पायनियर सेवा—तुम्ही करू शकाल का?
१ “मी दुसरं काही करायचा विचारच करू शकत नाही. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीनं मला इतका आनंद मिळेल, असं मला मुळीच वाटत नाही.” असे पूर्णवेळेच्या सेवेला करिअर म्हणून निवड केलेल्या यहोवाच्या हजारो साक्षीदारांपैकी एकीने म्हटले. तुम्ही कधी पायनियर सेवा करण्याचा प्रार्थनापूर्वक विचार केला आहे का? आपण पूर्ण मनाने यहोवाला आपले जीवन समर्पित केले आहे. त्याअर्थी, राज्याच्या सुवार्तेच्या प्रचार कामात आपण जास्तीत जास्त सहभाग घेऊ शकतो का यावर नक्कीच विचार केला पाहिजे. पायनियर सेवेबद्दल अनेकांच्या मनात काही प्रश्न येतात. खाली त्यांची चर्चा करण्यात आली आहे.
प्रश्न १: “काहींचं असं म्हणणं आहे, की सर्वच जण पायनियरिंग करू शकत नाहीत. मला करता येईल का, हे मला कसं कळेल?”
२ तुमची परिस्थिती व शास्त्रवचनात दिलेली जबाबदारी लक्षात घेऊन या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच देऊ शकता. अनेकांना त्यांच्या तब्येतीमुळे किंवा परिस्थितीमुळे दर महिन्याला सेवेमध्ये ७० तास भरणे शक्य होत नाही. तरीपण, त्यांच्या परिस्थितीनुसार व त्यांना शक्य होईल तितक्यांदा ते सेवेमध्ये भाग घेतात. त्यांना जमेल तसे ते वर्षातून एक किंवा अनेक महिन्यांसाठी साहाय्यक पायनियरिंग करतात. सेवेमध्ये जास्त भाग घेतल्यामुळे त्यांनाही आनंद मिळतो. (गलती. ६:९) त्यांच्या परिस्थितीमुळे ते सध्या जरी पूर्णवेळेची सेवा करू शकत नसले तरी, मंडळीतील इतरांना पायनियरिंग करण्याचे प्रोत्साहन देतात. यामुळे ते सुवार्तेचे आवेशी प्रचारक म्हणून मंडळीसाठी एक आशीर्वादच आहेत.
३ दुसऱ्या बाजूला पाहता, अनेक बंधुभगिनींवर जास्त कौटुंबिक जबाबदाऱ्या नसल्यामुळे, आपल्या परिस्थितीत फेरबदल करून ते आता पायनियरिंग करतात. तुमच्याबद्दल काय? तुम्ही एक युवक आहात व तुमचे शिक्षण संपले आहे का? तुम्ही एक पत्नी आहात का जिचे पतीच्या पगारावर घर चालते? तुमची मुले तुमच्यावर अवलंबून नाहीत ना? तुम्ही सेवानिवृत्त आहात का? पायनियरिंग करायची किंवा नाही हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. तरीपण, मी पायनियरिंग करू शकेन का? असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारू शकता.
४ आपले लक्ष विचलित करण्यासाठी व फक्त स्वतःपुरतेच जगण्यासाठी सैतान या जगाच्या व्यवस्थिकरणाचा उपयोग करतो. पण आपण जर जगाचा भाग न बनण्याचा दृढनिश्चय केला तर यहोवा, त्याच्या राज्याला जीवनात प्रथम स्थान देण्यास आपल्याला मदत करेल. त्याच्या सेवेत उपलब्ध असलेले सर्व सुहक्क मिळवण्यासाठी तो मार्ग दाखवेल. मग पायनियरिंग करण्यासाठी तुम्ही जर तुमच्या परिस्थितीत बदल करू शकता, तर मागे पुढे का पाहता?
प्रश्न २: “मी जर पूर्णवेळेची सेवा सुरू केली तर मला आर्थिक अडचणी तर येणार नाहीत ना?”
५ अनेक देशांमध्ये, आजकाल अगदी जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठीसुद्धा दर आठवडी अनेक तास काम करावे लागते. तरीपण पुष्कळ जण कित्येक वर्षांपासून पायनियरिंग करू शकले आहेत आणि यहोवाने त्यांची काळजी घेतली आहे. पायनियरिंगमध्ये टिकून राहण्यासाठी विश्वास आणि आत्म-त्यागी मनोवृत्ती बाळगणे गरजेचे आहे. (मत्त. १७:२०) स्तोत्र ३४:१० मध्ये आपल्याला असे आश्वासन देण्यात आले आहे, की यहोवाला “शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही.” पायनियरिंग सुरू करणाऱ्यांनी डोळे झाकून असा भरवसा बाळगला पाहिजे, की यहोवा जरूर त्यांची काळजी घेईल. सगळीकडच्या विश्वासू पायनियरांची तोच तर काळजी घेतोय! (स्तो. ३७:२५) अर्थात २ थेस्सलनीकाकर ३:८, १० व १ तीमथ्य ५:८ या वचनांतील तत्त्व लक्षात ठेवून पायनियरांनी अशी अपेक्षा करू नये की इतरांनी त्यांना आर्थिक मदत करावी.
६ पायनियरिंगचा विचार करणाऱ्यांनी, “अगोदर बसून . . . खर्चाचा अंदाज” काढा, या येशूच्या शब्दांवर विचार करावा. (लूक १४:२८) असे करून ते सुज्ञता दाखवतात. अनेक वर्षांपासून पायनियरिंग करत असलेल्या बंधुभगिनींशी बोला. यहोवाने त्यांना कसे सांभाळले ते विचारा. तुमचे विभागीय पर्यवेक्षक हे स्वतः एक अनुभवी पायनियर आहेत. पूर्णवेळेच्या सेवेत यशस्वी कसे होता येईल, याबद्दल अनेक उपयुक्त गोष्टी ते तुम्हाला सांगतील.
७ आपल्या सभोवतीचे जग आजकाल पैसा व भौतिक गोष्टी मिळवण्याच्या मागे धावत आहे. आपणही असेच करावे म्हणून आपल्यावर बराच दबाव आणला जातो. पण पूर्णवेळेची सेवा एक बहुमान आहे हे जर आपण नम्रपणे कबूल केले, तर आहे त्यात समाधानी राहण्यास आपण शिकू. (१ तीम. ६:८) आपली जीवनशैली साधी व सोपी ठेवलेल्या पायनियरांकडे सेवेसाठी भरपूर वेळ असतो. इतरांना सत्य शिकवून त्यांना खूप आनंद व आध्यात्मिक बळ मिळते. ते संन्यासींसारखे जीवन जगत नाहीत. पण आर्थिक गोष्टींबाबत संतुलित दृष्टिकोन बाळगल्यामुळे त्यांना पायनियरिंगचे आशीर्वाद मिळाले आहेत.
८ आपण शेवटल्या दिवसांत जगत आहोत आणि हे दुष्ट जग शेवटचा श्वास घेत आहे, असे जर तुम्हाला मनापासून वाटत असेल तर तुम्ही, प्रत्येक प्रसंगी सुवार्ता सांगण्यासाठी आवश्यक ते त्याग कराल. आपल्या आर्थिक परिस्थितीचा पुन्हा एकदा आढावा घेऊन यहोवावर आपला भरवसा टाकल्यास तुम्हाला जाणवेल, की तुम्ही पूर्णवेळेची सेवा करू शकता! पायनियरिंग करताना तुम्हाला विशिष्ट भौतिक गोष्टींचा त्याग करावा लागला तरी, त्या बदल्यात तुम्ही यहोवाचे समृद्ध आशीर्वाद उपभोगाल.—स्तो. १४५:१६.
प्रश्न ३: “मी किशोरवयीन आहे. मग मी पायनियर सेवेला माझं करिअर का बनवावं?”
९ शालेय जीवन संपायच्या बेतात असते तेव्हा तुम्ही नक्कीच तुमच्या भवितव्याचा विचार करता. कारण तुम्हाला जीवनात सुरक्षित, आनंदी व समाधानी व्हायचे असते. शाळेतील मार्गदर्शन देणारे सल्लागार तुम्हाला भरगच्च यश मिळणारे करिअर निवडण्याची गळ घालतील. यासाठी तुम्हाला आणखी काही वर्षे कॉलेजमध्ये शिक्षण घ्यावे लागेल. सोबतच तुमचा बायबल प्रशिक्षित विवेक तुम्हाला, पूर्ण मनाने यहोवाची सेवा करण्यासाठी तयार होण्यास प्रवृत्त करेल. (उप. १२:१) पुढेमागे लग्न करून कुटुंब वाढवण्याचादेखील विचार तुमच्या मनात येईल. अशा वेळेला तुम्ही काय कराल?
१० जीवनाच्या या टप्प्यावर तुम्ही जो निर्णय घ्याल त्यानुसार तुमच्या पुढील जीवनाला वळण लागेल. तुम्ही जर समर्पित बाप्तिस्मा घेतलेला एक यहोवाचा साक्षीदार आहात तर याचा अर्थ तुम्ही यहोवाला तुमचे जीवन बहाल केले आहे. (इब्री १०:७) आता तुमच्यासमोर एक किंवा अधिक महिन्यांसाठी साहाय्यक पायनियरिंग करण्याची संधी आहे. यामुळे तुम्हाला, सामान्य पायनियरिंग केल्यामुळे जो आनंद मिळतो तो अनुभवायला मिळेल आणि ही एक जबाबदारी आहे तेही समजेल. तसेच, तुम्ही जीवनात नेमके काय केले पाहिजे ते स्पष्टपणे कळेल. शालेय शिक्षण संपल्यानंतर मिळणारा रिकामा वेळ, पूर्णवेळेची नोकरी करण्यात घालवण्याऐवजी सामान्य पायनियरिंग करण्यात घालवायला काय हरकत आहे? अनेक वर्षांनंतर पायनियर सेवा सुरू केलेल्या काहींना, ही सेवा सुरू करायला आपण उगाचच इतका उशीर लावला, असे वाटले.
११ तुम्ही तरुण व अविवाहित आहात तोपर्यंत, पूर्णवेळेच्या प्रचार कार्यात मिळणाऱ्या फायद्यांचा लाभ घ्या. आणि आज नाही तर उद्या लग्न करण्याची तुमची इच्छा झाली तरी, सामान्य पायनियरिंग करण्यात घालवलेली वर्षे, तुमच्या विवाहासाठी एक भक्कम पाया ठरू शकतात. यासारखा उत्तम पाया अजून कोणताच असू शकत नाही. तुम्ही जसजसे प्रौढ व्हाल व तुमची मनोवृत्ती आध्यात्मिक होईल तसतसे तुम्ही कदाचित पायनियरिंगला आपले करिअर बनवाल आणि असेच विचार असलेला सोबती निवडाल. एकत्र पायनियरिंग केलेली काही जोडपी विभागीय कार्यात किंवा मिशनरी क्षेत्रात सेवा करण्यासाठी गेले आहेत. यासारखे आणखी समाधानकारक जीवन असूच शकत नाही!
१२ तुम्ही कितीही वर्षांपासून पायनियरिंग करत असला तरी, या जगात कोठेही न मिळणारे ज्ञान व प्रशिक्षण तुम्ही प्राप्त कराल. पायनियरिंगमुळे स्वतःला शिस्त लागते, तुम्ही वैयक्तिक नियोजन करू शकता. लोकांबरोबर कसे बोलायचे हे तुम्ही शिकू शकता आणि यहोवावर निर्भर राहण्यास शिकता. आणि, पुढे आणखी मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळण्याकरता सहनशीलता व दया यांसारखे गुण तुम्ही विकसित करू शकता.
१३ पूर्वी कधी नव्हे तितके आज मानवजातीचे जीवन अनिश्चित झाले आहे. यहोवाने जे वचन दिले आहे त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याच गोष्टी कायमस्वरूपी नाहीत. तुमच्यासमोर उभे आयुष्य पडले आहे. तेव्हा, येणाऱ्या वर्षांमध्ये तुम्ही तुमच्या जीवनाचे काय कराल यावर गंभीरपणे विचार करण्याची हीच उत्तम वेळ आहे. पायनियरिंग करण्याच्या बहुमानाचा काळजीपूर्वक विचार करा. पायनियरिंगला आपले करिअर केल्यास तुम्ही कधीच पस्तावणार नाही.
प्रश्न ४: “पण तास भरण्याची सतत चिंता असते. समजा मला तितके तास भरता आले नाहीत तर?”
१४ तुम्ही सामान्य पायनियरिंगचा फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला पुढील प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते: “वर्षाचे ८४० तास भरता यावेत म्हणून मी माझ्या वैयक्तिक गोष्टींचे व्यावहारिक रीत्या नियोजन केले आहे का?” याकरता तुम्हाला दिवसाला अडीच तास तरी सेवेत खर्च करावे लागतील. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या वेळेचे योग्य रीत्या नियोजन करावे लागेल, स्वतःला शिस्त लावावी लागेल. बहुतेक जण पायनियरिंग करायला लागल्यापासून काही महिन्यांतच स्वतःकरता एक व्यावहारिक व पाळता येऊ शकणारा आराखडा तयार करतात.
१५ पण उपदेशक ९:११ (पं.र.भा.) मध्ये म्हटले आहे: “समय व प्रसंग सर्वांना घडतात.” कधीकधी, गंभीर आजारपण किंवा इतर कोणतेही प्रसंग अचानक आल्यामुळे एखाद्याच्या पायनियरिंगमध्ये तात्पुरत्या काळासाठी खंड पडेल. ही समस्या जास्त दिवस नसेल आणि सेवा वर्षाच्या सुरुवातीलाच आली असेल तर, उरलेल्या महिन्यांत तास भरून काढण्यासाठी तुम्ही दुसरा एक आराखडा तयार करू शकता. पण जर सेवा वर्ष संपत आले असताना अचानक एखादी समस्या उद्भवली व उरलेले तास भरणे कठीण होत असेल तर काय?
१६ काही महिन्यांपासून आजारी असल्यामुळे किंवा तुमच्या हाताबाहेर असलेल्या एखाद्या समस्येमुळे तुम्ही वर्षाचे तास भरू शकणार नसाल तर मंडळीच्या सेवा समितीतील एखाद्या वडिलांबरोबर त्याविषयी बोलू शकता. उरलेले तास भरण्याची चिंता न करता तुम्ही तुमची पायनियरिंग चालू ठेवू शकता, असे कदाचित हे वडील ठरवतील. अशा वेळी, तुम्हाला हे तास भरून काढण्याची गरज नाही, अशी नोंद सचिव मंडळीच्या पब्लिशर कार्डवर करतील. ही तुम्हाला मिळालेली सुटी नव्हे तर, तुमची परिस्थिती लक्षात घेऊन तुम्हाला दिलेली सूट आहे.
१७ अनुभवी पायनियर सेवा वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षाचे तास भरून काढण्याचा प्रयत्न करतात. ते अनावश्यक गोष्टींमध्ये जास्त वेळ खर्च न करता पायनियरिंगला जास्त महत्त्व देतात. योग्य रीत्या वेळेचे नियोजन करून त्यानुसार कार्य न केल्यामुळे तास भरता येत नाहीत असे एखाद्या पायनियरला जाणवते तेव्हा त्याने खास सूट मिळण्याची अपेक्षा न करता उरलेले तास भरून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
१८ कधीकधी, एखाद्या पायनियरसमोर टाळता न येणारी परिस्थिती येईल. आरोग्याच्या समस्येमुळे, कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे तो तास भरून काढू शकणार नाही, असे कदाचित त्याला जाणवेल. अशा वेळी, तो सामान्य पायनियरिंग सोडून, एक प्रचारक राहून शक्य तेव्हा साहाय्यक पायनियरिंग करू शकतो. एखाद्याला त्याच्या परिस्थितीमुळे तास भरणे शक्य नसले, तरी तो सामान्य पायनियर म्हणून राहू शकतो अशी कोणतीही तरतूद नाही.
प्रश्न ५: “मला जीवनात काहीतरी साध्य करायचंय व त्यातून आनंद मिळवायचा आहे. पायनियरिंगमुळं हे शक्य होईल का?”
१९ खरे तर यहोवाबरोबरच्या आपल्या घनिष्ठ वैयक्तिक नातेसंबंधावर आणि आपण त्याची विश्वासूपणे सेवा करत आहोत या आपल्या भरवशावर खरा आनंद अवलंबून आहे. “जो आनंद [येशूपुढे] होता त्याकरता त्याने . . . वधस्तंभ सहन केला.” (इब्री १२:२) देवाची इच्छा पूर्ण करत असल्यामुळे तो आनंदी होता. (स्तो. ४०:८) आपण यहोवाच्या उपासनेशी संबंधित असलेल्या गोष्टींमध्ये व्यस्त राहिलो तर आताही आपल्याला खरा आनंद अनुभवता येईल. आध्यात्मिक गोष्टींमुळे आपल्या जीवनाला एक उद्देश मिळतो. आपण जे काही करत आहोत ते बरोबर आहे याची आपल्याला जाणीव होते. दिल्याने आनंद मिळतो; आणि देवाच्या नवीन जगातील सार्वकालिक जीवन कसे मिळवायचे याबद्दल इतरांना शिकवण्यात स्वतःला झोकून देण्यापेक्षा आणखी दुसरा आनंद कोणता असू शकेल?—प्रे. कृत्ये २०:३५.
२० सुरुवातीच्या परिच्छेदामध्ये उल्लेख केलेल्या पायनियरने याबद्दल असे म्हटले: “तुम्ही ज्याच्याबरोबर अभ्यास करता त्याला यहोवाची स्तुती करताना पाहून तुम्हाला जो आनंद मिळतो तो शब्दांत व्यक्त करता येत नाही. देवाच्या वचनात इतकी शक्ती आहे की, त्याचा अभ्यास करून लोक यहोवाला संतुष्ट करण्यासाठी आपल्या जीवनात बदल करण्यास प्रवृत्त होतात. हे सर्व पाहून आपल्याला खरंच किती आनंद होतो. आपला विश्वास भक्कम होतो.” (टेहळणी बुरूज, १५ ऑक्टोबर १९९७ पृष्ठे १८-२३ पाहा.) तर मग कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद मिळतो? जगातील गोष्टींमुळे मिळणाऱ्या क्षणभंगुर आनंदाऐवजी तुम्ही अर्थपूर्ण जीवन व कायमस्वरुपी टिकणारा आनंद यांना महत्त्व देत असाल तर, पायनियरिंगमुळे तुम्हाला हे सर्व मिळेल. पायनियरिंगमुळे तुम्हाला जे समाधान मिळेल त्याने तुम्ही खरोखरच आनंदी व्हाल.
प्रश्न ६: “सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी मी पायनियरिंग केलीच पाहिजे, असं काही नाही. मग, पायनियरिंग करायची किंवा नाही हे मीच ठरवेन, नाही का?”
२१ अगदी बरोबर, पायनियरिंग करायची किंवा नाही हा सर्वस्वी तुमचाच निर्णय आहे. पायनियरिंग करण्यासाठी तुमची परिस्थिती योग्य आहे किंवा नाही, हे फक्त यहोवाच सांगू शकतो. (रोम. १४:४) तुम्ही त्याची सेवा पूर्ण मनाने, अंतःकरणाने, शक्तीने व बुद्धीने करावी अशी तो तुमच्याकडून अपेक्षा करतो. (मार्क १२:३०; गलती. ६:४, ५) कुरकूर करत किंवा करावे लागते म्हणून नव्हे तर आनंदाने सेवा करणारे त्याला आवडतात. (२ करिंथ. ९:७; कलस्सै. ३:२३) यहोवावर आणि लोकांवर तुमचे प्रेम आहे म्हणून तुम्ही पूर्णवेळेची सेवा केली पाहिजे. (मत्त. ९:३६-३८; मार्क १२:३०, ३१) तुम्हालाही असेच वाटत असेल तर तुम्ही पायनियरिंग करण्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे.
प्रश्न ७: “वडील जन प्रत्येकाला कोणती मदत देऊ शकतात?”
२२ मंडळीतल्या सर्व वडिलांनी आणि खासकरून सेवा समितीतील वडिलांनी पायनियरांमध्ये वैयक्तिक आवड घ्यावी. पायनियरांना कोणकोणत्या बाबतीत मदत देता येऊ शकेल यासाठी पुढे काही प्रश्न दिले आहेत ज्यांचा फायदा वडिलांना होऊ शकतो: पायनियर सेवेच्या सर्वच पैलूत प्रभावी आहेत का, की त्यांना पुनर्भेटी घेण्याच्या अथवा बायबल अभ्यास चालवण्याच्या संबंधाने प्रशिक्षणाची गरज आहे? ते आत्म्याचे फळ दाखवून शांतीने व ऐक्याने सेवा करत आहेत का? (रोम. १४:१९) कोणाला व्यावहारिक आराखडा बनवण्यास मदत हवी आहे का? पायनियरांना वैयक्तिक अभ्यासाची सवय आहे हे दिसून येते का व ते सभांमध्ये उत्तरे देतात का? पायनियरांना होता होईल ती मदत करण्यासाठी वडील जन त्यांच्या गरजा, त्यांची परिस्थिती समजून घेतील आणि त्यांच्याबरोबर नियमित रीत्या बोलतील.
२३ इतर गोष्टींप्रमाणे तास भरण्याच्या बाबतीतही पायनियरांकडून उच्च दर्जाची अपेक्षा केली जाते व याला वडिलांनी पाठिंबा दिला पाहिजे. पण जर एखादा पायनियर काही समस्यांमुळे तात्पुरत्या काळासाठी तास भरू शकत नसेल तर वडिलांनी त्याला त्वरित मदत करावी. ‘जर तुम्ही सुधारणा केली नाही तर तुम्हाला काढले जाईल,’ असे त्यांनी त्याला सांगू नये. आणि वडिलांनी त्याला मदत देण्यात महिनोंमहिने दिरंगाई करू नये नाहीतर, तास पूर्ण करण्यात तो मागे पडेल आणि निरुत्साहित होऊन पायनियरिंग सोडून देण्याचा विचार करेल.
२४ एखाद्या पायनियरशी बोलल्यानंतर जर वडिलांनी ठरवले, की त्याची समस्या तात्पुरत्या काळासाठी आहे व सेवा वर्ष संपायच्या आधी तो तास भरून काढू शकतो तर, त्यांनी त्याला प्रोत्साहन द्यावे आणि काही व्यावहारिक गोष्टी सुचवाव्यात. पण समजा पायनियरसमोर खरोखरच एक अशी समस्या उभी आहे जिच्या बाबतीत तो काहीच करू शकत नाही आणि यामुळे त्याला सेवा वर्ष संपायाच्या आधीसुद्धा तास भरून काढता येणार नाहीत तर, त्याला खास सूट द्यायची किंवा नाही हे वडिलांनी ठरवावे. खास सूट देण्यासाठी योग्य कारण आहे, असे जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी, मंडळीच्या पब्लिशर कार्डवर याची नोंद करून ठेवावी. तसेच, भरून न काढता आलेल्या तासांची अधिक चिंता न करता येथून पुढे तास भरण्यासाठी मेहनत घेण्याचे प्रोत्साहन ते त्याला देऊ शकतात. पायनियरच्या समोर आलेल्या समस्येचे निवारण लगेच होणार नाही व त्याच्या परिस्थितीमुळे सध्यातरी त्याने पायनियरिंग थांबवणे योग्य असेल, असे जर वडिलांनी ठरवले तर त्यांनी याबाबतचा उचित फॉर्म भरून तो शाखा कार्यालयाला पाठवावा.
प्रश्न ८: “मी सामान्य पायनियर बनण्यास पात्र कसा ठरू शकतो?”
२५ सामान्य पायनियर बनण्याकरता प्रचारकाचा बाप्तिस्मा होऊन निदान सहा महिने तरी झाले पाहिजेत आणि तो नियमित प्रचारक असणे आवश्यक आहे. त्याला वर्षाचे ८४० तास भरता आले पाहिजेत. शिवाय त्याचे नैतिक आचरण शुद्ध आणि इतरांसमोर एक उत्तम उदाहरण असले पाहिजे. (यहोवा की इच्छा पूरी करने के लिए संगठित पृ. ११३-११४) याचा काय अर्थ होतो? पायनियरिंगचा अर्ज भरणाऱ्यांच्या कोणत्या गुणांकडे वडिलांनी लक्ष द्यावे?
२६ उत्तम उदाहरण असणे म्हणजे, शारीरिक रीत्या व आचार-विचारातही स्वच्छ असले पाहिजे. पायनियर म्हणून ज्याला स्वीकारले जाते त्याचे मंडळीत व बाहेर उत्तम ख्रिस्ती आचरण असले पाहिजे. तो यहोवाला आपले पूर्ण जीवन बहाल करतो आणि त्याच्या सेवेसाठीच स्वतःला झोकून देतो. त्याच्या वागणुकीतून देवाच्या आत्म्याचे फळ दिसून आले पाहिजे. पायनियरचा मुख्य उद्देश, राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे व शिष्य बनवणे हा असला पाहिजे. त्याला घरोघरी बायबलचा प्रभावीपणे उपयोग करता आला पाहिजे. आवड दाखवणाऱ्यांची पुनर्भेट घेऊन बायबल अभ्यास सुरू करता आला पाहिजे. क्षेत्र सेवेच्या व सभांच्या व्यवस्थेच्या बाबतीत पायनियरांनी वडिलांना पूर्णपणे सहकार्य करणे आवश्यक आहे.
२७ न्यायिक समितीने एखाद्यावर काही बंधने घातली असतील किंवा बहिष्कृत करण्यात आल्यानंतर मंडळीत त्याचा पुन्हा स्वीकार करण्यात आला असेल तर त्याला, साहाय्यक किंवा सामान्य पायनियरिंग करू देण्याआधी एक वर्ष जाऊ द्यावे. तसेच, न्यायिक समितीने एखाद्या प्रचारकावर काही बंधने घातली असतील तर ती सर्व बंधने काढून टाकल्यावरच तो पायनियरिंग करू शकतो.
२८ एखाद्याला सामान्य पायनियर बनायचे असेल तर त्याने आधी अनेक महिने साहाय्यक पायनियरिंग करणे आवश्यक आहे का? नाही. पण एखाद्याने साहाय्यक पायनियरिंग केली तर त्याला सामान्य पायनियर बनून तो आराखडा पाळणे सोपे जाईल. वडिलांची पुरेशी खातरी पटली पाहिजे, की सामान्य पायनियर बनण्याचा अर्ज भरणारा प्रचारक दर महिन्याला ७० तास आणि सेवा वर्षाच्या शेवटापर्यंत ८४० तास भरू शकतो.
२९ एखादा प्रचारक ॲप्लिकेशन फॉर रेग्युलर पायनियर सर्व्हिस (सामान्य पायनियर सेवेचा अर्ज) भरून वडील वर्गाच्या संयोजकाला देतो तेव्हा मंडळीच्या सेवा समितीने हे त्वरित हाताळावे. समितीतील एखादा वडील एक-दोन आठवड्यांसाठी सुटीवर गेला असेल तर तो येईपर्यंत बाकीच्या वडिलांनी त्यासाठी थांबून दिरंगाई करू नये. कदाचित त्या वडिलांच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या वडिलाला घेतले जाऊ शकते. मंडळीच्या सेवा समितीने अर्ज मान्य केल्यास त्यांनी मंडळीच्या वडील वर्गाला याबद्दल कळवावे जेणेकरून तो अर्ज शाखा कार्यालयाला पाठवण्याआधी बाकीच्या वडिलांना काही सांगायचे असेल तर ते तसे करू शकतात.
३० ॲप्लिकेशन फॉर रेग्युलर पायनियर सर्व्हिस फॉर्मवर विचार करताना, वडिलांनी प्रचारकाचे गेल्या सहा महिन्यांपासूनचे क्षेत्र सेवेचे तास लिहावेत. अर्ज भरणारा प्रचारक नियमित रीत्या तास भरू शकेल, याची वडिलांना खातरी असली पाहिजे. प्रचारकाच्या सहा महिन्यांच्या सरासरी तासांवरून असे पक्के सांगता येणार नाही की तो पुढील महिनेदेखील दर महिन्याचे तास भरू शकेल. त्या सहा महिन्यांदरम्यान त्याने जर एक किंवा दोन महिने जरा जास्त प्रयत्न करून अधिक तास भरले असतील, तर वडिलांनी याची नोंद घ्यावी. दुसऱ्या शब्दांत, वडिलांनी या भावी पायनियरच्या सहा महिन्यांच्या क्षेत्र सेवेच्या तासांचा आढावा घेतला पाहिजे. प्रचारकाचे सरासरी तास भरपूर झाले असतील पण, सेवेच्या इतर पैलूंमध्ये तो कमी पडत असेल तर वडिलांनी त्याला पायनियर बनण्याआधी या पैलूंमध्ये सुधारणा करण्यास सुचवावे. वडिलांना अर्ज मिळाल्याबरोबर त्यांनी तो शाखा कार्यालयाला न पाठवण्याचे ठरवले असेल तर त्याचे कारण अर्ज भरणाऱ्या प्रचारकाला सांगावे. पात्र ठरण्याकरता त्याने कोणकोणत्या बाबतीत सुधारणा केली पाहिजे हे वडिलांनी त्याला समजावून सांगावे. कदाचित काही महिन्यांनंतर आपण आता त्याचा अर्ज पाठवू शकतो असे जर वडिलांना वाटत असेल तर त्यांनी मूळ अर्जाच्या प्रतीवरील फक्त तारीख बदलावी.
३१ येथे सांगितलेल्या गोष्टींच्या आधारावर आता तुम्ही, तुमच्या परिस्थितीनुसार पायनियरिंग करण्याची निवड करू शकता. सामान्य पायनियरिंगसाठी तुम्ही तुमच्या परिस्थितीत काही फेरबदल करू शकता का? त्यासाठी तुम्ही एक व्यावहारिक आराखडा तयार करा, ज्याद्वारे तुम्हाला दर आठवडी सेवेमध्ये १७ तास भरता येतील. यहोवावर पूर्ण भरवसा ठेवा. त्याच्या मदतीनेच तुम्ही यशस्वी व्हाल! “मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद” तुमच्यावर वर्षवेन, असे वचन त्याने दिले आहे.—मला. ३:१०.
३२ आता आम्ही तुम्हाला विचारू इच्छितो: “पायनियर सेवा—तुम्ही करू शकाल का?” तुमचे उत्तर “होय” असेल तर सामान्य पायनियरिंग सुरू करण्याची एक तारीख निश्चित करा. तुमच्या या आनंदी जीवनावर यहोवाचे आशीर्वाद असतील ही खातरी बाळगा!