आनंदाची बातमी माहितीपत्रक वापरून लोकांना शिकवणं
१. आनंदाची बातमी या माहितीपत्रकाचं वैशिष्ट्य काय आहे?
१ देवाकडून आनंदाची बातमी! हे माहितीपत्रक आपल्या शिकवण्याच्या साधनांपैकी एक महत्त्वाचं साधन आहे, असं जुलै महिन्याच्या आपली राज्य सेवा यात सांगितलं होतं. घरमालकाला थेट बायबलमधून वाचून शिकता यावं म्हणून या माहितीपत्रकात शास्त्रवचनांचा फक्त उल्लेख करण्यात आला आहे. बायबल अभ्यासाकरता तयार करण्यात आलेली आपली इतर बरीच प्रकाशनं अशा पद्धतीनं लिहिली जातात की वाचक स्वतः ती वाचून बायबलमधील सत्य शिकू शकतो. पण या माहितीपत्रकाचं वैशिष्ट्य म्हणजे ते एका बायबल शिक्षकासोबत चर्चा करून शिकण्यासाठी बनवण्यात आलं आहे. म्हणून, हे माहितीपत्रक सादर करताना त्यातून बायबल अभ्यास कसा केला जातो ते घरमालकाला दाखवलं पाहिजे. यामुळं बायबलमधील सत्य शिकण्यात किती आनंद आहे हे त्याला कळेल.—मत्त. १३:४४.
२. पहिल्याच भेटीत आपल्याला आनंदाची बातमी माहितीपत्रक कसं वापरता येईल ते सांगा.
२ पहिल्याच भेटीत: तुम्ही असं म्हणू शकता: “जगाची वाईट परिस्थिती पाहून लोकांना भविष्याची चिंता वाटते. ही परिस्थिती सुधारेल असं तुम्हाला वाटतं का? [उत्तरासाठी थांबा.] आपल्याला आशा मिळेल अशी आनंदाची बातमी आपला निर्माणकर्ताच देऊ शकतो. इथं काही प्रश्न आहेत. यांची खातरीशीर उत्तरं या माहितीपत्रकात मिळतील.” घरमालकाला माहितीपत्रक द्या आणि त्याला शेवटच्या पानावरील एखादा प्रश्न निवडायला सांगा. मग त्या धड्याचा पहिला परिच्छेद वापरून बायबल अभ्यास कसा करतात ते दाखवा. आणखी एक पर्याय म्हणजे, तुम्ही माहितीपत्रकाचा एखादा धडा निवडा व त्यावर आधारित असा एक प्रश्न विचारा ज्यामुळं घरमालक विचार करायला प्रवृत्त होईल. आणि मग माहितीपत्रक वापरून, बायबलमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर कसं मिळतं ते दाखवा. या धड्यात जर jw.org वरील एखाद्या व्हिडिओचा संदर्भ असेल तर तुम्ही तो व्हिडिओ दाखवू शकता.
३. आनंदाची बातमी माहितीपत्रकातून बायबल अभ्यास कसा घ्यावा ते स्पष्ट करा.
३ अभ्यास घेण्याची पद्धत: (१) ठळक अक्षरात छापलेला प्रश्न वाचा. यामुळं घरमालकाचं लक्ष मुख्य मुद्द्याकडं जाईल. (२) प्रश्नाखालील परिच्छेद वाचा. (३) तिरप्या अक्षरातील शास्त्रवचनं वाचा, आणि घरमालकाला असे प्रश्न विचारा ज्यामुळं त्या ठळक अक्षरातील प्रश्नाचं उत्तर वचनांत दिलं आहे हे त्याला कळेल. (४) प्रश्नाखाली आणखी एक परिच्छेद असेल तर, पुन्हा वरील २ आणि ३ सुचनांप्रमाणे करा. एखाद्या प्रश्नाला जुळेल असा एखादा व्हिडिओ असेल आणि घरमालकाला तुम्ही तो अजून दाखवला नसेल, तर चर्चेदरम्यान तो केव्हाही दाखवा. (५) शेवटी, घरमालकाला ठळक अक्षराचा प्रश्न विचारा. यावरून त्याला मुद्दा कळला आहे की नाही याची तुम्हाला खातरी होईल.
४. हे अनमोल साधन कुशलतेनं वापरता यावं म्हणून काय करणं गरजेचं आहे?
४ शिकवण्याचं हे अनमोल साधन कसं वापरायचं याची चांगली माहिती करून घ्या. संधी मिळेल तेव्हा त्याचा वापर करा. प्रत्येक अभ्यासाच्या आधी, विद्यार्थ्याची विचार करण्याची क्षमता लक्षात घ्या आणि धड्यात दिलेल्या शास्त्रवचनांचा वापर करून त्याच्याबरोबर कशा प्रकारे चांगला तर्क करता येईल, याचा विचार करा. (नीति. १५:२८; प्रे. कृत्ये १७:२, ३) हे माहितीपत्रक वापरण्याचा जसजसा तुमचा अनुभव आणि कौशल्य वाढेल तसतसा लोकांना बायबलमधील सत्य शिकवण्याचं हे साधन वापरण्यात तुमचा आनंददेखील वाढेल.