स्मारकविधीच्या काळात तुमचा आनंद द्विगुणित करा!
१. स्मारकविधीच्या काळात आपला आनंद द्विगुणित करण्याचा एक मार्ग कोणता?
१ तुम्हाला मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांदरम्यान आणखी आनंद अनुभवायला आवडेल का? असे करण्याचा एक मार्ग म्हणजे आपले सेवाकार्य वाढवणे, आणि शक्य असल्यास साहाय्यक पायनियरिंग करणे. यामुळे तुमचा आनंद कसा द्विगुणित होईल?
२. आपले सेवाकार्य वाढवल्यामुळे आपला आनंद द्विगुणित होतो तो कशा प्रकारे?
२ आनंद द्विगुणित करा: आपल्यामध्ये असलेली आध्यात्मिक भूक भागवताना आपण आनंदाने व समाधानी वृत्तीने यहोवाची उपासना करावी अशा प्रकारे त्याने आपली निर्मिती केली आहे. (मत्त. ५:६) शिवाय, त्याने आपली निर्मिती अशा प्रकारेदेखील केली आहे, की इतरांना काही दिल्यामुळे आपल्याला आनंद होतो. (प्रे. कृत्ये २०:३५) आपल्या सेवाकार्याद्वारे आपण या दोन्ही गोष्टी करतो—देवाची उपासना आणि लोकांना मदत. त्यामुळे, साहजिकच जेव्हा आपण आपले सेवाकार्य वाढवतो तेव्हा आपला आनंद द्विगुणित होतो. शिवाय, प्रचार कार्यात आपण जितका जास्त भाग घेतो, तितके जास्त आपण तरबेज बनतो. तरबेज बनल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपली भीती कमी होते. यामुळे, साक्ष देण्याच्या आणि बायबल अभ्यास सुरू करण्याच्या बऱ्याच संधी आपल्याला मिळतील. या सर्व कारणांमुळे आपले सेवाकार्य आणखी आनंददायक बनते.
३. मार्च आणि एप्रिल हे महिने साहाय्यक पायनियरिंग करण्यासाठी इतके खास का आहेत?
३ मार्च आणि एप्रिल हे महिने साहाय्यक पायनियरिंग करण्यासाठी खूप खास आहेत, कारण या महिन्यांत आपण ३० किंवा ५० तास भरण्याची निवड करू शकतो. शिवाय, स्मारकविधीच्या निमंत्रणपत्रिका वाटपाची मोहीम शनिवार, २२ मार्च पासून ते सोमवार, १४ एप्रिलपर्यंत सुरू राहील. या मोहिमेत भाग घेऊन इतरांना स्मारकविधीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्याद्वारे आपण आपला आनंद वाढवू शकतो. नियुक्त वेळेत जास्तीत जास्त क्षेत्र पूर्ण करण्यासाठी बरेच बंधुभगिनी “खांद्याला खांदा लावून” या मोहिमेत भाग घेतील. यामुळे, मंडळीमध्ये आनंददायक वातावरण तयार होईल.—सफ. ३:९, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर.
४. आपल्याला साहाय्यक पायनियरिंग करायचे असेल तर आपण काय केले पाहिजे?
४ आताच तयारी करा: जर तुम्ही अद्यापही तयारी केली नसेल, तर तुमच्या आराखड्याची पाहणी करा आणि एक किंवा जास्त महिन्यांत आपली सेवा वाढवण्यासाठी तुम्हाला कोणते काही फेरबदल करावे लागतील ते पाहा. याबद्दल यहोवाला प्रार्थना करा. (याको. १:५) तुमच्या कुटुंबासोबत किंवा मंडळीतील बंधुभगिनींसोबत याविषयी चर्चा करा. (नीति. १५:२२) आरोग्याच्या समस्या असूनही किंवा कामात खूप व्यस्त असूनही तुम्ही साहाय्यक पायनियरिंग करता, तेव्हा किती आनंद मिळतो हे तुम्हीदेखील अनुभवू शकता.
५. स्मारकविधीच्या काळात आपण आपले सेवाकार्य वाढवल्यामुळे कोणते परिणाम घडून येतील?
५ यहोवाच्या उपासकांनी आनंदी राहावे अशी त्याची इच्छा आहे. (स्तो. ३२:११) स्मारकविधीच्या काळात आपले सेवाकार्य वाढवण्यास झटल्यामुळे आपल्याला तर आनंद होईलच, शिवाय आपल्या स्वर्गीय पित्यालाही आनंद होईल.—नीति. २३:२४; २७:११.