ख्रिस्ती जीवन
पती-पत्नी आपल्या विवाहबंधनाला कशा प्रकारे मजबूत करू शकतात
पती-पत्नी म्हणून अब्राहाम आणि सारा यांचं खूप चांगलं उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि त्यांना एकमेकांबद्दल आदर होता. (उत्प १२:११-१३; १पेत्र ३:६) तरीसुद्धा ते अपरिपूर्ण मानव असल्यामुळे त्यांच्या जीवनातही बऱ्याच समस्या आल्या. पण मग विवाहित लोक आज त्यांच्या उदाहरणातून काय शिकू शकतात?
एकमेकांसोबत बोलायचं सोडू नका. जेव्हा तुमचा विवाहसोबती वैतागून किंवा चिडलेल्या अवस्थेत तुम्हाला काहीतरी बोलतो तेव्हा समजूतदारपणा दाखवा आणि त्याच्याशी सौम्यतेने वागा. (उत्प १६:५, ६) एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी योजना करा. तुमचं तुमच्या विवाहसोबत्यावर प्रेम आहे हे तुमच्या शब्दांमधून आणि तुमच्या कृतीतून नेहमी दिसून येऊ द्या. आणि यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे यहोवाला आपल्या विवाहात सर्वात पहिलं स्थान देण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी बायबलचा अभ्यास करा. एकत्र मिळून प्रार्थना करा. आणि सोबत मिळून त्याची उपासना करा. (उप ४:१२) कारण विवाहबंधन मजबूत असेल तर या पवित्र व्यवस्थेचा पाया घालणाऱ्या यहोवा देवाचा गौरव होतो.
आपलं विवाहबंधन मजबूत करा हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
या व्हिडिओमध्ये शान आणि किआरा एकमेकांपासून दूर जात आहेत, हे कोणत्या गोष्टींवरून दिसून येतं?
विवाहात प्रामाणिकपणे आणि मनमोकळेपणाने बोलणं का महत्त्वाचं आहे?
अब्राहाम आणि सारा यांच्या उदाहरणातून शान आणि किआरा यांना कशी मदत झाली?
शान आणि किआरा यांनी आपलं विवाहबंधन मजबूत करण्यासाठी कोणती पावलं उचलली?
पती-पत्नींनी आपल्या विवाहात परिपूर्णतेची अपेक्षा का करू नये?
तुम्ही तुमचं विवाहबंधन मजबूत करू शकता!