“परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा”
१. येणाऱ्या अधिवेशनात आपले आचरण चांगले ठेवणे महत्त्वाचे का आहे?
१ दरवर्षी अधिवेशनांमुळे लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते. तेव्हा यहोवाचे उपासक या नात्याने आपल्या आचरणाकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. (लेवी. २०:२६) आपल्या सभ्य वागणुकीमुळे व शालीन पेहरावामुळे आपण ख्रिस्ताचे खरे अनुयायी आहोत हे स्पष्टपणे दिसून आले पाहिजे. तर मग, येणाऱ्या प्रांतीय किंवा आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहताना आपण “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले” कसे ठेवू शकतो? आणि याद्वारे आपल्या स्वर्गीय पित्याचा गौरव कसा करू शकतो?—१ पेत्र २:१२.
२. अधिवेशनादरम्यान आपण ख्रिस्ती गुण कसे दाखवू शकतो?
२ ख्रिस्ती गुण दाखवा: आपण एकमेकांना जे प्रेम दाखवतो व “बाहेरच्या लोकांबरोबर” ज्या प्रकारे वागतो त्यात आणि जगात दिसणाऱ्या मनोवृत्तीत खूप फरक आहे. (कलस्सै. ३:१०; ४:५; २ तीम. ३:१-५) अधिवेशनाच्या वेळी आपण हॉटेलमध्ये राहणार असू किंवा रेस्ट्रॉन्टमध्ये जेवायला जाणार असू तर तेथे काम करणाऱ्या लोकांशी आपण प्रेमळपणे व सहनशीलतेने वागले पाहिजे. तुमच्यासाठी छोटीमोठी कामे करणाऱ्यांना लहानसे बक्षीस देणे हासुद्धा शिष्टाचाराचाच भाग आहे.
३. आईवडिलांना कशाची आठवण करून देण्यात आली आहे, आणि का?
३ अधिवेशनाच्या ठिकाणी, हॉटेलमध्ये आणि रेस्ट्रॉन्टमध्ये आईवडिलांनी मुलांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. (नीति. २९:१५) एका हॉटेलच्या मॅनेजरने एका ख्रिस्ती जोडप्याला असे म्हटले: “आम्हाला तुमचे लोक खूप आवडतात. तुमचे लोक, तुमची मुलं खरंच खूप सभ्य आणि प्रेमळ आहेत. इथं काम करणारे सर्व लोक तुमचं नाव काढतात. दर शनिवारी-रविवारी तुम्ही इथं यावं असं आम्हाला वाटतं.”
४. अधिवेशन ज्या शहरात आहे त्या ठिकाणी असताना आपण आपल्या पेहरावाकडे लक्ष का दिले पाहिजे?
४ शालीन पेहराव: अधिवेशनादरम्यान आपला पेहराव योग्य व शालीन असला पाहिजे. आपल्या पेहराव्यावरून, जगात सर्रासपणे दिसणाऱ्या टोकाच्या स्टाईल प्रदर्शित होऊ नयेत. (१ तीम. २:९) हॉटेलमध्ये राहायला जाताना व तेथून बाहेर पडताना; तसेच अधिवेशनाच्या अगोदरच्या व नंतरच्या वेळात आपण प्रसंगानुसार पेहराव करत असलो, तरी तो गबाळा मुळीच असू नये. शालीन पेहराव केल्यामुळे आपण गर्वाने अधिवेशनाचे बॅज कार्ड लावू शकू आणि संधी मिळाल्यास लाज न वाटता साक्ष देऊ शकू. येणाऱ्या अधिवेशनात आपला शालीन पेहराव व चांगले आचरण पाहून नम्र अंतःकरणाचे लोक बायबलच्या जीवनदायक संदेशाकडे आकर्षित तर होतीलच, शिवाय त्यामुळे यहोवाचे मनही आनंदित होईल.—सफ. ३:१७.