संदेष्ट्यांचे अनुकरण करा—नहूम
१. नहूमच्या पुस्तकातून कोणती गोष्ट स्पष्ट होते?
१ निनवे शहराचे अवशेष या गोष्टीचा पुरावा आहेत की नहूम संदेष्ट्याने घोषित केल्याप्रमाणे यहोवा त्याच्या शत्रूंवर सूड उगवतो. त्याच्यासमोर कोणताही शत्रू टिकाव धरू शकत नाही, मग तो कितीही क्रूर असला तरीही. (नहू. १:२, ६) नहूमच्या भविष्यवाणीचे परीक्षण केल्यास, सेवाकार्याच्या बाबतीत आपण अनेक धडे शिकू शकतो.
२. आपण आपला संदेश सकारात्मक कसा ठेवू शकतो?
२ सांत्वन आणि आशा द्या: वरवर पाहिल्यास असे वाटेल, की नहूमच्या पुस्तकात दिलेला संदेश हा अश्शूर साम्राज्याची राजधानी असलेल्या गर्विष्ठ निनवे शहरावरील केवळ एक न्यायदंडाचा संदेश आहे. (नहू. १:१; ३:७) पण खरे पाहता, न्यायदंडाचा तोच संदेश यहोवाच्या लोकांकरता सांत्वनदायक ठरला. नहूमच्या नावाचा अर्थ “सांत्वनदाता” असा होतो आणि त्याच्या संदेशाद्वारे त्याने यहूदी लोकांना असा धीर दिला की त्यांचे शत्रू लवकरच नाहीसे होतील! नहूमने पुढे असेही सांगितले की यहोवा “विपत्काली . . . शरणदुर्ग आहे.” (नहू. १:७) आपणही जेव्हा प्रचार करतो तेव्हा लोकांना आनंदाची बातमी सांगतो आणि यहोवाला आपला आश्रय बनवण्याचे त्यांना उत्तेजन देतो.—नहू. १:१५.
३. उदाहरणांचा उपयोग करण्याच्या बाबतीत आपण नहूमचे अनुकरण कसे करू शकतो?
३ उदाहरणांचा आणि दृष्टान्तांचा उपयोग करा: निनवे शहराच्या विनाशाची तुलना इजिप्तमधील थीब्झ (नोआमोन) या शहराच्या विनाशासोबत करण्याची प्रेरणा यहोवाने नहूमला दिली. अश्शूरी लोकांनीच या शहराचा पूर्वी विनाश केला होता. (नहू. ३:८-१०) आपण जेव्हा दुष्ट व्यवस्थेच्या अंताविषयी लोकांशी बोलतो तेव्हा आपण बायबलमधील अशा भविष्यवाणींचा उल्लेख करू शकतो ज्यांद्वारे हे सिद्ध होते की यहोवा त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तंतोतंत पूर्ण करतो. उदाहरणार्थ, इ.स.पू. ६३२ मध्ये बॅबिलोनी आणि मेदी लोक निनवे शहरावर चढाई करून आले, तेव्हा जोरदार पावसामुळे टाइग्रिस नदी दुथडी भरून वाहू लागली आणि निनवे शहराच्या एका बाजूच्या मजबूत भिंती कोसळल्या. यहोवाने सांगितल्याप्रमाणे शत्रू राष्ट्राने सहज रीत्या निनवे शहर काबीज केले.—नहू. १:८; २:६.
४. सेवाकार्यादरम्यान आपण लोकांशी स्पष्टपणे आणि समजेल अशा प्रकारे कसे बोलू शकतो?
४ स्पष्ट आणि समजेल असे बोला: नहूमची लिहिण्याची पद्धत वर्णनात्मक आणि बोलकी होती. त्याने प्रत्येक मुद्दा अगदी स्पष्ट रीत्या मांडला. (नहू. १:१४; ३:१) त्याचप्रमाणे, आपणही सहज समजेल अशी भाषा वापरली पाहिजे. (१ करिंथ. १४:९) पहिल्या भेटीत, तुमचा येण्याचा उद्देश स्पष्टपणे सांगा. तुम्ही जेव्हा लोकांसोबत बायबल अभ्यास कराल तेव्हा त्यांना यहोवा आणि त्याचे वचन बायबल यांवर विश्वास वाढवण्यास मदत करा. तसेच, बायबलमधील माहितीचा ते कसा अवलंब करू शकतात हेदेखील त्यांना सांगा.—रोम. १०:१४.
५. नहूमच्या भविष्यवाणीतून आपल्याला कोणते आश्वासन मिळते?
५ यहोवाचे शब्द नक्कीच पूर्ण होतील असा भरवसा नहूमला होता हे त्याच्या नावाने असलेल्या पुस्तकातून स्पष्टपणे दिसून येते. सैतानाच्या जगाचा लवकरच नाश होणार आहे. तेव्हा, विपत्ती पुन्हा कधीच येणार नाही ही देवाने केलेली भविष्यवाणी आपल्याला नक्कीच सांत्वन देते.—नहू. १:९.