केवळ मूक सोबती असू नका
१. क्षेत्र सेवेत इतर प्रचारकांसोबत काम करत असताना आपण प्रेषित पौलाच्या मनोवृत्तीचे अनुकरण कसे करू शकतो?
१ सहविश्वासू बांधवांसोबत वेळ घालवल्यामुळे आपल्याला त्यांना “उत्तेजन” देण्याच्या संधी मिळतात, असे प्रेषित पौलाला वाटत होते. (रोम. १:१२) क्षेत्र सेवेत इतर प्रचारकांसोबत काम करत असताना या संधीचा फायदा घेऊन तुम्ही त्यांना उत्तेजन व मदत देता का? मूक सोबती असण्यापेक्षा, प्रभावी प्रचारक बनण्यास कोणत्या गोष्टीने मदत मिळाली ते तुम्ही त्यांना सांगू शकता का?
२. आपल्यासोबत सेवेत काम करणाऱ्या बांधवाचा किंवा बहिणीचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण कायकाय करू शकतो? असे करणे महत्त्वाचे का आहे?
२ आत्मविश्वास वाढवा: सुवार्तेची घोषणा करणाऱ्या काही बंधुभगिनींमध्ये आत्मविश्वासाची कमी असते. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव किंवा आवाज यांवरून आपण ते ओळखू शकतो. तेव्हा, त्यांची मनापासून प्रशंसा करून आपण त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकतो. कसे करू शकतो हे आपण? एक प्रवासी पर्यवेक्षक त्यांच्यासोबत क्षेत्र सेवेत काम करत असलेल्या सोबत्याला सांगतात, की त्यांच्या मनात कोणती भीती होती व या भीतीवर मात करण्यास मदत मिळावी म्हणून ते यहोवाला कसे प्रार्थना करतात. आणखी एका बांधवाने त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ते काय करतात ते सांगितले: “मी घरमालकाकडे बघून स्मितहास्य करतो. पण तोंडावर हे साधेसे स्मितहास्य आणण्यासाठीसुद्धा मला आधी मनात छोटीशी प्रार्थना करावी लागते.” सेवेत तुमचा आत्मविश्वास कशाने वाढला? ते तुमच्यासोबत काम करणाऱ्या बांधवाला अथवा बहिणीला सांगा.
३. आपल्यासोबत असलेल्या बांधवाला अथवा बहिणीला सेवेत आणखी प्रभावी होण्यास मदत करण्याकरता आपण त्यांना कायकाय सांगू शकतो?
३ वेगवेगळ्या पद्धतींविषयी सांगा: एखाद्या स्थानीय घटनेबद्दलचे एक विधान करून किंवा प्रश्न विचारून घरमालकाबरोबर संभाषण सुरू करणे तुम्हाला सोपे वाटते का? नमुना सादरीकरणातील एखादे सादरीकरण तुमच्या शब्दांत मांडल्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळाले आहेत का? घरमालकाच्या परिस्थितीनुसार तुम्ही तुमच्या सादरतेत बदल कसा करता? मग हे तुम्ही तुमच्यासोबत सेवेत असलेल्या बांधवाला अथवा बहिणीला सांगू शकता. (नीति. २७:१७) पुनर्भेट घ्यायला जात असताना, आपण ही भेट घ्यायला का जात आहोत आणि तिथे गेल्यावर तुम्ही कोणत्या विषयावर चर्चा करणार आहात ते सांगा. बायबल अभ्यासानंतर परत जाताना तुम्ही तुमच्यासोबत असलेल्या बांधवाला अथवा बहिणीला सांगू शकता, की तुम्ही विद्यार्थ्यामुळे अमुक एक मुद्दा, वचन किंवा शिकवण्याची पद्धत निवडली.
४. सेवेत आपल्यासोबत असलेल्या बांधवाला व बहिणीला मदत करण्याची आपण इच्छा का दाखवली पाहिजे?
४ पहिल्या शतकात सुवार्तेची घोषणा करणारे फक्त, यहोवा व त्याच्या उद्देशांविषयी कसलीही माहिती नसलेल्या लोकांनाच नव्हे तर एकमेकांनाही मदत करण्यास तयार होते. एकमेकांना उत्तेजन देणे व त्यांचे आत्मबळ वाढवणे महत्त्वाचे आहे हे त्यांनी जाणले होते. (प्रे. कृत्ये ११:२३; १५:३२) प्रेषित पौलाने तरुण तीमथ्याला प्रशिक्षण दिले आणि त्याने शिकलेल्या गोष्टी इतरांना सांगायचे प्रोत्साहन दिले. (२ तीम. २:२) सेवेत असताना आपण आपल्यासोबतच्या बांधवाला अथवा बहिणीला अशी मदत करून त्यांचे भले करतो तेव्हा ते आनंदित होतात व प्रभावी प्रचारक बनण्यास त्यांना मदत मिळते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण आपल्या स्वर्गीय पित्याचे मन आनंदित करतो.—इब्री १३:१५, १६.