जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
२-८ डिसेंबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं|प्रकटीकरण ७-९
“मोजता येणार नाही इतक्या मोठ्या लोकसमुदायावर यहोवाचा आशीर्वाद”
इन्साइट-१ पृ. ९९७ परि. १
मोठा लोकसमुदाय
जर मोठ्या लोकसमुदायातील लोक पृथ्वीवरच सार्वकालिक जीवन जगणार असतील तर ते राजासनासमोर आणि कोकऱ्यासमोर उभे आहेत असं का म्हटलं आहे? (प्रक ७:९) बायबलमध्ये काही वेळा एखाद्या व्यक्तीवर किंवा लोकांच्या समुहावर देवाची कृपा आहे हे दाखवण्यासाठी ती व्यक्ती किंवा तो समूह जणू देवासमोर उभा असल्याचं म्हटलं आहे. त्यांची ‘उभी’ असण्याची स्थिती देवाकडून मिळालेल्या कृपेला किंवा संमतीला सूचित करते. (स्तो १:५; ५:५; नीत २२:२९; लूक १:१९) प्रकटीकरण पुस्तकाच्या याआधीच्या अध्यायात क्रोधाचा मोठा दिवस आला असल्याचं म्हटलं आहे. या क्रोधाच्या दिवशी “पृथ्वीवरचे राजे, वरिष्ठ अधिकारी, सेनापती, श्रीमंत व प्रभावशाली माणसे, प्रत्येक गुलाम, आणि प्रत्येक स्वतंत्र व्यक्ती,” आपला जीव वाचवावा म्हणून लपण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं आहे. कारण त्यांच्यासाठी राजासनावर बसलेल्या व्यक्तीच्या आणि कोकऱ्याच्या क्रोधाचा सामना करणं शक्य नाही. (प्रक ६:१५-१७ ची तुलना लूक २१:३६ सोबत करा.) यावरून दिसून येतं की ‘मोठ्या लोकसमुदायात’ असे लोक असतील, जे देवाच्या क्रोधापासून वाचतील, आणि देवाची आणि कोकऱ्याची कृपा किंवा संमती असल्यामुळे ते त्यांच्यासमोर उभे राहू शकतील.
इन्साइट-२ पृ. ११२७ परि. ४
संकट
प्रेषितांची कार्ये ७:९, १० मध्ये म्हटलं आहे, की “देव [योसेफसोबत] होता; त्याने त्याच्या सर्व संकटांतून त्याची सुटका केली.” जेव्हा योसेफवर ही वेगवेगळी संकटं आली तेव्हा यहोवाने त्याला फक्त ती संकटं सहन करण्याची ताकद दिली नाही, तर त्याला त्या संकटांमधून वाचवलंसुद्धा. यावरून आपल्याला या गोष्टीची खात्री मिळते की मोठ्या लोकसमुदायातल्या लोकांचा मोठ्या संकटातून नक्की बचाव होईल. यरूशलेमच्या नाशानंतर जवळजवळ ३० वर्षांनी प्रेषित योहानलाही मोठ्या लोकसमुदायाबद्दल असं सांगण्यात आलं, की हेच ते लोक आहेत, जे “मोठ्या संकटातून बाहेर येतात.”—प्रक ७:१३, १४.
इन्साइट-१ पृ. ९९६-९९७
मोठा लोकसमुदाय
त्याची ओळख. मोठ्या लोकसमुदायाची ओळख खासकरून प्रकटीकरण पुस्तकाच्या ७ व्या अध्यायात दिलेल्या माहितीवरून आणि त्यासारख्या इतर अहवालांमधून होते. प्रकटीकरण ७:१५-१७ मध्ये सांगण्यात आलं आहे की देव त्यांच्यावर आपला तंबू घालेल, त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याकडे घेऊन जाईल आणि त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. अशाच प्रकारचं वर्णन आपल्याला प्रकटीकरण २१:२-४ मध्येही वाचायला मिळतं. जसं की, “देवाचा तंबू मानवांजवळ आहे”, “तो त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल”, “यापुढे मरण नसेल.” त्यामुळे हा दृष्टांत, जिथून नवी यरुशलेम खाली येते, त्या स्वर्गात असलेल्या लोकांबद्दल नाही, तर पृथ्वीवर असणाऱ्या लोकांबद्दल आहे.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. १२
अबद्दोन
अथांग डोहाचा देवदूत असणारा अबद्दोन कोण आहे?
प्रकटीकरण ९:११ मध्ये ‘अथांग डोहाच्या देवदूताचं’ नाव “अबद्दोन” असल्याचं सांगितलं आहे. याच्याशी संबंधित असणारं ग्रीक नाव अपुल्लोन आहे, ज्याचा अर्थ “विनाशक” असा होतो. १९ व्या शतकात, या देवदूताचा संबंध भविष्यात असणाऱ्या काही लोकांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. उदाहरणार्थ हा देवदूत सम्राट व्हेस्पासियन, मुहम्मद, आणि नेपोलियन असल्याचा दावा करण्यात आला. यासोबतच असंही मानलं जायचं की हा देवदूत देवाच्या विरोधात काम करणारा आहे. पण याउलट, प्रकटीकरण २०:१-३ विचारात घेतलं तर त्या ठिकाणी या देवदूताजवळ “अथांग डोहाची किल्ली” असल्याचं, आणि तो स्वर्गातून उतरणारा देवाचा प्रतिनिधी असल्याचं म्हटलं आहे. कारण तो सैतानाला बांधून अथांग डोहात टाकून देतो. प्रकटीकरण ९:११ या वचनावर टिपणी करताना इंटरप्रीटर्स बायबल म्हणतं, की “अबद्दोन नाव असलेला हा देवदूत खरंतर सैतानाकडून नाही तर देवाकडून आहे, आणि देवाच्या आज्ञेनुसार एखाद्याचा नाश करण्याचं काम तो करतो.”
प्रकटीकरण १:१८ मध्ये येशू म्हणतो, की “मी सदासर्वकाळ जिवंत राहतो आणि माझ्याजवळ मरणाच्या आणि कबरेच्या किल्ल्या आहेत.” तसंच लूक ८:२१ मध्ये अथांग डोहाबद्दल, त्याला असलेल्या अधिकाराविषयी सांगितलं आहे. आणि इब्री लोकांना २:१४ मध्ये त्याच्याकडे नाश करण्याची, अगदी सैतानालाही नाहीसं करण्याची ताकद असल्याचं सांगितलं आहे. त्यात म्हटलं आहे, की ‘ज्याच्याजवळ मृत्यू घडवून आणण्याची ताकद आहे त्याला म्हणजेच सैतानाला आपल्या मरणाद्वारे नाहिसं करावं’ म्हणून तो “हाडामांसाचा झाला.” प्रकटीकरण १०:११-१६ मध्ये तर देवाने विनाश करण्यासाठी नियुक्त केलेला शासनकर्ता म्हणून त्याची भूमिका स्पष्टच दिसून येते.
डिसेंबर ९-१५
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-२ पृ. ८८०-८८१
गुंडाळी
लाक्षणिक अर्थ. बायबलमध्ये बऱ्याच ठिकाणी गुंडाळी हा शब्द लाक्षणिक अर्थाने वापरला आहे. सहसा गुंडाळीची एकच बाजू लिहिण्यासाठी वापरली जायची. पण यहेज्केल आणि जखऱ्या या दोघांनीही दृष्टांतात दोन्ही बाजूला लिहिलेली गुंडाळी पाहिली. यावरून समजतं की त्या गुंडाळ्यांवर लिहिलेला न्यायाचा संदेश अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर असावा. (यहे २:९–३:३; जख ५:१-४) प्रकटीकरणाच्या एका दृष्टांतात असं दाखवण्यात आलं आहे की राजासनावर बसलेल्या एका व्यक्तीच्या उजव्या हातात एक गुंडाळी आहे, जिच्यावर सात शिक्के मारून तिला बंद करण्यात आलं आहे. देवाचा कोकरा जोपर्यंत ते शिक्के उघडत नाही तोपर्यंत त्यात लिहिलेल्या गोष्टी गुपित ठेवल्या जातात. (प्रक ५:१, १२; ६:१, १२-१४) पण नंतर एका दृष्टांतात योहानला एक गुंडाळी दिली जाते आणि त्याला ती खायला सांगितली जाते. योहानला ती आधी गोड लागते पण तिच्यामुळे त्याचं पोट कडू होतं. ती उघडलेली असल्यामुळे त्यात काय लिहिलं आहे ते योहानला समजण्यासारखं होतं. त्यातला संदेश योहानला वाचता येत होता आणि हा संदेश तो समजू शकत असल्यामुळे एका अर्थाने त्याच्यासाठी ती गुंडाळी गोड होती. पण त्यात न्यायदंडाची भविष्यवाणी होती. आणि ही भविष्यवाणी त्याला लोकांना सांगावी लागणार होती. त्यामुळे त्यातला संदेश योहानसाठी कडू होता. (प्रक १०:१-११) यहेज्केलला मिळालेल्या गुंडाळीमध्येही अशाच प्रकारचा संदेश होता कारण त्यात “विलाप, शोक व आकांत” याबद्दल लिहिलं होतं.—यहे २:१०.
इन्साइट-२ पृ. १८७ परि. ७-९
प्रसूतीच्या वेदना
प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये प्रेषित योहान दृष्टांतात स्वर्गात असणाऱ्या एका स्त्रीला “प्रसूतीच्या वेदनांमुळे व्याकूळ होऊन ओरडत” असल्याचं पाहतो. ती स्त्री एका मुलाला जन्म देते. हे मूल पुढे सगळ्या राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार चालवणार होतं. पण मग अजगर त्या मुलाला खाऊन टाकायचा प्रयत्न करतो. पण त्या मुलाला “देवाकडे आणि त्याच्या राजासनाकडे” नेण्यात येतं. (प्रक १२:१, २, ४-६) प्राचीन काळात नुकत्याच जन्मलेल्या बाळाला त्याच्या वडिलांकडे दिलं जायचं. त्या बाळाला घेतल्यावर वडिलांनी त्या बाळाला आपलं मूल म्हणून स्वीकारलं आहे हे दिसून यायचं. त्यामुळे दृष्टांतात पाहिलेली गोष्ट, त्या मुलाला देवाने स्वीकारलं आहे, हे सूचित करते. साहजिकच मग ती स्त्री, “वरील यरुशलेम,” म्हणजे देवाची “पत्नी” आणि ख्रिस्ताच्या व स्वर्गीय आशा असणाऱ्या त्याच्या आध्यात्मिक बांधवांची “आई” असल्याचं स्पष्ट होतं.—गल ४:२६; इब्री २:११, १२, १७.
ही स्त्री देवाची पत्नी असल्यामुळे ती नक्कीच परिपूर्ण असली पाहिजे आणि त्यामुळे कोणत्याही वेदनेशिवाय तिने मुलाला जन्म दिला पाहिजे. पण दृष्टांतात या स्वर्गात असणाऱ्या देवाच्या “स्त्रीला” प्रसुतीच्या वेदना होत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे तिला होणाऱ्या वेदनासुद्धा लाक्षणिक असल्या पाहिजेत. तिला होणाऱ्या वेदनांमुळे हेच सूचित होतं, की आपण लवकरच मुलाला जन्म देणार आहोत, या गोष्टीची जाणीव झाल्यामुळे ती प्रसुतीच्या अपेक्षेत आहे.—प्रक १२:२.
पण या स्त्रीच्या पोटी जन्माला येणारं मूल कोण होतं? हे मूल “सर्व राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार चालवेल” असं म्हटलं आहे. हीच गोष्ट स्तोत्र २:६-९ मध्ये देवाच्या मसीही राजाबद्दल सांगितली आहे. योहानने हा दृष्टांत पृथ्वीवर येशूचा जन्म, त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान झाल्याच्या खूप नंतर बघितला. त्यामुळे या दृष्टांतातली भविष्यवाणी देवाच्या पुत्राच्या म्हणजे येशू ख्रिस्ताच्या हातून होणाऱ्या मसीही राज्याच्या जन्माबद्दल आहे. कारण तोपर्यंत देवाच्या या पुत्राला मरणातून पुन्हा जिवंत करण्यात आलं होतं आणि आता जोपर्यंत “त्याच्या शत्रूंना त्याच्या पायांसाठी आसन” केलं जात नाही, तोपर्यंत तो ‘देवाच्या उजवीकडे’ बसणार होता.—इब्री १०:१२, १३; स्तो ११०:१; प्रक १२:१०.
डिसेंबर २३-२९
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं|प्रकटीकरण १७-१९
“सर्व युद्धांचा अंत करणारं देवाचं युद्ध”
टेहळणी बुरूज०८-E ४/१ पृ. ८ परि. ३-४
हर्मगिदोन—सर्व युद्धांचा अंत करणारं देवाचं युद्ध
या जगावर जोपर्यंत दुष्ट लोकांचं वर्चस्व आहे, तोपर्यंत नीतिमान लोकांना शांती आणि सुरक्षिततेचा अनुभव घेता येणार नाही. (नीतिसूत्रे २९:२; उपदेशक ८:९) ज्यांचे विचारच मुळात वाईट आहेत आणि ज्यांना वाईट गोष्टीच करायच्या आहेत, त्यांना अशा गोष्टींपासून तुम्ही दूर करू शकत नाही. त्यामुळे जर कायमस्वरूपी न्याय आणि शांती आणायची असेल तर त्यासाठी अशा दुष्ट लोकांचा अंत करावाच लागेल. म्हणूनच शलमोनने म्हटलं, की “धार्मिकाची खंडणी दुर्जन” आहे.—नीतिसूत्रे २१:१८.
या जगाचा न्यायाधीश स्वतः यहोवा असल्यामुळे, आपण या गोष्टीची खात्री बाळगू शकतो की दुष्टांचा न्यायसुद्धा नीतीनेच केला जाईल. अब्राहामने जेव्हा असा प्रश्न विचारला, की “सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?,” तेव्हा त्याला हेच उत्तर मिळालं की यहोवा न्याय करण्याच्या बाबतीत कधीच चुकत नाही! (उत्पत्ति १८:२५) एवढंच नव्हे तर बायबल याचीसुद्धा खात्री देतं की दुष्टांचा नाश करण्यात देवाला संतोष वाटत नाही, तर शेवटचा पर्याय म्हणून त्याला हे पाऊल उचलावं लागतं.—यहेज्केल १८:३२; २ पेत्र ३:९.
इन्साइट-१ पृ. ११४६ परि. १
घोडा
प्रेषित योहानला मिळालेल्या एका लाक्षणिक दृष्टांतात, गौरवण्यात आलेल्या येशू ख्रिस्ताला आणि त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या सैन्याला पांढऱ्या घोड्यावर स्वार असलेलं दाखवलं आहे. आपला देव व पिता असणाऱ्या यहोवाच्या वतीने येशू सर्व शत्रूंच्या विरोधात युद्ध करणार आहे. हे युद्ध तो नीतीने आणि न्यायाने करेल हे दाखवण्यासाठी योहानला हा दृष्टांत देण्यात आला.—प्रक १९:११, १४.
३० डिसेंबर–५ जानेवारी
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-२ पृ. २४९ परि. २
जीवन
आदामला दिलेल्या आज्ञेतून देवाने हे स्पष्ट केलं होतं की जर त्याने त्याची आज्ञा पाळली असती तर तो कधीच मेला नसता. (उत्प २:१७) त्यामुळे जेव्हा आज्ञाधारक मानवांचा शेवटचा शत्रू, मृत्यू नाहीसा केला जाईल तेव्हा तेही पापी नसल्यामुळे कधीच मरणार नाहीत. (१कर १५:२६) मृत्यूला अशा प्रकारे नाहीसं करण्याचं काम येशूच्या हजार वर्षांच्या शेवटी केलं जाईल. येशूसोबत जे लोक राजे आणि याजक म्हणून कार्य करतील त्यांच्याबद्दल असं म्हटलं आहे, की “ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्तासोबत हजार वर्षांपर्यंत राजे म्हणून राज्य केले.” पण पुढे असंही म्हटलं आहे, की ही “हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत मेलेल्यांपैकी बाकीचे पुन्हा जिवंत झाले नाहीत.” त्यामुळे हे अशा लोकांना सूचित करतं जे येशूच्या हजार वर्षांच्या शेवटी आणि मानवजातीची परीक्षा घेण्यासाठी सैतानाला अथांग डोहातून सोडण्यात येईल, त्याच्या आधी जिवंत असतील. आदाम आणि हव्वा पाप करण्याआधी ज्या परिपूर्ण अवस्थेत होते त्याच अवस्थेपर्यंत, येशूच्या हजार वर्षांच्या शेवटी पृथ्वीवरील लोक पोचतील. तेव्हा मानव परिपूर्ण असतील. त्यानंतर, सैतानाला अगदी थोड्या काळासाठी अथांग डोहातून सोडलं जाईल आणि तो लोकांची शेवटची परीक्षा घेईल. आणि त्यातून वाचणारे लोक पुढे अनंतकाळासाठी जीवनाचा आनंद लुटतील.—प्रक २०:४-१०.
इन्साइट-२ पृ. १८९-१९०
अग्नीचे सरोवर
‘अग्नीच्या सरोवराचा’ उल्लेख फक्त प्रकटीकरणाच्या पुस्तकात आणि तेही पूर्णपणे लाक्षणिक अर्थाने केलेला आढळतो. अग्नीचं सरोवर काय आहे हे स्पष्ट करताना बायबलमध्ये म्हटलं आहे, की “अग्नीचे सरोवर म्हणजे दुसरा मृत्यू.”—प्रक २०:१४; २१:८.
प्रकटीकरणाच्या पुस्तकात अग्नीच्या सरोवराबद्दल जे संदर्भ आहेत त्यावरून त्याचा लाक्षणिक अर्थ काय असू शकतो ते कळतं. उदाहरणार्थ, मृत्यूला या अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येईल असं म्हटलं आहे. (प्रक १९:२०; २०:१४) मृत्यू एक वास्तविक गोष्ट नाही, जिचा खरोखर आगीत टाकून नाश केला जाईल. तसंच अदृश्य आत्मिक प्राणी असणाऱ्या सैतानालासुद्धा या सरोवरात टाकण्यात येतं. एक आत्मिक प्राणी असल्यामुळे त्यालाही आगीमुळे काहीच इजा होऊ शकत नाही.—प्रक २०:१० ची तुलना निर्ग ३:२ आणि शास १३:२० सोबत करा.
अग्नीचं सरोवर “दुसऱ्या मृत्यूला” सूचित करतं. आणि प्रकटीकरण २०:१४ मध्ये “मृत्यू आणि कबर” यांना अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येईल असं म्हटलं आहे. यावरून हे लाक्षणिक सरोवर मानवजातीला आदामपासून वारशाने मिळालेल्या मृत्यूला सूचित करत नसावं, हे स्पष्ट होतं. (रोम ५:१२) तसंच हे सरोवर कबरेलाही (शिओल) नक्कीच सूचित करत नसावं. याउलट, हे सरोवर लाक्षणिक असलं पाहिजे आणि मानवांच्या स्वाभाविक मृत्यूला नाही तर आणखी एका प्रकारच्या मृत्यूला सूचित करत असलं पाहिजे. एक असा मृत्यू, ज्यातून पुन्हा जिवंत होण्याची काहीच शक्यता उरत नाही. कारण आदामपासून आलेल्या ‘मृत्यूने’ आणि ‘कबरेने’ (शिओल) जसं आपल्यातल्या मृतांना बाहेर सोडलं असं म्हटलं आहे, तसं या सरोवराने आपल्यातल्या लोकांना बाहेर सोडलं, असं कुठेही म्हटलेलं नाही. (प्रक २०:१३) ज्यांचं नाव “जीवनाच्या पुस्तकात” लिहिलेलं नाही अशा अपश्चातापी आणि देवाच्या सर्वोच्च अधिकाराचा विरोध करणाऱ्या लोकांना, या अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येईल. म्हणजे त्यांचा कायमचा नाश होईल व त्यांना पुन्हा कधीच जिवंत केलं जाणार नाही. हेच ते दुसरं मरण आहे.—प्रक २०:१५.