नोव्हेंबर—जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
६-१२ नोव्हेंबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | आमोस १-९
“यहोवाला शोधा म्हणजे तुम्ही वाचाल”
(आमोस ५:१४, १५) “तुम्ही वाचावे म्हणून बऱ्याच्या मागे लागा; वाइटाच्या मागे लागू नका, म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर, सेनाधीश देव, तुम्हाबरोबर असेल. वाइटाचा द्वेष करा, बऱ्याची आवड धरा, वेशीत न्याय स्थापित करा; परमेश्वर, सेनाधीश देव योसेफाच्या अवशेषावर कदाचित दया करील.”
जेहोवाज डे पृ. ९०-९१ परि. १६-१७
यहोवाच्या उच्च स्तरांनुसार त्याची सेवा करा
१६ बऱ्या-वाइटाबद्दल कोणाचे स्तर सर्वात चांगले आहेत, याची निवड करताना पहिला मनुष्य आदाम याने अविचारीपणा दाखवला. आपल्याबद्दल काय? आपण सुज्ञतेने निवड करू का? आपण या विषयाबद्दल गंभीरतेने विचार करावा, हे सांगताना आमोसने “वाइटाचा द्वेष करा, बऱ्याची आवड धरा,” असा इशारा दिला. (आमोस ५:१५) विल्यम रेने हारपर, हे युनिवर्सिटी ऑफ शिकागो इथे प्राचीन भाषा व साहित्य याचे प्राध्यापक होते. त्यांनी वर दिलेल्या वचनाबद्दल असं म्हटलं: “बऱ्या आणि वाइटाच्या स्तराबद्दल असलेलं [आमोस] याचं मत याव्हे सारखंच होतं.” बारा संदेष्ट्यांनी याच मुख्य मुद्द्यावर जोर दिला होता. चांगल्या आणि वाइटाबद्दल असलेल्या यहोवाच्या स्तरांचा आपण मनापासून स्वीकार करतो का? या उच्च स्तरांबद्दल आपल्याला बायबलमधून शिकायला मिळतं. एवढंच नाही, तर प्रौढ व अनुभवी ख्रिस्तींनी बनलेला “विश्वासू व बुद्धिमान” दास हे स्तर समजायला आपली मदत करतो.—मत्तय २४:४५-४७.
१७ वाइटाचा द्वेष केल्यामुळे आपल्याला देवाला पसंत नसलेल्या गोष्टींपासून दूर राहायला मदत मिळते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती इंटरनेटवर असलेल्या पोर्नोग्राफीच्या (अश्लील दृश्यांच्या) धोक्यांपासून कदाचित सावध राहील आणि ते पाहण्याचं टाळेलही. तरीही, तिचा “आतला मनुष्य” तिला याबद्दल काय सांगतो? (इफिसकर ३:१६) आमोस ५:१५ या वचनात दिलेला देवाचा सल्ला लागू केल्यामुळे, त्या व्यक्तीला वाइटाचा द्वेष करायला सोपं जाईल. अशा प्रकारे, ती व्यक्ती तिच्या आध्यात्मिक लढाईत यशस्वी होईल.
१३-१९ नोव्हेंबर
आध्यात्मिक रत्नं शोधा
(ओबद्या १२) “तू आपल्या भावाचा संकटसमय व त्याच्या विपत्तीचा दिवस पाहून संतोष मानू नको आणि यहूदाच्या वंशजास नाशसमय प्राप्त झाला असता तुला आनंद वाटू देऊ नको; संकटाच्या दिवशी ताठ्याने बोलू नको.”
जेहोवाज डे पृ. ११२ परि. ४-५
यहोवाच्या इच्छेप्रमाणे इतरांशी वागणं
४ सोरचे लोक इस्त्राएलसोबत व्यापार करायचे, म्हणून एका अर्थाने ते त्यांचे “भाऊबंद” होते. पण, अदोमी लोक मात्र इस्त्राएली लोकांचे खरे “भाऊबंद” होते, कारण ते याकोबचा जुळा भाऊ एसाव याच्या वंशातले होते. यहोवानेसुद्धा अदोमी लोकांना इस्त्राएलचे “भाऊबंद” असं म्हटलं. (अनुवाद २:१-४) त्यामुळे, बाबेलच्या लोकांकडून यहुद्यांवर समस्या आल्या, तेव्हा अदोमी लोकांनी दाखवलेला आनंद खूप द्वेषपूर्ण होता.—यहेज्केल २५:१२-१४.
५ यावरून आपल्याला कळतं की अदोमी लोकांचं असं वागणं यहोवाला आवडलं नाही. आपण कदाचित स्वतःला विचारू, ‘मी ज्या प्रकारे माझ्या बांधवांशी वागतो त्याबद्दल यहोवाला काय वाटतं?’ एका गोष्टीत आपण खासकरून सावध राहिलं पाहिजे. ती म्हणजे बांधवांसोबत आपले काही मतभेद होतात, तेव्हा आपण त्यांच्याबद्दल कसा दृष्टिकोन ठेवतो आणि त्यांच्याशी कसं वागतो. उदाहरणार्थ, एका ख्रिस्ती बांधवाने तुम्हाला दुखावलं असेल किंवा तुमच्या एखाद्या नातेवाइकासोबत त्याचा मतभेद झाला असेल. अशा वेळी, तुम्हाला काही तक्रार असेल, तर तुम्ही ती विसरून जाण्याऐवजी किंवा समस्या सोडवण्याऐवजी मनात राग बाळगाल का? (कलस्सैकर ३:१३; यहोशवा २२:९-३०; मत्तय ५:२३, २४) असं केल्यामुळे, बांधवासोबतच्या तुमच्या वागण्यावर याचा परिणाम होईल. कदाचित तुम्ही काही झालंच नाही असं वागाल, तुम्ही त्याच्याशी बोलणं टाळाल किंवा त्याच्याबद्दल नकारात्मक बोलाल. आणि समजा याच बांधवाच्या हातून चूक झाली असेल. आणि त्यासाठी त्याला कदाचित मंडळीतल्या वडिलांकडून ताडन मिळालं असेल किंवा त्याची सुधारणूक केली गेली असेल, तेव्हा काय? (गलतीकर ६:१) अशा वेळी, त्याचं वाईट झालं, म्हणून अदोमी लोकांसारखं तुम्हीही आनंदी व्हाल का? तुम्ही कसं वागावं अशी देवाची इच्छा आहे?
२०-२६ नोव्हेंबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मीखा १-७
“यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?”
(मीखा ६:८) “हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यांवाचून परमेश्वर तुजजवळ काय मागतो?”
टेहळणी बुरूज१२-E ११/१ पृ. २२ परि. ४-७
“यहोवा तुमच्याकडून काय अपेक्षा करतो?”
“नीतीने वागणे.” एका संदर्भानुसार, नीती (न्याय) या शब्दासाठी असलेल्या हिब्रू शब्दाच्या अर्थात “समाजात असलेल्या योग्य आणि चांगल्या नातेसंबंधांचा समावेश” होतो. आपण इतरांना देवाच्या स्तरांनुसार योग्य वागणूक द्यावी अशी देवाची इच्छा आहे. इतरांशी न्यायाने वागणं, म्हणजे त्यांच्याशी निःपक्षपणे आणि प्रामाणिकपणे वागणं. (लेवीय १९:१५; यशया १:१७; इब्री लोकांना १३:१८) जर आपण इतरांशी न्यायाने वागलो, तर तेही आपल्याशी न्यायाने वागण्यासाठी प्रेरित होतील.—मत्तय ७:१२.
“आवडीने दया करणे.” आपण फक्त दया दाखवावी असं नाही, तर दयेवर प्रेम करावं अशी देवाची इच्छा आहे. दया या शब्दासाठी असलेला हिब्रू शब्द खेसेद याचा अर्थ “प्रेमदया” किंवा “एकनिष्ठ प्रेम” असाही होऊ शकतो. एक बायबल विद्वान असं म्हणतात, की खेसेद या शब्दासाठी प्रेम, करुणा आणि दया हे शब्द अपुरे आहेत. पण हे सर्व शब्द मिळून तो गुण तयार होतो, असंही ते म्हणतात. आपण जर दयेवर प्रेम केलं, तर आपल्याला ती मनापासून दाखवता येईल. आणि गरजवंतांची मदत करताना आपल्याला आनंद होईल. यामुळे, देण्यातून मिळणारा आनंद आपल्याला अनुभवता येईल.—प्रेषितांची कार्ये २०:३५.
“आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे.” बायबलमध्ये, “चालणे” या शब्दाचा अर्थ ‘एखादं काम करत राहणे’ असा होतो. आपल्या जीवनासाठी देवाने बायबलमध्ये जे मार्गदर्शन दिलं आहे, त्याचं पालन करून आपण त्याच्यासोबत चालतो. हे करताना आपल्याला “नम्रभावाने” चालण्याची गरज आहे. हे आपण कसं करू शकतो? आपण जेव्हा देवापुढे नम्रपणे वागतो, तेव्हा यहोवाच्या तुलनेत आपलं काय स्थान आहे याचा विचार आपण करतो. तसंच, आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव असते. म्हणूनच, “नम्रभावाने चालणे” याचा अर्थ देवाच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, हे ओळखणं आणि आपल्या क्षमतेनुसार त्याची सेवा करणं असा होतो.
यहोवा आपल्याकडून जास्त गोष्टींची अपेक्षा करत नाही, यासाठी आपण देवाचे आभारी आहोत. त्याच्या सेवेत आपण मनापासून मेहनत घेतो, तेव्हा तो खूश होतो. (कलस्सैकर ३:२३) तो आपल्या मर्यादा जाणतो. (स्तोत्र १०३:१४) आपणही जेव्हा नम्रतेने आपल्या मर्यादा स्वीकारायला शिकतो, तेव्हा त्याच्यासोबत चालताना आपल्याला आनंद होतो. मग, आपण देवासोबत चालायची सुरुवात कशी करावी हे शिकू नये का? असं केल्यामुळे आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळतील.—नीतिसूत्रे १०:२२.