आपल्या प्रकाशनांची आपल्याला किंमत आहे का?
१ यहोवा आणि येशू यांच्याबद्दलचं ज्ञान खूप किंमती आहे. आणि, फक्त आपल्याच प्रकाशनांमध्ये हे ज्ञान इतक्या सखोल व पद्धतशीर रीत्या समजावण्यात येतं. (रोम. ११:३३; फिलिप्पै. ३:८) तेव्हा, आपल्या प्रकाशनांबद्दल आपल्याला कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो?
२ पुष्कळ बांधव आणि कुटुंबे नियमित रीत्या, “जगव्याप्त कार्यासाठी दान” असं लेबल असलेल्या राज्य सभागृहातील दान पेट्यांमध्ये एक ठराविक रक्कम टाकतात. आपल्या प्रकाशनांबद्दल कदर दाखवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, क्षेत्र सेवेत भेटणाऱ्या लोकांना प्रकाशनं देताना विचार करूनच ती देणं. घरमालक आपल्याबरोबर बोलायला तयार आहे का? आपण बोलत असताना तो लक्ष देत आहे का? आपण विचारत असलेल्या प्रश्नांची तो उत्तरं देत आहे का? आपण बायबलमधून वचन वाचून दाखवतो तेव्हा तो ते लक्ष देऊन ऐकतो का? या प्रश्नांची उत्तरं होय, अशी असतील तर याचा अर्थ घरमालकाला आवड आहे. अशा वेळी मग आपण त्याला आपली प्रकाशनं देऊ शकतो. आपल्या प्रकाशनांचा आपण योग्य वापर केला तरच लोकांना त्याचा खरा लाभ होईल.
३ राज्य सभागृहात लिटरेचर ठेवतात त्या कपाटांमध्ये किंवा आपल्या घरात प्रकाशनं धूळ खात पडली असतील तर त्यांचा काही उपयोग होत नाही. आपल्याकडं जुनी नियतकालिकं, माहितीपत्रकं, पुस्तकं किंवा पत्रिका असल्यातरी आपण त्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो. तुमच्याजवळ किती प्रकाशनं शिल्लक आहेत, हे अलिकडंच तुम्ही केव्हा पाहिलं होतं? असं केल्यास तुम्हाला दिसून येईल, की तुमच्याकडं बरीच प्रकाशनं साठली आहेत. ही प्रकाशनं पिवळी पडली आहेत का, किंवा फाटली आहेत का? किंवा त्यांच्यावर धूळ जमली आहे का? ती चांगल्या स्थितीत असतील तर क्षेत्र सेवेत लोकांना देण्यास काही हरकत नाही. आपण सेवेत त्या महिन्यात जे प्रकाशन द्यायचं असतं तेच देत असलो तरी अधूनमधून एखादं वेगळं प्रकाशनही सेवेत सादर करू शकतो. खराब झालेली प्रकाशनं आपण एकतर स्वतःच्या वापरासाठी ठेवू शकतो किंवा त्यांची योग्य रीतीनं विल्हेवाट लावू शकतो.
४ क्षेत्रात तुम्ही किती प्रकाशनं देता याबद्दल विचार करणं महत्त्वाचं आहे. पण, प्रमाणापेक्षा अधिक साठा ठेवण्याची गरज नाही. आपल्याला प्रकाशनं लागलीच, तर ती आपण केव्हाही सभेच्या आधी किंवा नंतर घेऊ शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही प्रकाशनांचा पुरेसा साठा स्वतःजवळ ठेवू शकता. आणि जसजसं लागेल तसतसं तुम्ही आणखी घेऊ शकता.
५ पत्रिका पाहून लोकांचं लक्ष लगेच आकर्षित होतं. आणि त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतात. सार्वजनिक साक्षकार्य करताना तसंच घरोघरच्या कार्यामध्ये भेटणाऱ्या लोकांना पत्रिका, नियतकालिकं आणि माहितीपत्रकं देण्याचा प्रयत्न करा. सार्वजनिक साक्षकार्य करताना पत्रिका आणि माहितीपत्रकं सादर करण्यासाठी खास तयार केलेल्या पोस्टर्सचा उपयोग करा. आनंदाची बातमी किंवा आनंदी कुटुंब या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या व्यक्तीला आवड आहे आणि आपल्या साहित्याची तिला कदर आहे याची तुम्हाला खातरी पटते तेव्हा तुम्ही तिला बायबल काय शिकवते किंवा योग्य असं एखादं पुस्तक देऊ शकता. एखाद्याला बायबलविषयी खरंच फार आवड असेल तर पहिल्या भेटीतच आपण त्याला बायबल काय शिकवते पुस्तक देऊ शकतो. छापील साहित्य वापरण्याऐवजी शक्य असेल तिथं jw.org या आपल्या वेबसाईटवरील इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये असलेल्या साहित्यांचा चांगला उपयोग करण्यास शिकून घ्या.
६ आपण सर्व जण, आपल्याला देण्यात आलेल्या प्रकाशनांचा वापर करण्यात सुज्ञता दाखवू या. यावरून कळेल की आपल्या प्रकाशनांची आपल्याला किंमत आहे.