.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. ७८ परि. ४
सर्वसमर्थ
अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना यहोवाचं नाव माहीत नव्हतं असं नाही. कारण त्यांनी आणि त्यांच्या आधीसुद्धा देवाच्या इतर सेवकांनी बऱ्याचदा या नावाचा वापर केला होता. (उत्प ४:१, २६; १४:२२; २७:२७; २८:१६) खरं पाहिलं, तर कुलप्रमुखांच्या जीवनाबद्दल सांगणाऱ्या उत्पत्ति या पुस्तकात “सर्वसमर्थ” हा शब्द फक्त ६ वेळा आला आहे; पण, यहोवा हे नाव मूळ इब्री लिखाणांमध्ये १७२ वेळा आलं आहे. या कुलप्रमुखांना स्वतःच्या अनुभवावरून ही खात्री पटली होती, की “सर्वसमर्थ” या उपाधीसाठी फक्त यहोवा देवच योग्य आहे. पण देवाचं वैयक्तिक नाव यहोवा याचा खरा अर्थ काय होतो आणि त्यावरून यहोवाबद्दल कोणकोणत्या गोष्टी कळतात, हे पूर्णपणे समजून घेण्याची त्यांना संधी मिळाली नव्हती.
इन्साइट-२ पृ. ४३५ परि. ५
मोशे
जेव्हा मोशे आणि अहरोन इस्राएलच्या वडीलजनांशी बोलायचे आणि फारोशी बोलायचे, तेव्हा देव मोशेला त्याच्या सूचना व आज्ञा सांगायचा आणि मोशे त्या अहरोनला सांगायचा. मग, अहरोन फारोशी बोलायचा. (निर्ग २:२३; ४:१०-१७) नंतर, यहोवाने अहरोनच्या बाबतीत बोलताना त्याला मोशेचा “संदेष्टा” म्हटलं. मोशे देवाच्या मार्गदर्शनाने बोलत असल्यामुळे तो देवाचा संदेष्टा होता. त्याच प्रकारे, अहरोन मोशेचा संदेष्टा होता कारण तो मोशेच्या मार्गदर्शनाप्रमाणे बोलायचा. यासोबतच, देवाने मोशेला सांगितलं, की त्याला “फारोचा देव” करण्यात येईल. याचा असा अर्थ होता, की मोशेकडे देवाकडून मिळालेली शक्ती असल्यामुळे आणि त्याला फारोवर अधिकार देण्यात आल्यामुळे आता त्याला इजिप्तच्या या राजाला घाबरायची काहीही गरज नव्हती.—निर्ग ७:१, २.
१३-१९ जुलै
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | निर्गम ८-९
“गर्विष्ठ फारोने नकळत देवाचा उद्देश पूर्ण करायला मदत केली”
इन्साइट-२ पृ. १०४०-१०४१
अडेल वृत्ती
मानवांशी व्यवहार करताना यहोवा देवाने धीर दाखवला. काही लोक आणि राष्ट्रं नाश व्हायला पात्र असूनही त्याने त्यांचा लगेच नाश केला नाही, तर त्यांना अस्तित्वात राहू दिलं. (उत्प १५:१६; २पेत्र ३:९) त्यांपैकी काहींनी चांगला प्रतिसाद दिला आणि यहोवाकडून क्षमा मिळेल अशी कार्यं केली. (यहो २:८-१४; ६:२२, २३; ९:३-१५) तर, इतरांनी यहोवाविरुद्ध आणि त्याच्या लोकांविरुद्ध आपलं मन आणखीनच कठोर केलं. (अनु २:३०-३३; यहो ११:१९, २०) यहोवा लोकांना अडेल वृत्ती दाखवण्यापासून रोखत नाही. म्हणून असं म्हणण्यात आलं आहे, की तो ‘त्यांचं मन कठीण करतो.’ पण शेवटी जेव्हा तो अशा अडेल वृत्तीच्या लोकांना शिक्षा देतो, तेव्हा तो किती शक्तिशाली आहे हे दिसून येतं आणि त्याचं नाव सर्वांपुढे जाहीर होतं.—निर्ग ४:२१; योह १२:४०; रोम ९:१४-१८ पडताळून पाहा.
इन्साइट-२ पृ. ११८१ परि. ३-५
दुष्टपणा
कधीकधी यहोवा देव परिस्थितीचा अशा रितीने उपयोग करतो, की ज्यामुळे दुष्ट लोक नकळत त्याचा उद्देश पूर्ण करायला स्वतःहून मदत करतात. हे दुष्ट लोक देवाचा विरोध करत असले, तरी देव त्यांच्या वागणुकीवर आवश्यकतेप्रमाणे नियंत्रण करू शकतो. आपल्या सेवकांना वाचवण्यासाठी आणि त्यांना एकनिष्ठता टिकवून ठेवता यावी म्हणून तो असं करतो. तसंच, अशा दुष्ट लोकांच्या कार्यांतूनही आपलं नीतिमत्त्व सगळ्यांपुढे प्रकट होईल अशा प्रकारे तो घटना घडवून आणू शकतो. (रोम ३:३-५, २३-२६; ८:३५-३९; स्तो ७६:१०) हीच गोष्ट नीतिसूत्रे १६:४ यात सांगण्यात आली आहे: “परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे, दुर्जन देखील अरिष्टाच्या दिवसांसाठी केलेला आहे.”
याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे फारो. मोशे आणि अहरोन यांच्याद्वारे यहोवाने इजिप्तच्या गुलामगिरीत असलेल्या इस्राएली लोकांची सुटका करण्याची फारोला आज्ञा दिली. इजिप्तच्या या राजाला देवाने दुष्ट बनवलं नाही. पण त्याने त्याला जिवंत राहू दिलं. तसंच, त्याने अशा घटना घडवून आणल्या ज्यांमुळे फारोने हे दाखवून दिलं की तो दुष्ट आहे आणि नाश व्हायला पात्र आहे. यहोवाने हे कोणत्या उद्देशाने केलं हे आपल्याला निर्गम ९:१६ या वचनातून कळतं. तिथे म्हटलं आहे: “मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव साऱ्या पृथ्वीवर प्रगट व्हावे यासाठीच मी तुला राखले आहे.”
इजिप्तवर दहा पीडा आल्या आणि त्यानंतर तांबड्या समुद्रात फारो आणि त्याच्या सैन्याचा नाश झाला, तेव्हा यहोवा किती शक्तिशाली आहे हे खूप ठळकपणे दिसून आलं. (निर्ग ७:१४–१२:३०; स्तो ७८:४३-५१; १३६:१५) यानंतर कित्येक वर्षांपर्यंत आजूबाजूची राष्ट्रं या घटनांबद्दल बोलत होती आणि अशा प्रकारे देवाचं नाव संपूर्ण पृथ्वीवरच्या लोकांना समजलं. (यहो २:१०, ११; १शमु ४:८) यहोवाने फारोचा लगेच नाश केला असता, तर त्याचं सामर्थ्य अशा प्रकारे सर्वांसमोर प्रकट होऊन त्याचा गौरव झाला नसता आणि त्याच्या लोकांची सुटकाही होऊ शकली नसती.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. ८७८
गोमाशी
इजिप्तवर आलेल्या चौथ्या पीडेत ज्या किड्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यांसाठी असलेला मूळ हिब्रू शब्द नेमक्या कोणत्या कीटकांना सूचित करतो हे नक्की सांगता येत नाही. ही पहिली पीडा होती जिच्यापासून गोशेनमध्ये राहणाऱ्या इस्राएली लोकांना वाचवण्यात आलं. (निर्ग ८:२१, २२, २४, २९, ३१; स्तो ७८:४५; १०५:३१) अरोव या हिब्रू शब्दाचं वेगवेगळ्या भाषांतरांत गोमाशी, भुंगेरा, माशी आणि चिलट असं भाषांतर करण्यात आलं आहे.
“गोमाशी” हा शब्द प्राण्यांच्या शरीरावर राहणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांना सूचित करतो. मादी घोडमाश्या प्राण्यांना तसंच मानवांना चावतात आणि मग त्यांचं रक्त शोषतात. या कीटकांचे डिंभ (लार्वा) प्राण्यांच्या आणि माणसाच्या शरीरात परजीवी म्हणून राहतात. मानवांच्या शरीरात राहणारे हे कीटक उष्ण प्रदेशांत सापडतात. त्यामुळे, असं म्हणता येईल की गोमाश्यांच्या पीडेने इजिप्तच्या लोकांना आणि त्यांच्या गुराढोरांना नक्कीच खूप त्रास झाला असेल आणि काहींचा यामुळे मृत्यूही झाला असेल.
२०-२६ जुलै
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | निर्गम १०-११
“मोशे आणि अहरोन यांनी खूप धैर्य दाखवलं”
इन्साइट-२ पृ. ४३६ परि. ४
मोशे
फारोसमोर जाण्यासाठी धैर्याची आणि विश्वासाची गरज होती. मोशे आणि अहरोन यहोवाने दिलेल्या शक्तीमुळेच आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या मदतीमुळेच त्यांना दिलेलं काम पूर्ण करू शकले. त्या काळातल्या सगळ्यात शक्तिशाली राजाच्या म्हणजेच फारोच्या भव्य दरबाराचं चित्र डोळ्यांपुढे उभं करा. देव समजला जाणारा गर्विष्ठ फारो तिथे आहे. त्याच्या आजूबाजूला त्याचे सल्लागार, सैन्याचे अधिकारी, रक्षक आणि गुलाम आहेत. शिवाय, त्याचे पुजारी आणि मांत्रिकही तिथे आहेत. हेच मोशेचे प्रमुख विरोधक होते. फारोच्या नंतर याच लोकांचा इजिप्तमध्ये सगळ्यात जास्त प्रभाव होता. इजिप्तचे देव खरे आहेत हे सिद्ध करण्यासाठी फारोला या सर्व प्रभावशाली लोकांचा पाठिंबा होता. मोशे आणि अहरोन यांना एकदा नाही तर बऱ्याचदा फारोसमोर जावं लागलं. आणि प्रत्येक वेळेस फारोचं मन आणखी कठोर होत गेलं. कारण, त्याला कसंही करून आपल्या इब्री दासांना गुलामगिरीत ठेवायचं होतं. हे दास त्याच्या खूप कामाचे होते. म्हणूनच, मोशे आणि अहरोनने आठव्या पीडेची घोषणा केल्यानंतर त्यांना फारोसमोरून हाकलून देण्यात आलं. आणि नवव्या पीडेनंतर, त्यांनी पुन्हा कधीच फारोसमोर येऊ नये, नाहीतर त्यांना मारून टाकलं जाईल अशी धमकीही देण्यात आली.—निर्ग १०:११, २८.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. ७८३ परि. ५
निर्गम
यहोवाने चमत्कारिक रीत्या आपल्या शक्तीचा वापर करून आपल्या नावाचा गौरव केला आणि आपल्या लोकांची सुटका केली. इस्राएली लोक तांबड्या समुद्राच्या पूर्वेकडच्या किनाऱ्यावर सुखरूपपणे पोचले, तेव्हा मोशेने आणि त्याच्या पाठोपाठ इस्राएली लोकांनी एक गीत गायलं. तसंच, त्याची बहीण संदेष्टी मिर्याम ही पुरुषांच्या पाठोपाठ गीत गाऊन आणि हातात डफ घेऊन नाचू लागली. तेव्हा तिच्यामागून सगळ्या स्त्रियाही हातात डफ घेऊन नाचू लागल्या. (निर्ग १५:१, २०, २१) इस्राएली लोकांची आता त्यांच्या शत्रूंपासून पूर्णपणे सुटका झाली होती. ते इजिप्तमधून बाहेर पडले तेव्हा त्यांना कोणत्याही माणसापासून किंवा जनावरापासून कसलाही धोका नव्हता. त्यांच्यावर साधा कुत्राही भुंकला नाही. (निर्ग ११:७) निर्गम पुस्तकाच्या अहवालात, फारोच्या सैन्यासोबत तो स्वतःसुद्धा समुद्रात बुडाला किंवा नाही हे सांगितलेलं नाही. पण स्तोत्र १३६:१५ यात स्पष्टपणे म्हटलं आहे, की यहोवाने “फारोला व त्याच्या सैन्याला तांबड्या समुद्रात गडप केले.”
२७ जुलै–२ ऑगस्ट
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | निर्गम १२
“वल्हांडण—आपल्यासाठी त्याचं महत्त्व”
इन्साइट-२ पृ. ५८३ परि. ६
वल्हांडण
वल्हांडणाच्या काही वैशिष्ट्यांची पूर्णता येशूमध्ये झाली. उदाहरणार्थ, इजिप्तमध्ये घरांवर लावण्यात आलेल्या रक्तामुळे नाश करणाऱ्या देवदूतापासून पहिल्या जन्मलेल्यांचा बचाव झाला. पौलने अभिषिक्त ख्रिश्चनांना ज्येष्ठांची मंडळी म्हटलं. (इब्री १२:२३) तसंच ख्रिस्ताच्या रक्तामुळे त्यांची सुटका झाली असंही त्याने म्हटलं.—१थेस १:१०; इफि १:७.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-२ पृ. ५८२ परि. २
वल्हांडण
इजिप्तवर आलेल्या दहा पीडांद्वारे इजिप्तच्या देवांवर न्यायदंड आणण्यात आला. खासकरून दहाव्या पीडेद्वारे, ज्यात सगळ्या पहिल्या जन्मलेल्यांचा मृत्यू झाला. (निर्ग १२:१२) मेंढा हा इजिप्तच्या रा दैवताच्या उपासकांसाठी पवित्र होता. त्यामुळे, वल्हांडणाच्या मेंढराचं रक्त दारांवर शिंपडणं हे इजिप्तच्या लोकांच्या दृष्टीने त्यांच्या देवाचा अपमान करण्यासारखं होतं. तसंच, बैलालाही पवित्र समजलं जायचं. त्यामुळे सगळ्या पहिल्या जन्मलेल्या बैलांचा नाश झाला, तेव्हा ओसायरिस हा देव खोटा आहे हे सिद्ध झालं. फारोला रा दैवताचा मुलगा समजून त्याचा आदर केला जायचा. त्यामुळे जेव्हा फारोच्या पहिल्या मुलाचा मृत्यू झाला, तेव्हा रा आण फारो हे दोघंही शक्तिहीन आहेत हे दिसून आलं.
इन्साइट-१ पृ. ५०४ परि. १
मेळावा
या सर्व ‘पवित्र मेळाव्यांचं’ एक खास वैशिष्ट्य हे होतं, की त्यांदरम्यान लोकांना कोणतंही कष्टाचं काम करण्याची परवानगी नव्हती. उदाहरणार्थ, बेखमीर भाकरींच्या सणाच्या पहिल्या आणि सातव्या दिवशी ‘पवित्र मेळावा’ होता आणि त्याबद्दल यहोवाने असं म्हटलं: “या दोन्ही दिवशी काही काम करू नये; मात्र प्रत्येक व्यक्तीच्या खाण्यापिण्यासंबंधाने जे काही करायचे असेल ते करावे.” (निर्ग १२:१५, १६) पण, या ‘पवित्र मेळाव्यांमध्ये’ याजक यहोवाला बलिदानं अर्पण करायचे. (लेवी २३:३७, ३८) हे यहोवाच्या आज्ञेच्या विरोधात नव्हतं. कारण ती आज्ञा दररोजची सर्वसाधारण कामं करण्याबद्दल होती. पण या दिवशी इतर लोक नुसतेच बसून राहायचे असं नाही. उलट, त्यांना आध्यात्मिक दृष्टीने खूप फायदा व्हायचा. दर आठवड्याच्या शब्बाथाच्या दिवशी लोक सार्वजनिक उपासनेसाठी जमायचे आणि त्यांना शिकवलं जायचं. त्यानंतर देवाच्या वचनाचं वाचन आणि त्यावर दिल्या जाणाऱ्या स्पष्टीकरणामुळेही त्यांना बराच फायदा व्हायचा. हीच पद्धत नंतर सभास्थानांतही चालू ठेवण्यात आली. (प्रेका १५:२१) त्यामुळे, शब्बाथाच्या किंवा इतर पवित्र मेळाव्यांच्या दिवशी लोक कष्टाचं काम करत नसले, तरी ते प्रार्थना करण्यासाठी, तसंच आपल्या निर्माणकर्त्याबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल मनन करण्यासाठी त्या वेळेचा उपयोग करायचे.