देवाचा गौरव करणारे आचरण
१. आपण प्रांतीय अधिवेशनांना उपस्थित राहतो तेव्हा पटकन लोकांच्या नजरेत का येतो?
१ आपण प्रांतीय अधिवेशनांना उपस्थित राहतो तेव्हा पटकन लोकांच्या नजरेत येतो. ज्या शहरांत अधिवेशने होतात तेथील प्रसारमाध्यमे सहसा लोकांना आपल्या उपस्थितीबद्दल सांगतात. हॉटेल आणि रेस्टॉरंट, अधिवेशनाला आलेल्या लोकांनी भरलेली असतात. बॅच कार्ड लावलेले अनेक यहोवाचे साक्षीदार लगेच लोकांच्या नजरेत येतात. तेव्हा, अधिवेशन शहरात असताना आपण पुढील गोष्टी लक्षात ठेवल्यास आपल्या उत्तम आचरणाद्वारे आपल्याला देवाचा गौरव करणे शक्य होईल.—१ पेत्र २:१२.
२. अधिवेशनाच्या शहरात आपण आपल्या शालीन पेहरावाद्वारे देवाचा गौरव कसा करू शकतो?
२ शालीन पेहराव: कार्यक्रमादरम्यान आपण जो शालीन पेहराव करतो त्याचा सहसा पाहणाऱ्यांवर चांगला प्रभाव पडतो. पण, इतर वेळी म्हणजे आपण जेव्हा हॉटेलमध्ये पोहचतो, रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो किंवा खरेदी करायला जातो तेव्हा आपण जो पेहराव करतो त्याचा लोकांवर सगळ्यात जास्त प्रभाव पडतो. अर्थात, अशा प्रसंगी आपण जो पेहराव करतो आणि अधिवेशनाला जाताना आपण जो पेहराव करतो तो सहसा वेगळा असतो. असे असले तरी आपण इतर वेळी केलेला पेहरावसुद्धा सभ्य व शालीन असावा; गबाळा मुळीच नसावा. पाहणाऱ्यांना आपल्यामधील आणि इतरांमधील फरक दिसला पाहिजे. (रोम. १२:२) तसेच, आपण आपले बॅच कार्ड लावले पाहिजे, कारण ते आपल्या अधिवेशनाची प्रसिद्धी करते, साक्ष देण्याच्या संधी निर्माण करते आणि अधिवेशनाला आलेल्या बंधुभगिनींना आपली ओळख करून देते.
३. आपण धीर आणि चांगुलपणा कसा दाखवू शकतो?
३ धीर आणि चांगुलपणा: हल्ली जगातले बहुतेक लोक स्वार्थी, उपकारांची जाण न राखणारे आहेत. अशा या जगात आपण धीर आणि चांगुलपणा दाखवला तर पाहणाऱ्यांना, जसे की हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांना नक्कीच खूप तजेला मिळेल. (२ तीम. ३:१-५) जागा राखून ठेवताना आणि प्रकाशित झालेले नवीन साहित्य घेण्यासाठी रांगेत उभे राहताना आपण नेहमी स्वतःचे नव्हे तर इतरांचे हित पाहिले पाहिजे. (१ करिंथ. १०:२३, २४) पहिल्यांदाच अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या एका आस्थेवाईक व्यक्तीने म्हटले: “त्या दिवशी देण्यात आलेलं एकही भाषण मला आठवत नाही, पण यहोवाच्या साक्षीदारांच्या वागणुकीनं मात्र माझ्या मनावर खोलवर प्रभाव पाडला.”
४. आपापल्या परिस्थितीनुसार अधिवेशनात स्वयंसेवक म्हणून काम करण्याचा आपण विचार का करावा?
४ स्वयंसेवक: स्वयंसेवा हे खऱ्या ख्रिश्चनांचे ओळखचिन्ह आहे. (स्तो. ११०:३) तुम्ही अधिवेशनात मदत करण्यासाठी पुढे येऊ शकता का? एका ठिकाणी जवळजवळ ६०० बंधुभगिनी अधिवेशनाच्या आधी साफसफाई करण्यासाठी स्वेच्छेने आले होते. हे पाहून तेथील कर्मचाऱ्यांनी असे म्हटले: “आम्ही तर हे पहिल्यांदाच पाहतोय, आमचा तर विश्वासच बसत नाही की हे सर्व लोक स्वयंसेवक आहेत.” आपण २०१३ च्या प्रांतीय अधिवेशनाची फार आतुरतेने वाट पाहत आहोत. कारण तेव्हा आपल्याला फक्त देवाकडून ऐकण्याची आणि शिकण्याचीच नव्हे, तर त्याचा गौरव करण्याचीही संधी मिळेल.
[२ पानांवरील चित्र]
२०१३ च्या प्रांतीय अधिवेशनासाठी लक्षात ठेवायच्या सूचना
◼ कार्यक्रमाची वेळ: सभागृहाचे दरवाजे सकाळी ८:०० वाजता उघडले जातील. तिन्ही दिवशी सुरुवातीचे संगीत सकाळी ९:२० ला सुरू होईल. संगीत सुरू होते तेव्हा सर्वांनी आपापल्या जागेवर बसावे जेणेकरून कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय पद्धतीने होईल. समारोपाचे गीत आणि प्रार्थना शुक्रवारी व शनिवारी संध्याकाळी ४:५० ला आणि रविवारी ३:३५ ला होईल.
◼ पार्किंग: सभागृहाच्या व्यवस्थापनाने पार्किंगची जबाबदारी आपल्यावर सोपवल्यास, जसजशा गाड्या येतील तसतशी त्यांना पार्किंगसाठी जागा मोफत दिली जाईल. पार्किंगची जागा सहसा कमी असल्यामुळे, होईल तितके कारपूलींग करावे, म्हणजे प्रत्येकाने आपापल्या गाड्या आणण्यापेक्षा दुसऱ्यांच्या गाडीत जागा असल्यास त्यांच्या गाडीतून प्रवास करावा. अपंगांसाठी राखीव असलेल्या जागेत इतरांनी पार्किंग करू नये.
◼ जागा राखणे: केवळ तुमच्यासोबत एकाच कारमधून प्रवास करणाऱ्यांसाठी किंवा एकाच घरात तुमच्याबरोबर राहणाऱ्यांसाठी, तसेच तुमच्या बायबल विद्यार्थ्यांसाठी जागा राखून ठेवल्या जाव्यात. वयोवृद्धांसाठी आणि आजारी लोकांसाठी आरक्षित असलेल्या जागा कमी असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना त्यांच्यासोबत बसणे शक्य नाही. तेव्हा या जागा वयोवृद्ध व आजारी लोकांसाठी आणि त्यांना मदत करणाऱ्यांसाठी ठेवाव्यात.—१ करिंथ. १३:५.
◼ दुपारचे जेवण: दुपारच्या जेवणासाठी अधिवेशनाचे ठिकाण सोडून बाहेर जाण्याऐवजी कृपया सोबत साधे जेवण घेऊन या.
◼ दान: जगभरात चाललेल्या कार्यासाठी, अधिवेशनात असलेल्या दानपेट्यांमध्ये स्वेच्छेने दान टाकून आपण अधिवेशनाच्या व्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकतो. तुम्ही जर चेकद्वारे अनुदान देत असाल तर ते चेक “द वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया”ला देय केले पाहिजे.
◼ औषधोपचार: तुम्ही काही विशिष्ट औषधे घेत असाल तर त्यांचा पुरेसा साठा सोबत घेऊन या, कारण ती अधिवेशनात उपलब्ध नसतील. जे बंधुभगिनी मधुमेहासाठी इंजेक्शन घेतात त्यांनी वापरलेले सिरिंज व सुया अधिवेशनातील किंवा हॉटेलमधील कचरा पेट्यांत टाकू नयेत, तर त्यांची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी.
◼ बूट व चपला: अनुचित प्रकारचे बूट किंवा चपला घातल्यामुळे, खासकरून उंच टाचेच्या चपला घातल्यामुळे दर वर्षी अनेकांना दुखापती होतात. अधिवेशनगृहात, पायऱ्यांवरून किंवा जाळी असलेल्या मार्गावर सुरक्षितपणे चालता यावे म्हणून योग्य व आपल्याच मापाचे बूट किंवा चपला घालणे उचित असेल.
◼ कर्णबधिर: काही निवडक ठिकाणी संकेत भाषेतदेखील कार्यक्रम सादर केला जाईल.
◼ अत्तरे: बहुतेक अधिवेशने बंद ठिकाणी होत असल्यामुळे यंत्राच्या साहाय्याने हवा खेळती ठेवण्याची सोय केली जाते. त्यामुळे, अशा ठिकाणी उग्र वासाची अत्तरे, कोलोन व परफ्यूम वापरण्याचे टाळावे. कारण यांमुळे श्वसनसंबंधित विकार असलेल्यांना त्रास होतो. तेव्हा याबाबतीत काळजी घेण्याद्वारे आपण इतरांबद्दल प्रेम दाखवतो.—१ करिंथ. १०:२४.
◼ प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्म्स: अधिवेशनाच्या काळात, अनौपचारिक साक्ष दिल्यानंतर जर कोणी आस्था दाखवली तर त्या व्यक्तीविषयीची माहिती देण्याकरता प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्मचा उपयोग केला पाहिजे. पूर्ण भरलेले फॉर्म एकतर पुस्तक विभागाला किंवा अधिवेशनाहून परतल्यावर तुमच्या मंडळीतील सचिवाला दिले जाऊ शकतात.
◼ रेस्टॉरंट: रेस्टॉरंटमध्ये गेल्यास आपल्या उत्तम वागणुकीद्वारे यहोवाच्या नावाला गौरव आणा. ख्रिस्ती सेवकाला शोभेल असा पेहराव करा. टिप देण्याची प्रथा असल्यास ती द्या.
◼ हॉटेल्स:
(१) कृपया गरजेपेक्षा जास्त खोल्यांचे आरक्षण करू नका; आणि जितक्या लोकांना एका खोलीत राहण्याची परवानगी आहे तितक्याच लोकांनी एका खोलीत राहावे.
(२) निकडीची परिस्थिती असल्याशिवाय आरक्षण रद्द करू नका. आणि रद्द करावे लागलेच तर लवकरात लवकर हॉटेलला कळवा, जेणेकरून ज्यांना गरज आहे त्यांच्या राहण्याची सोय होऊ शकेल. (मत्त. ५:३७) आरक्षण रद्द केल्यास ते रद्द झाले आहे याची खातरी करा. ऐनवेळी आरक्षण रद्द केल्यास तुम्हाला कदाचित तुमचे डिपॉझिट परत केले जाणार नाही.
(३) रूम बुक करताना तुम्ही जर तुमच्या डेबिट किंवा क्रेडीट कार्डचा वापर करत असाल तर लक्षात ठेवा, की काही हॉटेल तुमच्या खात्यातील एक विशिष्ट रक्कम राखून ठेवतात. रूम बुकींगसाठी व त्यासोबतच तुम्ही राहत असताना काही नुकसान झाल्यास किंवा एखादा आकस्मिक प्रसंग उद्भवल्यास या रकमेचा उपयोग केला जातो. या सर्व गोष्टींचा हिशेब चुकता झाल्याशिवाय तुम्ही त्या रकमेचा उपयोग करू शकणार नाही.
(४) तुम्हाला लागेल तेव्हाच सामान वाहण्याची ट्रॉली (लगेज कार्ट) घ्या आणि काम झाल्यावर लगेच परत करा म्हणजे इतर जण ती वापरू शकतील.
(५) हॉटेल कर्मचारी तुमचे सामान उचलून नेत असतील तर त्यांना व हाऊसकीपरला प्रत्येक दिवशी टिप द्या.
(६) स्वयंपाक करण्याची परवानगी असलेल्या खोल्यांमध्येच स्वयंपाक करा.
(७) हॉटेलमध्ये राहणाऱ्यांकरता नाश्ता, कॉफी किंवा बर्फ यांसारख्या मोफत दिल्या जाणाऱ्या गोष्टींचा गैरफायदा घेऊ नका. या सोयी फक्त हॉटेलमध्ये राहणाऱ्यांसाठीच असतात.
(८) हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी वागताना सर्व वेळी आत्म्याचे फळ प्रदर्शित करा. त्यांना अनेक लोकांकडे लक्ष द्यावे लागते. तेव्हा, आपण जर त्यांच्याशी दयाळूपणे, सहनशीलतेने व समंजसपणे वागलो तर त्यांना बरे वाटेल.
(९) स्विमिंग पूल, लॉबी, जिम, लिफ्ट अथवा हॉटेलच्या परिसरात कोठेही असताना पालकांनी सर्व प्रसंगी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे.
(१०) सुचवलेल्या हॉटेलांच्या यादीत दाखवलेले खोल्यांचे भाडे हे दर दिवसाचे भाडे असते, पण त्यात टॅक्सचा समावेश नसतो. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तुमच्याकडे जादा पैसे मागितल्यास ते देऊ नका आणि लगेच अधिवेशनातील रूमिंग विभागाला याविषयी कळवा.
(११) तुमच्या हॉटेलच्या खोलीसंबंधी काही समस्या निर्माण झाली तर अधिवेशनातील रूमिंग विभागाला याविषयी कळवा.
◼ स्वयंसेवा: अधिवेशनात काम करण्यास इच्छुक असलेल्यांनी स्वयंसेवा विभागाशी संपर्क साधावा. १६ पेक्षा कमी वयाची मुलेदेखील पालकांच्या किंवा पालकांची अनुमती असलेल्या एखाद्या प्रौढ व्यक्तीच्या देखरेखीखाली काम करू शकतात.