साक्ष देण्यात कोणतीही कसूर करू नका
१. प्रेषित पौलाने सेवाकार्य करण्यात आपल्यासाठी कोणते चांगले उदाहरण मांडले?
१ “तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर.” (२ तीम. ४:५) पौल निःसंकोचपणे तीमथ्याला हा सल्ला देऊ शकला कारण त्याला सोपवलेली सेवा त्याने पूर्ण केली होती. इ.स ४७ ते ५६ या काळादरम्यान पौलाने तीन मिशनरी दौरे पूर्ण केले. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात अनेक वेळा आपल्याला वाचायला मिळते की पौलाने साक्ष देण्यात कोणतीही कसूर केली नाही. (प्रे. कृत्ये २३:११; २८:२३) पौलाच्या या उदाहरणाचे आज आपण कसे अनुकरण करू शकतो?
२. घरोघरचे साक्षकार्य करण्यात आपण कोणतीही कसूर करत नाही हे आपण कसे दाखवू शकतो?
२ घरोघरचे साक्षकार्य: घरमालकाला साक्ष देण्यासाठी आपल्याला कदाचित वेगवेगळ्या वेळी त्याची भेट घ्यावी लागेल. घरातील पुरूष कदाचित आपल्याला संध्याकाळच्या वेळीच किंवा मग शनिवारी-रविवारीच घरात भेटतील. आपल्या क्षेत्रातील ज्या भागांत सहसा प्रचार केला जात नाही त्या भागांत जर आपण प्रचार कार्य केले तर आपल्याला आस्थेवाईक लोकांना शोधण्यास मदत मिळेल. प्रत्येक घरात निदान एका व्यक्तीशी तरी बोलण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. घरी कोणी नसेल तर दुसऱ्या एखाद्या वेळी त्यांना भेटण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पण वारंवार भेट देऊनसुद्धा घरात कोणी भेटले नाही तर काय? तर मग, आपण त्यांना पत्र लिहू शकतो किंवा मग फोन करू शकतो. असे केल्याने कदाचित आपल्याला चांगला प्रतिसाद मिळेल.
३. सार्वजनिक आणि अनौपचारिक साक्षकार्य करण्याच्या कोणत्या संधी आपल्याजवळ आहेत?
३ सार्वजनिक आणि अनौपचारिक साक्षकार्य: ज्या लोकांना आस्था असते अशा सर्वांना यहोवाचे साक्षीदार खरे “ज्ञान” देतात. कधीकधी तर रसत्यावर किंवा भर चौकात ते लोकांना साक्ष देतात. (नीति. १:२०, २१) आपले दैनंदिन कार्य करताना आपण साक्ष देण्याच्या संधी शोधतो का? साक्ष देण्याच्या कार्यात आपण “गढून” गेलो आहोत, असे आपल्याबद्दल म्हणता येईल का? (प्रे. कृत्ये १८:५) असल्यास, आपल्याला सोपवलेले सेवाकार्य पूर्ण करण्यात आपण कोणतीही “कसूर” करत नाही असे म्हणता येईल.—प्रे. कृत्ये १०:४२; १७:१७; २०:२०, २१, २४.
४. प्रार्थना व मनन केल्यामुळे आपल्याला आपले सेवाकार्य पूर्ण करण्यास कसा फायदा होतो?
४ पण कधीकधी वैयक्तिक कमतरतांमुळे किंवा बुजऱ्या स्वभावामुळे आपण साक्ष देण्यापासून कचरू शकतो. यहोवा आपल्या मर्यादा जाणतो हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. (स्तो. १०३:१४) अशा वेळी आपल्याला धैर्याने साक्ष देता यावी म्हणून आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो. (प्रे. कृत्ये ४:२९, ३१) तसेच वैयक्तिक अभ्यास व बायबल वचनांवर मनन करताना देवाच्या राज्याची सुवार्ता किती मौल्यवान आहे याबद्दल आपण आपली कदर वाढवू शकतो. (फिलिप्पै. ३:८) यामुळे आपण आवेशाने सुवार्ता सांगण्यास प्रोत्साहित होऊ.
५. योएलच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेत आपण कसा हातभार लावू शकतो?
५ योएल संदेष्ट्याने सांगितलेल्या भविष्यवाणीत असे म्हटले होते की यहोवाचा महान व भयंकर दिवस येण्याआधी देवाचे लोक प्रचार करत राहतील व कोणत्याही गोष्टीला त्यांच्या कार्याच्या आड येऊ देणार नाहीत. (योए. २:२, ७-९) तर मग, पुन्हा कधीही न केल्या जाणाऱ्या या कार्यात आपण स्वतःला झोकून देऊ या!