आस्था दाखवणाऱ्या लोकांना लगेच जाऊन भेटा
१ “ज्या दिवसाचे काम त्याच दिवशी करावे,” हे आपण अनेकदा ऐकले असेल. दुसऱ्या शब्दांत, एखादे महत्त्वाचे काम करायचे असल्यास ते लगेच पूर्ण करावे, उद्यावर ढकलू नये. ही गोष्ट आपण सेवाकार्यातही लागू करू शकतो हे पुढील उदाहरणावरून दिसून येते.
२ एका बहिणीने एका माणसाला एक पुस्तक दिले व पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले. एका तासानंतर दुसरी एक बहीण चुकीने त्याच माणसाच्या घरी गेली. त्याने दार उघडले तेव्हा पुस्तक त्याच्या हातातच होते. तिला पाहून तो म्हणाला: “तुम्ही येणार हे माहीत होतं, पण इतक्या लवकर याल हे माहीत नव्हतं. बरं या, आत या, मी अभ्यास करायला तयार आहे.” अर्थात, अशी झटपट पुनर्भेट घेणे नेहमीच शक्य नसले तरी सेवाकार्यात आस्थेवाईक लोकांची लगेच भेट घेणे किती गरजेचे आहे हे या उदाहरणावरून दिसून येते.
३ लोकांना अधिक मदतीची गरज आहे: आपल्या प्रकाशनांतील माहिती लोकांना समजण्यास व या माहितीचा त्यांच्या जीवनाशी व भवितव्याशी संबंध आहे हे पाहण्यास त्यांना मदत करता यावी म्हणून पुनर्भेटीची योजना करणे गरजेचे आहे; शक्यतो पहिली भेट घेतल्याच्या काही दिवसांतच पुनर्भेट घेणे गरजेचे आहे. आपण हे कसे करू शकतो? आपण पुन्हा भेटणार आहोत याची त्या व्यक्तीला कल्पना दिल्यामुळे तिला कितपत आस्था आहे हे समजण्यास आपल्याला मदत मिळेल.
४ पुनर्भेटीसाठी मार्ग तयार करा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे एखाद्या व्यक्तीकडून एक विशिष्ट वेळ ठरवून घेणे सोपे नाही; आणि तिने वेळ दिली तरी ती तिच्या लक्षात राहीलच असे नाही. असे असले तरी, पुनर्भेट घेण्याची वेळ तुम्ही काळजीपूर्वक लिहून ठेवता आणि शक्य असल्यास काही दिवसांतच आवर्जून त्या व्यक्तीची भेट घेता तेव्हा दिलेला शब्द तुम्ही गांभीर्याने पाळत असता. जर आस्थेवाईक व्यक्ती घरी नसेल तर तिच्याशी संपर्क साधण्याचा आवर्जून प्रयत्न करत राहा. तिची भेट घेण्याचा तुम्ही सातत्याने जो प्रयत्न करत आहात ते पाहून ती व्यक्ती कदाचित तुम्हाला भेटण्यास तयार होऊ शकते.
५ एका व्यक्तीला आस्था आहे की नाही हे पहिल्याच भेटीत ठरवणे सहसा शक्य नसते. त्यामुळे, तिने थोडी जरी आस्था दाखवली तरी पुन्हा तिला भेटण्याची नोंद करून ठेवा. अशा व्यक्तीला लवकरात लवकर भेट देणे फायदेकारक ठरू शकते. तुम्ही कदाचित त्या व्यक्तीची आस्था जागृत केली असेल आणि तुम्ही पुन्हा तिची भेट घेता तेव्हा ती आनंदाने तुमचे स्वागत करते हे पाहून तुम्ही चकित व्हाल. तेव्हा आस्था दाखवणाऱ्या लोकांना लगेच जाऊन भेटा!