२०१४ च्या प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना
◼ कार्यक्रमाची वेळ: सभागृहाचे दरवाजे सकाळी ८ वाजता उघडले जातील. तिन्ही दिवशी सुरुवातीचे संगीत सकाळी ९:२० ला सुरू होईल. संगीत सुरू होते तेव्हा सर्वांनी आपापल्या जागेवर बसावे जेणेकरून कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय पद्धतीने होईल. समारोपाचे गीत आणि प्रार्थना शुक्रवारी व शनिवारी संध्याकाळी ४:५५ ला आणि रविवारी ३:५० ला होईल.
◼ आंतरराष्ट्रीय अधिवेशने: काही भागांमध्ये आंतरराष्ट्रीय अधिवेशने आयोजित केली जातील. शाखा कार्यालयाने विशिष्ट मंडळ्यांना व परदेशातील बांधवांना या अधिवेशनांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. सभागृहात किती लोक बसू शकतात, पार्किंगसाठी किती जागा आहे आणि हॉटेलमध्ये किती रूम उपलब्ध आहेत याचा आधीच विचार करून त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे, निमंत्रण नसतानाही प्रचारक आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहिले तर सभागृहात गर्दी होऊ शकते. परिस्थितीमुळे तुम्हाला तुमच्या नेमलेल्या अधिवेशनाला उपस्थित राहता येत नसेल तर आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे ठरवू नका.
◼ पार्किंग: सभागृहाच्या व्यवस्थापनाने पार्किंगची जबाबदारी आपल्यावर सोपवली असल्यास, जसजशा गाड्या येतील तसतशी त्यांना पार्किंगसाठी जागा मोफत दिली जाईल. पार्किंगची जागा सहसा कमी असल्यामुळे होईल तितके कारपूलींग करावे, म्हणजे प्रत्येकाने आपापल्या गाड्या आणण्यापेक्षा दुसऱ्यांच्या गाडीत जागा असल्यास त्यांच्या गाडीतून प्रवास करावा. विकलांग लोकांसाठी राखीव असलेल्या जागेत इतरांनी पार्किंग करू नये.
◼ जागा राखणे: दररोज सकाळी सभागृहाचे दरवाजे उघडले जातात तेव्हा सगळ्यात चांगली जागा मिळावी म्हणून कृपया पळापळ करू नका. आपण इतरांचे हित पाहून जी आत्मत्यागी मनोवृत्ती दाखवतो त्यामुळे आपण खरे ख्रिस्ती आहोत हे दिसून येते आणि आपल्याला पाहणारे लोक देवाची स्तुती करण्यास प्रवृत्त होतात. (योहा. १३:३४, ३५; १ करिंथ. १३:४, ५; १ पेत्र २:१२) तुमच्यासोबत एकाच कारमधून प्रवास करणाऱ्यांसाठी किंवा एकाच घरात राहणाऱ्यांसाठी, तसेच तुमच्या बायबल विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जागा राखून ठेवू शकता. वयोवृद्धांसाठी आणि आजारी लोकांसाठी आरक्षित असलेल्या जागा कमी असल्यामुळे त्यांना मदत करणारे एक-दोन सदस्यच त्यांच्यासोबत बसू शकतात.
◼ दुपारचे जेवण: अधिवेशनाचे ठिकाण सोडून बाहेर जेवायला जाण्याऐवजी कृपया घरुनच जेवण घेऊन यावे. पाण्याचे कूलर किंवा जेवणाचा डबा आणल्यास सीटच्या खाली मावेल इतके लहान असावे. अधिवेशनाच्या ठिकाणी मोठमोठे कूलर किंवा जेवणाचे डबे आणि काचेची भांडी आणण्यास मनाई आहे.
◼ दान: जगभरात चाललेल्या कार्यासाठी, अधिवेशनात ठेवलेल्या दानपेट्यांमध्ये स्वेच्छेने दान टाकून आपण अधिवेशनाच्या व्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकतो. तुम्ही जर चेकद्वारे अनुदान देत असाल तर ते चेक “द वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया”ला देय केले पाहिजे.
◼ औषधोपचार: तुम्ही नियमितपणे काही विशिष्ट औषधे घेत असाल, तर त्यांचा पुरेसा साठा सोबत घेऊन या; ती अधिवेशनात उपलब्ध नसतील. जे बंधुभगिनी मधुमेहासाठी इंजेक्शन घेतात त्यांनी वापरलेले सिरिंज व सुया अधिवेशनातील किंवा हॉटेलमधील कचरा पेट्यांत टाकू नयेत, तर त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.
◼ वैयक्तिक सुरक्षा: घसरून किंवा अडखळून पडल्यामुळे होणाऱ्या दुखापती टाळण्याची विशेष काळजी घ्या. योग्य प्रकारचे बूट किंवा चपला न घातल्यामुळे आणि खासकरून उंच टाचेच्या चपला घातल्यामुळे दरवर्षी अनेकांना दुखापती होतात. तेव्हा, योग्य मापाचे बूट किंवा चपला घाला; यामुळे अधिवेशनगृहात, पायऱ्यांवरून किंवा जाळी असलेल्या मार्गावरून तुम्हाला सुरक्षितपणे चालता येईल.
◼ बाबागाड्या आणि आरामखुर्च्या: अधिवेशनाच्या ठिकाणी बाबागाड्या आणि आरामखुर्च्या आणण्याची परवानगी नाही. पण आईवडील, बाळांसाठी असलेल्या खास (चाईल्ड-सेफ्टी) सीट्स त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर ठेवू शकतात.
◼ अत्तरे: बहुतेक अधिवेशने बंद ठिकाणी होत असल्यामुळे यंत्राच्या साहाय्याने हवा खेळती ठेवण्याची सोय केली जाते. त्यामुळे, अशा ठिकाणी उग्र वासाची अत्तरे, कोलोन व परफ्यूम वापरण्याचे टाळावे. कारण यांमुळे श्वसनसंबंधित विकार असलेल्यांना त्रास होतो. याबाबतीत काळजी घेण्याद्वारे आपण इतरांबद्दल प्रेम दाखवतो.—१ करिंथ. १०:२४.
◼ प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्म: अधिवेशनाच्या काळात अनौपचारिक साक्ष दिल्यानंतर कोणी आवड दाखवली, तर त्या व्यक्तीबद्दलची माहिती देण्याकरता प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्मचा उपयोग केला जावा. पूर्णपणे भरलेला फॉर्म एकतर पुस्तक विभागाला किंवा अधिवेशनाहून परतल्यावर तुमच्या मंडळीतील सचिवाला दिला जाऊ शकतो.
◼ रेस्ट्रॉन्ट: रेस्ट्रॉन्टमध्ये असताना आपल्या उत्तम आचरणाद्वारे यहोवाच्या नावाचा गौरव करा. ख्रिस्ती सेवकाला शोभेल असा पेहराव करा. टिप देण्याची प्रथा असल्यास ती द्या.
◼ हॉटेल:
(१) कृपया गरजेपेक्षा जास्त रूमचे आरक्षण करू नका; आणि जितक्या लोकांना एका रूममध्ये राहण्याची परवानगी आहे तितक्याच लोकांनी त्यात राहावे.
(२) निकडीची परिस्थिती असल्याशिवाय बुकींग रद्द करू नका. रद्द करावे लागलेच तर लवकरात लवकर हॉटेलला कळवा, जेणेकरून ज्यांना गरज आहे त्यांच्या राहण्याची सोय होऊ शकेल. (मत्त. ५:३७) आणि आवर्जून कॅनस्लेशन नंबर मागा. ज्या तारखेसाठी तुम्ही बुकींग केले आहे त्याच्या कमीतकमी दोन दिवसांआधी ते रद्द करा. असे न केल्यास, तुम्हाला तुमचे डिपॉझिट परत मिळणार नाही.
(३) रूम बुक करताना तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर लक्षात ठेवा, की काही हॉटेल तुमच्या खात्यातील एक विशिष्ट रक्कम राखून ठेवतात. रूम बुकींगसाठी व त्यासोबतच काही नुकसान झाल्यास किंवा एखादा आकस्मिक प्रसंग उद्भवल्यास भरपाई करण्यासाठी या रकमेचा उपयोग केला जातो. या सर्व गोष्टींचा हिशोब चुकता झाल्याशिवाय तुम्ही त्या रकमेचा उपयोग करू शकणार नाही.
(४) गरज असेल तेव्हाच सामान वाहून नेण्याची ट्रॉली (लगेज कार्ट) घ्या आणि वापरून झाल्यावर लगेच परत करा म्हणजे इतर जण ती वापरू शकतील.
(५) हॉटेल कर्मचारी तुमचे सामान उचलून नेत असतील तर त्यांना व हाऊसकीपरला टिप द्या.
(६) स्वयंपाक करण्याची परवानगी असेल तरच रुममध्ये स्वयंपाक करा.
(७) काही वेळा हॉटेलमध्ये राहणाऱ्यांना नाश्ता, कॉफी किंवा बर्फ यांसारख्या गोष्टी मोफत दिल्या जातात. हॉटेलमध्ये असतानाच या गोष्टींचा फायदा घेतला जाऊ शकतो. तेव्हा, अधिवेशनात घेऊन जाण्याद्वारे त्यांचा गैरफायदा घेऊ नका.
(८) हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी वागताना सर्व प्रसंगी आत्म्याचे फळ प्रदर्शित करा. त्यांना सहसा अनेक लोकांकडे लक्ष द्यावे लागते. तेव्हा, आपण जर त्यांच्याशी दयाळूपणे, सहनशीलतेने व समंजसपणे वागलो तर त्यांना बरे वाटेल.
(९) स्विमिंग पूल, लिफ्ट, लॉबी, जिम अथवा हॉटेलच्या परिसरात कोठेही असताना पालकांनी सर्व प्रसंगी मुलांवर लक्ष ठेवावे.
(१०) सुचवलेल्या हॉटेलांच्या यादीत दाखवलेले रूमचे भाडे हे दर दिवसाचे भाडे असते; त्यात टॅक्सचा समावेश नसतो. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तुमच्याकडे जादा पैसे मागितल्यास ते देऊ नका आणि लगेच अधिवेशनातील रूमिंग विभागाला याविषयी कळवा.
(११) तुमच्या रूमसंबंधी काही समस्या निर्माण झाल्या तर अधिवेशनादरम्यान रूमिंग विभागाला याविषयी कळवा जेणेकरून ते तुम्हाला मदत करू शकतील.
◼ स्वयंसेवा: अधिवेशनात काम करण्यास इच्छुक असलेल्यांनी स्वयंसेवा विभागाशी संपर्क साधावा. १६ पेक्षा कमी वयाची मुलेदेखील पालकांच्या किंवा पालकांची अनुमती असलेल्या एखाद्या प्रौढ व्यक्तीच्या देखरेखीखाली काम करू शकतात.